Sunday, 1 November 2020

मौन

मौन तुझे ते सांगून गेले 

नकळत सारे उलगडले ,
शब्द मुके पण 
डोळे ओले.

शब्द हरवले , सूरही विरले 
हरवले ते आनंदी क्षण ,
नकळत उरले काहीतरी 
व्याकुळ होई हळवे मन.

उलगडले कोडे अवचित
प्रेमाच्या ह्या नात्याचे,
निःशब्द मोकळे आकाश,
सुन्या सुन्या ह्या जगण्याचे.

मोह पाश ही सगळे सुटले 
बंध रेशमी पुरते तुटले,
सरले मी पण,विरक्त आपण
आता उरले फक्त रितेपण-
आता उरले फक्त रितेपण!

सौ. सुगंधा पंकज रागळवार

वोल्सबुर्ग

जर्मनी.

माय माझी गोरटेली

 माय माझी गोरटेली

सौंदर्याची खाण होती
नाक चाफ्याची कळी अन्
लोचनांची शान होती

बोलताना काव्य मांडे
बोध होती ते आम्हासी
राबती ते हात दोन्ही
हीत साध्य व्हावयासी

काळजातूनी झरा तो
वात्सल्याचा वाहणारा
साक्ष देतो आजही तो
गाढ प्रेमाचा उमाळा

आज नाही राहिली ती
वारसा ठेऊन गेली
माय तू होशील जेव्हा
लूट माया साठलेली

आज जाहलेच आई
सोनुल्यांची जेधवा मी
गूज मायेचे कळाले
गूढ काही जाणले मी
 
Shital Joshi

पीप आय्‌

 

पहाटे दारावरची बेल वाजली. मांडवी झोपेतच दार उघडायला गेली. नेहमीप्रमाणे पीप आय मधून तिने पाहिलं तर डोळ्यासमोर अंधार! ती दचकली, आधी बाहेरचा लाईट लावला, पुन्हा पाहिलं, पुन्हा अंधार, हा काय प्रकार? ती खडबडून जागी झाली. परत एकदा भीत भीत पाहिलं, अंधार!

    नव-याला उठवावं का? कोण असेल बाहेर जेपीप आय्‌’ वर हात दाबून अंधार निर्माण करतंय? पाहू या, दुसरी काही हालचाल किंवा आवाज येतोय का? पाचेक मिनिटं वाट पाहून ती सकाळच्या कामांकडे वळली. मुलाला डबा करायचा होता.

    थोड्या वेळाने तिने मुलाला उठवलं. आवरता आवरता एकीकडे डोक्यात सारखा त्या अंधाराचा विचार चालू.

    थोड्या वेळाने उजाडलं. आता तिची भीड जरा चेपली नाहीतरी मुलाला शाळेत जाण्यासाठी दार उघडावंच लागणार होतं. पुन्हा एकदा पाहिलं, अंधार!

    आता मात्र तिने हिय्या करून हळूच थोडं दार उघडलं बाहेर कुणीही नव्हतं. मग पूर्ण दार उघडलं, अंधार कादिसतहोता हे तिच्या लगेच लक्षात आलं. तिने कपाळावर हात मारून घेतला. पेपरवाला पेपर बरोबरपीप आय्‌’ च्या समोर लावून गेला होता. छान!

    आजच्या दिवसाची सुरुवात खासच!

    ती नव-याबरोबर बाहेर जायला निघाली. नवरा गाडी काढत असताना ती कॉलनीतल्या रस्त्यावर थांबली होती. समोरून तोंडाला फडकं गुंडाळलेली एक स्त्री चालली होती. कॉलनीतलीच होती. तीही तिचा नवरा गाडी घेऊन येईपर्यंत चालत होती. मांडवीला पाहिल्यावर तिने स्वतःची वाट सोडली आणि रस्ता क्रॉस करून तिच्या दिशेने आली.

    आता ही कोण? फडकं काढेल तर ओळखू तरी येईल. ती फडक्याच्या आत हसली. मांडवीनेही प्रतिसाद दिला.

