Monday 8 March 2021

दुर्गे दुर्घट भारी

 दुर्गे दुर्घट भारी

- सुजाता महाजन

   

सकाळच्या वेळी चंद्रीला खूप काम असायचं. वर गच्चीपासून जिने झाडत खाली यायचं. ‘बी’ विंगला तिची पाठची बहीण ‘गोदू’, ‘सी’ विंगला तिच्याहून धाकटी ‘भीमी’, ‘डी’ विंगला ‘यमी’ आणि ‘ई’ विंगला त्यांचा बापू. बापू रस्तेपण झाडायचा. चौघी बहिणी केराची एकेक मोठी टोपली घेऊन खाली यायच्या. काही घरांच्या बाहेर मोठमोठी खोकी ठेवलेली असायची. ती खोकी, थर्माकोल वगैरे वरूनच खाली टाकून द्यायचं. काहींच्या केरात दारुच्या बाटल्या असायच्या त्या काचेच्या असल्यामुळे वेगळ्या ठेवायच्या.

खाली सर्वांचा केर एकत्र आणल्यानंतर ब-याचशा चांगल्या चांगल्या वस्तू केरातून काढून घ्यायच्या. खोकी सरळ करून त्यांचे गठ्ठे बांधायचे. प्लॅस्टिक, लोखंडी वस्तू, काचेच्या बाटल्या वेगळ्या काढायच्या.

हे काम चालू असताना बापू एका बाजूला उभा राहून सतत एकामागून एक विड्या ओढत असायचा. बापू खूच उंच, लुकडा, काळासावळा, दाट भिवयांचा, उग्र चेह-याचा मनुष्य होता. पण चारी मुलींचं त्याच्यावर फार प्रेम होतं.

मुलींना आई नव्हती. म्हणजे त्यांची आई स्टोव्हचा भडका उडून जळून मेली होती. ती खूपच सालस बाई होती. त्या मानाने बापू भडक डोक्याचा होता. आई तशी मेली तेव्हा मुली खूपच लहान होत्या. फक्त चंद्रीला थोडंफार कळत होतं. बापूबद्दल लोक काहीबाही बोलताना तिच्या कानावर आलं होतं. बापूनेच आईला मारलं असं लोक म्हणायचे. पण तिला कधीच ते पटलं नाही. गरिबाबद्दल काय, कुणी काहीही बोलावं. तिला खूप राग यायचा बापूबद्दल भलतंसलतं बोलणा-या लोकांचा.

आई गेल्यावर महिनाभरातच बापूने दुसरं लग्न केलं. दुसरी आई त्यांच्या नात्यातलीच होती. चंद्रीहून सात-आठ वर्षांनी मोठी असेल. तरुण आणि सुंदर होती. तरीही चंद्रीला असं वाटलं नाही, की या बाईंसाठी बापूने असं काही केलं असेल.

नवी आई त्यांच्याशी कधी वाईट वागली नाही. उलट ती मुलींमधली एक बनून राहायची. चारी मुली बापूबरोबर कामाला येत असल्या तरी अजून धाकटे दोघे भाऊ होते. नवी आई त्यांना सांभाळायची. एखाद दिवशी ती पण त्या दोघांना बरोबर घेऊन एक बोटाला, एक कडेवर शिवाय एक पोटात अशी कामाला यायची. एवढ्या मोठ्या कॉलनीतल्या मध्यभागी असलेल्या बागेत मुलांना बसवायची आणि जवळपासच झाडत रहायची. कोप-यावरच्या दुकानातनं ५० पै. च्या गोळ्या त्यांना घेऊन दिल्या की ते एकामागून एक चघळत बसायचे. कधी कधी भांडणं, मारामा-या करायचे. ‘आये’, ‘बापू’ करून ओरडायचे. चार मुली, आई, बापू जो कुणी ऐकेल तो पटकन धावून यायचा.

पण मुलांना सांभाळावं म्हणून आई घरीच थांबायची.

पावसाळ्याच्या दिवसात गच्चीवरुन खूप पाणी जिन्यांवर यायचं तेव्हा जिन्यावरचं पाणी केरासह लोटत लोटत खाली न्यावं लागयचं. हात भरून यायचे.

