Monday 8 March 2021

दानाचा संकल्प करु या!

 दानाचा संकल्प करु या!

पहाता पहाता  हे वर्ष संपत आले. नव्या वर्षासाठी काय योजायचे याचा विचार सुरु झालाय नॽ पाहू या का हे जमते का तेॽ 

‘जीवने यावदादानं स्यात् प्रदानं ततोऽधिकम्।’ याचा सरळ सरळ अर्थ ‘जीवनामध्ये आपण जे कमावतो, त्याहून अधिक दान आपण दिले पाहिजे.’ 

संस्कृत भाषेत आपल्याला विचार करायला प्रवृत्त करणारी असंख्य वचने आहेत. खरे तर सगळ्याच भाषेत अशी वचने असतील पण आपल्या गीर्वाण वाणीतली वचने अल्पाक्षरी म्हणजे अत्यंत कमी शब्दात भरपूर अर्थ सांगणारी, सहजतया संस्कार करणारी आहेत हे नक्की. 

जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक जीवच जगण्यासाठी काही न काही कमवत असतोच. मग प्राण्यांच्या बाबतीत ती शिकार असेल, वनस्पतींच्या बाबतीत ते जीवनग्रहण असेल. मनुष्याला तर अनेकांचे सहाय्य होतच असते. आपणही इतरांना साह्य करतो. पण हे साह्य नेहमी समजून केले जाते असे नाही. प्राणी अथवा वनस्पती निसर्गातून त्यांना आवश्यक असेल तेवढेच घेतात. माणसाच्या बाबतीत मात्र हे बरेचदा विपरितही दिसते. म्हणजे माणूस जेवढे घेतो ते सगळे आवश्यकच असते असे नाही. त्यामुळे मग मानवाचेच नव्हे तर सगळ्या जीवसृष्टीचे निसर्गचक्रही बिघडते. सध्या तर आपण अशा भयावह वाटणाऱ्या परिस्थितीतून जात आहोत. अशावेळी वरील वचनाचा अर्थ आपण सर्वांनीच समजून घ्यावयास हवा आहे. 

आपण जन्मल्यापासून आई, वडिल, गुरुजन, समाज आणि निसर्ग या सर्व घटकांपासून काही न काही प्राप्त करत असतोच. आता या प्राप्तीपेक्षा आपल्याला त्यांना अधिक दिले पाहिजे असे म्हटले आहे. आई, वडिल, गुरुजन यांचेविषयीची कृतज्ञता आपणांस सहजपणे समजते. पण नीट विचार केला तर आपल्याला दैनंदिन जीवनात सुलभतेने जगण्यासाठी अनेकांचे सहाय्य आपणास होत असते. अशांचे ऋण फेडण्यासाठी दानाची संकल्पना आपल्याकडे रूढ आहे. दान हे तेव्हाच होते ज्यावेळी त्याबदल्यात आपल्याला कोणतीही आपली अपेक्षापूर्ती करुन घ्यावयाची नसते. 

आता हे दान आपण कोणकोणत्या प्रकाराने देऊ शकतो त्याचा विचार करु या. आपल्याला सहाय्यभूत जे होत असतील त्यांचेप्रती सद्भाव असणे, त्यांना उचित मान देणे हेही एक प्रकारचे दानच असते. हे दान केवळ धन, पैसा, वस्तू या स्वरुपातच असावे असे अपेक्षित नाही. भावनिक आधार देणे, वेळ देणे, सहवास देणे, आपणांस ज्ञात असेल ते इतरांपर्यंत पोहोचवणे हे ही दान आपण देऊ शकतो. तेही मोलाचेच असते. धनादि संपत्तीने जशी समृद्धता येते तशीच या गोष्टींनी समाजात सौहार्दता नांदते. एकोपा वृद्धिंगत होतो. वेळप्रसंगी समाजात आवश्यक धाक निर्माण करण्याचे कामही या अशा उपक्रमातून साध्य होते. 

सुदृढ असणाऱ्यांनी केलेले रक्त्तदानही फार महत्त्वाचेच. नेत्रदान, देहदान, अवयव दान हे आपल्या मृत्यूपश्चात होणार असले तरी आपण त्याचा संकल्प हयातीतच करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या दानांचाही विचार करायला हरकत नाही. 

विद्यादान हे तर देता घेता दोघांनाही समृद्ध करणारे ठरते. म्हणूनच ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’ असे वचन भगवंत सहजपणे सांगतात.   

कोणत्याही वयाची, परिस्थितीची बंधने घालून न घेता आपण विं. दा. करंदीकरांच्या एका कवितेतील ‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे। घेता घेता एक दिवस देणाराचे हात घ्यावेत॥’ म्हणजे आपण स्वतः घेता घेता देता व्हावे याचे अनुसरण करु या. 


Padma Dabke 


No comments:

Post a Comment