हे पापच असेल ना
नर्मदा बाजारात निघाली होती. कुलूप लावता लावता समोर ‘राधिका’ दिसली.
‘‘बाजारात चाललेय’’ नमूने राधिकाच्या प्रश्नांकित चेह-याला उत्तर दिलं.
‘‘मला पण जायचं होतं. तीळ आणायचे होते, पण कंटाळा आलाय.’’
‘‘मग मी आणून देते. किती आणायचेत?’’
खूष होऊन राधिकाने अर्धा किलो तीळ आणायला सांगितले.
नर्मदा बाजारात गेली. तिची सगळी कामं करून आली. राधिकाला तीळ दिले.
राधिका थोड्या वेळाने तीळगूळ घेऊन आली नमूला द्यायला. आली, गप्पा मारत बसली.
नर्मदाने तिच्या मुलींसाठी गाण्याच्या क्लासची चौकशी केली.
‘‘आहे इथं एक. पण ते शास्त्रीय संगीत आऽऊऽ ते नाही शिकवत. ती गाणी, भजनं वगैरे शिकवते.’’
‘‘नाही. मला शास्त्रीय संगीतच शिकवायचंय त्यांना. मी इथे कुणाचं तरी नाव ऐकलेलंय. कोण बरं? अंऽ अगदी तोंडावर येत होतं बघ आत्ता. महिला विद्यापीठात संगीताच्या रीडर आहेत. आपल्याच कॉलनीत रहातात म्हणे ग. काय नाव सांगितलं होतं बरं? हां... रजनी, रजनीताई.’’
‘‘हं’’ राधिकाच्या चेह-यावरचे भाव झटकन बदलले. ती एकदम सावरून बसली. काहीतरी सांगण्यासाठी ती एकदम उत्सुक दिसायला लागली.
‘‘आहेत कुणी रजनीताई आपल्या कॉलनीत?’’
‘‘आहेत’’ राधिका तिरस्काराने म्हणाली. ‘‘तिकडे नको पाठवू पण मुलींना. फार कडक आहेत त्या. पुन्हा मोठ्या आर्टिस्ट आहेत त्या. छोटे - मोठे क्लास घेत नाहीत. परीक्षा घेतात आधी. त्यांना गाणं पसंत पडलं तरच शिकवतात. फार घमेंडखोर आहेत बाई त्या.”
नमूचं काम झालं होतं. राधिका मुलींना रजनी ताईंकडे पाठवू नको हे जसजसं म्हणत राहिली तसतसं रजनीताईच आपल्या मुलींना शिकवू शकतील याबद्दल तिची खात्री पटत चालली.
राधिकाने शेवटचं अस्त्र काढलं. ‘‘मी सांगणार नव्हते. पण सांगून टाकते... त्या बाईचं अफेअर आहे वयाहून तिच्यापेक्षा छोट्या अशा एका आर्टिस्टशी.’’
‘‘विवाहित आहेत?’’
‘‘कोण?’’
‘‘बाई?’’
‘‘नाही ना. म्हणून तर....’’
‘‘असू शकतं ना?’’ नमू एवढंच म्हणाली पण तिला पुढे बोलायचं होतं; ‘‘आम्ही विवाहित आहोत. ती बिचारी काय करणार? मेनॉपॉज असेल, बेचैनी असेल. किती स्वाभाविक आहे. शरीरातल्या वादळांना कसं सांभाळत असेल? आपल्या देशात स्त्रीला पण एक शरीर असतं. पुरुषासारखीच त्या शरीरालाही भूक असते. ही गोष्ट लोकांना मानवतच नाही.’’ यातलं काहीही ती बोलली नाही.
‘‘म्हणूनच म्हणतेय ना, तिचं तर अफेअर आहे. तिला कुठनं वेळ मिळणार कुणाला शिकवायला!’’
का? का? दिवसरात्र एकच काम करत असेल का ती? तिच्या वैयक्तिक आयुष्याचा शिकवण्याशी काय संबंध? नमू मनातल्या मनात...
तिची चीडचीड झाली. थोडा वेळ इकडचं तिकडचं बोलून ‘राधिका’ गेली. नमूने निश्चय केलाच होता मुलींना रजनीताईंकडे शिकवण्याचा. हां, रजनीताई तिच्या मुलींना शिकवायला तयार होतील की नाही, हा प्रश्न वेगळा.
रोज संध्याकाळी राधिका खाली कॉलनीच्या बागेत जाते. तिथं कॉलनीतल्या आणखी काही बायकाही येतात. सगळ्या गप्पा मारत बसतात. त्यात प्रामुख्याने विषय असतो, कुणाचं कुणांशी अफेअर, कुणाच्या घरात काय भांडणं वगैरे. कोण कसं दिसतं, कुणाचे कुठले अवयव कुठे सुटलेत? अमकी रोज दुपारची बाहेर जाते, तासाभरात येते, कुठे जात असेल... वगैरे वगैरे विषय चालू राहतात. एक प्रकारे सैतानाचा अड्डाच.
नमू रजनीताईकडे जाऊन आली. त्या म्हणाल्या, ‘‘मी ऐकीन पहिल्यांदा त्यांचं. पाहीन काय, कितपत रस आहे त्यांना. केवळ फॅशन म्हणून गाणं शिकणा-यांशी मला काही घेणंदेणं नाही.’’