    ‘‘गाडी येतीय वाटतं?’’ फडक्याच्या आतून प्रश्न.

    ‘‘हो. तुमची पण?’’

    ‘‘हो.’’ ती क्षणभर थांबली. मग एकदम तिने तोंडावरच फडकं काढलं. तिला जास्त काही बोलायचं असावं. अच्छा! कॉर्नरच्या विंगमध्ये राहणारी सरिता. आता हवेत प्रश्नोत्तर नाही करावी लागणार!

    ‘‘काय , निघालीस का ड्युटीला?’’ मांडवीने प्रश्नात ओळख मिसळली.

    ‘‘हो.’’ ‘पुन्हा बोलू की नकोया आविर्भावात काही क्षण गेले. मग सरिता बोलली, ‘‘बरेच दिवस तुमच्याशी बोलीन म्हणते पण नेहमी घाई, गडबड. रोज तुम्हाला कॉलनीत चालताना पहायचे पण मी गाडीवर गडबडीत…’’

    मांडवीला बरं वाटलं. अजूनही माणसं एकमेकांशी बोलायची इच्छा बाळगतात. पण सरिताने पुढच्या वाक्यात तिला खाली पाडलं.    

    ‘‘बरेच दिवस सांगायचं होतं तुम्हाला…’’

    ‘‘काय?’’ मांडवीने उत्सुकतेने विचारलं

    ‘‘तुम्हाला ना, तो पूर्वीचाच हेअरकट चांगला दिसत होता!’’

    मांडवीहॅ हॅकरत खोटं हसली भले शाबास! हे सांगायला ही एवढी उत्सुक होती, इतके दिवस भेटण्याची वाट पहात होती?

    हे वाक्य बोलून आपलं परम कर्तव्य बजावल्यावर सरिताने एकदम त्रयस्थ चेहरा केला आणि रस्ता क्रॉस करून गेली.

    तिच्या पाठीवर मांडवीला वाक्य सुचलं, ‘‘मग तेव्हा तो हेअरकट चांगला दिसत असताना तू तसं येऊन का सांगितलं नाहीस?’’

    भंजाळून ती नुस्ती पाहत राहिली.

    दुपारी तिच्याकडेतिस्ताआली. तिस्ता, तिची मैत्रीण. तिस्ताकडे चित्रविचित्र अनुभवाचं गाठोडंच असतं. उत्तम कथनशैलीत ती सांगत राहते.

    ‘‘किशोर भेटला होता अग, तो कसला विचित्र आहे माहीताय्ना…’’ तिस्ताची बडबड चालू असताना काम केलं तरी चालंत ती एकीकडे ओट्यावरचा पसारा आवरायला लागली.

    ‘‘अग, त्याने काय केलं, ‘झूमध्ये गेलो होतो परवा आम्ही मुलांना घेऊन. तिथं याने एका शहामृगाला दाणे खायला जवळ बोलावलं. दाणे वेचताना शहामृगाची चोच याच्या हाताला खूप टोचली बरं का! त्याने काय केलं, परत बोलावलं शहामृगाला. तो जवळ आल्यावर इतकी जोरात थोबाडीत मारली की ते तिरीमिरी येऊन खाली पडलं. लोकांनी गडबड सुरू केली. रक्षक धावत आल्यावर हा भागूचियापळून गेला.’’

    कणीक मळता मळता मांडवी म्हणाली, ‘‘बाप रे, भारीच दिसतोय हा नग!’’ तिने मळून झालेल्या कणकेला तेल लावून नीट तुळतुळीत केलं. तेवढ्यात बेल वाजली.

    तिने दार उघडलं. दारात सेल्समन उभे. लगेच बडबड सुरू

    ‘‘बहनजी, हमारे पास एक प्रॉडक्ट है, हम उसके बारे में इन्फर्मेशन देते हैं! आपको लेना नहीं पडेगा, नहीं नहीं सिर्फ दो मिनट में देखिए तो सही..’’ त्याने ते उपकरण बाहेर काढलं, रबरी. मांडवीला अजूनही माणसासारखा माणूस दारात उभा असताना धाडकन्दार लावून घेणं जमत नाही.

