Friday, 18 January 2019

माझा गीता प्रवास - भाग १ - माझे घर नक्की कोणते

आता साधारण एक महिना होत आला होता आम्हाला गीता संथा वर्ग सुरु करुन. बऱ्यापैकी पहिला अध्याय पाठ झाला होता. अर्जुनाची मनःस्थिती आणि आपली मनःस्थिती काळ वेळ वेगळा असला तरी तशीच असते हे विविध उदाहरणांवरुन कळू लागले होते. अशातच बाईंनी एक दिवस आम्हाला दोन प्रश्न दिले आणि सांगितले यांची उत्तरे तुम्ही काय देता पाहू बरे. ते दोन प्रश्न होते -१) तुम्हाला मिळालेले घर चांगले आहे काॽ २) त्यात किती जण रहातात, आणि ते तुमचे ऐकतात काॽ

            सामान्यतः या प्रश्नांचे प्रत्येकाचेच एक उत्तर असते. हो आमचे स्वतःचे कुणाचे दोन खोल्यांचे, कुणाचे चार खोल्यांचे, कोणाचे अनेक इमारतीतला एक भाग किंवा कुणाचे स्वतंत्र तर काहींचे भाड्याने घेतलेले तात्पुरते. पण जे आहे आमचे घर ते तसे चांगले आहे. कारण प्रत्येकालाच आपले घर अत्यंत प्रिय असते. माणूस कुठेही कितीही अलिशान जागेत गेला तरी त्याला आपल्या घराची ओढ असतेच असते. आणि आपल्या घरी आल्यावर त्याला स्वस्थता वाटते. त्यात रहाणारी जी काय घरातील माणसे असतील त्यानुसार संख्या किंवा नाते सांगितले जाते. कुणाच्या घरी गोकुळ असते तर काहींच्या घरात अगदी मोजकीच माणसे असतात. प्रत्येक घरातील सगळी माणसे प्रत्येकाचेच काही सगळेच सर्व बाबतीत ऐकतात असे नाही. काही बाबतीत ऐकतात. काही बाबतीत दुर्लक्ष करतात.
            गीतेचा अभ्यास करायला लागलो की कळू लागते हे प्रश्न वरवर जरी भौतिक जगताबद्दल असले तरी येथे ही उत्तरे नक्कीच अपेक्षित नाहीत. प्रत्येक जीवाला वेगवेगळ्या आकाराचे घर लाभले आहे. मग लक्षात येते की आपल्याला मिळालेले घर म्हणजे हा देह आहे. मनुष्य जन्म प्राप्त झाला म्हणजे घर उत्तम मिळाले आहे. सगळ्यांच्याच बाबतीत हे खरे असेल असे नाही. काहींचे शारिरीक व्याधी, उणीवा यामुळे ते कमकुवत वा मोडकळीस आलेले असू शकते. ज्यांना सर्व अवयव सुदृढ मिळाले आहेत त्यांना ते सांभाळण्यासाठी परिस्थितीची अनुकूलता असेल तर उत्तमोत्तम घराचा लाभ झाला असे म्हणायला हवे. पण एवढ्याने भागते का तर नक्कीच नाही. या उत्तम गोष्टी आहेत पण वृत्ती जर चांगली नसेल तर या घराचा कबाडखाना व्हायला काही वेळ लागत नाही. यापैकी एकाद्या गोष्टीची कमतरता ही आपल्या पूर्वसंचिताने असते हेही मग कळू लागते. उदाहरणादाखल आपल्याला अनेकदा असे दिसते की सर्व अवयव चांगले आहेत, त्यांचे पोषण नीट व्हावे अशी सांपत्तिक, कौटुंबिक स्थिती आहे पण वृत्ती मात्र नीट नसल्याने व्यक्ती व्यसनाधीन होते, आपली शक्ती दुराचारासाठी उपयोगी आणते. कधी वृत्ती चांगली असते पण परिस्थिती वाममार्गाच्या गोष्टी घडवते. काही वेळी या दोन गोष्टी सुस्थितीत असतात पण शरीर साथ देणारे नसते.
            आता या शरीररुपी घरात कोण रहाते याचा विचार केला की कळते आपल्या शरीररुपी घरात रसना (जीभ), डोळे, नाक, त्वचा, कान ही ज्ञानेंद्रिये व तोंड, हात, पाय, गुद, शिस्न ही कर्मेंद्रिये असतात. ह्या त्या दहा दृश्य व्यक्ती होत. त्याखेरीज न दिसणारे मन व अभिमान ही अदृश्य माणसे संगतीला असतात. ती तुमचे ऐकतात का या प्रश्नाचे उत्तर मुळीच ऐकत नाहीत असेच द्यावे लागते.
            ज्या गोष्टी करणे गरजेचे नसते त्याच गोष्टी कराव्या असेच त्यांना बहुतेक वेळा वाटत असते. वेळ, काळ याचे बंधनही त्यांना तोडावेसे वाटते. म्हणजे अभ्यासाची वेळ आहे पण त्यावेळी अभ्यास सोडून मालिका, खेळ, गप्पा अशा गोष्टी कराव्या असे वाटते. मधुमेह असला तरी पथ्य पाळावेसे वाटत नाही. एरवी गोड आवडेलच असे नाही पण साखर खाऊ नका म्हटले की हमखास गोड खाण्याची इच्छा होते.  रस्त्यावरचे पदार्थ आकर्षक मांडणीमुळे, विविध मसाल्यांच्या वासामुळे, खाण्यासाठी योग्य नाही हे कळते पण तरीही मन तिकडे ओढ घेते. एकादे वेळी खाल्याने काही बिघडत नाही अशी समजूत आपणच आपली करुन घेतो. भरपेट जेवल्यावरही कधी कधी आग्रहाला बळी पडून आणखी काही खातो. कपाटात मावत नाही इतके कपडे झाले तरी नवा ड्रेस पाहिला की हवा वाटतो.
            खरे पाहिले तर इंद्रिये ही आपल्या ताब्यात असायला हवीत. पण तसे होत नाही. आपण इंद्रियांच्या आहारी जातो. इतर कोणाचे ऐकून न घेणारे आपण इंद्रियांचे मात्र अगदी तंतोतंत ऐकण्याच्या बाबतीत तत्पर असतो.
            आपले हित साधायचे असेल तर मनाद्वारे या दशेंद्रियांवर अंकुश ठेवता यायला हवा. मनाला योग्य दिशेने जाण्याची सवय लावायला हवी. रामदास स्वामी मनाला तू सज्जन आहेस असे म्हणून चुचकारतात आणि मनाच्या श्लोकांद्वारे आपल्याला त्याला कसे वळवावे याचे मार्गदर्शन करतात. अभिमानाची मान उंचावणार नाही हे पाह्यला सांगतात. त्यासाठी नित्यनेम, सत्संग, नामस्मरण, भगवद् चिंतन, धार्मिक ग्रंथांचे वाचन याची कास धरली पाहिजे तरच हे शक्य होईल. तुम्हाला काय वाटतेॽ 

By

Padma Dabke

Pune, India

No comments:

Post a Comment