Sunday, 29 December 2019

पार्टी

पार्टी

- सुजाता महाजन


        रोजचीच सकाळची गडबड. आज नव-याला गावाला जायचं म्हणून काल रात्रीच बॅग भरून ठेवली होती. पण लॅपटॉप कशातून न्यायचा ते ठरत नव्हतं.

    चटईवर पडून पाय वर करून उत्तानपादासन अवस्थेत नवरा सूचना देत होता, ‘‘हँडबॅगेतून लॅपटॉप काढ. आधी तिकडून ती माझी छोटी काळी व्हीआयपीची हँडबॅग आण. हं काढ आता लॅपटॉप. हळू. जपून. ठेव त्या बॅगेत. दुस-या कप्प्यात प्लॅस्टिकची फाईल आहे आणि एक काळी डायरी आहे ती पण ठेव. पुढच्या चेनच्या कप्प्यात..’’

    इथं उत्तानपादासन खाली. विश्रांतीमुद्रा.
    ‘‘तिकिट आहे बघ जेटचं ते काढ बाहेर. ते इकडं ठेव.’’
    ‘‘चष्मा? चष्मा ठेवायचाय का?’’
    ‘‘हो. हो.’’ आता पवनमुक्तासनाची मुद्रा. पण नुसतेच पाय पोटाजवळ, गुडघ्यांना हाताची मिठी. मान जमिनीवरच.

    ‘‘च्यायला, काय लागेल अजून हे समजत नाहीये.’’ नवरा उठून बसला. वज्रासनात बसून पुढचं बोलायला सुरुवात. ‘‘काय आहे, ही बॅग त्या मोठ्या बॅगेत टाकता येते म्हणून ही न्यावी म्हणतोय. पण यातलं सगळंच या व्हीआयपीत मावणार नाही. का असं करू, लॅपटॉप नकोच. एका दिवसासाठी कशाला? लागला तर बरोबर सुन्याचा आहेच. असंच करूया. काढ तो लॅपटॉप बाहेर.’’
    तिने परत लॅपटॉप काढला. हळुवारपणे बॅगेत ठेवला. प्लॅस्टिकची फाईल, काळी डायरी, चष्मा सगळं काढलं.

    ‘‘त्या मोठ्या बॅगेत टाक काल भरलेल्या’’ हातांनी आतल्या खोलीची खूण करत नवरा म्हणाला आणि पश्चिमोत्तानासनात गेला. पाय समोर पसरून हातांनी पायांचे अंगठे पकडून गुडघ्याकडे डोकं नेतानाच त्याला फोन आला. ती धावत फोन घेऊन आली. एक अंगठा पकडलेल्या एका गुडघ्याकडे डोकं वाकलेल्या अवस्थेत नव-याने फोन घेतला.
    तोवर तिने आतून त्याची बॅग आणली. लक्षात आलं, हिला नंबरचं कुलूप आहे. आता नवरा नंबर सांगेपर्यंत काय करणार.

    फोन संपेना. सुदैवाने एक अंगठा सोडून नवरा नॉर्मल झाला होता. एकीकडे ‘चहा ठेव’ अशी खूण करत होता. तिने पटकन चहा ठेवला.

    फोन संपवून नवरा उठून उभा राहिला. ताडासन केलं. मग आत आला. चहा घेत असताना तिला सूचना देऊ लागला. ‘‘हे बघ, उद्या पार्टी आहे. खूप महत्त्वाचे लोक आहेत. तू कार घेऊन मला घ्यायला एअरपोर्टवर ये. माझा कोट बरोबर आण येताना. तिथून तसंच जाऊ आपण. तुझं पण - कपडे, पर्स, चपला सगळं व्यवस्थित पाहिजे. चांगला स्वेटर नाहीये तुला. जुनाट झालेत पहिले सगळे. एक चांगला स्वेटर घेऊन ये.’’
    तिने मान डोलावली. नव-याला बॅगेच्या कुलपाचा नंबर विचारला. बॅगेपाशी गेली, न तिच्या लक्षात आलं. आपल्याला नंबर नीट दिसत नाहीत. आत जाऊन चष्मा शोधून आणला. मग पाहिलं तर लक्षात आलं जो नंबर शून्य दिसत होता तो सहा होता. कुलूप उघडून तिने बॅगेत सामान ठेवलं.