    एकदम तो म्हणाला, ‘‘जरा आपकी पीठ दिखाइए!’’

    ‘‘जी?” ती इतक्या जोरात ओरडली.

    ‘‘मेरा मतलब है, इसको पीठ पर ऐसे घुमाने से पीठदर्द गायब हो जाता है!’’

    ती सर्द झाली. तिने या दृश्याची कल्पना करून पाहिली. दोन अनोळखी पुरुषांकडे पाठ करून ती दरवाज्यात उभीच आणि तो भला माणूस तिच्या पाठीवर ते उपकरण फिरवतोय

    ‘‘अच्छा चलो, हाथ दिखाओ, हाथ पर चलाकर दिखायेंगे!’’

    ती घाईने म्हणाली, ‘‘ये सब हमारे पास है भय्या! त्याचं ‘‘देखिए तो सही’’ चाललेलं असताना तिने दार लावायला घेतलं. मग ते निघून गेले. नशीब! नवरा नव्हता. नाहीतर मारामारीच झाली असती इथे.

    समोर सोफ्यावर तिस्ता खूप हसत होती, ‘‘मांडवी, अग, नाही त्या लोकांना काय एन्टरटेन करतेस? दारच उघडायचं नाही अनोळखी लोकांना. पाठ दाखवा काय शी!’’

    मांडवी लाजून चूर झाली. विषय बदलण्यासाठी म्हणाली, ‘‘तू किशोरचं काहीतरी सांगत होतीस ना!’’ बोलता बोलता तिने फ्रीजमधून गवार काढली. डायनिंग टेबलवर पिशवी उलटी केली. आणि खुर्ची ओढून ती गवार निवडायला बसली.

    तिस्ता पण तिच्या जवळ येऊन बसली. ‘‘अग, त्याने त्या दिवशी एक कुत्रं खूप भुंकत होतं, त्याला घरात बोलावलं बिस्किट दाखवून. घरात आल्यावर पकडून त्याच्या चेह-यावर टायगर बाम फासला कुत्रं बिचारं केकाटत सैरावैरा धावत सुटलं.’’

    मांडवी ते ऐकून हादरली. ‘‘अरे बापरे, फारच भयंकर दिसतोय हा मनुष्य!’’

    तिस्ता हसत होती, ‘‘टायगर बाम! कॅन यू इमॅजिन! आपण लावला तर आपल्या चेह-याची किती आग होते कुत्र्याला बिचा-याला पुसताही येत नाही. तोंड मातीत खुपसत कितीतरी वेळ केकाटत होतं….’’

    पुन्हा बेल वाजली. मांडवी दार उघडायला गेली. दारात एक गोरा, स्मार्ट तरुण उभा होता. मांडवीने दार उघडलं. तिस्ता पहात होती.

    दार उघडताच त्याने मांडवीच्या हातात एक कागद दिला आणि हसून विचारलं, ‘‘काय वाचताय सध्या?’’

    तिस्ता आश्चर्याने पहात राहिली.

    ‘‘रजनीशांचं वाचतेय.’’

    ‘‘तुमचं झालं की मला द्या. मी ते तुम्हाला म्हणालो होतो ना ते आमच्या गुरुजींचं पुस्तक देईन तुम्हाला.’’

    ‘‘चालेल. चालेल’’

    मांडवी त्याला दारात तसंच ठेवून आत गेली. पर्स घेऊन बाहेर आली. त्याच्या समोरच पर्स उघडून पैसे मोजून त्याला दिले. तो गेला.

    तिस्ता म्हणाली, ‘‘काय हे? कोण होता तो?’’

    ‘‘आमचा पेपरवाला. पेपरबील द्यायला आला होता.’’

