Sunday, 30 June 2019

पाऊस

स्पर्धेचा विषय 'पाऊस' आहे हे वाचल्यावर पावसाच्या असंख्य आठवणी मनात बरसू लागल्या.  

पहिल्या पावसानंतर हवेत उसळलेला तो मृदगंध नेहेमीच मला लहानपणात नेतो.  आमची चाळ डोळ्यासमोर येते.  आणि चाळीचं मोठ्ठं अंगण.  अनवाणी पायांनी अंगणभर हुंदडणारी आम्ही मुलं समस्त आयांच्या धाकाने व-हांड्यातच उच्छाद आणायचो.  पावसाच्या धारांमधून आणि सोसाट्याच्या   
वा-याने हलणा-या अशोकाच्या फांद्या बघायला मला खूप आवडायचं.  मातीत, विहिरीच्या पाण्यात पडणारे पावसाचे थेंब इतके सुंदर दिसायचे जणू काही निरांजनंच.  आजही मला पावसाचा थेंब जमिनीवर, पाण्यावर पडून काहीसा वर उडतो तेव्हा ती जुनी निरांजनंच आठवतात.  आज विहीर किती भरली हे बघण्यातला आनंद पावसात मिळायचा.  पावसातल्या त्या होड्या कुठे आणि कशा वहात जातायत हे बघायला आमचं टोळकं निघायचं ते आईची तंबी कानाआड करूनच.  शाळा नुकत्याच सुरू झालेल्या असायच्या, नविन छत्री रेनकोट, चावणारे पावसाळी सॅण्डल्स, पाणी फदक फदक उडवत शाळेत जाणारी मी मला आठवते.  

याच पावसात मला आठवतं माझ्या आजोबांचं  आजारपण आणि त्यातच झालेलं त्यांचं निर्वाण.  11 जुन 1970. प्रचंड धो धो पाऊस, घोंगडीवर ठेवलेलं आजोबांचं कलेवर आणि घरात आलेला अश्रूंचा पूर.  

वयात आल्यावर अशाच एका पावसाळी दिवशी ह्यांची -माझी झालेली पहिली भेट.  ती आठवण तर आजन्म सुखावणारी.  माझी दोन्ही बाळंतपणं धुव्वाधार पावसातलीच. बाहेर पाऊस, मनात आनंदाचा पाऊस असं विलक्षण गोड चित्र आठवलं की मनातला पाऊस बरसू लागतो.

आजोबा गेल्याचं दुःख प्रत्येक पावसात ओलं होतं तसंच सासरे आणि वडील गेल्याचं दुःखही पावसाला आणि मनाला उदास करतं.  

पण परत नातीचा पावसाळ्यातलाच जन्म पुन्हा आनंदाच्या पावसात चिंब भिजून जाते.  

1990 चा पूर, 26 जुलै 2005 ची पूरस्थिती खूप अनुभव देऊन गेल्या.  1990 साली घरात कमरेएवढं पाणी, कीचन ओट्यावर घाबरून बसलेले अनुजा अमृत आणि सासूबाई, घराबाहेर मुंबईत अडकलेले हे आणि वाहणारं सामान वाचण्याचा प्रयत्न करणारी मी हे दृष्य आजही आठवलं की हलवून सोडते  तर 26 जुलै 2005 साली चर्चगेटला राहणारी मी, पावसात अडकलेल्या 30-35 जणांना घरात आसरा देणारी मी, आकाशवाणी, हायकोर्ट, सिटी सिव्हिक कोर्टातल्या 150-200 माणसांना डाळ तांदुळाची  खिचडी करून देणारी मी आणि ती घेऊन जाऊन वाटणारी माझी मुलं आणि यजमान.  ही आठवण खूप मानसिक समाधान देते दर पावसाळ्यात.  देवाचे आभार प्रत्येकवेळी मानायला लावते कारण 150-200 जणांसाठी खिचडी हा माझ्या लेखी चमत्कारच होता. 

तर सख्यांनो अशा या माझ्या पावसाळी आठवणी काही सुखाच्या आनंदधारा तर काही दुःखाची रिमझिम असणा-या.

By

Anagha Joshi

Talegaon, India

No comments:

Post a Comment