Friday, 31 May 2019

उंदरायण


बरेच दिवस पाणी नव्हतं म्हणून धुण्याचे कपडे साठवून ठेवले होते. लोखंडी कपाटाशेजारच्या मोकळ्या जागेत खोचून ठेवले होते. आज पाणी आलं म्हणून ‘शरावती’ ते सगळे भिजवण्यासाठी काढायला लागली आणि लपकन्‌ एक लांब काळीशेपटी हलली, एक जाड काळं धूड चमकून अदृश्य झालं आणि तिच्या हृदयाचा
थरकाप झाला. उंदीर! नक्कीच उंदीर! आधी मन कबूल होईना. चौथ्या मजल्यावरच्या आर.सी.सी. बांधकामाच्या नव्याको-या फ्लॅटमध्ये उंदीर येणं कसं शक्यय? हॅ! उंदीर नसणार, पाल असेल पाल. किती नाकबूल केलं तरी डोळ्यांनी पाहिलेली प्रतिमा उंदराचीच होती हे मनात डाचत राहिलंच.मग एकदम असुरक्षित वाटायला लागलं. घरात उंदीर असू शकतो ही कल्पनाही नसल्यामुळे स्वत:चं बेदरकार वागणं आठवलं. उदा. कपाटाजवळ पलंग.पलंगावर तिचं बाळ झोपतं. ते झोपलं की कपाट उघडता, लावता येणार नाही म्हणून ते झोपेत
असतानाच कपाटाची दोन्ही दारं ती सताड उघडून ठेवायची कारण त्याच्या झोपेच्या काळातच तिला सारखं काही न काही कपाटातून लागायचं. अशी दारं दोन दोन तास उघडी रहायची. मग दारातून कपाटात शिरून त्याने आतल्या मालावर कधी हल्ला केला नसेलच का? आत सगळे बाहेरचे कपडे, पुस्तकं, वाचायला आणलेले थिसिस,
महत्त्वाची कागदपत्रं कितीतरी होतं . याने काय काय खलास केलं असेल? कपाटापाशी मच्छरदाणीची गुंडाळी खोचलेली होती. महाराज त्यात बसलेले होते. काय करू मी?वरच्या फ्लॅटमधला तरूण पोरगा ‘विक्रम’ तिला आठवला. धिप्पाड पर्सनॅलिटीचा. वाटलं, तो एक मिनिटात करेल आपलं काम, पण ‘विक्रम’ फारच घाबरट निघाला. सरळ ‘नाही’ म्हणाला. ते म्हणताना त्याची मान लगालगा हलली, जणू ती त्याला धरूनच नेणार होती. ओठ ‘नाही’ शब्दाबरोबर थरथरत राहिले. ‘हात तुझी रे विक्रम’ असं मनात म्हणत ती खाली आली.
गॅलरीत उभी राहून ती सोसायटीतल्या सगळ्या घरांकडे पाहत राहिली. एका घराबद्दलही असा विश्वास वाटेना की तिथे एखादा माईचा लाल असा असेल, जो न भिता उंदीर मारायला पुढे होईल. सगळी आपल्यासारखीच भित्री वस्ती. खरं म्हणजे तिला त्या उंदराला मुळीच मारायचं नव्हतं, फक्त त्याला घरातनं बाहेर काढायचं होतं.