    सगळं आवरून नवरा बाहेर पडल्यावर तिने शांतपणे बसून विचार केला, की पार्टीची तयारी कशी करावी? ड्रेस की लगेच स्वेटर की लगेच चप्पल्स की लगेच पर्स की लगेच कानातलं, गळ्यातलं. एवढ्या सगळ्या गोष्टी परस्परानुकूल हव्यात.

    नव-याला सोडून ड्रायव्हर परत आला तेव्हा ती मुलीबरोबर खरेदीला बाहेर पडली. पहिले स्वेटर ! पहिल्या दुकानात तिने ‘लेडिज स्वेटर?’ विचारलं तेव्हा उलटा प्रश्न आला, ‘‘गुंड्यांचा की चेनचा?’’ हल्ली चेनचेही स्वेटर आहेत वाटतं (ती मनात) ‘‘दोन्ही दाखवा.’’

    ‘‘मग चेनचे तुम्ही इथे पाहा. गुंड्यांचे पलीकडच्या दुकानात. आमचंच आहे ते.’’
    चेनचे स्वेटर पाहिले. त्यांची पुरुषी डिझाईन्स पाहून ती वैतागली. पलीकडे गुंड्यांचे पाहायला गेली. सगळे शाळांमधले युनिफॉर्मचे स्वेटर्स असावेत तसे होते.   

    न घेताच ती जेव्हा बाहेर पडली तेव्हा तिला कल्पनाही नव्हती आपण नाकारलेले हे स्वेटर्स आपल्या पाहण्यातले शेवटचे गुंड्यांचे स्वेटर्स. इथून पुढे आपल्याला फक्त चेनचे पुरुषी स्वेटर्सच दिसणारेत. त्यानंत जेवढ्या शॉपिंग मॉलमध्ये ती गेली त्यात तीन प्रकारच्या प्रतिक्रिया तिला ऐकायला मिळाल्या.

    (१) ‘‘काय? लेडीज स्वेटर? (जणू काही तिने कुणाचा खून करण्यासाठी पिस्तूलच मागितलं होतं) नाय नाय नाय. आमच्याकडे नाय.’’
    (२) ‘लेडीज स्वेटर? एवढेच आहेत. पहा.’’ तीन स्वेटर. तेही चेनचे.
    (३) लेडीज स्वेटर आता कुणी घालत नाही. 
    तिला वाटलं, आपल्याला लेडीज स्वेटर घालायला लागून अनेक वर्ष झाली पण ‘लेडीज स्वेटर’ हा ब्रिटिशकालीन विषय कधी झाला?
    सर्व स्त्रिया पँटच घालतात असं गृहीत धरून पँटवर सोयीस्कर असे चेनचे स्वेटर्सच फक्त बाजारात ठेवणे हे अर्थशास्त्रातलं, बाजारपेठेतलं कुठलं गृहीतक म्हणायचं ! 
    स्वेटरशिवाय रात्रीची पार्टी अटेण्ड करणं शक्यच नव्हतं. स्वेटर घेण्याशिवाय पर्याय नव्हता. तिने गुपचूप चेनचा त्यातला त्यात पुरुषी न वाटणा-या डिझाईनचा स्वेटर निवडला.
    स्वेटरसाठी दुकानं पालथी घालण्यात एवढा वेळ गेला होता. नंतर तिने एक दोन पंजाबी ड्रेस घेतले. मग चप्पल खरेदी.

    स्टँडवरची प्रत्येक चप्पल आपल्या पायात आली की कुरूप दिसते असं तिला वाटायचं. पुन्हा कुठल्या ड्रेसवर काय घालायचं, कशी पर्स घ्यायची, कशा चपला घालायच्या, कशी टिकली लावायची, ओढणी कशा पद्धतीने घ्यायची याबाबत जग इतकं जागरूक झालेलं असताना तिला मुलीची ट्युशन आवश्यक वाटायची. त्यामुळे आताही तिच्या सल्ल्याने चप्पल निवडली. 