नमूला हे आवडलंच, रजनीताईसुद्धा! त्यांच्या काळ्या डोळ्यात स्पष्टता आणि सरळपणा होता. जगण्याला जसं आहे तसं, सरळपणे स्वीकारण्याची हिंमत होती.
नमू राधिकाच्या ग्रुपसमोरूनच रजनीताईंच्या घरातून बाहेर पडली. नमूला ठाऊक होतं, आता चर्चा सुरू होईल. ती, तिच्या मुली आणि रजनीताई. त्यांच्याकडे लक्ष न देता ती घराकडे वळली.
जिन्याच्या पाय-या चढताना तिला बासरीचे सूर ऐकू आले. ते स्वर इतके व्याकुळ होते की काही कळायच्या आत ती धावत सुटली.
बासरीचा आवाज राधिकाच्या घरातून येत होता. नमू तिच्या घराशेजारच्या जिन्याच्या पाय-यांवर बसली. डोळे मिटून घेतले. ऐकत राहिली.
ते सूर ऐकताना तिचे डोळे भरून आले. पण मन इतकं आनंदाने उचंबळून आलं की छातीत धडधडायला लागलं. कधी जलद धावणा-या कधी सुस्तावून अंगभर पसरणा-या सुखाच्या लहरी...
राधिकाकडे कोण एवढी थोर कलाकार व्यक्ती असावी जी माणसाला स्वतःचा विसर पाडू शकते? नमूला माहीत नव्हतं. राधिकाही कधी काही बोलली नव्हती. राधिकाची मुलगी रुना इतकी सुंदर बासरी वाजवते?
किती वेळाने कुणास ठाऊक. बासरीने सूर संपले. नमू भानावर आली.
तेवढ्यात राधिकाच्या घराचा दरवाजा उघडून राधिकाचा नवरा राजीव बाहेर आला. दरवाज्याजवळच्या पाय-यांवर नमूला अशी बसलेली पाहून तो दचकलाच.
नमूही घाईने उठून उभी राहिली. काही क्षण दोघांनाही काहीही बोलायला सुचलं नाही. मग नमूच कशीबशी बोलली, ‘‘तुमच्या घरी... बासरी... कोण वाजवत होतं?’’
‘‘मी... मीच वाजवत होतो, असंच.’’
‘‘असंच? तुम्ही? तुम्ही वाजवता? शिकलायत तुम्ही?’’
‘‘थोडं फार, बरं वाटतं स्वतःचं स्वतःलाच. या ना आत. पण राधिका नाहीये.’’
‘‘माहीतीये, खाली पाहिलं मी तिला’’ थोडं थांबून खूप हिंमतीने ती एक वाक्य बोलली, ‘‘तुम्ही खूप छान वाजवता. माझ्या.... माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला’’ आणि झटकन स्वतःच्या घराकडे वळली.
राधिकासारखी बायको असेल तर कुणीही शांततेसाठी तडफडेल. राधिका खाली फालतू गप्पा मारत बसते आणि हा माणूस... इथे अपूर्व स्वरांना बोलावून आणतो.
किती नाजूक असतात हे क्षण! जे स्त्री-पुरुषांच्यामध्ये मूकपणे उभे राहतात. राधिकाच्या नव-याला तिने आजपर्यंत जेव्हा जेव्हा बघितलं होते तेव्हा तेव्हा त्याच्यात खास काहीच जाणवलं नव्हतं. आज त्याच्याबाबतीत तिला काहीतरी खास कळलं होतं. स्वतःच्या कलेचा आनंद लुटण्यासाठी हा माणूस रोज राधिकाची टकळी घराबाहेर जाण्याची वाट पाहतो. पतीपत्नी असूनही किती मोठं अंतर असू शकतं दोघांच्या दरम्यान आणि त्याच्या बासरीचे स्वर आपल्या कणाकणात साठवून घेण्याचा प्रयत्न करणारी नमू त्याची कुणीही नाही. त्याच्याशी एक स्तिमहास्याच्या देवघेवीइतकाही तिचा आजपर्यंत संबंध आलेला नाही.
राजीव ऐवजी राधिका इतकी सुंदर बासरी वाजवत असती तर नर्मदानं तिचं किती कौतुक केलं असतं. घरी जाऊन ती तिचं बासरीवादन ऐकत बसली असती. तिला पुन्हा पुन्हा वाजवायचा आग्रह केला असता.
राजीवला ती काहीही म्हणू शकत नाही. या समाजाची चौकटच अशी आहे की त्यात उत्सफूर्ततेला वाव नाही. ठरावीक नात्यांच्या पलीकडे माणसामाणसात नाजूक नात्याचे बंध नाहीत. माणसामाणसातले संबंध उत्स्फूर्ततेने, तरलतेने, उत्कटतेने रचले गेले तर ते पाप. जसं, राजीवच्या बासरीवादनाचे कौतुक करणं, विशेषतः राधिका नसताना! तेव्हाच तो वाजवणार ना! तेव्हा बासरी ऐकणं, स्वरांचा आनंद घेणं, राजीवचं उत्स्फूर्तपणे कौतुक करणं...
By
Sujata Mahajan
USA
No comments:
Post a Comment