    ‘‘तुला विचारतोय, काय वाचताय सध्या! हाऊ फनी.’’

    ‘‘तो वाचतो खूप. माझ्याकडनंही बरीच पुस्तकं नेतो.’’

    ‘‘मला गंमतच वाटतेय. पेपरवाला तुला विचारतोय, काय वाचताय सध्या!’’

    मांडवीलाही आता त्या सीनमधली विसंगती जाणवली. हसू आलं. मांडवीची पुन्हा गवार सुरू आणि तिस्ताची  बडबड सुरू.

    ‘‘अग, त्याने आणखी एक तर इतकी विचित्र गोष्ट केली. एक मांजर रोज चोरून दूध पिऊन जायचं ना, एकदा त्याने त्याला पकडलं न्त्याच्या मिशाच कापून टाकल्या!’’

    ‘‘काय सांगतेस! काय माणूस म्हणायचा हा! ते मांजर तरी हातात कसं आलं ह्याच्या.’’

    ‘‘अगं, पुढची गोष्ट म्हंजे मांजराला आपली पिल्लंच ओळखू येईचनात म्हणे. त्याच्या मिशांचा या गोष्टीशी संबंध असतो ना!’’

    ‘‘अरे, काय हे! तिस्ता, त्या किशोरच्या भयंकर गोष्टी ऐकवणं बंद कर बरं. नाहीतर मी उठून त्याला धोपटून काढायला जाईन आता.’’

    तेवढ्यात खालून खूप जोरजोरात भांडणाचे आवाज यायला लागले. दोघी धावत टेरेसमध्ये आल्या. प्रचंड भांडाभांडी चालू होती.

    दोघी धावत खाली गेल्या. एक गृहस्थ विरुद्ध सात-आठ जण, जणी असं भांडण चालू होतं. सात-आठ जण, जणींमध्ये मांडवीच्या ओळखीची बाई, चंपा होती. तिने समजावून सांगितलं. तो जो एक गृहस्थ होता. त्याचं एक पाळलेलं कुत्रं होतं. तो कॉलनीत अलीकडेच आला होता. रोज कॉलनीत कुत्र्याला फिरायला न्यायचा. कॉलनीतल्या पाळलेल्या पण पाळलेल्या कुत्र्यांप्रमाणेच लोकांशी जवळीक असलेल्या तीन कुत्र्यांना या नव्या पांढ-याशुभ्र देखण्या कुत्र्यामुळे हीनगंड निर्माण झाला असावा. ते त्याच्यावर भुंकायचे. आज त्या गृहस्थाच्या हातून त्याचं कुत्रं सुटलं. ते त्या तिघांवर धावून गेलं. तिघंही त्याच्यावर तुटून पडले. त्या गृहस्थानं कुत्र्यांना हाकलण्यासाठी छोटासा दगड उचलावा, काठी उचलावी, हाड्हाड्करत धावून जावं तर ते नाहीच त्याने डायरेक्ट जडशीळ, जाडजूड फरशा तिथं पडलेल्या होत्या, त्या जीव खाऊन उचलल्या आणि एका पाठोपाठ एक कुत्र्यांवर फेकल्या. एकदा नव्हे तीनदा. सगळी कुत्री जखमी झाली. दरम्यान हे पाहणा-या दोन स्त्रिया इतक्या जोरात ओरडल्या की गर्दी जमा झाली आणि तीन कुत्री आणि कॉलनीतले समस्त रहिवासी विरुद्ध तो अति हिंसक माणूस आणि पांढरंशुभ्र; देखणं कुत्रं, ज्यालाकुत्राम्हणायचं नाही असं त्या माणसाच्या बायकोने सांगितलं म्हणे!