    घरी आल्यावर ड्रेस घालून बघितला तेव्हा बाह्या अंमळ जास्तच लांब आहेत हे लक्षात आलं. तेव्हा ती आल्टर टेलरकडे गेली. बाह्या लहान करायला सांगितल्या. पण किती लहान ते त्याला समजेना. तेव्हा त्याच्या दुकानातच तिला कपड्यांवरूनच तो अंगरखा घालून आपल्या हाताबाहेर जाणा-या बाह्या दाखवाव्या लागल्या. तिचं हे कृत्य चालू होतं तेव्हा टेलरची बडबड चालू होती. नुकतीच एक बाई त्याच्या दुकानात दुरुस्तीला टाकलेले कपडे घ्यायला आली. ते सापडेनात तेव्हा तिने आत जाऊन कपड्यांच्या ढिगा-यातून स्वतःचं, त्याने हात न लावलेलं पुडकं शोधून दिलं होतं. त्या घटनेवर तो बोलत होता. ‘‘मी येकटाच. अन्‌ काम पाह्यलं ना तुमी किती. निस्त शिवायचं आन्‌ ह्ये आल्टरचं यात फरके. माझा भाव आणला होता हितं. नोकरीला लावला. म्हटलं संध्याकाळचं थोडं शिकल, मदतीला यील तर हा कसला. नोकरी करायचा अन्‌ संध्याकाळशाला भटकत फिरायचा. आता हाकतोय बैलं गावाकडे. आमचा जल्म असाच जाणार. आमच्या मदतीला कुनी पन नाय यायचं.’’

    तो हे इतकं हसतमुखाने सांगत होता की ही तक्रार समजायची की नुसती हकीकत, तिला कळेना. तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. मग त्याचं बोलणं झाल्यावर ती त्याला म्हणाली, ‘‘तुमचा नंबर द्या मला म्हणजे उद्या मी तुम्हाला सकाळी आठवण करीन.’’

    त्याने सांगितला. तिने तो स्वतःच्या मोबाईलवर सेव्ह केला. त्याला रिंग दिली चेकिंगसाठी. बरोबर होता.
    दुस-या दिवशी ती ब्युटिशियनकडे गेली. एकूणच ती पावडर, कुंकू, केसावरून कंगवा फिरवणं एवढ्याच गोष्टी नियमितपणे करत असल्याने या विषयातही मुलीचंच मार्गदर्शन आवश्यक. मुलीच्या ‘‘कोणता कट करू?’’ या प्रश्नावर ‘‘तुला बरा वाटेल तो’’ या व्यतिरिक्त कोणतंही उत्तर तिला कधीच देता आलं नाही.

    ब्युटिशियन तिच्या चेह-यावर पपईचे गराचे लपके ठेवत असतानाच फोन वाजला. तोंडभर पपई ठेवलेल्या अवस्थेत तिने आंधळ्यासारखा फोन उचलला. ‘‘हॅलो’’ म्हटलं. पलीकडून नवरा, ड्रायव्हरला संध्याकाळी येण्याचा निरोप सांगता आला नाही ही खुशखबरी सांगत होता. ‘‘माझ्या सेलची बॅटरी डाऊन होतेय. मी आमच्या रिसेप्शनिस्टला, त्याला शोधून काढून निरोप द्यायला सांगितलंय. तू फक्त फॉलोअप घे. त्या तुला फोन करतीलच.’’ 

    मग पुढचा सर्व वेळ -
    ती पायाच्या भेगा साफ करण्यासाठी दोन्ही पाय साबणाच्या कोमट पाण्यात टाकून बसलेली असताना - ब्युटिशियन आणि तिची सहकारी तिचा एकेक पाय आपल्या मांडीवर घेऊन दगडाने साफ करत असताना - ब्युटिशियन तिच्या केसांना मेंदी लावण्यासाठी मेंदीत बुडवलेला हात मेंदीसह उचलताना - अनुक्रमे नवरा, रिसेप्शनिस्ट, पुन्हा रिसेप्शनिष्ट, त्यांचा ड्रायव्हर असे फोन येत राहिले.

    ब्युटिशियनच्या त्या पार्लरचं अंतर्गत वैशिष्ट्य असं होतं की तिथे फोनची रेंज येत नव्हती. बाहेरच्या खोलीत जाऊन दाराजवळ उभं राहिलं की दुस-याला आपला आवाज येणार त्यामुळे या सर्व अवस्थांत तिला धडपडत बाहेर येऊन फोन घ्यावा लागला. प्रत्येक वेळी बाहेरच्या खोलीतल्या चारी बाजूंच्या आरशात आपलं रूप पाहून ती दचकायची. फोनवर बोलून परत येऊन पुन्हा ब्युटिशियनच्या मांडीवर आपला पाय देऊन बसणं भयंकर अॅबसर्ड वाटत राहिलं.

