रामायण सांगण्याच्या निमित्ताने मावशींचा प्रवास सुरु असे. ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणची माहिती, वैशिष्ट्ये जशी त्या समजून घेत तसेच तिथले कार्य वाढावे, अधिकाधिक महिलांनी जोडले जावे याचाही विचार असे. या विचारासंबंधी मावशींचा आणखीही एक उपक्रम मला आठवतोय. समितीच्या अविवाहित सेविकांची लग्ने ठरली की त्या कोणत्या गावी जाणार आहेत त्या गावच्या सेविकांना त्यांची माहिती आधीच कळवण्याची पद्धत मावशींनी दूरदृष्टीने सुरु केलेली होती. एकतर नवख्या गावात आलेल्या त्या मुलीला भेटायला आपल्या विचारांच्या व्यक्ती आल्यामुळे आनंद होत असे. दिलासा मिळत असे. समितीशी त्या ठिकाणीही तिचा संपर्क पुन्हा सुरु होत असे. शाखा विस्तार, कार्य विस्तार यासाठी वरवर जरी फारशा महत्त्वाच्या नाहीत असे वाटत असलेल्या अनेक कल्पनांचा उपयोग होतो हेच जणू मावशींनी सिद्ध करुन दाखवलेले.
याच अनुषंगाने आणखीही एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की, संघाचे जसे पूर्णवेळ प्रचारक निघतात त्याप्रमाणे समितीच्याही काही तरुण मुलींना आपणही अविवाहित राहून समितीच्या प्रचारिका म्हणून काम करावे असे वाटत असे. आज या विषयी आपल्याला विशेष असे वेगळे फार काही जाणवणार नाही कदाचित. पण स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरच्याही काही वर्षांत असा विचार मुलींच्या बाबतीत सहजपणे स्वीकारणे अशक्यच होते. त्यामुळे मावशी त्या मुलींना समजावून सांगत की यामुळे जे पालक आपल्या मुली समितीत आता ज्या विश्वासाने पाठवत आहेत ते मुलींबाबत शंकित होतील आणि मुलींना समितीच्या शाखेत पाठवणे कदाचित बंद करतील. त्यापेक्षा तुम्ही विवाह करुनही हे काम करू शकता. जी कन्या चांगली असते, तीच चांगली पत्नी, गृहिणी होते. आणि जी चांगली गृहिणी असते, तीच उत्तम माताही होते. प्रपंच नीटनेटका करतांना तुम्हाला समितीच्या संस्कारांचा नक्की उपयोग होईल. चांगला संसार करणाऱ्या तुम्हाला बघूनही समितीचा विचार उत्तम आहे असा विश्वास वाढेल. मावशींचे बोलणे इतके आश्वासक, मृदू असे की त्याचा नुसता प्रभावच पडत नसे. तर स्वीकृतही होत असे. आणि खरोखरीच लग्न होऊन दुसऱ्या गावी गेलेल्या मुलीच प्रचारिका सिद्ध होत. मा. बकुळताई देवकुळे, मा, वत्सलाबाई चोळकर, मा. श्रीमती सिंधुताई फाटक अशी अनेक नावे या मांदियाळीत आहेत.