    ते दृश्य पाहिलेल्या दोघी स्त्रिया रडत होत्या. भटकी कुत्री नक्की कुणाची? हा प्रश्न निर्माण झाला. सर्व घरांमध्ये ती कुत्री जायची, खायची, कॉलनीतल्या सर्व लहान मुलांशी खेळायची, येणा-या जाणा-या उपटसुंभांवर भुंकायची. एका अर्थाने अख्ख्या कॉलनीची सुरक्षाच बघत होती आणि अख्ख्या कॉलनीकडून खायला मिळवत होती. मुलांवर अतोनात प्रेम करत होती आणि मुलांच्या आयांकडून प्रेम मिळवत होती. साहजिकच तिथं खूप मोठं भांडण जुंपलं.

    सगळे लोक त्या अवस्थेत तणावग्रस्त असताना अचानक कॉलनीत एकदम म्हशी दिसायला लागल्या एक, दोन, तीन, चारअनेक म्हशी.

    बघणारे सर्द झाले. ‘‘अरे, म्हशी?’’

    ‘‘अरे, इथे म्हशी कुठून आल्या?’’

    ‘‘अरे , कुणाच्या रे म्हशी? इथं कुणी सोडल्या? बघा रे’’

    म्हशी निर्विकारपणे येतच राहिल्या. संतापलेल्या चेह-यांच्या आसपास निर्विकार, मख्ख, निसर्गाशी जवळीक दाखवणारे चेहरे पसरले. रागाची वाफ विरायला लागली. तेवढ्यात कुणीतरी जाऊन माहिती मिळवली.

    ‘‘अरे, डांगेकाकूंनी बोलावल्यात म्हशी’’

    ‘‘म्हंजे?’’

    ‘‘कॉलनीत खूप गवत वाढलंय ना, गवत काढायला शंभर रु. खर्च येईल म्हणाले. मग डांगेकाकूंनी इथं येणा-या गवळ्याला त्याच्या वेळेत रस्त्यात गाठून त्याच्या म्हशींची अपॉईंटमेंट घेतली. गवत खाल्लंय बरंचसं त्यांनी.’’

    मांडवी आणि तिस्ता एकदमच हसल्या. बाकीचे लोकही तणाव विसरून हसायला लागले. हळूहळू हसण्याची लाट पसरत गेली. तणाव कमी होत गेला.

    म्हशी आमंत्रित होत्या त्यामुळे त्यांना हाकलण्याचं कुणी धारिष्ट्य दाखवलं नाही. त्या आरामशीर लोकांच्या आजूबाजूंनी जागा मिळेल तशा पसरत राहिल्या. जे म्हशींना घाबरत होते ते घरात पळून गेले. जे घाबरत नव्हते ते मध्ये तसेच उभे राहिले.

    भांडण आपोआपच थांबून गेलं होतं. दोन्ही पक्षांकडून शिव्यागाळीची पातळी गाठली गेली होती. पुढची काहीतरी आततायी हालचाल होण्याआधीच भांडण संपलं. अनेक बघ्यांचे हिंसेसाठी आतुरलेले डोळे तहानलेलेच राहिले. पाळीव कुत्र्याचा मालक निघून गेला होता. जखमी कुत्र्यांवर औषधोपचार चालू झाले.

    तिस्ता म्हणाली, ‘‘तुमची कॉलनी फारच मजेदार आहे !’’ जखमी कुत्र्यांना पाहण्यासाठी त्या गेल्या तेव्हा कॉलनीतल्या देवळात गर्दी दिसली.

    मांडवी एकदम म्हणाली, ‘‘अच्छा, असं आहे तर! म्हणूनच भांडणांचे नेहमीचे प्रेक्षक दिसले नाहीत!’’

    ‘‘म्हंजे काय?’’ तिस्ता.

    ‘‘अग, इथं पाहिलंस का तू काय लिहिलंय ते. मां तुमच्या भेटीला येत आहे. आत्मसाक्षात्काराचा अनुभव घ्या. कुंडलिनी जागृतीचा अनुभव घ्या. कॉलनीतला खरा प्रेक्षक इथं कुंडलिनी जागृत करत बसलाय.’’