    शेवटी एकदाचं ते सगळं संपलं. ब्युटिशियने विचारलं, ‘‘कोणतं नेलपॉलिश लावू?’’ नेलपॉलिश कधीच लावत नसल्याने ‘‘तुला हवं ते लाव’’ हे उत्तर तिने दिलं.

    थोड्या वेळाने ब्युटिशियन ‘‘हं झालं!’’ म्हणाली तेव्हा तिने आपल्या पायांकडे पाहिलं आणि दचकलीच. एकदम डायलॉग आठवला. ‘‘आपके पैर बहोत सुंदर है, इन्हे जमींपर मत रखना, मैले हो जायेंगे’’ वगैरे वगैरे.
    हे आपले पाय आहेत? एवढे गोरे, लालसर? आणि आपलं ते पूर्ण काळं पडलेलं करंगळीचं नख? अरे, हेही गोरं? एवढे त्रास सहन करत ही सगळी उठाठेव केली, नव-याला चांगलं वाटावं म्हणून. आपल्यालाही मस्त वाटतंय की ! आपल्या पायाला एकेक गुलाबाची कळी आलीय नवीन.

    ती खुशीत उठली. ब्युटिशियनला पैसे देऊन बाहेर पडली. आता बाह्या! आल्टरवाल्याकडून ड्रेस घ्यायचा. तिने त्याला फोन केला, रेडी ठेवा. तो म्हणाला, ‘‘घडी घालून ठेवतो. पण माझ्याकडे पिशवी नाही, कॅरीबॅग आणा.’’
    ड्रेस घेतला. डोक्याला मेंदी थापलेली त्यावर प्लॅस्टिकची टोपी, वरून ओढणी. खालच्या दुकानात तांदूळ घ्यायला गेली तर कधी अनावश्यक न बोलणारा दुकानदार म्हणाला, ‘‘प्लॅस्टिकची टोपी घातलीय डोक्यात?’’
    ‘‘हं! मेंदी लावलीय ना!’’
    ‘‘नाही, मी म्हटलं. प्लॅस्टिक वाईट असतं ना!’’
    ‘‘ती घरी येईपर्यंत घातलीय. आता काढणार’’
    तिने त्याचं समाधान केलं.
    घरी आली. टोपी काढली. मोड आलेल्या मुगाला फोडणी देऊन भात आणि उसळीची कुकर लावला. रात्री फक्त दोघांनाच जायचं होतं. बाकीच्यांसाठी स्वयंपाक करून ठेवावा लागणार होता. कुकर चालू असतानाच तिने बेसीनमध्ये डोकं धुवायला सुरुवात केली.
    तेवढ्यात ड्रायव्हर आला. मुलीने त्याला गाडीची किल्ली दिली. डोकं धुवून झाल्यावर मुलीजवळून जाताना मुलगी म्हणाली, ‘‘अंड्याचा वास येतोय डोक्याला. धू पुन्हा.’’
    मग शाम्पू लावून पुन्हा डोकं धुणं. पुसणं. बाह्या लहान केलेला कुडता चढवणं. स्वच्छ गो-या झालेल्या चेह-यावर एक छोटीशी टिकली टेकवणं, पायात नव्या चपला घालणं, कानातलं, गळ्यातलं घालून मुलीसमोर पसंतीसाठी उभं राहणं, नव-याचा कोट घेऊन चालायला लागणं...

    गाडीकडे जाताना मुलगी म्हणाली, ‘‘आई, तू फारच छान दिसतेयस.’’ गाडीत कोट अडकवला. मुलगी शेजारी बसली. तिला वाटेत क्लासला सोडायचं होतं.

    रस्त्यात मुलीला भूक लागली. मध्येच काय खाणार म्हणून केळीवालीपाशी गाडी थांबवली. काच खाली केली. केळीवालीला चार केळी द्यायला सांगितली. केळीवालीची गाडी मागे होती ती तिथे गेली. हातात मोठ्या केळ्यांचा एक चांगला घड घेतला. गाडीकडे पाहिलं. काचेतून आपल्याकडे कुणी पाहतंय हे तिला दिसत नव्हतं. तिने तो घड पुन्हा ठेवून दिला. दुसरा छोट्या केळ्यांचा घड निवडला. त्यातली चार केळी कापून दिली. हे सारं पाहूनही ती केळीवालीला काहीच म्हणाली नाही.