पण तेही होईना तिच्याच्याने.तिने असं खूप बौद्धिक लढवून पाहिलं, आपल्याला उंदीर हाकलायला पुरुष
कशाला पाहिजे? फक्त पुरुषांचाच धिटाईशी संबंध असतो असं कुठंय? मध्यंतरी आपल्याहून लहान वयाच्या आपल्या जावेने हा महापराक्रम करून दाखवलाच होता की! ओट्यावर पिशवीत बसलेला उंदीर तिने पाहिला तेव्हा गपकन्‌ पिशवी उचलली. तिचं तोंड बांधलं आणि चक्क चालत चालत गेटपर्यंत जाऊन सोडून आली. तिने हा पराक्रम सांगितला तेव्हा तिच्या धिटाईचं तोंड भरून कौतुक केलं पण ते नुस्ते शब्द होते. उंदीर मारायला किंवा हाकलायला किती प्रमाणात धिटाई अपेक्षित आहे हे कुठं माहीत होतं तेव्हा. नुस्तंच शाब्दिक कौतुक.तर मुद्दा हा की, बायकाही उंदीर हाकलू शकतात. हे भलतंच झालं. आता मुद्दा हा पुढे आला की, आपण का हाकलू शकत नाही उंदीर? परिस्थिती तिच्यासमोर स्पष्ट होती. उंदीर गुंडाळीत होता. गुंडाळी उचलून फक्त गॅलरीतून खाली झटकायची होती. आपण का झटकू शकत नाही? हा या परिस्थितीतला प्रश्न होता. कुठे पळू, कुठे पळू या प्रश्नापासून असं तिला झालं. तिने स्वतःला खूप समजावलं जर उंदीर गुंडाळीत व्यवस्थित बसलेला असेल तर अनपेक्षितरीत्या फटकन्‌ गुंडाळी उचलायची न्‌ तीन सेकंदात गॅलरीतनं खाली झटकायची. आहे काय न्‌ नाही
काय? मग? का जमत नाहीये? समजा, तो तिथल्या तिथेच गुंडाळीतनं बाहेर पडून आपल्या अंगावर आला.
आपल्या हाताला, पायाला कुठे त्याचा स्पर्श झाला तर? काय होईल? स्पर्शाला इतकं का भ्यायचं? तो काय हातावर, पायावर बसून राहणार आहे? एका क्षणात ती घटना घडणार. आपण घटनेच्या वेगाला घाबरतो की त्याच्या काल्पनिक स्पर्शाला? की त्याच्या समग्र दर्शनालाच! कारण मगाशी आपल्याला जे दर्शन झालं ते फक्त उंदीर ही वस्तू कळण्यापुरतंच होतं. या भीतीची मुळं शोधण्याची तिची धडपड तिची तिलाच असह्य होत होती.
कशाला या फंदात पडतेस असं कुणीतरी जोरजोरात परिस्थितीपासून दूर ढकलत सांगत होतं. उंदीर जवळून कसा दिसत असेल? त्याच्या डोळ्यात काही भाव असतील का? त्याचा स्पर्श कसा असेल? त्याने आपल्या अंगावर कुठेही उडी घेतली तर तेवढ्या त्वचेला कोणत्या संवेदना होतील? खरखरीत? मऊ? लिबलिबीत? हे सगळं तिने
कल्पनेने अनुभवून पाहिलं. एवढ्यानेच छातीत धाडधाड वाजायला लागलं. काय पुळचट सुशिक्षित आपण. आयुष्यभर फालतू गोष्टी शिकत राहतो, उपयोगाच्या शिकत नाही. प्रश्नाची दुसरी बाजू ही होती, की नाही ना आपण उंदीर हाकलू शकत? मग विसरून जा. आपण उंदीर नाही, पाल पाहिली असं समजायचं पण तेही जमण्यासारखं नव्हतं. उंदराला पाल समजायचं? पाहिलाच नाही असं समजायचं? पाल काय