    देवळात खूप गर्दी होती. ‘मांची सीडी ऐकवणं चालू होतं. सीडी ऐकवूनच आत्मसाक्षात्कारही होणार आणि कुंडलिनी जागृतीही होणार असं सांगण्यात आलं होतं. समोर बसलेला प्रेक्षकवर्ग एकमेकांशी गप्पा मारत मारत कुंडलिनी जागृती करवून घेत होता. त्यांना दूर कुत्र्यावरून झालेली भांडणं, भांडणाच्या ऐन मध्यावर कॉलनीभर पसरलेल्या म्हशींचा काहीच थांगपत्ताच नव्हता.

    मांडवीला वाटलं, जगातली प्रत्येक गोष्ट इतर गोष्टींच्या संदर्भानं विचित्र वाटते, की असतेच विचित्र?. आत्मसाक्षात्कार आणि कुंडलिनी जागृतीची गोष्ट विचित्रच होती. कुत्र्यांच्या भांडणाच्या आणि म्हशींच्या पार्श्वभूमीवर ती आणखी विचित्र ठरली. दारावरच्या सेल्समनने घरातल्या गृहिणीलापाठ दाखवाहे म्हणणं खूप विचित्र होतं, की तिस्ताने सांगितलेल्या मांजराच्या मिशा कापणं आणि कुत्र्याला टायगर बाम या पार्श्वभूमीवर ते आणखी विचित्र वाटलं? आपला नेहमीचाच पेपरवाला पण त्याने दार उघडल्यावरकाय वाचताय सध्या?’ हे विचारणं विचित्र आहे का? दारासमोर पेपर ठेवल्यामुळे आपण अंधार नसताना अंधार बघत राहिलो. तसंच ज्ञानाचं असतं की काय! हे जे चाललंय ते सगळं आपापल्या नजरेला जाणवणारे भ्रमच आहेत की काय? नजरांना जाणवणारे भ्रम, बुद्धीची कमी अधिक पोच, तरल तरल होत जाणा-या संवेदनांवरच उभारलेलंय हे विश्व! इथं अबसोल्यूट काहीच नाही.

    संध्याकाळी बेल वाजली तिने दार उघडलं. इस्त्रीवाला कपडे घेऊन जाण्यासाठी दारात उभा होता. ती एकेक कपडा मोजून देऊ लागली. एकीकडे बडबड, ‘‘ह्या कपड्याला आतून इस्त्री करा बरं का. मोती तुटतीलतुम्ही ड्रायक्लिनिंगचे कपडे नाही आणले अजूनशाळेचा ड्रेस आधी आणून द्यामागच्या वेळेस सात रु. तुमच्याकडे राहिलेत….’’

    तेवढ्यात बाईने तिखटाची फोडणी उधळून इस्त्रीवाल्यासह सर्वांना ठसकायला लावलं.

    इकडे पोरगी फोनवर जोरजोरात बोलत होती, ‘‘अग, काल आमची टीचर आमच्याबरोबर कॉफी पीत बसली होती. तेवढ्यात एक इराणी मुलांचा ग्रुप गेला, मुलांनी तिलाहाय्‌’ केलं. टीचरला. माझी मैत्रीण म्हणाली, ‘‘टीचर, तुमचे विद्यार्थी आहेत ते? आय फील जेलस’’ असली चिकणी मुलं आहेत ना ती!’’

    मांडवीची खात्री झाली. मुलीची ही बडबड, आपली ती बडबड, बाईची तिखटाची फोडणी, टीव्हीवर त्याच वेळेस एका बाईने आपल्या प्राध्यापक नव-याचे अनैतिक संबंध कसे चव्हाट्यावर आणले याची स्टोरी तेच तेच फोटोग्राफ पंधरा पंधरा वेळ दाखवत चालूहे सगळं कठीण आहे. कशातनं काहीच हाती लागणारं नाही. आपल्यापीप आय्‌’ म्हणून जे दिसणारं तेच आपलं विश्व. सत्य, भ्रामक, कसंही!


Sujata Mahajan