Friday, 27 December 2019

जन्म मृत्यू असाच काॽ

जन्म मृत्यू असाच काॽ


आत्मा या पंचभौतिक असलेल्या देहात आल्यानंतर काही काळाने त्याला हा देह म्हणजे शरीर सोडावे लागते हे
सगळ्यांनाच समजते. पण हा देह धारण करीत असतांना तो काय घेऊन ते धारण करतो किंवा जातांना काय घेऊन सोडतो हे
सामान्य जीवासाठी एक कोडेच असते.
तथापि ‘अंते मति सा गति’ या न्यायाने अंतकाळी जी इच्छा असेल त्यानुरुप पुढचा जन्म मिळतो ही मान्यता आहे.
पंधराव्या अध्यायाच्या ७ व्या श्लोकात भगवंत सांगतात, ‘ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। मनः षष्ठानीन्द्रियाणि
प्रकृतिस्थानि कर्षति॥ म्हणजे या बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. प्रकृतिच्या त्रिगुणांनी व संचित कर्माने बद्ध
झाल्यामुळे ते मनासहित आपल्या एकूण सहा इन्द्रियांनी अवघड असा संघर्ष करीत आहेत. एका विद्युत शक्तीने दिवा, पंखा,
शीतकपाट, धुलाई यंत्र हे सगळे चालते. पण त्या प्रत्येकाचे साधन व कार्य भिन्न भिन्न दिसते. तद्वत सर्व जीवांमध्ये तो सनातन अंश
आहेच पण आपल्या साधनानुसार व कर्मानुसार भिन्न भिन्न दिसते.
पूर्णतः ज्ञान प्राप्त करुन घेण्याची माणसाची आकांक्षा होत नाही त्यामुळे पुनः पुनः ते जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकत
राहतात. सनातन, शाश्वत असा अंश असल्यामुळे भगवंताकडे स्वाभाविक ओढ असली तरी आरशावर धूळ बसल्यामुळे तो जसा
प्रतिबिंब दाखवू शकत नाही तसे अज्ञानाचे पडदे, विकारांचे पडदे या अंशावर असल्याने पूर्ण रुप दिसत नाही. दृश्य जग हे भौतिक
दृष्ट्या सातत्याने नजरेसमोर असते. त्रिगुणांच्या आणि षडविकारांच्या प्रभावाखाली हा देह या भौतिक जगात सुख शोधण्याचा
प्रयत्न करीत रहातो. त्या सुखाच्या प्रीत्यर्थ जी जी कर्मे करतो त्याचे संचित जमा होते. आपापल्या संकल्पनेप्रमाणे, कल्पनेप्रमाणे
एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जीव प्रवेश करत रहातो. ज्याप्रमाणे वारा आपल्याबरोबर गंध आणतो मग तो कधी चांगला असतो
वा कधी दुर्गंधही असतो. तसेच आपल्या संचितानुसार येणारा देह मग कधी उत्तम असतो वा कधी कमतरता असलेला. या अंशाला
त्याने कोणत्या प्रकारचे कर्म करुन पुढील देह कोणत्या स्वरुपाचा मिळवावा यासाठीचा प्रयत्न करण्याचे सदैव आंशिक स्वातंत्र्य
असते.
‘शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रमतीश्वरः। गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात्॥’ असे भगवंत याच अर्थाने सांगतात.
आत्ताचा देह व वर्तमान कर्मे ही पुढील शरीराची पूर्वतयारी असते. आत्मा हा शरीर सोडतांना या भौतिक जगतातील
कोणतीही गोष्ट बरोबर घेऊन जात नाही. तर त्या जीवाने त्या त्या शरीरात असतांना जी कर्मे केली असतील त्यानुसार त्याचे
झालेले संचित बरोबर घेऊन जातो. एकाच नव्हे तर अनेक जन्माच्या संचितांचे गाठोडे तो आपल्याबरोबर वागवीत असतो.
धृतराष्ट्राच्या आधीच्या ५० जन्मांपूर्वीचे पारध्याच्या रुपाने केलेले कर्माचे संचित त्याच्या या जन्मात अंधत्व आणि १०० पुत्रांचा
वियोग या रुपाने मिळालेले आपल्याला ज्ञात आहे.
आपल्याला कधी कधी अशा घटना ऐकायला मिळतात की एकादी व्यक्ती एकादे ठिकाण पूर्वी कधीही पाहिले नसले तरी
