Saturday, 29 December 2018

माझा गीतापठण प्रवास - प्रस्तावना

मी गेल्या दहा वर्षात वेगवेगळ्या गावी, देशी जाऊन आले की तिथे मला काय दिसले, काय वेगळे होते, तिथल्या माणसांच्या वृत्ती, प्रवृत्ती असे लिहून ठेवत असे. ते वाचायला अनेकांना आवडले. या वर्षी मी एकही ट्रीप केली नाही का अशी विचारणा अधूनमधून होत होती. आज आता माझा पूर्ण वर्षभर घडलेला प्रवास क्रमाक्रमाने नोंदण्याचा प्रयत्न करणार आहे.


              पंधरा जानेवारी २०१७ रोजी मला आमच्या रस्त्यावर एक बोर्ड वाचायला मिळाला. १८ जानेवारीपासून निःशुल्क गीता संथा वर्ग सुरु होत आहेत. मी चौकशी केली तेव्हा कळले की गीता म्हणण्याची एक विशिष्ठ पद्धत गीताधर्म मंडळाने अंगीकारली आहे. आणि त्या अंतर्गत पुण्यात जवळपास ८० वर्ग या पद्धतीने सुरु आहेत. संपूर्ण वर्षभर हा उपक्रम चालतो. मी त्या वर्गाला जाण्याचे निश्चित केले. गेल्यावर पाहिले तर माझ्यासारख्याच आणखी २० ते २५ महिला आल्या होत्या. सगळ्यांची जुजबी ओळख झाली आणि लगेचच आमच्या बाईंनी गीताताई कुलकर्णी यांनी प्रार्थनेतला एक श्लोक आमच्याकडून म्हणून घेतला आणि वर्गाला सुरुवात झाली.

            गीतेचे एकूण अठरा अध्याय आहेत. सातशे श्लोक आहेत. मोठ्या टाईपातील गीतेची प्रत सगळ्यांना देण्यात आली. त्याचे स्वागत मूल्य केवळ २० रु. होते. प्रत्येक श्लोकात दोन ओळी आणि प्रत्येक ओळीत सोळा अक्षरे अशी बऱ्याच श्लोकांची रचना आहे. काही वेगळे आहेत. त्याबद्दल संदर्भ येईल तेव्हा सांगेनच. संस्कृत शब्दांचे उच्चार त्याच एका ठराविक पद्धतीने करावे लागतात अन्यथा एकाच अक्षरांचे उच्चार वेगळे केले की त्या शब्दांचे अर्थ बदलतात. इतर भाषेत सहसा आढळणारी अनुनासिक अक्षरे विशिष्ट तऱ्हेने उच्चारली की त्यायोगे आपली श्वसनप्रक्रिया उत्तम होते. अनेकांचे सायनस संबंधीचे विकार यामुळे आटोक्यात आल्याचे माझ्या गीतासखी आता आवर्जून सांगतात.

               गीतेच्या पहिल्या अध्यायाचे नाव आहे अर्जुन विषाद योग. पहिलाच अध्याय विषादासंबंधी आहे. पण हा विषाद अर्जुनाचा आहे. (अर्जुनाला आलेले नैराश्य).  अत्यंत शूर, वीर, सहृदयी असणारा अर्जुन. आपल्या उचित हक्कांविषयीचे सर्व प्रयत्न निर्फळ ठरल्यानंतर युद्धाशिवाय अन्य पर्याय उरला नाही तेव्हा रणांगणावर युद्धसज्ज होऊन आलेला अर्जुन. प्रत्यक्षात रणभूमीवर आल्यानंतर समोर ठाकलेल्या सेनेला पाहून अर्जुनाला आपण यांना मारुन विजय मिळवणार आहोत. या सगळ्यांचा विनाश झाल्यानंतर जे राज्य मिळेल ते आपण सुखाने उपभोगू शकू काॽ युद्धामुळे किती विविध प्रकारचे विपरित परिणाम होतीलॽ कुलधर्म नष्ट होतील, स्त्रिया भ्रष्ट होतील, अवांछित संतती निर्माण होईल. हे योग्य असेल काॽ असे प्रश्न मनात येऊ लागले. आपल्या वैयक्तिक सुखासाठी हे करण्यापेक्षा भिक्षांदेही चांगली असेही त्याला वाटून गेले. नितीधर्मानुसार वागणाऱ्या व्यक्तीला जेव्हा विषाद निर्माण होतो तेव्हा सामाजिक स्थिती अत्यंत विपरित स्वरुपाची झालेली असते असे आपल्याला आढळून येईल. दुष्कृत्य करणाऱ्यांना  असे प्रश्न पडत नाहीत. विषाद वेळीच दूर करुन स्वधर्म आचरण्यास प्रवृत्त करणारी जी गोष्ट ती म्हणजे गीता. आपला धर्म नेमका काय हे समजून घेण्याचा यशस्वी उपाय म्हणजे गीतेचा अभ्यास.

