Sunday, 1 November 2020

साठवणीतली ' आठवण '

सकाळचे पाच सव्वा -पाच वाजले आहेत. बाहेर निरव शांतता. पक्ष्यांचे  मंजूळ आवाज त्यांच्या विविधतेसह कानावर पडत आहेत पाऊस नुकताच पडून गेलेला असावा. हवेतला त्याचा उबदार ओलसरपणा गादीवर पडलेल्या मला जाणवत होता .अर्धवट मिटलेल्या डोळ्यांसमोर नकळतच वेगळे चित्र उमटू लागलं होतं.

माजघरात ओळीनं झोपलेली आम्ही भावंड. वाटलं  हीच वेळ का... नाही ...थोडी अजून लवकरच उजाडलेली पहाट.. आजीचा स्वयंपाकघरातला पायरव.. किशोर काकाचं चरवीभरुन आणलेलं फेसाळलेलं ताजं  दूध.... पडवीतल्या बाजेवर बसून तात्यांचं स्वच्छ, स्पष्ट अन् गोड आवाजात श्लोक म्हणणं.. गोठ्यातल्या गाई- म्हशींचं हंबरणं... मागच्या अंगणात पारिजातकाच्या फुलांचं अलगद ओघळत सडा घालणं.... पक्ष्यांचं असंच कानावर पडणारे कूजन..
 

मन केव्हाच पोचलं माझ्या गावालाकिती छान होते ना बालपणातले ते दिवस.शाळेचा  'निकाललागला की दर सुट्टीला महिन्या- दीड महिन्यासाठी मुक्काम पोस्ट ताम्हनमळा ...माझं गाव..आई-आजीची सामानाची जुळवाजुळव..टम्म  फुगलेल्या पिशव्या.. आधी चिपळूण पर्यंत जायचं...टपावरचं सामान उतरवायचं..मग तो सगळा लवाजमा घेऊन दुसऱ्या एस्.टीत चढायचं...मग माझ्या काकांच्या प्रयत्नानं मुंबई ते ताम्हनमळा अशी थेट एस्.टी.परळ डेपोमधून सुरू झाली.आणि गाडी बदलाबदलीचं सव्यापसव्य संपलंच.आता थेट उतरायचं ते आमच्या पाटीवरच... पाटी म्हणजे काय ?....अहो, हा आमच्या घराजवळचा  थांबाइथंच आजोबांनी पाठवलेली बैलगाडी उभी असायची. आम्हाला बघून हसू फुललेला रत्नू लगबगीनं सामान उतरवून घ्यायला.. आम्हाला हात द्यायला पुढे.' वहिनींनू  बरं आहे ना ? ' असं विचारत घरच्या दिशेने प्रवास सुरु..आजी सामानासह बैलगाडीत अन् आम्ही एक- दीड किलोमीटर चालत.
      

रस्त्यालगतच्या करवंदाच्या जाळ्या, उजव्या हाताचा भांडकेश्वराचा  डोंगरडाव्या हाताला उतारावरून वाहणारी नदी.. थोडं पुढे गेल्यावर विनू अण्णांचे घर.. त्यांच्या मळ्यातली लोंबकळणारी सर्पासारखी लांब पडवळं ..मग यायचा अर्धवट बांधलेला पूल..  आता डाव्या हाताला वळलो की उजवीकडचं गुंजेचं झाड ..इथे आम्ही गुंजा वेचायला यायचो  संध्याकाळी. ..इथूनच दिसायला लागायच्या घराच्या खुणा..चढावरच्या आंब्याला वळसा घालून पुढे आलो की मग  दिसायचा खोबरी आंब्याच्या डेरेदार झाडामागचा आमचा मोठ्ठा गोठा.. अन् ही डगर चढून गेलं की आलंच की घर ....
      

कौलारु घर..अंगण.. फुललेली झाडं.. सगळंच डोळे भरून बघून, हात-पाय धुवून देवाला,बाया-तात्यांना केलेला नमस्कार .." किती बारीक दिसताय..आई घालते ना गो पोटभर खायला "अशा मायेच्या शब्दांनी, चेहऱ्यावर फिरलेल्या खरखरीत हातांनी झालेलं स्वागत..
      

थोडंसं खाऊन..चहा-काॅफी..छे!! छे !! ही पेय आम्हा मुलांसाठी नव्हतीच तेव्हा..तर पटकन् खाऊन पळायचो बाहेर.मागच्या पुढच्या गोठ्यातल्या कपिला,रंगी, तांबू ,खंडू,सर्जा.. सगळ्यांना डोळे भरून बघायचं.. ओळखलंत ना.. उद्या जाऊ बरं नदीवर एकत्र..असं बरंच काही बोलून गोठ्यामागच्या फणस,बेलाच्या झाडांकडे बघायचं .बेलफळ किती लागली आहेत हे  तपासायचं...आम्हाला  त्यांनी क्रिकेट असायचं ना खेळायचं...मग पाटापाशी येऊन खालच्या मळ्यात भाज्या कोणकोणत्या आहेत याच्यावर एक नजर टाकायचीसंध्याकाळ कलायला लागल्यानं विहिरीपर्यंत जायची परवानगी नसे आम्हाला. मग मोर्चा वळायचा तो झोपाळ्याकडे.
        

रामरक्षा, मनाचे श्लोकपाढे.. सगळ्यांची उजळणी होईपर्यंत ,    '  उठा रे मुलांनो  पाटपाणी घ्यायला 'अशी हाक यायचीच माजघरातून.
  

आत्ता आत्ता काही वर्षांपूर्वी गावात, घरात आलेली वीज. तेव्हा संध्याकाळ नंतर साम्राज्य असायचं ते लखलखणाऱ्या कंदिलांचंच. मग जेवणं झाली की बाहेरच्या मोरीवर कंदिलाच्या उजेडात भांडी घासायची.. थोड्या गप्पा-टप्पा करता करता पंख्याशिवाय  मस्त गाढ झोप लागायची.किती निर्भर होते ते दिवस...

         

आता मुक्काम हलेपर्यंतचा सुरु झालेला वेगळाच दिनक्रम...आजही  आठवला की हवाहवासा वाटतो.


माधुरी मोरे.


No comments:

Post a Comment