कधी कधी लोकांशी कटकटी व्हायच्या. काही लोक दररोज कटकट करणारे होते. केराची बादली ठेवली, की ‘नीट झाडत जा ग जिना’

‘केराची पिशवी नको काढून नेऊस. रोज रोज नवी पिशवी कुठून आणायची?’’

‘बादलीला केर राहिला बघ. नीट पुसून घे.’

कुठल्याही वेळेला आलं तरी ‘भलत्या वेळेला काय येते गं?’

कुणी म्हणायचं, ‘मुलांच्या डब्याच्या घाईत येत जाऊ नकोस.’

कुणी म्हणायचं, ‘सकाळी पटकन्‌ येऊन स्वच्छ करून जावं तर किती उशीरा येतेस.’

काही काही लोक बादली बाहेर ठेवून द्यायचे. मग कुत्री जाऊन सगळं उचकून बाहेर काढणार उघडं परब्रह्म. अंड्यांची टरफलं, भाज्यांचे देठ, चहाच्या गाळासकट चहाचे थेंब, फळांची सालं, कंडोम...

त्यामुळे कुत्री म्हणजे बापूच्या पूर्ण कुटुंबाचीच शत्रू. खाली केर आणून ठेवला की कुत्री धावत येणार, बापूचं लक्ष नाही पाहून टोपलीत तोंड घालणार. पिशव्या बाहेर उपसणार. मग बापूने एक सणसणीत शिवी घालून जोरात एखादा दगड फेकला, की कुत्री क्यॅ क्यॅ करत पळून जाणार.

मग सगळा केर एकत्र करायचा. चंद्री त्या टोपलीत उभी राहून पायाने केर दाबून दाबून बसवायची मग बापू एम-८० घेऊन यायचा. चंद्री त्याच्यामागे टोपली घेऊन बसायची. मग ते कोप-यावरच्या कचराकुंडीत केर ओतून यायचे.

एवढं सगळं काम करता करता पोरींचा जीव थकून जायचा. पण बापूला आपण मदत करतोय ही भावनाच त्यांना पुरेशी होती. बापूच्या थकलेल्या चेह-यावर आनंदाचं हसू दिसलं की त्यांचा थकवा पळून जायचा.

एकेक विंग एकटीने झाडताना, येणा-या प्रत्येक गोष्टीला तोंड देताना, शेवटच्या पायरीपर्यंत आलं, की गड जिंकल्यासारखं वाटायचं. पाठमोरा बापू झाडताना दिसला की मायेची ऊब पसरल्यासारखं वाटायचं. एकत्र काम करण्याचा आनंद एवढा मोठा होता, की कामांचे कष्ट काहीच जाणवायचे नाहीत.

कधी थंडीच्या दिवसात पार्किंगच्या जागेत एखाद्या मोडक्या खुर्चीत बापू बसलेला असायचा. चंद्री त्याच्या डोक्यातल्या उवा काढून द्यायची. ती कामाला गेली की भीमी यायची, मग गोदी, मग यमी. सगळ्या मिळून बापूचं डोकं साफ करून टाकायच्या. बापू खुर्चीत गुंगी झाल्यासारखा मुटकुळं करून पडून रहायचा.

कधी कधी केरात कुणी टाकून दिलेल्या काही चांगल्या वस्तू अनपेक्षितपणे मिळून जायच्या. एकदा असाच एका माणसाने जुना सोफासेट बापूला घेऊन जायला सांगितलं. तो दिवस अविस्मरणीय होता. बापूने चार माणसं मदतीला आणून सोफासेट घरी नेला होता. तो थोडासा फाटलेला होता. फाटक्या जागेतून स्पंज बाहेर आलेला होता.

पोरांनी सोफ्यावर खूप उड्या मारल्या. सगळ्यांनी एकाचवेळी सोफ्यावर बसून कसं वाटतं ते बघितलं. कुणी झोपून पाहिलं. त्याच्यावरनं बरीचशी भांडाभांडी झाली. पण तो दिवस वेगळाच होता. शेजारीपाजारी दिवसभर सोफा पहायला येत होते. गप्पा चालल्या होत्या.

