Friday, 22 March 2019

हक्काची नाती

नातीने केलेल्या केकचा फोटो कौतुकाने तिच्या आईला whatsappवर पोस्ट केला तसाच आम्हा भावंडांच्या ग्रुपवरही पोस्ट केला.  तो फोटो पहाताच सगळ्यांनी छान छान इमोजी टाकल्या.  मनिषाने, माझ्या मावस बहिणीने मेसेज केला,"परिधी....मी केक खायला येऊ का?" 

परिधीला मी सांगितलं मनिषामावशी विचारतेय तुला येऊ का केक खायला.  

कोण गं मनिषामावशी? असं परिधी म्हणाली तेव्हा मी आम्हा सर्व भावंडांचे फोटो दाखवले.  तिला एकेक भावाची आणि बहिणीची ओळख करून दिली.  

कार्तिकच्या(भाच्याच्या) मुंजीत या सगळ्यांना  बघितल्याचं तिला आठवलं.  कार्तिकचा बाबा सागर माझा मावसभाऊ आहे हे तिला सांगितल्यावर तिला खूप गम्मतच वाटली.

आज्जी, फक्त प्रदीपमामाच तेवढा तुझा भाऊ आहे ना? 

अगं, तो माझा सख्खा भाऊ आहे.  ही सगळी माझी मामे-मावस भावंडं आहेत. ही चुलत-आते भावंडं आहेत.  कझिन्स.  

केवढे कझिन्स तुला! मला एकच कझिन सिस्टर आहे.  ती पण आईच्या कझिनची मुलगी.  पण आज्जी, माझे सगळे फ्रेन्डस माझे कझिन्स आहेत कि नाही गं? त्यांच्या आया माझ्या मावश्या आहेत.  ते पण माझ्या आईला मावशी म्हणतात.  

मनात आलं, खरंच! या छोट्या मुलांना इतकी भरपूर भावडं असणं आता आणि यापुढे दुर्मिळच होत जाणार आहे.  घरटी एकच मुल किंवा मुल नाहीच अशी अवस्था असणारी ही 'सुशिक्षित, उच्चशिक्षित' पिढी त्यांच्या मुलांना हे 'कझिन्स' असण्याचं सुख देऊ शकत नाही.  पण निदान त्यांच्या मित्र-मैत्रिणींची मुलं तरी कझिन्स असणार आहेत हेही नसे थोडके.

By

Anagha Joshi

Talegaon, India

No comments:

Post a Comment