Sunday, 30 June 2019

उद्धरेदात्मनात्मानम्


आज या विषयावर लिहितांना मला मोरारी बापूंनी सांगितलेली एक गोष्ट आठवतेय. एका शहरात एक कुशल चोर होता. तो आपला उदरनिर्वाह चोरीवर चालवायचा. एकदा तो सत्संग चालू असतांना तिथे थांबला. तिथे प्रवचन करणारे सांगत होते की माणसाने कोणते तरी व्रत अवश्य अंगिकारले पाहिजे आणि त्या व्रताचा दृढतेने पाठपुरावा केला पाहिजे. प्रसंगी त्या व्रत पालनाने प्राणावर संकट आले तरी हरकत नाही. त्याने विचारपूर्वक नेहमी खरे बोलण्याचे व्रत घेतले. एकदा तो चोरी करायला एका राजाच्या महालात गेला. चूपचाप आत शिरत असतांना राजाचा प्रधानमंत्रीही तिथे होता. त्याने विचारले तू कोणॽ चोर म्हणाला मी चोर आहे. हे ऐकताच मंत्री हसला आणि म्हणाला चल मी पण राजाचा खजिना लुटायलाच आलोय. आपण दोघेही धन लुटू आणि बरोबरीने वाटून घेऊ. त्या प्रमाणे त्यांनी बरोबरीने सर्व दागिने, जडजवाहिर घेतले. मात्र एका बटव्यात तीन मौल्यवान हिरे होते. त्यामुळे प्रधानमंत्र्याने सांगितले. यातला एक तू घे. एक मी घेतो. आणि एक इथेच राहू दे. आपल्यात भांडण नको. चोरी करुन दोघेही बरोबर बाहेर पडले. मंत्री चोरासोबत त्याच्या घरापर्यंत गेला आणि मग आपल्या घरी गेला. दुसऱ्या दिवशी राजदरबारात आल्यावर चोरी झाल्याचे कळताच प्रधानमंत्र्याने चोराच्या घराचा पत्ता सांगितला. चोराला पकडून ऱाज्य सभेत उभे केल्यावर त्याने सगळी घटना खरीखुरी सांगितली. एक हिरा तेथेच बटव्यात ठेवला हेही सांगितले. राजाने पाहिले तर खरेच एक हिरा होता. राजाने प्रधानमंत्र्याच्या घराचीही झडती करविली तर एक हिरा आणि बाकीचे धनही त्याच्याकडे सापडले. राजाने खरे बोलणाऱ्या चोराला आपला प्रधानमंत्री बनविले आणि प्रधानमंत्री होता त्याला राज्यातून हद्दपार केले.

     आपणच आपले मित्र असतो आणि आपणच आपले शत्रु असतो. चोराने ठरविले की आपण सत्यच बोलायचे आणि प्रधानाने ठरविले की चोराच्या नावावर आपला स्वार्थ साधला जाईल. योग्य गोष्ट चोराने केली तर त्याचा लाभ त्याला मिळाला आणि चुकीची गोष्ट प्रधानमंत्र्याने केली तर त्याला नुकसान सोसावे लागले.

     जी गोष्ट व्यवहारात तीच परमार्थातही. आपणच निश्चयपूर्वक आपले हित कशात आहे हे समजून घेतले तर मनुष्य जन्म हे खरोखरीच एक अद्भुत असे मिळालेले वरदान आहे. इतर सर्व योनी या भोगयोनी आहेत.  मनुष्य देहातच आपण या सृष्टीचा कर्ता कोण हे जाणून घेऊ शकतो. पंच महाभूते जी आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश यांच्या सहाय्याने व त्रिगुण – रज, तम आणि सत्त्व यांच्या मिश्रणाने आपला देह तयार होतो. या देहाचा उपयोग आपल्या स्वतःचा उद्धार करुन घेण्यासाठी आहे हे आपण मनुष्य जन्मातच समजू शकतो. इतर प्राण्यांपेक्षा मिळालेल्या विकसित बुद्धीचा सन्मार्गासाठी उपयोग करु शकतो.

