Wednesday, 31 July 2019

जिन्यातले पत्ते

माझ्या नव्या फ्लॅटच्या दरवाज्यापुढे रुंद पॅसेज आहे आणि लिफ्टच्या समोर तर फारच मोठा चौकोनी भाग आहे. त्यातून इथे माणसे कमी आहेत, त्यामुळे हा भाग जास्तच प्रशस्त वाटतो..... आणि परवा न ठरवता मला आठवला आमच्या दादरच्या घराचा जिना आणि त्यासमोरील गॅलरी मिळून झालेला ‘तो’ चौकोनी भाग. मे महिन्यात त्या भागाला फार महत्त्व प्राप्त होत असे. कारण दुपारी जेवणे झाल्यानंतर संध्याकाळ होईपर्यंत हा चौकोनी भाग आमचा स्पोर्टस् क्लब असायचा. १०, १२ जण दाटीवाटीने गोल करुन बसायचो आणि पत्त्यांतील ‘बदाम -७’, ‘गड्डा झब्बू’, ‘नाटे काटे ठोम’ (म्हणजे नॉट ॲट होम चे मराठी व्हर्जन) यासारखे खेळ तासंतास चालायचे. तिथे फॅन, कारपेट तर नव्हेच, कोणत्याही सुविधा नाहीच तण तो चक्क येण्याजाण्याचा रस्ता होता. तरीही आमच्या मोरंजनात काही कमतरता नव्हती. येणारे जाणारे चप्पल हातात घेऊन पत्त्यांवर पाय न देण्याची दक्षता घेत. दररोज त्याच जोणाने तीच मुले, तेच तेच खेळ खेलायची पण प्रत्येक दिवस वेगळा होता. प्रत्येक डाव वेगळा होता आणि दरवेळची रंगतही वेगळीच असायची. 

चंद्रचूडांकडील आरती, अमय, आम्ही भावंडे, तळमजल्यावरचा हेमा, शहांकडील नीता, शेजारच्या चाळींमधील मोहिनी, सुधा, शिवाय मोडकांची नलू, चंद्रचूडांचा अनिल, उकीडवे अमल त्याचा चुलत भाऊ दत्ता ही वयानी मोठी मंडळी मधूनमधून असायची. वरच्या मजल्यावरची अश्विनी म्हणजे गुलाबाच्या फुलासारखी. झब्बू, नाटे काटे ठोम सारखे आक्रमक खेळ ती फार काळ खेळू शकत नव्हती. त्यामुळे गुलबकावलीच्या फुलाप्रमामे कधीमधी उगवायची. या व्यतिरिक्त सर्वांकडील पाहुणे मंडळी – अर्थातच मुले – असा हा जथा जमायचा. एकमेकांची पाने चोरुन पहाणे आणि फोडणे हा खोडकर आनंद होता. जिंकण्याची मजा होती पण हरण्याचे दुःख नव्हते. मला वाटत हीच गोष्ट आम्हांला पुढच्या आयुष्यात खूप काही देऊन गेली. 

सुट्ट्यांमध्ये हिल स्टेशन आणि हॉलिडे रिसॉर्टला जाण्याची तेव्हा पद्धत नव्हती. थोडे दिवस काका, मामा, आत्या, मावशी यांचेपैकी जे कोणी असतील त्यांच्याकडे जायचे. पण इथेच जास्त मजा होती. एकतर बाबांनी आणलेली असंख्या पुस्तके वाचायची. सुट्टी पडेपर्यंत ती कपाटावर ठेवलेली पहायची. हात लावायची हिंमत नव्हती!

पत्ते, बुद्धीबळ हे खेळ मुख्य. त्याशिवाय मुलींसाठी सागरगोटे, ठिक्कर हे खेळ तर मुलांना पतंग, गोट्या, सिगारेटची पाकीटे जमवून खेळण्याचा छंद. कधी कधी दुपारच्या वेळेस रस्त्यावर आणि समोरच्या चौकात लपंडाव, पकडापकडी, विशेषतः ‘डब्बा ऐसपैस’ हे खेल. रस्त्यावर वाहने फारशी नसायची. आम्ही रस्त्यावर सुसाट धावायचो. आता पार्किंग केलेल्या गाड्यांतून चालताही येत नाही. टी. व्ही., मोबाईल, व्हिडिओ गेम्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस यातून मुलांना इतर काही खेळायला वेळच नाही. 

आमच्या ‘त्या’ खेळायच्या जागा गेल्या आणि खेळणारी तशी मुलेही आता नाहीत. यालाच म्हणतात ना ..... काळ बदलला! 

माझ्या नविन फ्लॅटसमोरचा प्रशस्त पॅसेज मला उगीचच ओकाबोका  वाटायला लागला आणि मनाला वाटले आजच्या समृद्धीचा तेव्हा लवलेश नव्हता पण जे समृद्ध बालपण आम्ही अनुभवले ते आत्ताच्या पिढीला नाही मिळत. 

 By

Bharati Garud

Bangalore, India



1 comment:

  1. भारती, खूप छान लिहल आहेस. एकदम बालपणच उभं केलंस डोळ्यापुढे. थोड्याफार फरकाने आपण सगळ्यांनीच हा आंनद उपभगलाय. आपण बालपण जगलोय. खूप छान. असच share करीत रहा.

    ReplyDelete