हुबेहुब वर्णन करुन सांगते. किंवा एकादे लहान चार पाच वर्षाचे मूल उत्तम तबला वाजवते. त्याला हे ज्ञान कुठून प्राप्त झाले असेल
याचे आपल्याला आश्चर्य वाटते. आपण जेव्हा संतांची चरित्रे वाचतो तेव्हाही आपल्याला खूप वेळा प्रश्न पडतो की हे इतके विरागी,
प्रसन्न, शांत कसे असू शकतातॽ इतक्या हालअपेष्टा, अभावाच्या परिस्थितीतही समत्व कसे दाखवू शकतातॽ गीतेच्या सहावा
अध्यायातील खालील ४१ ते ४५ श्लोकात भगवंत याचे उत्तर देतात.
‘प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समा। शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते॥ ४१॥
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम्। एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्॥ ४२॥
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम्। यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन॥ ४३॥
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः। जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्ते॥ ४४॥
प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः। अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम्॥ ४५॥’
पूर्व जन्मी योगाभ्यास करीत असतांना आत्मदर्शन होण्यापूर्वी मृत्यू आला म्हणजेच तेथून तो योगभ्रष्ट झाला. वाटचाल
थांबली. त्यामुळे मृत्युनंतर त्याला त्याच्या कर्मानुसार सांसारिक भोग घेण्याची त्याची इच्छा अपुरी असेल तर जे स्वर्गभोग
असतील ते भोगल्यानंतर परत पवित्र, श्रीमंत, अशा कोणत्या तरी घराण्यात जन्म प्राप्त होतो. आणि ज्याला कोणतीही कामनाच
शिल्लक राहिली नसेल असा पण साधना अपूर्ण राहिल्यामुळे जन्म आला असेल तर तो थेट ज्ञानसंपन्न, तत्वज्ञानी घराण्यात जन्म
घेतो असे भगवंत सांगतात. अशा प्रकारचा जन्म खरोखरच दुर्लभच असतो. पूर्व जन्मात झालेल्या अभ्यासाच्या अनुषंगाने त्याची
वृत्ती योगमार्गाकडेच वळते. परमात्म चिंतनाची त्याची ओढ कायम असल्यामुळे तो पुन्हा आपले साधन करु लागतो. देहाचे भौतिक
गुण देहावसनानंतर तिथेच संपतात. पण आत्म्याचे जे गुण आहेत स्वस्वरुपाशी अनुसंधान, श्रद्धा, विश्वास ते त्याच्याबरोबरच
असल्याने त्याला प्रपंचातील गोष्टींबद्दल अनास्थाच वाटते. त्याची प्रगती निश्चितपणे होते.
यातून भगवंत आपल्याला आश्वस्त करीत आहेत की आत्तापर्यंत जरी तुम्ही देहाधिष्ठित सुखाची कामना करुन जीवन
व्यतीत केले असले तरी आता कळल्यानंतर जर तुम्ही हा योगाभ्यास चालू केला आणि तो अपुरा राहिला तरी पुढच्या जन्मात तो
तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. आत्मज्ञान प्राप्त करुन घेण्यासाठी कोणतीही वयाची अट, परिस्थितीचा संबंध असत नाही. ज्या क्षणी

तुम्हाला त्याचे महत्त्व कळाले त्याच क्षणापासून तुम्ही ते प्राप्त करण्यासाठी मार्ग क्रमू शकता. परमेश्वर सहाय्याला आहेच हा
विश्वास ठेवा.

Padma Dabke

1 comment:

  1. तुम्ही पाठवलेला लेख आज निवांत क्षणी वाचला.जन्म मृत्यु याचं रहस्य तुम्ही सोप्या आणि मोजक्या शब्दात अतिशय सुंदर पध्दतीने मांडलंय.हेच गीतेच सार आहे.विद्युत शक्तीचं उदाहरण अगदी चपखलं आहे.

    ReplyDelete