रोज साडेआठला कामाला येणारी रूपाली नऊ वाजून गेले तरी आली नव्हती. रोज काही ना काही कारणं ठरलेलीच आहेत उशीर होण्याची
आणि दांड्या मारण्याची. हिच्यामुळे माझं वेळापत्रक रोज गडगडतंय. ते काही नाही. खूप सहन केलं हिला. आज काय तो सोक्षमोक्ष
लावूच या. काही लाड करण्यात अर्थ नाही असा विचार करून मी तिच्यासाठी करून ठेवलेला चहा मुद्दाम पिऊन टाकला.
ह्यांनी कपाळावर आठ्या घालून, कोपरापासून मला नमस्कार करून नापसंती व्यक्त केलीच. पण मी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं.
रूपाली... आमच्याकडे भांडी आणि केर लादी करणारी मुलगी. केर लादी भांडी या व्यतिरिक्त कपडे इस्त्रीला दे.
दुकानातून काही आणून दे. भाजी निवडून दे अशी पण मदत घेत असते मी तिची. वय वर्ष 29. आणि पदरात 11 वर्षांचा मुलगा. नवरा
प्लंबिंगची कामे करणारा, आणि विधवा सासू असं कुटुंब. रूपाली तुरूतुरू पळापळ करत कामं करणार. ज्या कामाला आपल्याला
किमान अर्धा तास लागेल ते काम ही शब्दशः पाच मिनीटात उरकणार. हिचं काम झालं की आपल्या लक्षात येतं की या बाजूने केरच
घेतला नाहीये, लादीच पुसली नाहीये किंवा कढईचा ओशटपणा तसाच आहे, परातीच्या कडेला कणिक तशीच आहे. शंभर वेळा सांगून
झालं,"रूपाली अशी वाघ मागे लागल्यासारखी कामं करू नकोस. तू नीट काम केलेलं नाहीयेस हे ह्यांच्या लक्षात येतं आणि वाद होतात
आमचे." पण रूपालीत फरक शून्य. दुसरी बाई पहावी कामासाठी तर तिची तरी काय खात्री? त्यामुळे रूपालीला सहन करण्यावाचून
पर्याय नाही आणि वाद व्हायला नकोत म्हणून भराभर स्वतःची कामं आवरायची म्हणजे तिच्यावर लक्ष ठेवून काम करून घ्यायला बरं.
आज तिची खैर नाही. गेली सोडून काम तरी चालेल पण हे फार झालं असा विचार करून मी अगदी टपून बसले. रूपाली येते
कधी आणि माझा तोंडाचा पट्टा सुरू करते कधी. (रूपाली ला बोलताना मला ह्यांना पण टोमणे मारता येतात) असं मला
झालं होतं. रूपाली आली. नाक लाल....डोळे लाल. चपला अंगणात भिरकावून तरातरा घरात. माझे सगळे ठरवलेले डायलॉग्ज माझ्या
घशातच राहीले. काय गं काय झालं? मी जरा कोरडेपणानेच विचारलं कारण माझा राग तरी कुठे शांत झाला होता? काही नाही काकू.
वैताग आलाय मला. रूपाली म्हणाली. तिचे शब्द ऐकले. अवताराकडे परत बघितलं आणि मला खूप वाईट वाटलं. माझाच रागही आला.
मी प्रयत्नपूर्वक स्वतःवर कंट्रोल केला. रूपालीचा हात धरून तिला माझ्यासमोर बसवलं."सांगशील मला काय झालंय ते? नवरा तर दारू
पीत नाही, मारझोड करत नाही म्हणाली होतीस. मग? इतकं काय झालंय?"
रूपाली ने जे सांगितलं त्यामुळे मी आवाक झाले. घरातलं करून बाहेरची काम करून रूपाली पैसे कमवून सासूच्या हातात देत होती.
काही पैसे सासूला न देता भिशीत टाकत होती. अगदी गेल्या महिन्यापर्यंत तीला रोखीतच पगार मिळत होता त्यामुळे नवरा आणि सासूच्या
नकळत तिला भिशीचे पैसे वेगळे काढता यायचे. या महिन्यात तिला सगळ्यांनीच पगाराचे चेक दिले. त्यामुळे सासूला रोख पैसे काही हातात
देता आले नाहीत. भिशीला पैसे देता आले नाहीत आणि चेक्स मिळाल्यामुळे तिच्या कमाईचा नेमका आकडा सासूला आणि नवऱ्याला
कळला. आपल्या मुलापेक्षा त्याची बायको जास्त कमावते ते सासूला सहन झालं नाही. आपल्याला कमी पैसे देत आली आजवर याचाही
राग भरीस भर म्हणून होताच. सासूने रागाच्या भरात रूपाली च्या आईबापांचा उद्धार केला. तिला घराबाहेर ढकलून दिलन घरात आलीस
तर खबरदार म्हणाली.
मी सुन्न झाले. रूपाली....माझ्या मुलाच्या वयाचीच पण आज परिस्थितीमुळे किती घरची कामे करतेय, सासूचा छळ सहन करतेय आणि
आपण दहा मिनीटं, अर्धा तास उशीर झाला, घाणेरडं काम केलं म्हणून चिडचिड करतो.
काकू...नवरा काही बोलत नाही हो त्याच्या आईला. मला म्हणतो तूच दुर्लक्ष कर. आज कहर झाला. माझ्या आईवडिलांना कशाला
घाणघाण शिव्या द्यायच्या ना? पोलीस कंप्लेंट करून फायदा होण्यापेक्षा नसते तमाशे लोकांना. पोरगं माझं घाबरून गेलंय. सासूने घरात
घेतलं नाही तर माझे आई वडील पण जवळ नाहीत. काय करावं समजेना झालंय.
बिल्कूल काळजी करू नकोस. सासू घरात घेणार नाही असं होणार नाही. नवरा तसं आपल्या आईला करू देणार नाही. आणि नाहीच
घेतलं घरात तर काकूचं नाही तुझ्या आईचं घर तुझ्यासाठी कधीही उघडं आहे. ताबडतोब इथे निघून ये. आता शांत हो. देतेय ते खा.
चहाचा घोट घे. मग लाग कामाला.
मी हे म्हंटलं आणि मनात आलं ह्यांना न विचारताच मी हे रूपालीला सुचवून चूक तर नाही केली? रूपालीला डोक्यावर थोपटून ह्यांच्या
कानावर घालावं म्हणून उठले तर बेडरूमच्या दारातच हे उभे! "ऐकलंय सगळं. रूपालीला सांगितलंस ते बरं केलंस." मला हुश्श झालं.
आपण योग्य केलं याचं समाधान झालं.
Anagha Joshi
Talegaon
|
Sunday, 29 December 2019
Blog Post
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment