Thursday, 1 August 2019

ऋतुगंध


पहाटे कानात कोणीतरी गुरगुरलं. वाटलं मी वाघाच्या गुहेत झोपलेय आणि माझ्या बाजूला वाघोबा territory झालेल्या enchroachment गुरगुरतोय. किंचित उठले, तक्क्याला वाघोबा समजून, त्याला कवटाळून, 'झोप, उगी उगी' करून थोपटवीत परत झोपले. झाला असेल तासभर पण गुरगुरणं चालूच! काय शिंची कटकट म्हणत अर्धा डोळा उघडून पाहिलं तर अरेच्चा! मी माझ्याच घरी माझ्याच बेडवर होते. परदेशात एकटं राहत असतानाचा हक्काचा सोबती, मोबाईल, गुरगुरत होता. बघितलं तर २०-२५ मेसेजेस् आले होते. त्यात एक होता श्री.डॉ.सुमेध ढबू यांचा सिंगापूरहून. ' ओय, ऋतुगंधसाठी लेख लिहिणार का? ह्या अंकाचा विषय आहे 'जोडीदार/साथीदार' दोन तीन दिवसांत लिही' घड्याळात पाहिलं तर पहाटेचे वाजले होते. म्हणजे ह्या ढब्याचे ११..च्यामारी सिंगापुरात ही NTU बसून विडंबनं रचायची वेळ असली तरी जर्मनीतली ही गोडगुलाबी थंडीतल्या साखरझोपीची वेळ होती ना! विषय काय तर 'जोडीदार/साथीदार'! मी काय लिहिणार ह्यावर डोंबल? आणि त्याचा सिंगापूरशी काय संबंध? But the damage was made..निरव शांतता, पार लांब कुठेतरी उमटू पाहणारी, क्षितिजाचे अस्तित्त्व जाणवून देणारी केशरी कडा, वर आकाशात लख्ख चंद्रकोर, मधेच लुकलुकणारे तारे, शून्य अंशांच्या गुलाबी थंडीत हिटरचा चढलेला पारा, आजीच्या मऊ मऊ गोधडीतून मिळणारी ऊब, विचार करायला मिळालेलं खाद्य, आणि अजून चांगले तीन तास तरी लोळायला काहीच हरकत नाही ही सुखद जाणीव. अहाहा! मग झोप कुठून येणार होती? विचारचक्र सुरु झाली आणि डोळ्यासमोरून झर्र्कन सरकले ते ते ११ महिने. मन त्याचं 'अंतर' हे नाव सार्थ करीत १०-१२ हजार किलोमीटर अंतर कापत दिड वर्षं मागे गेलं, अन् आठवला तो, प्रतिकुल काळात निराशेतून मला सदैव अलगद बाहेर काढणारा, हतबल झालेल्या मला परिस्थितीला '' जास्त शहाणपणा करायचा नाही, समजलं का?'' असं दरडावून विचारायचं बळ देणारा, मला नव्याने गवसलेला माझा सखा ..

भारतात गावांचं पाणी पिऊन झालं आणि २०१४ मध्ये मी पहिल्यांदाच भारताबाहेर पाऊल ठेवलं ते Stuttgart, Germany. नोकरी सुरळीत चालू होती. तसं एकूणच बरं चाललं होतं माझं पण आयुष्यात आलेलं हे स्थैर्य लाकडी खुर्चीतून बाहेर आलेला खिळा जसा नको तिथे बोचत राहतो तसं टोचू लागलं होतं. मनानी उचल खाल्ली काहीतरी नवीन पाहिजे आयुष्यात. नोकरी बदलावी का? पण नको, त्यापेक्षा नावापुढची अद्याक्षरं जरा बदलूयात, अर्थात masters करूयात ह्या विचाराने DAAD च्या Website वर हुडकून काढला तो Master of Science in Green Electronics ह्या TU, Munich आणि NTU, Singapore चा dual degree course. Home trip मध्ये ReCo मिळवली आणि course ला apply केलं, admission मिळाली सुद्धा. पण त्यासाठी सिंगापूरला मुक्काम हलवणं गरजेचं होतं. DAAD website वर केलेली शोधाशोध ही केवळ जर्मनी सोडायला लागू नये म्हणून केलेला खटाटोप होती. जर्मनी सोडायची आणि सिंगापुरला जायची माझी काडीची इच्छा नव्हती पण निव्वळ ह्या एका कारणाने admission नाकारण्याइतकी मूर्ख मी खचितच नव्हते. खोटं कशाला बोलू? पण सिंगापुर बद्दल आकर्षण, आस्था मला कधीच वाटली नाही. अगदी पूर्वग्रहदूषित दृष्टीकोण नाही म्हणता येणार कारण नवीन देश बघायची, सारख्या टुरकांड्या मारायची चटक एव्हाना Schengen visaने लावलीच होती. पण ह्यावेळी प्रश्न -१५ दिवसांचा नाही तर किमान ११ महिन्यांचा होता. पोटात गोळा आला होताच पणजो होगा, देखा जाएगामाजही होता. निरीच्छेने का होईना पण राजीनामा, student visa, packing, unpacking, repacking, पुण्यातली उणीपुरी १५ दिवसांची धावती भेट ह्या सगळ्या सावळ्यागोंधळांनंतर शेवटी सिंगापुरात धडकले आणि परत एकदा student life जगू लागले. आत्तापर्यंतच्या जीवनातला सगळ्यात खडतर कालखंड होता तो. एकूण . वर्षं नोकरी केल्यानंतर परत अभ्यास, परीक्षा, आयुष्यात प्रथमच करावं लागलेलं flat-sharing, दक्षिण भारतीयांच्या पूर्णपणे कचाट्यात सापडणं, नवीन काहीतरी शिकण्यापेक्षा परीक्षेत मार्क मिळवण्याच्या rat race मध्ये नकळत ओढलं जाणं ह्यामुळे सुरुवातीच्या काळात पुरती बावचळून गेले होते. Europeans, Singaporeans, Chinese ह्या कोणीही दिला नाही तो cultural shock मला ह्या दक्षिण भारतीयांनी दिला. काय बुद्धी झाली आणि इथे आले असं वाटू लागलेलं असताना तो मला भेटला; नव्याने भेटला, जाणीव करून दिली त्याच्या अस्तित्वाची,  मला निराशेच्या दलदलीतून बाहेर काढलं आणि माझं चित्त थाऱ्यावर आणलं.

