Monday, 27 May 2019

इंगित सुखी आयुष्याचे



आई असते सागर प्रेमाचा,
अथांग झरा आतूट मायेचा.
पण तिथे नको अविचारी आंधळी माया,
कौरवांच्या गांधारीचे जाते मग आयुष्य वाया.

पिता असे ताकद आयुष्य पेलण्याची,
दिशादर्शक, तपस्वी गुरू, सत्यता जगण्याची.
नको तिथे अहं; स्वतःच्या इच्छेचा,
अन्यथा होतो तिथे जन्म प्रल्हादाच्या हिरण्यकश्यपूचा.

पुत्र व्हावा ऐसा, ज्याचा डंका कीर्तीचा,
तोच स्त्रोत असतो पालक इच्छापूर्तीचा.
नको स्पर्श तिथे व्यभिचार वा दुर्वर्तनाचा,
उगा मग होतो तिथे धृतराष्ट्र दुर्योधनाचा.

कन्या असते चैतन्य, सौंदर्य सार्‍या घराचे,
दोन्ही घरातील दीप उजळविते ती स्वजनांचे.

न मिळो थारा तिथे कपटी मनाला,
पोटी जन्मते होलिका, कष्ट कश्यप ऋषीला.

बंधु प्रेमळ सखा असतो वडिलांचे दुसरे रूप,
बहिणीच्या हक्काचा दरवळतो सुखद, मंद धूप.
तिथे मात्रा नको स्वार्थी वा लोभीपणाची,
प्रसवते मग तिथे वृत्ती देवकीच्या कंसाची.

बहीण असते वात्सल्यमुर्ती, सावली आईची,
पाठराखण करते, पांघरते शाल ती मायेची.
नको व्हावी ती आंधळी, स्वार्थी, मनाची काळी,
जणू शूर्पणखाच ती, करते रावणाची, राखरांगोळी.

सासू असते परक्या घरी आई दुसरी,
समजवणारी, सांभाळणारी, मूर्ती प्रेमळ हसरी.
नको तिथे वावर राग-मत्सराचा,
जसा त्रास झाला सीतेला कैकेयीचा.

सून असते ऊर्जा सार्‍या सासरची,
मुलगीच दुसरी नव्या नेणत्या स्वशुरांची.

नको तिथे निवड अविचारी, घमंडी सूनेची,
होते मग कथा तिथे कोमोलिकेची.

असावे आयुष्य सारे आनंदी- स्वच्छंदी,
मैत्र असता आयुष्यभराचे, तिथे आत्मा अवघा आत्मानंदी.
हवी कशाला मग तगमग दोन जीवांची,
नको तिथे आता मैत्री त्या कर्ण - दुर्योधनाची.

आपल्यातच दडलेत राम अन् रावण,
म्हणूनी मनाची असावी निरोगी ठेवण.
प्रेम, आपुलकी अन्‌ जिव्हाळा,
सतत वाहता ठेवावा मनाचा उमाळा.
सर्वांग-सुंदर आयुष्याच्या असावा विचार,
अंतरी सतत तो ठेवील तेवत सदाचार.

सौ. केतकी कुलकर्णी
स्टुटगार्ट (जर्मनी)

No comments:

Post a Comment