नुकतीच आषाढी एकादशी आणि संकष्टी चतुर्थी झाली. या दोन्ही दिवशी सुहृदांच्या आणि वर्गमैत्रीणींच्या गाठीभेटीत या विषयावर अनेकानेक विनोद, मते, मतांतरे, दिक्षित की दिवेकरॽ आणि खाण्याच्या विविध पदार्थांची रेलचेलही अनुभवायला मिळाली आणि आज त्याच संदर्भात गेल्या वर्षी गीतेच्या अभ्यासादरम्यान जे आकलन झाले ते मांडायचा आज प्रयत्न.
मराठीत हे दोन्ही शब्द आपण एकाच अर्थाने वापरतो. बहुधा खाण्याच्या अनुषंगानेच त्याचा जास्त विचार होतांना दिसतो. माणसाला आस म्हणजेच इच्छा इतक्या असतात की त्यांना कधी अंतच नसतो. उपास या शब्दाची फोड केली तर उप + आस अशी करता येईल. आस म्हणजे इच्छा. तिला उप म्हणजे दुय्यम स्थान द्यावयाचे असा अर्थ आपण या शब्दाचा घेऊयात. खाण्याच्या पदार्थांवरची इच्छा जास्त तीव्र असतात आणि त्या सतत बदलतही असतात. म्हणून अन्नावरची इच्छा कमी करण्यासाठी उपास हा पर्याय सांगितला आहे. त्याचबरोबर जसे अन्न तसे मन होते. व्रत कराल तेव्हा तरी सात्विक आहार, अल्प आहार यासारख्या गोष्टीतून संयम व त्याचबरोबर आरोग्य दोन्हीचाही समन्वय साधलेला दिसेल. अर्थात आज आपण ‘एकादशी दुप्पट खाशी’ या म्हणीला जागून वागतो अंह खातो ते इथे अभिप्रेत नव्हे. आपल्याकडच्या एकादशी व्रताची पद्धत म्हणजे दर पंधरा दिवसांनी येणाऱ्या दशमीला रात्री अल्पाहार घ्यायचा. एकादशीला निर्जला जमले तर उत्तमच अन्यथा निराहार तरी रहावयाचे आणि द्वादशीला माध्यान्ही सात्विक भोजन घ्यावयाचे अशी पद्धत सांगितली आहे. २०१६ चे चिकित्सा संबंधीचे नोबेल पारितोषिक जेम्स पी. एलिसन( यूएसए) आणि तसाकू होन्जो(जपान) यांना मिळाले आहे. त्यात त्यांनी कॅन्सर होऊच नये यासाठी काय करायला हवे यावर जोर दिला आहे. त्यांच्या संशोधनाप्रमाणे दर पंधरा दिवसांनी एक दिवस पूर्ण अन्न वर्ज्य केले तर आपल्या शरीरातील नको असलेल्या पेशींचा नाश केला जातो. आपल्याकडे एकादशीचा उपवास ज्या पद्धतीने करायला सांगितला आहे तीच पद्धत त्यांनी त्या संशोधनात नमूद केली आहे. आहे की नाही गंमत. धर्मपालन व्हावे या हेतूबरोबरच आरोग्य उत्तम रहावे यासाठीच आपल्या प्रथा, निर्बंध, परंपरेने चालत आले होते. आपण केवळ रुढी म्हणून त्याकडे पाहिले आणि त्यामागचे विज्ञान समजूनच घेतले नाही.
आज पोट भरण्याची विवंचना फार लोकांना आहे असे दिसत नाही. पण समाधान नावाची गोष्ट मात्र फारच अल्प प्रमाणात दिसते. याला कारण माणसाला असलेली हाव. अर्थात इच्छेचा अतिरेक. एकाच गोष्टीचा अतिरेक असतो असे नाही तर अनंत गोष्टींच्या इच्छा त्याला असतात. त्या सगळ्या पूर्ण व्हाव्या अशी अपेक्षा असते आणि त्यासाठी तो अनेकविध आघाड्यांवर मोर्चेबांधणी करतो. ‘अनेक दरडींवर पाय आणि मग घे आपल्याच शरीरावर घाय’ असे तुकाराम महाराज सांगतात तसा अनुभव येतो. यासाठीच धर्मशास्त्र आपल्याला उपवास करायला म्हणजेच अहंभाव सोडून त्या परमतत्त्वाचा अनुभव घेण्यासाठी त्याच्याजवळ वास कर असे सांगतात. स्वतःच्या स्वार्थाशिवाय जे जे करता येईल ते कसे आणि केव्हा करायचे यासाठी स्वस्थ बसणे म्हणजे उपवास. आपल्यातल्याच अंतरात्म्याजवळ काही काळ स्थित आणि स्थिर होणे म्हणजे उपवास. कोणीही व्यक्ती असो कोणत्या ना कोणत्या कारणाने दुर्वृत्ती होतच असते. ती कार्यान्वित होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी करावयाचा उपाय म्हणजे उपवास.
उपवास या शब्दाची फोड उप + वास. म्हणजे एकाद्या जवळ वास करणे. अन्नाची मात्रा नगण्य घेऊन परमेश्वराजवळ सान्निध्य अशी उपास आणि उपवास या शब्दांमागील संकल्पना आपण समजून घेतली तर आपणांस तो करावा की करु नये असा प्रश्न पडणारच नाही तर वैज्ञानिक दृष्ट्या आपली प्रकृति उत्तम रहावी व मनःस्वास्थ्य चांगले रहावे यासाठी असलेली संकल्पना अंगिकारावी असेच वाटेल.
By
Padma Dabke
Pune, India
No comments:
Post a Comment