संघाप्रमाणेच समितीचीही सेविकांसाठी निवासी शिबिरे घ्यावीत हा विचार झाला तेव्हा संघाचे जे शिबिर होत असे ते एका वर्षी मावशींनी पूर्णवेळ उपस्थित राहून पाहिले व मगच समितीसाठीही शिबिरांची योजना करण्यात आली. जे करायचे ते केवळ नक्कल म्हणून नाही. तर त्या मागचा उद्देश, तो सफल होण्यासाठी आवश्यक ते उपक्रम व सुविधा या सर्वांचा त्या विचार करीत. उन्हाळ्याच्या सुट्टीत महिनाभर मुलींना एकत्र राहून स्वावलंबी, सकारात्मक विचार देणारे, शारिरीक क्षमता वाढवणारे, देशप्रेम जागृत ठेवणारे, ध्येय निश्चित करणारे, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीचे भान देणारे उपक्रम या शिबिरात राबविले जाऊ लागले. विविध खेळ, स्पर्धा, वाचन, लेखन, मुलाखती, मनोरंजनाचे कार्यक्रम अशी आखणी केली जाई. शिबिरात दैनंदिन सुविधेसाठीची सर्व कामे सेविकाच सहकार्याने करीत असत. वेगवेगळ्या विभागात अशी शिबिरे होत. मावशींची काही दिवसांची उपस्थिती हा सेविकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असे. त्यांचे वर्तनच मुलींना अधिक संस्कारित करीत असे. मावशींचीही सर्व सेविकांप्रमाणेच दैनंदिनी असे. प्रत्येक सेविकेची त्या दखल घेत. तिच्या अंगचे गुण जाणून घेत. मार्गदर्शन करीत. तेही अगदी सहजगत्या, कोणताही अभिनिवेश न आणता.
रामायण कथनाच्या कार्यक्रमांतून जे उत्पन्न मिळाले ते मावशींनी वर्ध्याच्या अष्टभुजा देवीच्या मंदीरासाठी अर्पण केले. जिजामाता, अहिल्या बाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई या आपल्या आदर्श असल्या तरी आपल्या समाजमनाचा विचार केला तर तो श्रद्धाळू आहे. अशावेळी एकाद्या देवीचे रुप जर आपण त्यांच्यासमोर ठेवले तर ते अधिक प्रभावी असेल. या विचाराचा पाठपुरावा करतांना अष्टभुजा देवीची प्रतिमा साकार झाली ती आपल्या ध्येयाचा मानदंड समोर राहील अशा स्वरुपात. स्त्री शक्तीतले जे जे योग्य व वर्धिष्णु रहावे ते ते सर्व या प्रतिमेत साकार झालेले दिसते. सायुध, सिंहाधिष्ठित, प्रसन्न, सोज्वळ रुप आहे या प्रतिमेचे. स्वकर्तव्याचे भान सातत्याने रहावे यासाठी असलेली जपमाळ, जागृतीचे प्रतीक म्हणून घंटा, फलासक्तीशिवाय कर्माचा संदेश देणारी भगवद्गीता, पावित्र्य व त्याग यांचे प्रतीक असलेल्या अग्नीचे विधायक कामासाठी उपयुक्त ठरणारे यज्ञकुंड, सौंदर्य, निर्लेपता शिकविणारे कमळ, शौर्य व स्वसंरक्षणासाठी तलवार, शक्तिसामर्थ्यावर आधारित मानदंड म्हणून त्रिशूळावर फडकणारा भगवा ध्वज हे सात हाती असून आठवा वरदहस्त अशी ही मूर्ती जयंतराव देवकुळे आणि प्रसिद्ध चित्रकार दलाल यांच्या सहकार्याने साकार झाली.
मावशींची व स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट झाली तेव्हा सावरकरांनी त्यांच्या या कामाला भीज पावसाची उपमा दिली होती. ज्यामुळे पीक उत्तम येते. आज मावशींच्या पश्चातही त्याच विचाराने चालू असलेले हे कार्य त्याची साक्ष देणारेच आहे.
