लहान असताना चांगल्या सवयी लगव्यात म्हणून मी आईचा खूप ओरडा खाल्ला आहे.
आता मी सुद्धा एका मुलीची आई आहे त्यामुळे तिने सुद्धा चांगल्या सवयी अंगीकराव्यात असेच मला वाटते.
पण ज्या सवयी आईने मला लावण्याचा प्रयत्न केला त्या सवयी ती स्वतः अंगी बण वल्या होत्या. माझ्याबाबतीत मात्र तसे नाही. काही चांगल्या सवयी मी नाही पाळत पण माझ्या मुलीने त्या पाळाव्यात असे मला वाटते. उदाहरण द्यायचे झाले तर सकाळी उठल्यावर दात घासणे मुक्ताला खूप कंटाळा येतो. पटकन आवरण्यासाठी मी रोज सकाळी उठल्यावर तिच्या मागे लागते. पण मी स्वतः लहान असताना खूप चेंगटपणा करत असे हे मला स्पष्टपणे आठवते. आता काय करायचे असा मला प्रश्न पडला होता.
हल्लीच्या मुलाना आपल्या बोलण्यात आणि वागण्यात जरा जरी फरक दिसला तर ते आपल्याला चांगलेच कोंडीत पकडतात याचा मला आधी अनुभव आलेला आहे. म्हणून मी काय करावे असा विचार करत असताना मला एक कल्पना सुचली.
तिने ज्या चांगल्या गोष्टी कराव्यात असे मला वाटते त्यांचे मी दहा प्रश्न तयार केलं. प्रत्येक प्रश्नाला एक गुण. याप्रमाणे तक्ता तयार करून त्या समोर घरातील सर्व मोठ्या माणसांची नवे टाकली. आमच्या घरातील मोठी माणसे म्हणजे आई (मी), बाबा, आणि मुक्तची आजी. उदाहणादाखल पहिला प्रश्न सकाळी लवकर कोण उठते ? आई आणि बाबांना या प्रश्नाला शून्य गुण. आजीला एक गुण. अशा रीतीने तिला प्रत्येकाला गुण द्यायला सांगितले. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर प्रत्येकाला मिळालेल्या गुणांची बेरीज खाली लिहिली. अर्थात कुणालाही पूर्ण दहा गुण मिळाले नाहीत.
मग मी तिला सांगितले की मला लहान असताना आई लवकर उठ म्हणून सांगायची पण मी आईचे ऐकले नाही. ऐकले असते तर मला हा अजून एक गुण मिळाला असता. पण तू अजून लहान आहेस ना. तर तू सगळ्या चांगल्या गोष्टी शिकून घेतल्यास तर एक दिवस तुला प्रत्येक प्रश्नाला एक एक गुण मिळत जाईल आणि पूर्ण दहा गुण मिळाले की तू आपल्या घरातली सगळ्यात Good Girl होशील.
आता आम्ही रोज एक एक गुण मिळवायचा प्रयत्न करणार आहोत.....
By
Sumedha Godbole Gole
किती चांगली संकल्पना. आपले चुकले ते कबूल करुन मुलाने दुरुस्त करावे यासाठीचा उत्तम मार्ग. तुझ्यासारख्या इतर पालकांसाठी अनुकरणीय.
ReplyDelete