मध्यरात्रीचा आरसा किती भयाण असतो!
किती स्वच्छ, किती प्रामाणिक!
अंधारात अचानक उठून उभं राहिल्यावर
अंधाराहून गडद आपली सावली
हलत राहते कोपर्यात.
हे कोणंय नेमकं?
दिवसभर स्वतःला उसवणारं,
अनंत वादळात फसवून घेणारं,
अहंकाराच्या, वासनेच्या, विकारांच्या, वेदनांच्या
विळख्यात पिळलं जाणारं,
कधी पोरकं, कधी परकं होणारं
आणि एकाएकी सुट्टं मोकळं होणारं
हे शरीर आपलंच आहे का?
---
वंचकाने तिला हज्जारदा सांगितलं, तू नकोयस मला.
तुझी काटेरी सावलीपण नको.
दुसरं नवं झाड सापडलंय मला लाल लाल फुलांचं.
तिचा विश्वासच बसेना,
त्याच्या हज्जारदा नाकारण्यावरसुद्धा!
आपली सळसळ आवरत ती कसंबसं म्हणाली,
पण त्या झाडाची फुलं विषारी आहेत, त्यांनी उध्वस्त केलं कितिकांना.
शिवाय त्याची कुजकी मुळं रुजणार नाहीत
तुझ्या मातीत.
वंचकाने ऐकलं नाही.
लाल लाल फुलांच्या मोहाने जिभल्या चाटत
तो निघून गेला, कधीच वाट पाहू नकोस म्हणत.
तेव्हापासून,
झाड एकटंच आहे.
दिवस उगवतात, मावळतात.
झाडाच्या अंगाखांद्यावर पक्षी खेळतात.
जमिनीतले कृमिकीटक मुळांशी बोलतात.
आकाश आणि मातीशी नातं जोडणारं
शुभ्र, निर्वैर आकाशपुष्पांचं झाड
दिवसेंदिवस बहरतंय.
तरी , दर मोसमाला
वंचकाची खंत काढत, काळजी करत
ते पानं ढाळतं.
त्याच्यासाठी सावल्या गोळ्या करून ठेवतं!
----
कधी कधी भीती वाटते पाखरांची किलबिल सुरू झाली की.
म्हंजे आता हा दिवस सुरू झाला.
आता पुन्हा सारे तसेच घडणार!
लोक उठतील, आवरतील, त्यांची अंथरुणं काढली जातील.
त्यांचे शिळे कपडे धुवायला जातील,
त्यांच्या रिकाम्या बशा घासायला जातील,
कपडे धुवून तारेवर वाळायला जातील
मग घड्या होऊन कपाटात जातील.
भांडी घासून पालथी होतील
मग आपापल्या जागेवर जातील.
उद्या पुन्हा हीच भांडी, हेच कपडे, हीच माणसं
अशाच प्रकारे वापरतील.
माणसं कामाला जातील.
कामं करतील किंवा वेळकाढूपणा करतील.
ट्रॅफिकमध्ये धक्के खात घरी परततील.
अंथरुणं पुन्हा घातली जातील.
सूर्य उगवतोय, मावळतोय. कारण पृथ्वी फिरतेय
आपण अंथरूणातून उठून दिवस सुरू करतोय
आणि अंथरूणावर येऊन पडतोय.
या दरम्यान,
खरोखर आपण जगतोय का?
By
Sujata Mahajan, Chicago
No comments:
Post a Comment