उंदराइतका उत्‌मात करते का? शेवटी ती भांडीवाल्या आजीबाईची वाट पहात राहिली. त्या आल्या. घाईघाईने
तिने त्यांना आपला प्रॉब्लेम सांगितला. त्यांनी,‘त्यात काय एवढं घाबरायचं!’ म्हणत मच्छरदाणीची गुंडाळी उचलली. गॅलरीत नेऊन झटकली पण उंदीर त्यातून बाहेर पडला नाही. आजीबाईंना उंदीर सापडण्याची निकड नव्हती. त्यामुळे त्या ‘उंदीर नाय्‌ न काय नाय्‌’ म्हणत उठल्या देखील, तिला मात्र उंदीर सापडण्याची निकड होती
त्यामुळे तिने त्यांना दाबून पुन्हा खाली बसवलं. पलंगावर उभं राहून अवजड कपाट सरकावलं. पलंगावरून कपाटामागे वाकून पहाताना ती दिव्य आकृती पुन्हा दिसली तिला. तिने आजीबाईंना सांगितलं, ‘आहे, आहे. आज्जी, कपाटाच्या मागेच आहे.’ आणि रणभूमीवरून पळून बाहेरच्या खोलीत जाऊन थेट पलंगावर उभी राहिली. आजीबाईंनी पाहिलं, सुटका दिसत नाही. त्यांनी काठीने खुडखुड करायला सुरुवात केली. पाचच मिन्टात आजीबाईंचा चीत्कार ऐकू आला, ‘पळाला हो पळाला.’ म्हणजे शंभर टक्के उंदीरच! हे क्लेशकारक सत्य तिने पचवलं. दुसरं आता आणखीन धावपळ करायला लावणारं क्लेशकारक सत्य म्हणजे तो घरातच दुसरीकडे
कुठेतरी लपून बसलाय. ही दोन्ही सत्यं स्वीकारून ती स्वयंपाकघरात गेली. पहिल्यांदा कमालीची चतुराई
दाखवून बेडरूमचं दार लावून टाकलं. बाथरूम, संडासची दारं लावून टाकली. मुख्य दरवाजा सताड उघडा ठेवला. हेतू हा की सद्‌गृहस्थाने सभ्यपणे घराबाहेर व्हावे. स्वयंपाकघर! डबेच डबे. लपायला अनेक सापट्या, फ्रीजजवळ दुधाच्या पिशव्यांचे गठ्ठे, गॅस सिलेंडरजवळ तवा, खलबत्ता, पोळपाट-लाटणं वगैरे. सगळे डबे सरकवत आजीबाई शोधत राहिल्या. ती खुर्चीवर सुरक्षित उभं राहून काठीने फ्रीजजवळ खुडखुड
करत त्यांना मदत करायला लागली. इतक्यात फ्रीजच्या मागच्या तारांच्या जाळ्यात शेपटी थरथरताना दिसली.
महाराज चकणी नजर करून तिच्याकडेच पहात होते. तेवढ्यातल्या तेवढ्यात वाटलं, या प्राण्यांना मृत्यू हातभर अंतरावर समोर दिसतो आणि आपण मृत्यू आपल्याला कधीही येऊ शकतो हे सत्य फक्त शब्दस्तरावरच मान्य करतो. आता आपण असे खुर्चीवर उभे असताना आपल्याला मृत्यू येऊ शकत नाही का? येऊ शकतो पण
आपल्याला तो अजिबातच दिसत नाही. दिसला असता तर...शेवटी तो आजीबाईंच्या हाती लागला नाहीच. आजीबाई शोधताना पुन्हा पुन्हा म्हणत होत्या, ‘त्यो काय करतोय? चावत नाय्‌ न काय नाय्‌. त्याला कशापायी
घाबरताय एवडं? त्यालाबी आपल्या जिवाची भीती असते ना!’