               महाभारतकालीन परिस्थिती आजही आहेच. साधने बदलली पण वृत्ती साऱ्या तशाच आहेत. आपल्यालाही दैनंदिन जीवनातही अर्जुनाला ज्या प्रकारचे प्रश्न पडलेत तसे पडतात. मीच काॽ माझ्याच बाबतीत असे काॽ मलाच काॽ या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आपल्याला गीतेत मिळत जातो. त्यासाठी ती व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न आपण करु या

    भगवद् गीतेत दुसऱ्या अध्यायातील ३१ व्या श्लोकांत भगवंत अर्जुनाला सांगतात, ‘स्वधर्मपि चावेक्ष्य विकम्पितुमर्हसि। धर्म्यादि युद्धच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य विद्यते॥म्हणजेतुझ्या स्वधर्माकडे (क्षात्रधर्माकडे) पाहूनही तू हे धर्मयुद्ध करण्यासाठी भयभीत होण्याचे कारण नाही. कारण तुझा स्वधर्मच तुला यापेक्षा दुसरे कोणतेही कर्म कल्याणकारी नाही असेच सांगेल.’
 यातील स्वधर्म या शब्दाची स्व + धर्म अशी फोड होते. स्व याचा अर्थ मी. तसेच स्व म्हणजे ईश्वरही.  ‘धारयते इति धर्मःम्हणून मी धारण केलेला मार्ग किंवा भगवंताने चातुर्वर्ण्याधारित आखून दिलेला मार्ग म्हणजे स्वधर्म. येथे स्वतः कोण हे कळणे महत्वाचे आहे. तसेच भगवंताने निर्माण केलेल्या चातुर्वर्णानुसार आपला वर्ण कळणे आवश्यक आहे. आपल्याला जर आपण कोण असे विचारले तर आपण आपले नाव, गाव, हुद्दा अशी सर्व माहिती देतो. पण वस्तुतः ही ओळख या देहाची असते. हिंदू, बौद्ध, शीख असेही सांगतो. पण हे सांगणे म्हणजे धर्म नव्हे. तो आपण स्वीकारलेला पंथ असतोहा देह अनेक नात्यांनी जोडला, बांधला गेलेला असतो. या प्रत्येक नात्यानुसार या देहाचा धर्म बदलतो. त्या त्या भूमिकेतले आपले सत्याला धरुन उचित वर्तन म्हणजे स्वधर्म होय. याखेरीज आपण ज्या समाजात वावरतो तेथले वातावरण, व्यवस्था सुचारु पद्धतीने चालावी म्हणून जे नियम असतात ते काटेकोरपणे पाळणे हा ही स्वधर्मच असतो प्रत्येक नागरिकाचा. त्यात रहदारीचे नियम, स्वच्छतेचे नियम अशा सर्व गोष्टी अंतर्भूत असतात. स्वहित, समाजहित, राष्ट्रहित आणि जगाचे हित साधण्यासाठी जे जे वर्तन करणे आवश्यक आहे ते ते कुशलतेने प्रामाणिकपणे करणे म्हणजे स्वधर्म असे आपल्याला सांगता येईल.
सैन्यात भरती झालेल्या सैनिकाचा देशाचे संरक्षण करणे हा स्वधर्म आहे. यावेळी सीमेवर शत्रुसैन्याला दया दाखवून आपल्या राष्ट्राच्या हद्दीत घुसू दिले त्या ठिकाणी संतांनी क्षमा हा धर्म सांगितला म्हणून असे केले असे जर तो सैनिक सांगू लागला तर त्याने आपल्या धर्माच्या विपरित अनाठायी संतधर्म स्वीकारला तर त्याचे परिणाम विपरीतच होतील. वरील परिस्थितीत सैनिकाला मृत्यु आला तरी किंवा त्याचे हातून शत्रुचा वध झाला तरी त्याला त्याचा धर्म आचरणे हेच उचित. भगवंत तिसऱ्या अठराव्या अध्यायात स्पष्टच सांगतात, ‘श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्।स्वधर्म आचरतांना मृत्यु आला तरी ते श्रेयस्कर आहे. तसेच स्वधर्मामुळे दोषयुक्त कर्म घडले तरी त्याचा दोष लागत नाही.
