लहानपणी खऱ्या मामापेक्षाही, ज्याचा त्याचा लाडका असतो चांदोमामा,
प्रत्येक भाचराला हमखास लळा लावेल, असा हा शांत, शीतल 'भाऊ' प्रत्येक आईच्या येतो कामा!
बालपणीचा हा निरागस भाबडेपणा, पुढे वयपरत्वे लुप्त होतो,
अन भूगोल, विज्ञान शिकताना, चंद्र केवळ एक पृथ्वीसापेक्ष अंतराळी ठिपका होऊन जातो!
पण तरीही त्याच्याबद्दल एक सुप्त आकर्षण, मनात रुजून असतं खोलवर,
आणि तारुण्यात ते उसळी मारून हमखास येतं वर,
प्रेमी युगुलांचं बरंच काही अवलंबून असतं, चंद्राच्या साक्षीवर!
प्रेमाच्या आणाभाका, प्रेयसीच्या सौंदर्याची तारीफ करताना तिला दिलेली चंद्राची उपमा,
हे सारं पाहून, चंद्र हसून म्हणत असेल, "बच्चमजी, या 'मामा'ने केला की नाही तुझा मामा?!"
मग काय?, यथावकाश इतिहासाची होते पुनरावृत्ती,
अन चांदोबाच्या गोष्टी-गाणी ऐकायला सज्ज होते 'नवी-कोरी आवृत्ती'!
मला वाटतं, झालं एवढं पुरे झालं, शब्दांचं उधाण,
भरती नंतर ओहोटी ओघाने येतेच, तेव्हा आवरते घेते, हे माझं चंद्रपुराण!
By
Akanksha Phadke
Mumbai, India
No comments:
Post a Comment