आपल्या संचित कर्मांमुळे
ज्या प्रवृत्ती आपल्यात विकसित होतात त्या कोणत्या दिशेने जातात व त्याचे काय
परिणाम होतात ते गीतेतील सोळाव्या अध्यायात सविस्तररित्या भगवंत सांगतात.
त्यातल्याच सत्प्रवृत्तींना दैवी संपत्ती आणि दुष्प्रवृत्तींना आसुरी संपत्ती
मानलेले आहे.
दान, तप,
यज्ञ, दया, तेज, क्षमा, सुबुद्धी, पावित्र्य, ऋजुता, शांती, ज्ञान, विनम्रता
ज्याचे अंगी आहेत त्याला दैवी संपदा लाभलेली आहे असे समजावे. या उलट अहंकार,
दांभिकता, अज्ञान, मलिनता, संताप, उर्मटपणा ज्याचे अंगी अधिकांश वेळा दृगोचर होतो
त्याला आसुरी संपदेचा धनी समजावे. खरे तर जन्मास आलेल्या प्रत्येकातच षडविकार कमी
अधिक प्रमाणात असतातच. त्यांचा योग्य वेळी, योग्य त्या प्रमाणात उपयोगही केला
पाहिजे. पण हे तारतम्य दरवेळी दिसतेच असे नाही. याचे काय कारण याचा विचार केला तर
मनुष्य जन्म मिळाला तरी पूर्वजन्मांचे संस्कार घेऊनच जीव या पृथ्वीतलावर येतो. इतर
योनी या भोगयोनी आहेत. माणसालाच फक्त विचार करण्याची व या जन्ममरणाच्या फेऱ्यातून
सुटका करुन घेण्याची संधी असते. भगवंत येथे कोणत्या मार्गाचे अनुसरण केले तर हे
शक्य होते ते सांगतात. आसुरी संपदेमुळे मनुष्य कसा अधिकाधिक अधःपतनाकडे जातो हेही
आपल्याला दिसते. गीतेच्या दुसऱ्या अध्यायातही मनुष्याचे षडविकारांच्या प्रभावामुळे
कसे कसे नुकसान होत जाते याचे ‘ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते।
सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥ क्रोधात्भवति सम्मोहः
सम्मोहात्स्मृतिविभ्रमः। स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥ या
श्लोकांतही विवेचन भगवंतांनी केलेच आहे.
सामान्य माणसाच्या जीवनात तर
रोजच अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी विचारांचे द्वंद्व चालू असते. रोज गीतेचे दोन
अध्याय वाचायचे हा नियम केला तरी तो पाळतांना कितीतरी वेळा मोडला जाण्यासारखा
विचार येतो तो ही या दोन संपत्तीतल्या द्वंद्वाचाच भाग असतो. सकाळी
उठल्याबरोबर वाचावे. नको. का तर इतक्या
लवकर आंघोळ होत नाही. बिना आंघोळीचे देवाचे कसे वाचायचेॽ आंघोळ झाल्यावर लगेच
वाचता येत नाही. स्वयंपाक, पाणी इतर घरातली कामे असतात. दुपारी निवांतपण असते पण
घरात कोणीच नसते. नेमके वाचायला बसले की कोणीतरी येते. घंटी वाजवते, फोन वाजतो,
संध्याकाळी न बघता आलेल्या मालिका इ. मधे अडथळा आला तर राहील अर्धवट. संध्याकाळी
तर शक्यच नसते. बाहेर जायचे, भाजी आणायची, मुलांचे खाणे पिणे, स्वयंपाक आहेच पुन्हा.
रात्री जेवणी खाणी, मुलांचे अभ्यास इ. इ. म्हणजे अध्याय वाचण्यापेक्षा
त्याच्यासाठी वेळ कोणता याची निश्चिती करण्यातच मनात उलटेसुलटे विचार फिरत राहतात.
हेच ते द्वंद्व. नक्की कशाला महत्त्व द्यायला हवे याचे अज्ञान, अस्थिर चित्त, संशय
या सगळ्या आसुरी संपत्तीच डोके वर काढतात. गीताध्याय वाचन या सद्विचाराला पूर्तता
देण्यासाठी ठाम निश्चय, वेळ मिळेलच ही खात्री, कामाचे नियोजन, नियम केलाय मग तो
पूर्ण करुन घेईल हा विश्वास या दैवी संपदेचा जोर जास्त असला तर मग अडथळे न येता
नियम पूर्ती होते.
संपदा म्हणजे संपत्ती, धन.
केवळ पैसा या अर्थाने विनिमयाचे साधन म्हणून संपदा असा शब्द येथे योजिलेला नाही.