    मुलीनं केळं खाल्लं पण सालीची जबाबदारी घेईना. रस्त्यात टाकायचं नाही ‘‘आता मी कुठे कचरापेटी शोधू तुम्हीच दिसली की टाका’’ असं म्हणून मुलगी गाडीतून उतरली.
    ती हातात केळ्याची साल घेऊन बसली होती. हे शहर एवढं अस्ताव्यस्त पसरलेलं, पूर्णपणे नियोजनासहित रस्ते आणि घरांचं, वाट्टेल तसं वागणा-या नगरसेवकांचं आणि बेजबाबदार नागरिकांचं असूनही रस्त्यात तिला एकही कच-याचा ढीग दिसेना.

    शेवटी ही साल आता आपल्याला एअरपोर्टपर्यंत साथ देणार असं वाटत असतानाच एक कचरापेटी दिसली. ड्रायव्हरने जवळ गाडी नेऊन कचरापेटीत साल फेकली.

    हुश्श !
    ती एअरपोर्टजवळ आली. तीस रू. चं तिकिट काढून आत गेल्यावर बातमी कळली फ्लाईट दीड तास लेट. पुस्तकांच्या दुकानात पुस्तकं चाळली. जेम्सच्या दुकानात सुंदर वस्तू पाहिल्या. आर्टस्‌ कॉर्नरमध्ये एक स्त्री आणि विमानतळ व्यवस्थापकांची तिची चित्रे ठेवण्यासाठी कोणती जागा निवडावी यावर चर्चा चालू होती. त्यांना ओलांडून चित्रं पाहिली. पंचाहत्तर रू. चा अतिसुमार दर्जाचा एक बटाटेवडा खाल्ला. कॉफी प्यायली.

    मग निमूट हे ते करून दमलेली ती खुर्चीवर बसली. भणाणत्या पंख्याचं वारं यायला लागलं म्हणून तिथून उठून दुस-या मग तिस-या मग चौथ्या. वारं कमी येणारी खुर्ची मिळेपर्यंत ती खुर्च्या बदलत राहिली. एका खुर्चीत स्थिर झाल्यावर तिच्या लक्षात आलं, द्वारपाल तिच्याकडे संशयाने बघतायत. कदाचित ते संशयाने बघत नसतीलही पण मध्यमवर्गीय माणसाच्या मनात संशय, भीती, न्यूनगंड असतोच. त्यामुळे तिला तसं वाटत असेल.
    मध्यमवर्गीय माणसाला दुस-याचा संशय दूर करण्याचीसुद्धा तातडी असते. त्यामुळे पाच-दहा मिनिटांनी ती उठली. त्या द्वारपालांजवळ गेली आणि फ्लाईट किती लेट आहे ही तिला माहीत असलेलीच गोष्ट विचारली आणि आपला हेतू शुद्ध असल्याचं जाहीर केलं. द्वारपालांनी तिला आवश्यक ती माहिती दिली. दुस-या फ्लाईटस्‌ किती लेट आहेत ही तिला अनावश्यक अशी माहितीपण दिली.

    ती पुन्हा स्टॉलवर गेली. एखादं चॉकलेट घेतलं तर चघळण्यात वेळ जाईल म्हणून ते घ्यायला गेली. कोणतं घ्यावं? चॉकोलेटस्‌ची माहिती नव्हती. सर्वात छोटं असेल ते द्या असं सांगितल्यावर पुढ्यात आलं ते चॉकलेट स्वीकारलं. त्याचा तुकडा तोंडात टाकल्यावर तिचा चेहरा तोंडात मारल्यासारखा झाला. ती पुन्हा स्टॉलवर जाऊन म्हणाली, ‘‘हे कसलं चॉकलेट दिलं तुम्ही. खराब आहे.’’

