गीता संथा वर्ग सुरु होऊन पहाता पहाता ३ महिने होत आले.
मे महिन्यात १५ दिवसांची सुट्टी मिळणार होती. आणि त्यानंतर पाठांतर स्पर्धेच्या तारखा जाहीर होणार होत्या. दरवर्षी गीताधर्म मंडळ सर्वांसाठी पाठांतर स्पर्धांचे आयोजन करीत असते. गीता संथा वर्गात शिकणाऱ्यांसाठी एक अध्याय, दोन अध्याय, तीन अध्याय, आणि एक खुली पाठांतर स्पर्धा असे वेगवेगळ्या महिन्यांत पद्धतशीर नियोजन केलेले असते.
जूनमध्ये एक अध्याय पाठांतर स्पर्धा, सप्टेंबरमध्ये दोन अध्याय पाठांतर स्पर्धा, दिवाळीनंतर खुली पाठांतर स्पर्धा आणि डिसेंबरमध्ये तीन अध्याय पाठांतर असे साधारण वेळापत्रक असते. यंदा एक अध्याय पाठांतर स्पर्धेसाठी पहिलाच अध्याय असल्याने तो शिकून आणि बऱ्यापैकी पाठ करुन झाला होता. त्यामुळे बहुतेक सगळ्यांचा उत्साह आपण स्पर्धेत नक्की भाग घ्यायचा अशा रितीचा होता. जो तो उत्साहाने व नेटाने अध्यायाचे पाठांतर करु लागला.
मे महिन्याची सुट्टी संपली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात स्पर्धा असेल असे जाहीर झाले. मग काय विचारता आम्हा सगळ्यांनाच अधिक जोश आला. रोज वर्गात आल्या आल्या सगळ्या मिळून अध्याय म्हणू लागलो. दोन दिवस बाईंनी आमचे म्हणणे ऐकले आणि तिसऱ्या दिवशी सांगितले उद्यापासून एकेकीने म्हणून दाखवायचा आहे. स्पर्धा वैयक्तिक आहे. सांघिक नाही. तेव्हा सरावही तसाच करु.
दुसरा दिवस उजाडला. वर्ग नेहमीप्रमाणे झाला. आणि आमची सरावाची पहिली फेरी सुरु झाली. सुरुवात कोण करणार इथपासून गडबड सुरु झाली. एकमेकी तू म्हण आधी, तू म्हण आधी असे करु लागल्या. बरोबरच आहे न. आत्तापर्यंत कधीही असे स्वतंत्रपणे काहीही न केलेल्यांची अवस्था अशीच होणार. सगळ्याच जणी काही अशा होत्या असे नाही. नोकरी, व्यवसाय केलेल्याही काही होत्या पण त्यांचे ते क्षेत्र आणि ही स्पर्धा यात फरक होता. मग बाईंनी युक्ती केली. सगळा अध्याय नका म्हणू एकदम. प्रत्येकीने दोन दोन श्लोक म्हणा असे सांगितल्यावर थोडे दडपण कमी झाल्याचे दिसले.
सुरुवात झाली तेव्हा कळू लागले. आपला आवाज कापतो. उच्चार पूर्ण जसे आहेत तसे स्पष्ट येत नाहीत. आधी जिने म्हटले त्याच्या पुढचा श्लोक क्रमाने आठवत नाही. चाल चुकते कधी तर कधी लय साधत नाही. अनुनासिकांच्या उच्चारांची वेगळीच तऱ्हा. कोणाचे काही न कोणाचे काही अशी अवस्था झाली. पण एक या सगळ्या वर्गात चांगले असते की शिक्षिका या कधीही रागावत नाही किंवा हे काय तुम्हाला येत कसे नाही असा अविर्भावही उमटू देत नाही. सगळ्यांना धीर देतात आणि तुम्हाला नक्की येईल अशा पद्धतीने विश्वास देत राहतात. अशा पद्धतीने चार एक दिवस आमचा सराव सुरु राहिला. आता उद्या ज्यांना स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी नावे द्या असे सांगितले तेव्हा अनेकींनी उद्या सांगतो बाई असे सांगून तो दिवस ढकलला.
