Thursday, 21 March 2019

चैत्र

चैत्र म्हणजे काय?
चैत्र म्हणजे चैत्रगौर,
हळदीकुंकवासाठी, आईच्या वरताण, 
नटून-थटून, पुढे पुढे करून,
दमली गं बाई घरची गौर!
चैत्र म्हणजे राम-हनुमानाचा पाळणा,
सुंठवडा अन पन्हे-पचडीच्या प्रतीक्षेत,
बाळ-गोपाळांना धीर काही धरवेना!
चैत्र म्हणजे वसंताचे आगमन,
मोगरा, जाई-जुई, सायली 
अन चमेलीच्या सुगंधाने वेडावते मन,
चैत्र म्हणजे झाडाझाडांतून,
घुमणारा आतुर कोकीळकंठ,
अन आंबेडाळ आणि पन्ह्याचा,
खमंग आणि सुमधुर आस्वाद, आकंठ!
चैत्र म्हणजे निसर्गाची नयनरम्य रंगसंगती,
हिरव्या पानांतून, पिवळे जर्द सोनमोहोर, बघता बघता, अंगभर बहरती!
निष्पर्ण झाडांवर पाचूचे नवे साज चढती,
तर डेरेदार वृक्षही, हिरवी रंगछटा मिरवती,
गडद जून पाने खाली, कोवळी पालवी वरती,
नवोन्मेषाच्या चाहुलीने जणू मोहरते धरती!
कोणी म्हणेल त्यात एवढं काय?
चैत्र महिना दरवर्षी येत नाही काय?
काही झालं तरी हा हिंदू नववर्षाचा पहिला महिना!
नव्या नवलाईचं कौतुक, नसतं का सर्वांना?!

By

Akanksha Phadke

Mumbai, India

No comments:

Post a Comment