    तो शहाणा म्हणाला, ‘‘इसका स्मेल ऐसा ही आता है’’
    ती मनात म्हणाली, ‘‘ऐसाही आता है, पहले नहीं बता सकता था? पंचाहत्तर रू. चा बटाटेवडा पूर्ण टेस्टलेस असणार. तरी आपण काही नाही बोलणार.
    ती ते चॉकलेट परत घेऊन निघाली तेव्हा तिला असं वाटत होतं कुठल्याही केबिनमध्ये घुसावं आणि असल्या पदार्थांच्या स्टॉलबद्दल व्यवस्थापनाला झापावं.
    पण तिने तसं काही केलं नाही.

    रस्त्यात कार्टूनिस्टने एक टेबल टाकलं होतं. स्टॉलकडच्या तिच्या प्रत्येक फेरीत तो तिला डोळ्यांनी ‘कार्टून काढून घ्या’ असं खुणावत होता. दर पन्नास रू. लिहिलेला होता. स्वतःचं कार्टून पाहण्याचा धीर काही तिला होत नव्हता. त्यामुळे ती ‘नाही, नाही’ अशी मान हलवत पुढे जात राहिली.
    अखेर एकदाचा नवरा आला. दुरूनच तिने त्याची मूर्ती ओळखली. बाहेर आल्यावर तिच्याकडे बघून म्हणाला, ‘चांगलाय ड्रेस!’

    आहा ! सार्थक झालं. 
    ते बाहेर आले. त्याच्या हातातलं सामान घेऊन ड्रायव्हर गाडीकडे गेला. तेवढ्यात तिने नव-याला पाय दाखवले. ‘बघ, किती छान झालेत.’
    नवरा तिने आणलेला कोट अंगावर चढवत फक्त ‘हं’ म्हणाला. ‘‘तुम्हारे पैर बहोत सुंदर है, इन्हें जमीनपर मत रखना’’ अशासारखं काहीच नाही. 

    गाडीत बसल्यावर त्याने त्याची हालहवाल सांगायला सुरुवात केली.
    पार्टीच्या ठिकाणी ते पोचले. लोकांनी त्यांचं स्वागत केलं. एका प्रशस्त दालनात टेबल्स मांडलेली होती. त्यावर अनेक शीतपेये आणि उष्णपेये मांडलेली होती. त्या दालनात सगळे आल्यावर लोक टेबलकडे धावले. जो तो आपापले पेय घेऊन खुर्चीवर बसला. ती उष्ण पेये घेत नव्हती. आणि थंडीमुळे शीत पेये नको वाटत होती. तिने काहीच घेतलं नाही. खुर्चीवर इतर बायकांशेजारी जाऊन बसली. त्यांनी औपचारिक विचारपूस केली, नाव, रहायला कुठे, मुलंबाळं, मिस्टर काय करतात? तिनेपण औपचारिक विचारपूस केली.
    आता आणखी काय बोलावं हा प्रश्न उद्भवण्याच्या आत कोप-यात ठेवलेल्या सिंथेसायझरपाशी एक मनुष्य उगवला. आयोजकांनी त्याचे नाव सांगून हा सर्वांच्या मनोरंजनाची काळजी घेईल असे जाहीर केले. एकमेकांशी काय बोलायचं हा सर्वांचाच प्रश्न सोडविण्यासाठी तो उपस्थित होता.

    त्याने माईक हातात घेतला आणि पाळण्याशेजारी उभं राहून लाडं लाडं बोलावं तसं बोलायला लागला. ‘‘नाऊ वी आर गोईंग टु प्ले व्हेऽऽरी व्हेऽऽरी इंटरेस्टिंग गेम्स.’’

    तिच्या पोटात खड्डा पडला. गेम्स ! नव-याने तिच्याकडे पाहिलं. ‘जिसका डर था, वही हुआ’ या नजरेने.
    एन्टरटेनरने सुरुवात केली, ‘लेडीज अँड जन्टलमेन, पहिले ज्यांच्या उंचीत फार मोठं अंतर आहे अशा कपल्सनी इकडे या. अमिताभ और जया इधर जाइए।’’
    अशी पाच जोडपी निघाली. मोठ्या उत्साहाने ती त्याच्यासमोर उभी राहिली. मग त्याने एका स्त्रीला विनंती केली की तिने त्यांचं नीट निरीक्षण करून सर्वात जास्त फरक कोणात आहे ते ओळखावं. तिने त्या प्रदर्शनात मांडलेल्या व्यक्तींच्या चहुबाजूंनी न्याहाळून मग एका जोडप्याला निवडलं. लगेच नाव अनाऊन्स करण्यात आलं. टाळ्यांचा गजर.
    दुसरा गेम. ‘लेडीज, ध्यान इधर दीजिए । आपकी पर्सेस इधर लाइए । सबसे ज्यादा अॅक्सेसरीज्‌ जिसके पर्स में हो वो विनर ।’’
    पाच - सहा बायका धावल्या, ती जागची हलली नाही. कारण तिच्या छोट्याशा पर्समध्ये चष्मा, मोबाईल, मिनीपर्स, डायरी, पेन अशा पाचच वस्तू होत्या.