धन तर हवेच. पण केवळ नाणी, नोटा आपल्या गरजा पूर्ण करु शकत नाहीत. तर त्यांच्या
आधारे आपण आपल्याला हवी असलेली चीजवस्तू घेऊ शकतो. उदा. आपल्याला थंडीपासून
संरक्षण करण्यासाठी उबदार वस्त्रच हवे. नोटा खिशात वागवून उब मिळणार नाही. पण
खिशातील पैशाने आपण ती खरेदी करु शकतो. जी वस्तू घ्यावयाची त्याची आवश्यकता,
उपलब्धता, प्रमाण हे आपल्याला व्यावहारिक जीवनात माहीत असणे गरजेचे आहे तरच त्याचा
उचित उपयोग होऊ शकतो. नाहीतर भूक लागली आहे. खाण्याच्या वस्तू आहेत पण त्या न घेता
जर त्या पैशातून वस्त्रालंकार घेतले किंवा नको त्या गोष्टी खरेदी केल्या तर त्याने
भूक शमणार नाही. तसेच आपले जीवन व्यतीत करीत असतांना जे उत्तम गुण आहेत त्यांचा
उपयोग केला नाही. ते उत्तम गुण स्वीकारले, वर्धित केले नाही तर आसुरी संपदेचे परिणाम
भोगावे लागतात. उदाहरण द्यायचे झाले तर अंगी भरपूर शक्ती आहे, बुद्धी आहे, आईवडील
समृद्ध आहेत पण मुलाने जर अभ्यास न करता, उनाड मित्रांची संगत करुन, मवालीगिरी
करीत तारुण्य व्यतीत केले तर पदवी प्राप्त करणे, चांगला उद्योगधंदा करणे, उत्तम
शारीरिक स्थिती राखणे शक्य होणार नाही. आणि आयुष्याच्या शेवटी जसा आला तसाच गेला
म्हणजे पुनश्च जन्ममरणाचा फेरा सुरु. पुराण कालात धुंदुली, रावण, कंस यांचेठायी
दैवी संपदाही होती पण त्यांनी त्यांचा उपयोग केला नाही. तर आसुरी गुणांची कास
प्रकर्षाने धरली आणि आपल्या दुर्गुणांनी समाजाला त्राही माम करुन सोडले. अनेकदा
करणाऱ्यालाही हे माहीत असते की हे शास्त्राविरुद्ध आहे. अशा पद्धतीने वागणाऱ्यांना
चांगले काय वाईट काय माहीत नसते असेही अजिबात नाही. पण त्यांच्यातल्या दैवी
संपदेच्या गुणांवर आसुरी संपदेच्या गुणांचा विजय होतो. म्हणजे त्यांच्या मानसात हे
द्वंद्व होतच असते. दुर्योधन म्हणूनच म्हणतो ‘जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति।
जानामि अधर्मम् नच मे निवृत्ति।’ आसुरी संपदेच्या आहारी जाऊन भरकटलो तर स्वप्नातही
आपण मोक्ष प्राप्त करुन घेऊ शकत नाही की सुखाने जगूही शकत नाही. तर दैवी संपदेला
आपलेसे केले तर शाश्वत सुखापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होत जातो. वाल्या कोळी
या वाटमारी करणाऱ्याला नारदोपदेशानंतर निर्माण झालेल्या मनातील द्वंद्वाने
वाल्मिकी ऋषी बनण्याचा मार्ग प्रशस्त केला. ज्या योगे त्याने स्वतःचे कल्याण तर
केलेच पण अनेकांसाठी एक उत्तम साधन रामायणाच्या रुपाने निर्माण केले.
केशव उखळीकर नावाचे एक किर्तनकार आहेत. त्यांनी त्यांच्या किर्तनात एकदा
सांगितलेली ही गोष्ट. नविन नविन किर्तन करायला सुरुवात केलेली. कुठल्या तरी गावी किर्तनाची तारीख वेळ निश्चित केली होती.
त्या दिवशीपासून क्रिकेटची वन डे सिरीज आहे हे काही आधी पाहिलेले नाही. गावी
जाण्याची वेळ आली तेव्हा मित्रमंडळ भेटले आणि भारत न्यूझिलंडची मॅच उद्या आहे हे
कळले. झाऽऽऽले. क्रिकेट हा अत्यंत आवडीचा
विषय. आता काय करावेॽ किर्तनासाठी गावी गेलो तर सामने बघता येत नाही. सामने बघायचे
असतील तर किर्तनाला जाणे टाळले पाहिजे. हे करु की ते करु यांत किर्तन काय पुन्हा
करता येईल. हे सामने काही पुन्हा
व्हायच्या नाहीत असा विचार आला. त्याबरोबर किर्तनाला जायचे रद्द करुन त्या
गावीच्या मंडळाला अगदी नाटकीपणाने आजारी असल्याचे सांगून, किर्तनाला तशाही
परिस्थितीत येऊ का असे मानभावीपणाने विचारुन तारीख रद्द करुन घेतली. दुसऱ्या दिवशी
सामन्याचा आनंद मनसोक्त्त लुटला.
ही गोष्ट ऐकली आणि मनात विचार सुरु झाले. किर्तनकार असले तरी ते
एक माणूस आहेत आणि प्रत्येक माणसाच्या मनात असे द्वंद्व सुरुच असते. चांगले विचार
पोहोचवण्यासाठी किर्तनकार झालेला माणूसही आपल्यातील या द्वंद्वात निश्चित,
श्रेयस्कर काय हे ठरवू शकेलच असे नाही. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात ‘रात्रंदिन
आम्हा युद्धाचा प्रसंग। अंतर्बाह्य जग आणि मन॥ जीवाही आगोज पडती आघात। येऊनिया
नित्य नित्य वारूं॥’ आणि या आघांतातून द्वंद्वातून मुक्त होण्यासाठी ‘तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळें। अवघियांचे
काळें केले तोंड॥’ असा उपायही सांगतात.
Padma Dabke
No comments:
Post a Comment