 डोक्यात विचारांचा हलकल्लोळ मजला की मी राग कोणावर काढण्यापेक्षा ६१ number च्या बसने थेट clarke quay ला जाऊन बसे. Star Bucks ची coffee तर कधी शिराझ चा Döner घेऊन पलीकडच्या काठावर येऊन संथ पाण्याचं, नदीत रोवलेल्या रंगेबेरंगी नावांचं निरीक्षण करीत. पाठीमागे बरेचदा एक Guitarist गिटारच्या तारा खाजवत बसलेला असे; अर्थात ते तारा खाजवणं सुरेल असे. clarke quay चं मला नवल वाटतं. अलीकडचा काठ अगदी रुद्राक्ष संस्कृतीचा नसला तरी malls, MRT, Bus Stop वगैरे असलेला संसारी, तर पलीकडचा Pubs, Disco, Restaurents, अजून काय काय नी भरलेला द्राक्ष संस्कृतीचं प्रतीक! रात्रीच्या काळोखात मात्र अलीकडून बघितलेला तो पलीकडचा झगमगाट, गिटारचे स्वर, संथ नदी, त्यातून मधेच डोकं वर काढणारे, कोलांटीउडी मारणारे मासे, तर उजवीकडे दोन आकाशपाळणे त्या चंद्राच्या साक्षीने मन प्रफुल्लीत करी. तिथला तो टर्किश आईस्क्रीमवाला, पावातलं आईस्क्रीम मला अजूनही आठवतं.

माझं दुसरं हक्काचं Morale Booster म्हणजे Bukit Batok Nature’s park. सिंगापुरात आल्याच्या दुस-या दिवशी मी बाहेर पडले आणि गेले ती ह्या पार्कात. सुरुवातीला महिन्यातून एकदा दोनदा पार्कात जाणारी मी नंतर नंतर आठवड्यातून दोन तीनदा जाऊ लागले. पार्कात चांगल्या दोन मोठ्ठ्या फेऱ्या मारल्या की मी तिथल्या त्या तळ्याकाठी जाऊन बसे. आपल्या फणसाची सर डुरिअनला येणं कदापि शक्य नसलं तरी त्या खुज्या जंगलात फिरताना कोकणातल्या एखाद्या वाडीत गेल्याचा भास होई. आंबे-फणसांनी डवरलेली दुतर्फा झाडं आणि त्यातून पाऊलवाटेनं जाताना जाणवणारा गारवा ह्यांची आठवण करून देण्याइतपत त्याची क्षमता नक्की होती. कधी तळ्याकाठी बसून वाचलेले पुलंचे 'एक शून्य मी' मधले बोधनात्मक लेखही मला स्मरतात. चालल्याने घामाघूम झाल्यावर तळ्याकाठी विशेष शांत वाटे. डोक्यात चाललेलं वादळ शमलं की मी पुन्हा घरी जाई. तळ्यातली ती इवली इवली कासवं, त्यांची तळ्याकाठी येण्याची धडपड, तळ्यातले मासे, तिथे क्वचित दिसणारी माकडं, एकदा पाहिलेला जाडजूड साप यांनी माझं जगणं सुसह्य करून टाकलं.