    ‘‘ओ हो हो ! क्या क्या है : देखिए, टॅब्लेटस्‌, चॉकोलेटस्‌, क्रीम, लिपस्टिक, मनीपर्स, मोबाईल, ड्रायव्हिंग लायसेन्स, घर की चाबीयॉं, गॉगल्स, हँकी, परफ्यूम, बिंदी, वेट नॅपकीन्स, डायरी, निकल ही रहा है कुछ ना कुछ । हाऊ मेनी आऽ दे? नाइन्टीन ? वाउ ! यू आऽ द विनर. गिव्ह हर अ बिग हँड’’ सगळ्यांनी त्या स्त्रीच्या थोरपणाबद्दल टाळ्या वाजवल्या.

    ‘‘अब देखिए’’ एन्टरटेनरची बडबड थांबत नव्हती. ‘‘सब जेन्टस्‌, जिनकी मुछें हो, वे इधर आइए’’ मिशाधारी पुरुषांचा एक गठ्ठा एकेठिकाणी जमला. ‘‘एक देवीजी इधर आइए प्लीज । यहॉं, इन लोगोंके ठीक समाने दूरीपर आप खडी हो जाइये ।
    पंधरा पुरुष एकीकडे उभे. समोर एक बुटकीशी स्त्री आता हा काय करायला लावणार असे चेहरे.
    ‘‘अब देखिए, एकेक जन्टलमन सीधा चलता लेडी के पास जायेगा अँड देन, सीधा लौट आयेगा । जब वह लेडी के पास आयेगा...’’

    ऐकताना तिला फस्‌कन हसू आलं, ‘‘जब वह लेडी के पास आयेगा, लेडी हरेक को एकेक थोबाडीत देगी’ असलं काहीतरी सुचून.
    ‘जब वह लेडी के पास आयेगा, देवीजी, आप हरेक को देखेगी, आपको इनमें से उसे चुनना है जो, हॅविंग सेक्सीएट मुश्ताश, ओके?’’
    लेडीने मान डोलावली.

    एकेक पुरुष जात असताना ती कुतूहलाने त्याच्या मिशा निरखू लागली. कुणाच्या दोन्ही बाजूंनी खाली झुकलेल्या, मोठमोठ्या, कुणाच्या वरच्या बाजूला वळलेल्या झुबकेदार, कुणाच्या अगदी आखूड, कुणाच्या तलवारकट, कुणाची नुस्ती बारीक रेघ.
    एक पुरुष सेक्सी मिशांचा म्हणून निवडला गेला.

    पुन्हा एन्टरटेनमेंट सुरू. हा माणूस थांबत का नाही? ‘‘अब सब कपल्स इधर आइए । अब सब साथ साथ डान्स करेंगे । हम यहॉं म्युझिक बजायेंगे आप नाचेंगे! और और और... म्युझिक जब रूक जायेगा, तब....?’’ रहस्यमय पॉज घेऊन, ‘‘तब जो आपका बतला जायेगा वो करना है’’
    म्युझिक सुरू झालं. सगळे नाचायला लागले. एक म्हातारा म्हातारी विशेष उत्साहाने एकमेकांच्या कमरेभोवती हात टाकून नाचत होते. 

