‘‘हॅलो’’
‘‘कोण बोलतंय?’’
‘‘नंदा, मी लक्ष्मणमामा बोलतोय.’’
‘‘काय म्हणताय मामा? खूप दिवसांनी आमची आठवण झाली.’’
‘‘आता काय बोलायचं नंदा! ना तुमचा वाडा राहिला, ना रामाचं मंदिर, ना तुझे
सासरे राहिले, ना रामजन्माचे उत्सव. मग तुमच्या आमच्या भेटी कुठल्या व्हायला.’’
‘‘काय मजा असायची उत्सवाची. ती चक्रीकीर्तनं, पालखीचा सोहळा, मोठमोठ्या
पंक्ती....’’
‘‘तुम्हा बायकांचा पिट्टा पडायचा पण’’
‘‘हो मग, पाच वाजता पंगत बसायची आमची, की पुन्हा संध्याकाळच्या
कीर्तनाची, आरतीची गडबड.’’
‘‘गेले ते दिवस! आता इतक्या ठिकाणी कीर्तनं करतो पण तुमच्या काशीकर
राममंदिरासारखी मजा नाही कुठे. बरं ते जाऊ दे नंदा. मी तुला आज यासाठी फोन
केला होता आपले राम - लक्ष्मण, सीतामाई तुम्ही भटबुवांना दिलेत का?’’
‘‘छेऽ छेऽ काहीतरीच काय, रंगाभाऊजींकडे आहेत ते सध्या’’
‘‘नंदा,’’ लक्ष्मणमामाचा आवाज गंभीर झाला.
‘‘आपले राम भटबुवांच्या मंदिरात पाहिले मी.’’
‘‘अहो, काय सांगताय काय मामा? तिथे कसे जातील?’’
‘‘नंदा, तुझ्या सासूने मला भाऊ मानलं होतं. तुझे सासरे - आमचे मेव्हणे -
नावाजलेले कीर्तनकार : त्यांच्या घरी राहून कीर्तन शिकलो मी त्यांच्याकडून. माझ्या
लहानपणापासून या मूर्ती पाहतोय मी. सत्तरी आली आता माझी. साठेक वर्ष जी मूर्ती
मी रोज पाहतो, ती मला ओळखता येणार नाही? भटबुवांच्या देवळात कीर्तनं चालू
आहेत माझी. आज पहिला दिवस. त्यांच्या देवापुढे डोकं ठेवायला गेलो. त्यांच्या
विठोबा - रखुमाई शेजारी आपले राम उभे. अलीकडे लक्ष्मण पलीकडे सीतामाई. थक्क
उभा राहून निरखत राहिलो. बुवांना काही बोललो नाही. पण मन लागेना म्हणून तुला
फोन लावला.
नंदा थक्क झाली होती. ‘‘मामा, आता तुम्ही सांगताय तर खरंच असणार. पण
कशा काय गेल्या असतील मूर्ती तिथे. काही कळेना बाई.’’
‘‘वाडा पाडला तेव्हा मूर्ती कोणाकडे होत्या?’’
‘‘सुमित्रावहिनीकडे होत्या म्हणजे आमच्या थोरल्या जाऊबाईंकडे. त्या पूजाबिजा
करायच्या.’’
‘‘मग, रंगाकडे कधी गेल्या, कशा गेल्या?’’
‘‘अहो, वर्ष झालं असेल. रंगाभावजी आले एक दिवस आणि म्हणायला लागले,
रामाच्या जवळ होतो तोपर्यंत माझं बरं चाललं होतं. वाडा पाडला, मूर्ती गेल्या आणि
माझ्यामागे पीडा सुरू झाली. तुम्ही मूर्ती मला द्या. मी नीट सांभाळीन.’’
‘‘आणि तुम्ही दिल्या?’’
‘‘मग? असं म्हटल्यावर नाही कसं म्हणणार?’’
‘‘काही कळेना मला. राम तिथे कसे गेले? तू जरा चौकशी कर रंग्याकडे फोन
करून.’’
‘‘बरं बरं करते’’ नंदाने फोन खाली ठेवला.
रंगाकडे कसा फोन करावा? विचित्र माणूस. काय उत्तर देईल, कसा वागेल, नेम
नाही. राम आणि वाड्याच्या आठवणीत तिची रात्र गेली.