मी सिंगापूरला जाणार हे कळल्यावर आठवडाभर सिंगापूरला पाय लावलेल्यांनी बरेच फुकटचे सल्ले दिले होते. त्यातला एक होता 'सिंगापुरात रोज पाऊस पडतो. त्यामुळे नेहमी बाहेर जाताना नुसता 'पे() रु(माल) चा(वी) पा(कीट) पा()' नाही तर छत्रीही घ्यायला विसरू नकोस हो!' सिंगापुरात आल्यापासून चांगला पंधरवडा मी चातकासारखी ह्या बहुचर्चित पावसाची नुसती वाटच बघत होते. मला वाटलं ह्या नुसत्या गफ्फा एत हो गफ्फा. अहो कुठेय पाऊस, रोज पडतो तर आता काय मला घाबरला की लाजून घरीच बसला?

नंतर मात्र वाट पाहणं सरलं आणि आभाळ भरून आलं. अगंतुक पाहुण्यासारखा कधीही पण भरभरून आणि ओसंडून येणारा आणि माझं भान हरपून टाकणारा सिंगापूरचा पाऊस.. बदाबदा कोसळणाऱ्या, हळूच वाऱ्याच्या झुळुकेबरोबर खिडकीतून माझ्या खोलीत प्रवेश करू पाहणा-या  पावसाकडे नुसते बघत मी अभ्यासाच्या पोथ्या बाजूला ठेऊन मस्त वाफाळत्या कॉफीचे घोट घेत काढलेले तासन्तास मला आठवतात. तो हवेत अचानक येणारा गारवा, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, पत्र्यांवर होणारा थडथडात मन प्रफुल्लित करून टाकी. मरगळ क्षणार्धात झटकून टाकण्याचं सामर्थ्य त्या पावसात आहे. एक घाव दोन तुकडे करून विषय हातावेगळे करायचा त्याचा स्वभाव. अचानक येतो, ताडताड पडतो, १५ मिनिटांत विषय संपला, परत आपण उन्हाने चिंब. भिजत घोंगडं म्हणून नाही..

तर असा हा मला नव्याने गवसलेला, विविध रूपात माझं स्वत्व जपायला मला मदत करत आलेला माझा साथीदार: निसर्ग.. साथीदाराची व्याख्या better-half इतकीच मर्यादित ठेऊन कसं चालेल हो? मुळात तो एक व्यक्ती असलीच पाहिजे असेही नाही. एखादा छंद, ज्यात आपण पूर्ण रममाण होतो, जो आपल्याला आपल्यातल्या वेगळेपणाची जाणीव करून आपले मनोधैर्य वाढवतो, प्रोत्साहन देतो, धडपडल्यावर उठण्याची नवी उमेद, जिद्द जागवतो, जो आपल्याशी एकनिष्ठ असतो तोही आपल्या आयुष्याचा साथीदारंच म्हणावा लागेल..  अर्थात 'पडवीच्या देखाव्यातून दिसतात मठाचे खांब' म्हणतात तसं काठावर बसून पोहोण्याबद्दल बोलणा-याची ही आपली कल्पना किंवा भाबडी, innocent कदाचित भ्रामक आशा.

आता सिंगापूर सुटलं (कदाचित कायमचं) त्याला महिने उलटून गेले पण सिंगापुराचा विषय निघाला की मी आजही हळवी होते, ‘शिंगण्या कुठच’  म्हणताना गालावर स्मितहास्य उमटतं. सिंगापुरातला पहिला दिवस, Matriculation ची त्रेधातिरपीट, भेटलेले मित्र , नात्याने लांबचे पण तरीही जवळचे कोझरेकर काका, NTU , south spine, Can B, NTU तली दिवाळी, गाण्याची practice, Clarke Quay, Bukit Batok Nature's Park, महाराष्ट्र मंडळाची library, GIIS, माझी खोली, वाढदिवसाला आई बाबांनी घेऊन दिलेल्या बिनबॅग वर बसून काढलेली sketches, खरडलेले लेख, रात्र रात्र जागून केलेल्या movie marathons, क्वचित केलेला अभ्यास, गोवन मित्रमैत्रीणीबरोबर पहाटे वाजेपर्यंत ठोकलेल्या गप्पा, ते पार अगदी सिंगापूर सोडून म्युनिकला येताना अतिरिक्त सामानाबाबतीत केलेला जुगाड हे सगळं झर्र्कन डोळ्यासमोरून जातं.. ते ११ महिने आठवणींतून कधीच पुसले जाऊ शकत नाहीत, ते त्या अनुभवलेल्या खडबडाटामुळे, आणि म्हणूनच उठून दिसणं-या ह्या रम्य क्षणांमुळे..

By

Amita Joshi




No comments:

Post a Comment