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किम कुर्वत सञ्जयःॽ हा धृतराष्ट्राला पुत्रमोहाने आपला स्वधर्म आचरण्याचे सोडून विपरित कर्माने अतिसंहारक युद्धाला आमंत्रण दिल्यामुळे विचारावा लागलेला प्रश्न आहे. अर्जुनही त्या युद्धभूमीवर कर्तव्य पालनाच्याच हेतूने आला पण सगळे आपले सगेसोयरे पाहून, यांना मारुन, कुलधर्म, कुलाचार बुडवायला मी कारणीभूत होईन या भावनेने असे रक्तलांछित राज्य उपभोगणे उचित नव्हे या विचाराने आपला क्षत्रिय धर्म विसरला आणि धनुष्यबाण टाकून देऊन हतोत्साही झाला. त्याला त्याचा स्वधर्म कळावा या हेतूने भगवंतांनी गीतेत वेगवेगळ्या प्रकारे त्याला मार्गदर्शन केले. ते सगळ्यांनाच स्वधर्माचरणासाठी लागू आहे.
अनेक जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जेव्हा नरदेह प्राप्त होतो तेव्हा मनुष्याला इतर योनींसारखे फक्त भोग भोगून जन्माची सार्थकता मानलेली नाही. तर त्याला इतर योनींतील प्राण्यांशिवाय देहापलीकडे विचार करण्याची शक्ती भगवंतांनी प्रदान केली आहेआपले स्वरुप काय हे ओळखण्याची क्षमता त्याचेठायी आहे. तेव्हा या दृश्य विश्वाच्या मागे जी  भगवंताची शक्ती आहे ती जाणली पाहिजे. आत्तापर्यंत ज्या ज्या संचितांचे भोग वाट्याला आलेत ते भोगण्याची, ज्या स्थितीत आहोत त्यात समाधान मानण्याची तयारी झाली पाहिजे. कर्म करीत असतांना त्याचे फल काय मिळेल याबद्दल अपेक्षा ठेवता, मिळेल ते भगवंताची इच्छा म्हणून स्वीकारता आले पाहिजे. सातत्याने भगवंताचे चिंतन करीत आपल्याला जी भूमिका लाभली आहे त्याला अनुसरुन स्वतःचे इतरांचेही हित साधणे त्या परमात्मतत्वापर्यंत जाण्याचा मार्ग अनुसरणे म्हणजे स्वधर्म होय. हेच स्वामी रामदेव यांनीपतंजली गुरुकुलम्चे उद्घाटन करतांना छोट्या छोट्या वाक्यात सांगितले. ते म्हणाले, स्वधर्म म्हणजे  ‘मै कोन जानो, मुझे क्या करना समझो, फिर जागो और सबके लिए अच्छा काम करो’. 
भगवद्गीतेच्या अखेरीस अर्जुनालानष्टो मोहः, स्मृतीर्लब्धा, गतसंदेहः, करिष्ये तव वचनंही स्थिती प्राप्त झाली. ती आपल्यालाही प्राप्त होण्यासाठी करावयाचे वर्तन म्हणजे स्वधर्म होय. विविध संतांनी स्वतः त्या मार्गाचे अनुसरण केले तो मार्ग प्रशस्त करुन दाखविला.
ज्ञानेश्वर माऊली ब्राह्मण यातीत जन्मली तथापि सन्याशाचे मूल म्हणून हिणवली गेली, संत एकनाथ गृहस्थाश्रमी स्वतःच्याच पुत्राने त्यांची परीक्षा घेतली, तुकाराम महाराजांना तर अनेक प्रकारच्या विपदांचा (संकटांचा) सामना करावा लागला तरीही त्यांनी नरदेहाचा कोणता धर्म असला पाहिजे याची दिशा अचूक धरली आणि स्वतःचा उद्धार तर करुन घेतलाच पण अनेकांना स्वधर्माचे आचरण म्हणजे काय याचे निश्चित मार्गदर्शन होईल असा ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, अनेक भारुडे, तुकाराम गाथा असा अक्षय ठेवा आपल्या हाती सोपविला
सौ. पद्मा  अरुण दाबके

पुणे




1 comment:

  1. Thank you for sharing your enlightening content on Antarang. This blog belongs to all of us and is a platform to share, express views, opinions and ideas. Please continue to share more such articles. Let's make it live experience for all.

    Thanking you,
    Antarang team

    ReplyDelete