मावशींच्या प्रेरणेनेच विलासपूर येथे कुष्ठरुग्णांच्या निरोगी मुलींसाठी, ठाण्याला मूकबधिर मुलींसाठी, भंडारा∕गडचिरोली येथे नक्षलग्रस्त कुटुंबातील मुलींसाठी तेजस्विनी छात्रावास सुरु आहेत. नागपूर येथे अहिल्यादेवी मंदिरात आसाम, नागालँड, मणिपूर येथून जबरदस्तीने धर्मांतर केलेल्या मुलींना सोडवून आणल्यानंतर त्यांचा सांभाळ केला जात आहे. त्यांना शालेय शिक्षणाखेरीज स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असे शिक्षणही दिले जात आहे. आज जवळपास ४०,५० मुलींचे एक कुटुंब झाले आहे ते. मोठ्या मुलीच लहान मुलींची देखभाल करतात. सर्व कामे त्या मिळून मिसळून स्वतःची स्वतःच करतात. तिथेच मोठ्या झालेल्या अबोला आज नर्सिंगचे उत्तम शिक्षण घेतल्यावर नागालँडमध्ये आरोग्यविषयक क्षेत्रात उत्तम काम करतेय. तर पंकजा काश्मिरमध्ये अतिरेक्यांनी हिंदू कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला ठार केलेल्यांच्या मुलींचा सांभाळ करतेय. या छात्रालयांखेरीजही आज जवळजवळ २२ छात्रालये समितीद्वारे संचालित केली जाताहेत.
अष्टभुजा देवीचे मंदीर व वरील अनेक ठिकाणच्या संस्था या आज समितीच्या स्वतःच्या मालकीच्या इमारतीत आहेत ही समितीसाठी नक्कीच स्वाभिमानाची बाब आहे. या सर्वच ठिकाणी बालकमंदिरे∕शिशुवर्ग, उद्योग मंदिरे, वाचनालय, वसतिगृह या सारखे समाजातील घटकांना घडवण्याचे , संस्कार देणारे, कर्तृत्वाला वाव देणारे स्तुत्य उपक्रम नित्यनेमाने मावशींच्या पश्चातही त्याच ध्येयाने चालवले जात आहेत आणि चालवले जातील याची खात्री आहे.
वंदनीय मावशींच्या सर्वच कार्याचा आढावा घेणे ही सोपी गोष्ट नाही याची मला जाणीव आहे. पण हे करीत असतांना समाजात स्वतःविषयी व सेविकांबद्दल मावशींनी जो विश्वास निर्माण केला त्यासाठी जे विविध उपक्रम राबविले त्यानुषंगाने समितीच्या वर्गात नित्यनेमाने म्हटले जाणारे गीत मला आठवतेय.
काटेकुटेच पसरले तव ध्येयपंथी, नाही सुखांशु म्हणूनि नच मानी खंती ॥
विस्तारिला भवती विस्तृत भव्य सिंधु, नौका तुझी गमतसे जणू त्यात बिंदु ॥
लाभेल देवपण ते दगडासि साचे, देही प्रहार बसतील जरी घणांचे ॥
वाटोनिया कधी तुज पथ हा चुकीचा, चित्तास संशय पडेल जरी दिशेचा ॥
ध्येयाचिया अनुसरी ध्रुव तारिकेस, आशा अदम्य धरुनि चल सावकाश ॥
यातील प्रत्येक ओळ वं. मावशींच्या जीवनातील घटनाक्रम डोळ्यांसमोर आणत जाते. आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरु होतो आणि कार्तिकी द्वादशीला त्याची समाप्ती होते. या काळात विविध व्रते अगदी कसोशीने पाळली जातात, नवी व्रते स्वीकारली जातात. मावशींचा जन्म आषाढातील दशमीचा आणि मृत्यू कार्तिकी एकादशीचा. त्यांनीही आपले जीवन देशासाठी, समाजासाठी व्रतस्थ राहूनच समर्पित केले ते फक्त ४ महिने नव्हे तर ४ तपे इतके होते.
आजच्या घडत असलेल्या अनेक घटनांना, प्रवृत्तींना सक्षमपणे तोंड द्यायचे असेल तर राष्ट्र सेविका समितीच्या शाखांवर मुलींची आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसायला हवी. त्यांच्यासारखे व्रतस्थ जीवन जगण्याची प्रेरणा मिळायला हवी. मावशींसाठी तीच खरी गुरुदक्षिणा असेल.
By
Padma Dabke
Pune, India
No comments:
Post a Comment