घरी बहुतेकींनी जेव्हा एकेकटीने म्हणून पाहिला असेल तेव्हा लक्षात आले की ४७ ही श्लोक म्हणायला आपल्याला अवघड आहे. एकत्रितपणे म्हणतांना आणि स्वतंत्रपणे म्हणतांना काय होते हे कळल्यामुळे आमच्या २५ पैकी दहा जणींनी आम्हाला जमणार नाही असे सांगून स्पर्धेतून काढता पायच घेतला. आता उरलो पंधराजणी. स्पर्धेचा दिवस उजाडेपर्यंत ५ जणींची हिंमत कायम राहिली. बाकी गळल्या. आम्हा पाचही जणींचा बाईंनी त्यांच्यापरीने कसून सराव करुन घेतला. आम्हीही तितक्याच नेटाने प्रयत्न केला.
स्पर्धेला गेलो तेव्हा सगळ्या वर्गांत अशीच स्थिती होत असावी हे आलेल्या स्पर्धकांच्या संख्येवरुन समजले तसे एकीमेकींच्या बोलण्यातूनही कळले. तरीदेखील साधारण पन्नाशीच्या पुढच्या आणि ८० वर्षे वयापर्यंतच्या एकूण ५५० महिला होत्या. वयाप्रमाणे एकूण ५ गट केले आणि प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाली.
कसून तयारी केली होती तरी ऐनवेळी घाम फुटणे, दम लागणे, उच्चार स्पष्ट न होणे, विस्मरण होणे असे प्रकार काहींचे झालेच. मीही त्याला अपवाद नाही. त्याचबरोबर काहींचे आपल्या पेक्षा अधिक वयोमान असले तरीही खणखणीत स्पष्ट उच्चार, चोख पाठांतर असलेल्या, धीटपणे, धीरगंभीर आवाजात म्हणणाऱ्या महिलांचाही अनुभव प्रत्ययास आला. अशांना अर्थातच प्रथम तीन क्रमांकात स्थान मिळाले. मला मात्र शुद्ध आणि स्पष्ट उच्चार या दोन जमेच्या बाजू असल्याने व पाठांतर पूर्ण झाल्यामुळे उत्तेजनार्थ या कॅटेगरीतील पारितोषिक प्राप्त झाले.
या स्पर्धेच्या निमित्ताने असे वाटून गेले की, आपले व्यक्तिगत हित म्हणून आपल्याला वार्धक्यातही उपयुक्त होईल, आयुष्य कंटाळवाणे होणार नाही व अगदी एकाजागी रहाण्याची वेळ आली तरी उपयुक्त होईल असे साधन करण्यासाठी विविध स्तोत्रांचे, गीतेसारख्या ग्रंथाचे पाठांतर असणे आवश्यक आहे. वयोमानाप्रमाणे दृष्टी कमी झाली तर वाचन शक्य होत नाही. पण पाठ असलेले स्वतःच स्वतःला म्हणता येते. आपल्याकडे लहानपणी अर्थ समजो की न समजो पण चांगल्या गोष्टी पाठ करुन घेण्याचा संस्कार तेवढ्यासाठीच केला जातो. ज्यांचे पाठांतर योग्य वयात उत्तम झालेले असते त्यांना विस्मृतीचा आजारही कमी प्रमाणात होतो असा वैद्यकीय शास्त्राचाही अनुभव आहे. आम्हाला उशीर झाला हे कळायला. पण हरकत नाही. पुढच्या पिढीसाठी तरी सूतोवाच करु या. लहान आहात तोवरच चांगल्या गोष्टींचे न समजताही पाठांतर करा.
By
Padma Dabke
Pune, India
नेहमी प्रमाणेच छान लेख. पुढील लेखाची वाट पाहायला लावणारा...
ReplyDeleteएक छान अनुभव तुम्ही खास तरुण पिढीसाठी शेअर केलाय..मी कृतिकाला नक्की वाचायला देईन..खुप छान! आवडला.😊👍👌
ReplyDelete