आजीबाईंच्या अंगवळणी पडलेलं वास्तव ती मात्र स्वीकारायला तयार नव्हती. अखेर शेवटचा डबा दाणकन्‌ सरकवून त्यांनी शोध संपल्याचं जाहीर केलं, ‘कुटं बी न्हाई. त्या काय राहतोय व्हय येका जागी, पळून ग्येला आसंल.’ ती घराच्या कानाकोप-यात पाहू लागली. उंदीर नुकसान करू शकेल असं कुठे कुठे, काय काय होतं याची यादी करू लागली. सगळंच नजरेसमोर यायला लागलं. माळ्यावर एवढी रचून ठेवलेली पुस्तकं, कपाटावर न लागणा-या पांघरुणांचा ढीग, माळ्यावर न लागणा-या ब-याचशा प्लॅस्टिकच्या वस्तू, जुने कपडे, प्लॅस्टिकच्या,
साठवलेल्या खूप पिशव्या, विविध मासिकं - वर्तमानपत्रांची चवड, सर्वत्र पसरलेलं, सगळीकडे भरून असलेलं, आपल्या संसाराचा मोठ्ठा भाग व्यापून असलेलं, न लागणारं सामान. कशासाठी आपण साठवलंय एवढं? या सगळ्या प्रपंचाची कारणीभूत स्त्री आपणच? अरेरे, किती मूर्ख आपण ! कागदाचे एका बाजूने लिहिलेले, चुरगाळलेले हजारो कपटे ठेवलेले पर्यावरण प्रेमापोटी प्रत्येक गोष्टीचा पुरतेपणी उपयोग व्हावा
म्हणून. असाच वाढवत, वाढवत नेला होता संसार. सुहृदांची, मित्रमैत्रिणींची, नातेवाईकांची शेकडो पत्रं जपलेली, निरनिराळ्या पार्सल्समध्ये. पिशव्यात वीस-बावीस दैनंदिन्या, ज्यात टीचभर आयुष्यात कोण आपल्याशी कसं वागलं, कोण काय बोललं? कोणी प्रेम उधळलं? हजारो घटनांचे, व्यक्तींचे अनावश्यक तपशील.
‘तू खूप ढोंगी आहेस’ असं एकजण तिला सायकल हातात धरून तिच्या घराच्या दारापुढे उभा राहून ओट्यावर उभ्या तिच्याकडे पाहत म्हणाला होता. तिच्या गलथानपणामुळे पावसात पांघरूणं भिजली होती तेव्हा वडील तिला मारायला धावले होते. घरातल्या भांडणांना भिऊन ती दुपारच्या रणरणत्या उन्हात रस्त्याने अनवाणी पळत जाऊन कुठल्याशा देवळात येऊन थडकली होती. असे किती किती असतील संदर्भ? प्रत्येक क्षणाला घडतच असतं की काही ना काहीतरी. लिहून काय ठेवायचं ते? आता तो जो कोणी तिला ढोंगी म्हणालेला सायकलस्वार दुस-या टोकाला निघून गेला देशाच्या, पुन्हा कुठला आलाय्‌ भेटायला, तिला मारायला धावलेले वडील मरून सुद्धा
गेले. ती अनवाणी पळत गेली त्या रस्त्याने आठवण ठेवली असेल की थरथरत उभी होती त्या थंडगार देवळाने? ही कशाला येड्यासारखी जमवत बसली हा कचरा आयुष्यभर पेट्यातून, पिशव्यातून? आणि ही पुस्तकं.. यात कितीशी असतील जगायला नीटपणे शिकवणारी? काहीतरी मुद्याचं सांगणारी? वीस-पंचवीस फार तर बाकी तर सारी फाजील जागा अडवणारी. काढलं पाहिजे, काढलं पाहिजे हे सगळं. अजून नीटसा तिरस्कार उत्पन्न होत
नाहीये. जगून संपलेल्या आयुष्याचा मोह नीटपणे बाजूला सारता येत नाहीये. किती थोडं लागत असतं माणसाला जगायला. बाकी फाजील भरती फाजील कारणांसाठीच होते ना? घरभर पसारा, आणि ती! ढीगभर निराशा आणि पुस्तकं, कपड्यांच्या चिंतेचं ओझं वागवत आपल्या निरुपयोगी, अव्यावहारिक वांझोट्या जगण्याबद्दल स्वतःवर
चडफडणारी तरीही - बेंबीच्या देठापासून काहीही बदलायला तयार नसणारी, सुरक्षिततेच्या पांघरूणाखाली स्वतःला आणि आपल्या जवळच्या सगळ्यांना दाबून ठेवणारी! अदृश्य उंदराच्या सहवासात, स्वतःत कोंडलेली, दिसलेली पण न दिसलेली!

सुजाता महाजन

No comments:

Post a Comment