गेले काही दिवस बापू ज्या कॉलनीत काम करायचा तिथे नवाच प्रॉब्लेम झाला होता, तो परदेशी नागरिकांचा, विशेषतः आफ्रिकन. त्यांच्याशी कुठलाच डायलॉग शक्य नसायचा. ही मंडळी उपद्रवी होती. रात्रभर ये जा करणे, त्यापायी लिफ्ट सतत चालू, पाण्याचा नळ उघडा ठेवून जाणे, कोप-यावरच्या दुकानापाशी मोठा घोळका करून सिगरेटी फुंकणे, बडबड करणे, अर्धनग्न पोरींना घेऊन बेताल वागणे, रात्री उशिरापर्यंत गाणी लावून समूहनृत्य, अशासारखे त्यांचे त्रास असायचे. घरमालकाकडे तक्रार केली तर ते दुर्लक्ष करायचे. याचं कारण ज्या ज्या फ्लॅटधारकांचे हे भाडेकरू होते तेच सोसायटी चालवणारे होते, तक्रार कोणाकडे करणार? आपल्याकडच्या लोकशाहीचं हेच स्वरूप आहे हे प्रत्येकालाच माहीत असल्याने कुणी काही करूशकत नव्हतं.

बापूची एकदोनदा या आफ्रिकन लोकांशी बाचाबाची झाली. बाचाबाची म्हणजे बापू हिंदीत बोलत होता ते लोक त्याला इंग्लिशमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत होते. दोघांनाही एकमेकांची भाषा, देहबोली काहीच कळत नव्हतं.

हे लोक उशिरा झोपत असल्याने सकाळी बापूने दार वाजवलं की, ते दार उघडायचे नाहीत. नंतर सगळं साफ करून बापू गेला की केराची टोपली बाहेर ठेवून द्यायचे. कुत्री सगळा केर रस्ताभर करायची.

बापूने तडातडा हिंदीत बडबड करायचा. वेगळ्या लोकांशी बोलायचं तर मराठीत बोलायचं नसतं एवढं बापूला माहीत होतं. मराठीत बोलायचं नाही म्हणून तो हिंदीत बोलायचा. लोक त्याच्या तोंडाकडे पहात राह्यचे.

शेवटी बापूने एकाला पकडून आणून आपलं म्हणणं ट्रान्सलेट करून त्यांच्यापर्यंत पोचवलं.

तरीही प्रॉब्लेम झालाच.

त्या दिवशी बापू जोरात ओरडत जिन्यावरून खाली आला, ‘‘मारलं मारलं’ करत.

लगेच बघे जमले. बापूचे केस विस्कटले होते, शर्ट फाटला होता, गाल काळपट तांबडा झाला होता. तो संपाप आणि दुःखाने रडत होता. लोकांना सांगत होता, ‘त्यांनी रूममध्ये इथे एवढा कचरा करुन ठेवलावता. मला म्हणाले, आत येऊन सगळं झाडून कचरा घेऊन जा. म्हंजे खुनांनी सांगत व्हते. मी म्हटलं, मी इथे काम नाही करत. तुमी केर ठेवला की मी तो घेऊन जानार. मी न्हाई म्हनलो तर माजा शर्ट धरून ओढला. येकाने लाथ घातली. येकानं थोबाडीत दिली.’
बापू पुन्हा रडायला लागला. त्याला लागलं होतं त्याच्या वेदनांपेक्षा आकस्मिक घडलेल्या घटनेचा शॉक जास्त बसला होता आणि भयंकर अपमान वाटत होता.
‘ए’ विंगमध्ये चंद्री झाडत होती. खालून भीमीच्या जोरात हाका आणि अर्धवट रडणं ऐकू आलं. चंद्रीच्या छातीत धस्स झालं. काय झालं?

ती धावत खाली आली. खाली भीमी रडत उभी होती. ती म्हणाली, ‘बापूला मारलं’

चंद्री बेभान होऊन तिच्यामागे धावायला लागली. ‘ई’ विंगपाशी खुर्चीवर बापू बसला होता. केस विस्कटलेले, शर्ट फाटलेला. रडत होता. लोक त्याची समजूत काढत होते. कुणीतरी त्याला पाणी आणून दिलं होतं. पाण्याचा ग्लास हातात तसाच ठेवून तो रडत होता.

लोक आपापात बोलत होते, ‘फारच त्रास वाढलाय या मेल्यांचा. कुणी यांना काही कसं बोलत नाही.’

