Monday, 20 May 2019

इच्छा मरण

डेव्हिड गुडाॅल या ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाने वयाच्या 104व्या वर्षी सित्झर्लंडमधे जाऊन, सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून स्वेच्छामरण स्वीकारले.  हा निर्णय खरोखरच धाडसाचाच आहे.  पण ही बातमी सर्वांनाच विचार करायला मात्र भाग पाडेल हे नक्की.

मुंबईत, गिरगावात गेली कित्येक वर्षे लव्हाटे पती पत्नी स्वेच्छामरण हवे यासाठी सरकार दरबारी पत्रव्यवहार करत आहेत हेही आपणा सर्वांना आठवत असेलच.  

मृत्यू हेच चिरंतन सत्य असलं तरी हे शरीर कितीही रोगजर्जर झालेले असले तरी ना माणसाला सोडवत, ना डाॅक्टर आपले रूग्णाला वाचवण्याचे प्रयत्न सोडत.  यात रूग्णाच्या यातना, आर्थिक खड्डा, इतर नातेवाईकांना येणारा कंटाळा सगळं सगळं लक्षात घेऊनही एखाद्याची जीवनयात्रा संपविण्याचा विचार मनात आला तरी प्रत्यक्षात येत नाही.

मला आवडेल का स्वेच्छामरण? नक्कीच आवडेल.  स्वतःच्या मनाची भरपूर तयारी करायला लागेल.  नात्यांमधून विरक्त व्हावं लागेल.  विरक्ती येण्यासाठी ' इथे तुझ्यावाचून अडत नाहीये' ही भावना मात्र कामाची नाही.  पण हे खरंच आहे की नाही की कोणाचंही कोणावाचून कधीही अडत नसतं.  आपल्याला तसं उगीच वाटत असतं.  हे मनानं स्वीकारलं की गुंते सुटतात सगळे.  

येणेची शरीरे शरीरा येणे सरे ही अध्यात्मिक अवस्था येण्यासाठी मनाच्याही वृत्ती तशाच हव्या नाही का?  पण शरीरही एक यंत्र आहे.  त्यातही बिघाड होतात आपल्या वापरण्याने,  नीट न वापरण्याने. त्याची दुरूस्ती कुठवर आणि कोणासाठी करायची हे समजलं आणि पटलं की स्वेच्छामरण स्वीकारणे अवघड जाणार नाही.

पूजनीय विमलाताई ठकार यांच्या आधार पण आश्रय नव्हे या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे प्रयाणोत्सव, अर्थात  मृत्यूचाही आनंदी सोहळा झाला पाहिजे.  एखादा जीव जन्माला येतो तेव्हा आपल्याला किती आनंद होतो तसा आनंद मृत्यूमुळेही व्हावा.  हे शरीर सोडल्यामुळेच आत्म्याला नवीन शरीर मिळवता येणार आहे हे तत्त्व समजायला हवे. 

मलाही डेव्हिड गुडाॅल यांच्यासारखे  स्वेच्छामरण घेता आले तर मीही जुनी मराठी आणि हिन्दी  गाणी ऐकत अगदी हस-या चेहे-याने या जगाचा निरोप घेईन.  शस्रक्रियेपूर्वी भूलतज्ज्ञ आपल्याला भूल देतात. तेव्हा आपल्या मनात जराही किंतु नसतो तोच भरवसा स्वेच्छामरण स्वीकारताना नक्की ठेवीन मी.  सलाईनमधलं औषध नसेतून हळूवारपणे झिरपत जाईल आणि यत्किंचितही वेदना, घुसमट न होता हृदय आणि मेंदू चिरविश्रांती घेतील.  समईतली तेवती वात तेल संपल्यावर जशी निरोप घेते तसाच हाही निरोप असेल नाही!   प्रायोपवेशन, संथारा या मृत्यूसमीप जाण्याच्या संथ पद्धतीपेक्षा ही इंजेक्शनची पद्धत नक्कीच सुखावह आणि झटकन होणारी.  

या जगाचा निरोप आनंदाने घेईन मी कदाचित याहून चांगले समृद्ध जीवन जगण्यासाठी.  कदाचित अधिक उत्तम कार्य हातून घडण्यासाठी.  कदाचित यातलं काहीच न घडता जीवनमुक्त होण्यासाठी.

By

Anagha Joshi

Talegaon, India

No comments:

Post a Comment