बारा वाजता बालवाडीतली पिल्लं आयांबरोबर चिवचिवत घरी गेली की दुस-या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत मी अगदी निवांत असते. ख-या अर्थाने निवृत्त जीवन जगतोय आम्ही दोघं असं मित्र-मैत्रीणी, नातेवाईक म्हणतात. मित्र-मैत्रीणी तर 'मनसबदार' म्हणून चिडवतात. भाग्यवान जीव म्हणतात तेव्हा मन खरंच सुखावतं.
शांत,निवांतवेळी क्वचित भूतकाळ आठवतोही. आयुष्यातल्या चुका आठवतात तसे योग्य निर्णयही आठवतात. कधी मन स्वतःला माफ करू शकत नाही तर कधी कष्टांचं सार्थक झालं वाटतं. समाधान, तृप्ती जाणवते. कधी हुरहुर वाटते, खंतही वाटते. जर-तर ची द्विधाही होते कधी कधी. पण हाच तर मानवी स्वभाव आहे नाही का? 'चंचलं हि मनः कृष्ण हे त्या पराक्रमी नरश्रेष्ठ अर्जुनाला वाटलं तर आपलं काय!
खरोखर! झाल्या गोष्टींवरच विचार करण्याची सवय आपल्या प्रत्येकालाच असते. इतरांशी आणि स्वतःच स्वतःशी तुलना आपण करत असतो. मला गतकाळातील काही गोष्टींबद्दल नक्कीच खट्टू व्हायला होतं. कितीतरी संधी आयुष्यात आल्या ज्या मी फुकट दवडल्या याचं वाईट वाटतं. त्या संधींचा योग्य उपयोग करून घेतला असता तर आजच्यापेक्षा वेगळी 'मी' मला खरंच दिसले असते.
लहानपणी भयंकर बुजरी तर होतेच शिवाय क्षुल्लक कारणावरून हसायला येत असे. इतकं की ते आवरताच येत नसे. यावरून आई-दादांना अनेकदा कानकोंडं व्हायचं. या माझ्या दोषामुळे शाळेच्या अनेक कार्यक्रमांमधे मला बाजूला ठेवलं जायचं आणि याचं माझ्या शिक्षकांनाही वाईट वाटायचं पण माझ्यात बदल झालाच नाही. शिक्षकांनी कलाशाखेला प्रवेश घे सांगूनही मैत्रीणी वाणिज्यला म्हणून मी पण वाणिज्य शाखेतच प्रवेश घेतला. तिथे रमले, चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन पदवीही मिळवली पण साहित्याची आवड मागे पडली. आर्टस् ला खरंच जायला हवं होतं हे वेळ निघून गेल्यावर पटलं. याचं परिमार्जन आकाशवाणीत काम करून, महिलामंडळातील कार्यक्रमांमधे सहभागी होऊन, पारितोषिकं मिळवून काही अंशी झालं याचाच आनंद.
लग्नाचं वय झालं तेव्हा मात्र संकोच बाजूला ठेवून मी आईला माझ्या निर्णयाबद्दल सांगितलं आणि ठामपणे मला हवंय तेच केलं याबद्दल मला माझंच खूप छान वाटतं. इथे कच खाल्ली असती तरची कल्पना मी स्वप्नातही करू शकत नाही. मी खरोखरंच स्वतःला सुदैवी समजते कारण मी वेळोवेळी घेतलेले निर्णय काही वेळेस योग्य तर काही वेळेस कमी चुकीचे/नुकसानीचे ठरले. कोणत्याच निर्णयांबद्दल पश्चात्ताप करण्याची वेळ आजपर्यंत तरी आली नाही.
असं असलं तरी काही गोष्टींबद्दल रूखरूख लागून रहातेच. आई-दादांना, अहो आई-दादांना, नव-याला, मुलांना काय वाटेल?काय आवडेल याचाच विचार करत त्यानुसार वागत आले. त्यातच स्वतःला माझ्याच नकळत इतकं मुरवून घेतलं की मुलीने एका वाढदिवसाला मला विचारलं,"आई तुला काय आवडतं?" यावर उत्तर देणं मला महाकठीण गेलं. म्हणूनच आता ठरवलंय की रूखरूख वाटेल असं होता होईतो हातून घडू द्यायचं नाही. आयुष्यातल्या चुका ज्या सुधारता येतील त्या सुधारायचा प्रयत्न करायचा. वडीलधा-यांशी झालेले वादविवाद आठवण्यापेक्षा, आपणच त्यांना समजून घ्यायला कमी पडलो हे लक्षात घेऊन मनापासून क्षमा मागून मोकळं व्हायचं. वाचन,लेखन, गाणं, नाटक-सिनेमा यांची आवड जोपासायची. उरलेलं आयुष्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यापेक्षा भावनिक,आत्मिक दृष्ट्या समृद्ध कसं होईल हे बघायचं. आयुष्याशी कृतज्ञ रहायचं.
जन्म आहे तिथे मृत्यू असणारच आणि मृत्यू आहे तिथे नवा जन्म आहेच. असं आहे तर मग आत्ताच्या जन्माच्या वरच्या पातळीवर नवा जन्म मिळावा यासाठी इथेच प्रयत्न करायला हवेत नाही का? येणेची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरा पडे ह्या समर्थवचनानुसार वागण्याची बुद्धी मला व्हावी ही इच्छा आणि हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
By Anagha Joshi
Talegaon, India
No comments:
Post a Comment