‘कोण काय बोलणार’ इकडे तिकडे पहात हळूच, ‘त्यांना पाठीशी घालणारे आहेत ना!’

‘पण काहीतरी करायला हवं. अहो, दुकानापाशी उभं राहून सिगरेट ओढू नका. आमच्या घरात सारखा धूर कोंडतो किती वेळा सांगितलं तरी ऐकत नाहीत.’

‘कधी कधी वाटतं, कुठून आलो या सोसायटीत पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, शिवाय गुंडगिरी आणि दादागिरी. आपण कुठे कुणाशी भांडण, मारामा-या करत बसणार न! आणि केली तरी कायम थोडी करु शकणार!’

‘मला तर कधी कधी वाटतं, कुठून आलो या शहरात. चंद्रावर नसतील इतके खड्डे या शहरात आहेत. वाहन चालवताना कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी शिवाय ट्रॅफिक ज्यॅमची कटकट, बस कधी वेळेवर मिळणार नाही. इतक्या इतक्या वेळाने बस येते की पूर्ण भरून खाली लोंबायला लागते माणसांनी. परवा नाही का ती बिचारी मुलगी गेली.’

‘अहो, नव्या गाड्यांसाठी पैसे मंजूर केलेले. आणल्या कुठे नव्या गाड्या? काही खरं नाही या शहराचं.’

‘जाऊन जाऊन कुठे जाणार तुम्ही. दुसरीकडे काय वेगळं असेल? आपला देशच असा आहे. सगळे साले नुस्ते पैसे खाणारे.’

‘अहो महाराज, आपण फार बरे. तिकडं बिहार, उत्तर प्रदेश, आसाम तिकडं बघा. म्हंजे आपण फार सुखात आहोत असं वाटेल तुम्हाला.’

‘आपल्याला शिकवतातच ना नाहीतरी. तुमच्याहून मोठं दुःख असलेले लोक पहा म्हंजे तुमचं दुःख कमी होईल.’

अशीच चर्चा भरकटत राहिली.

चंद्रीने लोकांकडून सगळी चर्चा शांतपणे ऐकली ती लगेच वळून चालायला लागली.

‘ई’ विंगमधल्या बारा नं. च्या फ्लॅटची बेल वाजली. जॉनने दार उघडलं.

दारात तेरा-चौदा वर्षांची एक काळीसावळी, उंच, लुकडी मुलगी उभी होती. तीक्ष्ण डोळ्यांनी जॉनकडं पहात होती.

जॉनने इंग्लिशमध्ये ‘कोण पाहिजे’ विचारलं. प्रश्न संपताच लुकड्या हातांची एक सणसणीत चपराक गालावर बसली. विलक्षण धक्का बसून त्याने तिच्याकडे पाहिलं. तेव्हा दुस-या गालावर दण्णकन चपराक बसली.

कुठल्याही कृतीचं सामर्थ्य नसलेल्या पराभूत मनोवृत्तीच्या लोकांमधून २/४ माणसं कशीबशी निवडून बापू त्यांना घेऊन वर आला तेव्हा त्याला हे अभूतपूर्व दृश्य पहायला मिळालं. काहीही न बोलता चंद्री शांतपणे मागे वळली तेव्हा लोक थक्क होऊन आपल्याकडे बघताना तिला दिसले.

दारात बधीर होऊन थांबलेल्या जॉनला एका क्षणात ही पोरगी कोण आणि तिने आपल्याला का मारलं याचा उलगडा झाला.

एकदा समूह झाला की तो काहीही करू शकतो याचं उपजत ज्ञान त्याच्यात जागृत झालं. सगळ्यांसमोर तो बापूला हात जोडून ‘सॉरी, सॉरी’ म्हणाला मग चंद्रीकडे वळून तिला ‘सॉरी, सॉरी’ म्हणाला.

आता बोलण्यासारखं काही नव्हतं.

सगळे खाली उतरले तेव्हा चंद्रीची चपराक आपल्यालाच बसली असावी असं ओशाळेपण, नीट न घासलेल्या भांड्याला खरकटं राहून जावं तसं प्रत्येकाच्या मनाला चिकटून राहिलं होतं.


***

No comments:

Post a Comment