Monday, 19 August 2019

शिक्का

एखादी व्यक्तीला,  नातेवाईकाला आपणं विशिष्ट शिक्का मारून मोकळे होतो.  जसं की तिरसट आहे, शिष्ट आहे, सालस आहे वगैरे वगैरे....पण हे शिक्के आपण मारत असतो ते आपल्याला तसं वाटतं म्हणून की खरंच त्या व्यक्ती तशाच असतात?

हे सगळं आठवण्याचं कारण अलिकडे घडलेला एक प्रसंग.   माझे मामेसासरे वय वर्ष 84. एकटेच रहातात.  आमच्या घराला लागूनच त्यांचाही बंगला आहे.  माणूस अगदी लावून लचकून बोलणारा खवट कोब्रा.  या वयातही त्यांना कोणाचीही गरज नाही हे त्यांच्याच तोंडून अनेक वेळा ऐकलंय.  ते शक्यतो कुणाची मदत घेत नाहीत आणि घेतलीच तर परतफेडीत तत्पर.  त्यांच्या या वागण्यामुळे सख्खा भाचा असलेले माझे अहो सुद्धा जेवढ्यास तेवढे संपर्क ठेवून असतात.  अर्थात मी पण.  तरीही मामांकडे मी केवळ मामेसासरे म्हणून पहात नाही.  ते आणि माझे वडील एका वर्गात होते तो छोटासा स्नेहधागा माझ्या मनात कायम असतो. आमच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमात,"प्रभू...तुझी का मुलगी ही? छानच !" हे त्यांचे शब्द ऐकून मला वेगळाच धीर मिळाला तो मी आजही विसरू शकत नाही.

तर....मामांकडे वडीलांचे मित्र म्हणूनही मी पहात असल्याने असेल कदाचित मी त्यांच्या तिरसटपणाचा फारसा त्रास नाही करून घेत.   वेगळं काही खायला केलं की डब्यात घालून मामांना देते.  ते तसं दिलं की साखर घालून डबा लगेच मला मिळतो. "मामा आवडलं का? कसा झालाय पदार्थ?" विचारलं की म्हणायचे "काही न बोलता खल्लाय म्हणजे चांगला झालाय समज." हे ऐकल्यापासून मी त्यांना विचारायचं बंद केलं पण डबा पाठवायचा बंद नाही केला. परवा असंच झालं.  15 ऑगस्ट म्हणून काहीतरी गोड करायचं तर पुरणपोळ्या करूया म्हणून पुरणपोळ्या केल्या आणि तीन पोळ्या मामांना ह्यांच्या हाती पाठवल्या.

यावेळी मला डबा लगेच परत आला नाही.  काल संध्याकाळी मामा स्वतः घरी आले म्हणाले, "सुरेखा!  ए-वन पुरणपोळ्या!  आज ठरवलं. नेहेमी तू काही वेगळं केलेस की देतेस, कसं झालंय, आवडलं का विचारत नाहीस. मीही सांगत नाही.  पण नियम मोडला आज.
शिल्लक असेल तर दे.  शिळी पुरणपोळी आवडते मला.  आज आईची आठवण आली."

माझे डोळे पाणावले.  मनात आलं हेच का ते तिरसट मामा?

By

Anagha Joshi

Talegaon, India

No comments:

Post a Comment