     सात्विक आहार, इंद्रिय निग्रह, आत्मसंयम, ध्यान धारणा यांच्या सहाय्याने प्रपंचातील घटनांनी होणारा ताप आपण सुसह्य करुन घेऊ शकतो. भौतिक साधनांनी मिळणारे सुख वा दुःख हे काही काळापुरतेच असते. नित्य नसते. देहाला बाल्य, कौमार्य, प्रौढत्व, जरा आणि मृत्यू हे विकार काही काळापुरतेच असतात. एक गेले म्हणून त्रास करण्याचेही काही कारण नाही आणि दुसरे आले म्हणून फुशारकी मारण्याचेही कारण नाही हे ज्ञान आपल्याला अनुभवाने प्राप्त होते. मग आपोआपच देहावरचे ममत्व कमी होते. आत्मा अमर, नित्य आणि त्या परमतत्वाचा अंश आहे हे समजले की त्याची ओढ आपल्याला योग्य मार्गावर आणते. संचित कर्मानुसार येणारे भोग भोगत असतांना नवे क्रियमाण आपण तयार होणार नाही याची मग काळजी घेतो.  बुद्धीद्वारे आपले विहित कर्म जाणून स्वधर्माबद्दल जागृक राहून लोकसंग्रह करु शकतो. सर्वांभूती समभाव ठेवण्याचा अभ्यास करता येतो. माझ्या अंतरंगात देव आहेच तसाच तो सर्वत्र भरलेला आहे इतकी विशाल दृष्टी प्राप्त करुन घेऊ शकतो. विनोबाजींच्या शब्दात सांगायचे तर आपल्याला आपण आहोत त्या स्थानापासून उंच उडी मारण्याचा प्रयत्न करता येतो.

     या प्रयत्नांसाठी आधी आपल्या मनाला शिस्त लावावी लागते. त्याला योग्य त्या गोष्टी करण्याची गोडी निर्माण करावी लागते. कधी गोडीगुलाबीने तर कधी धाक दाखवूनही. जे अन्न आपण ग्रहण करतो ते आपले मन सात्विक वा तामसी बनविण्यास कारणीभूत होते. त्यामुळे भोजन तयार करण्यापासून ते ग्रहण करण्यापर्यंत त्यावर अनुचित संस्कार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागते. नाहीतर सध्याच्या काळात रस्तोरस्ती मिळणाऱ्या अन्नाने आणि जंकफूडने शारिरीक हानी तर होतेच आहे पण वृत्तीही अधिकाधिक तामसी झालेली अनुभवास येतेच आहे. मन स्थिर राहील, शांत राहील असे वाचन, श्रवणही आवश्यक असते. अन्यथा घराघरातून दिसणारी दूरदर्शनवरील मालिकांमधील नको ती दृश्य प्रत्यक्षात घरातच साकार व्हायला काही वेळ लागत नसतो. युक्त आहाराबरोबर विहारही आपला उचित ठिकाणी व्हावा हेही पहायला हवे. निसर्ग स्थानांच्या सान्निध्यात राहून आपले मन आपोआप विशाल होते. तीर्थस्थानी जाऊन पवित्र होते.

     ज्ञानप्राप्ती झाल्यानंतरही अभ्यास आणि वैराग्य कायम रहावे यासाठी सेवाभावाने केली जाणारी लोकहिताची कामे नित्य केली तरच अहंकार नावाचा नाग केव्हाही फणा काढायला तयार असतो त्याचेवर अंकुश ठेवता येतो. नाहीतर तोच आपला घात करुन अधोगतीला जाण्याचा मार्ग प्रशस्त करतो. आपले हित साधण्यासाठी वरील सर्व गोष्टींचा प्रयत्न माणसाने स्वतःहूनच केला पाहिजे तरच तो भगवंत सांगतात त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ, योगी, संन्न्यासी, जितेंद्रिय, मनोनिग्रही या विविध उपाधींनी वर्णन केल्याप्रमाणे होतो. अंतिमतः मोक्षाचा अधिकारी होतो. इतरांचे मार्गदर्शन, सहकार्य मिळू शकते. पण प्रयत्न हा ज्याचा त्यानेच म्हणजे स्वतःच स्वतःच्या उद्धारासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते. पाणी घोड्यानेच प्यायचे असते.

     असे स्वतःचे हित स्वतःच साधण्यासाठी सर्व संत नामस्मरणाचा मार्ग अत्यंत सुलभ, कोणत्याही प्रकारचे धन न वेचता कोणत्याही काळी व कितीही वेळ करता येणारा मार्ग आहे असे सांगतात.    

      ‘तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’ हे वामनराव पै यांचे प्रसिद्ध वाक्य गीतेच्या सहाव्या अध्यायातील ५ व्या श्लोकातील ‘उद्धरेदात्मनात्मानम्’ याचेच मराठीतील प्रकटीकरण आहे जणू.


By

Padma Dabke

Pune, India

No comments:

Post a Comment