    ती नुस्तीच जागीच पावलं आपटत उभी कारण नवरा नाचत नव्हता. त्याला असले खेळ आवडत नाहीत हेही तिला ठाऊक होतं. यातलं काहीच त्याला आवडण्यासारखं नव्हतं.
    तो सरळ लोकांकडे दुर्लक्ष करून त्याच्यासारख्याच एकाशी गप्पा मारत बसला. 
    इकडे एन्टरटेनरने मध्येच म्युझिक थांबवलं आणि ओरडला, ‘‘टच युअऽ पार्टनर्स एल्बो.’’
    लोकांनी घाईने कोपरांना कोपरं टेकवली. पुन्हा म्युझिक.
    ‘‘नाऊ शोल्डर टु शोल्डर’’
    ...‘‘नाऊ बॅक टु बॅक’’
    ...‘‘नोज टु नोज’’
    ...‘‘चीक टु चीक’’
    ...‘‘नी टू नी’’
    त्या प्रत्येक हास्यास्पद आज्ञेला प्रौढ, वयस्कर जोडपी आनंदाने प्रतिसाद देत होती. उत्साहानं नाचणारं म्हातारं जोडपं तर हार मानायला तयार नव्हतं.

    त्यांच्याकडे पाहताना तिला वाटलं, आपल्या मनात किती कुंपणं. आपण चारचौघात असं नव-याच्यासुद्धा गालाला गाल लावायला जाणार नाही. चारचौघात मरू दे, दोघंच असतानापण नाही.
    शेवटचा गेम अनाउन्स केला गेला. हातात फुगे नाचवत तो ओरडायला लागला, ‘‘अब इस बलूनको दोनो के पीठ के बीच पकडकर नाचना है इसे गिरने नही देना’’
    हे तर सर्वात हास्यास्पद दृश्य. जोडपी पाठीला पाठ लावून, मध्ये फुगा ठेवून, फुगा फुटू न देता, पडू न देता नाचत होती.

    यापेक्षा आणखी काही हास्यास्पद प्रकार आता निघू नये ही तिची प्रार्थना सफल झाली. एन्टरटेनर स्वतःच दमला. त्याने बडबडही थांबवली आणि गेम्सही.
    तत्पूर्वी त्याने सर्व पुरुषांना एक मर्मभेदी सवाल टाकला. ‘‘ऐसे कोन कौन जन्टलमेन हैं यहॉं, जिनके पॉकेट में पत्नी का फोटोग्राफ हो?’’
    दोन महाभाग निघाले.

    त्यातल्या एकाची बायको उपस्थित नव्हती. दुस-याच्या पाकिटातला फोटो पाहून एन्टरटेनरने त्याच्या पत्नीला जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली. ती पुढे आल्यावर म्हणाला, ‘‘आय जस्ट वॉन टू चेक वेदर धिस फोटोग्राफ इज हिज वाईफ्स ऑर एनीबडी एल्सस्‌ हॅ हॅ हॅ.’’
    मग सगळ्यांनी हॅ हॅ हॅ केलं.
    तिनेही, त्यानेही हॅ हॅ हॅ केलं.
    लोकांनी एकमेकांकडे बघून त्याच्या विनोदाला दाद दिली आणि मग त्या पद्धतीतल्या विनोदांची मालिकाच सुरू झाली.
    यानंतर जेवणं होऊन जेव्हा ते सगळ्यांचा निरोप घेऊन बाहेर पडले, कारमध्ये बसताक्षणी दोघांनी एकदम ‘हुश्श’ केलं.
    पार्टी किती भंकस होती यावर कॉमेंटस्‌ करायची गरज नव्हती.
    आपल्या सामूहिक करमणुकीच्या कल्पना सुमार दर्जाच्या का असतात? अनेक क्षेत्रातले मोठमोठे लोक एकत्र आले तरी करमणूक सामान्यच दर्जाची असणार असं का होतं हा प्रश्न उच्चारायची गरज नव्हती.
    दोन दिवस गाजत असलेली ‘पार्टी’ अशीच असणार हे माहीत असूनही आपण अशीच तयारी करणार, असेच जाणार हे जाणवून आतून झालेली चीडचीड व्यक्त करायची गरज नव्हती.
    आपण तीन तास एका माणसाच्या हातातलं बाहुलं का बनलो हा आत वळणारा प्रश्न पुन्हा पुन्हा डावलून टाकला जात होता. थकला भागला एन्टरटेनर त्याच्या दोन साथीदारांना घेऊन सिंथसह जाताना पाठमोरा इतका गरीब वाटला तिला की त्याच्यावरची चीड विझून गेली .

No comments:

Post a Comment