सासरे गेले. उत्सव, सण, सोहळे, यांचं मोठ्ठं पर्व संपलं. ती मोठमोठी पातेली,
भात ठेवलेल्या डेगी, स्वयंपाक करणाऱ्या मंगलाबाईंचं मिश्र भाज्यांचं लोणचं.
स्वयंपाकघरात कोप-यात हात धुण्यासाठी मोरी होती. दोन्ही बाजूंना कट्टे होते.
ब-यापैकी मोठी असल्याने पुरुष मंडळी तिथे अंघोळीही करत.
महाप्रचंड स्वयंपाकाच्या उष्णतेने काहिली झालेल्या मंगलाबाई मोरीच्या
कट्ट्यावर शेषशायी भगवान व्हायच्या. हाताची उशी करून ओट्यावर आरामात
झोपायच्या ‘‘गार वाटतं’’ म्हणत. एका बाजूला पडल्या तर मोरी; दुस-या बाजूला
पडल्या तर मोठमोठी आमटीची वगैरे पातेली. मंगलाबाई इकडे किंवा तिकडे कधीतरी
पडतील अशी प्रत्येक वर्षी प्रत्येक पिढीच्या लहान मुलांनी वाट पाहिली. पण हुशारीने
झोपणा-या मंगलाबाई कधीही पडल्या नाहीत. मोरी पडली, वाडा पडला, मंगलाबाई
पडल्या नाहीत.
काशीकर बुवांचे सर्वात मोठे चिरंजीव ‘पुंडलीकबुवा’ शिकले नाहीत. किरकोळ
आजारपणाचं निमित्त करून घरीच राहिले. दुसरं काही केलं नाही. देव देव करत
बसायचे. सकाळी सगळं आवरायला त्यांना दोन - तीन तास लागायचे. विशेषतः
शौचविधी. सगळ्या वाड्यातल्या पन्नास-साठ माणसांसाठी दोनच संडास होते. सकाळी
वाड्याच्या कुठल्याही खिडकीतनं पाहिलं की, जिन्यावर नंबर लावून बसलेली मंडळी
दिसायची. तो एक महत्त्वपूर्ण अड्डा होता. इथे नवीन विचारांची देवघेव व्हायची,
प्रेमप्रकरणे जमायची, तुटायची. ‘आत’ गेलेल्या मंडळींबद्दल चर्चा व्हायची, त्यांच्या
आतील कार्याची चिकित्सा व्हायची.
बंडूकाका नंबरच्या जिन्यावर बसून जोक सांगण्याबद्दल प्रसिद्ध होते.
कित्येकदा ज्याचा नंबर आला असेल, त्याला पकडून ते जोक ऐकवत असतील तर तो
आत गेला तरी ते बाहेर एकटेच बसून ऐकवायचे.
संपूर्ण वाड्यात कुणाला किती वेळ लागतो याबद्दलचं गणित सर्वांना पाठ होतं.
अमूक ना, गेला की एक मिनिटात पाण्याचा आवाज येईल पण तमूक गेला असेल ना,
तुम्ही आरामात एक झोप काढून या किंवा बाहेर जाऊन भाजी घेऊन या.’’ पुंडलीकबुवा
तमूकपैकी होते म्हणजे पाऊण तास वाल्यांपैकी.
दुपारी मंडपात कुणी नसलं किंवा मध्यरात्री कुणी पाणी प्यायला उठलं की
पुंडलीकबोवा रामाच्या गाभा-यात जाणा-या दारापाशी उभं राहून रामाशी बोलताना
दिसायचे. तासन्तास बोलत असायचे. मुलांच्या दृष्टीने चेष्टेचा विषय. ती गाभा-
याच्या मागे लपून ऐकायची. कळायचं काहीच नाही. ‘‘तुम्ही आम्हाला कबूल केलं
होतंत पण शब्द पाळला नाहीत’’ वगैरे कस्मे -वादे चालू असायचे रामाशी.
राम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्ती अत्यंत आकर्षक. त्यांना चढवले जाणारे सुंदर
कपडे आणि दागिने मुलं पाहत राहायची. शेजारी एक पाय दुमडलेला नमस्कार
मुद्रेतला हनुमान. आसपासच्या सगळ्या परिसरात या मूर्ती प्रसिद्ध होत्या. काशीकर
बोवांचा रामनवमी उत्सव प्रसिद्ध होता. कीर्तनं अशी रंगायची. दुरून दुरून कीर्तनकार
यायचे.
मंडपात सगळ्यांच्या पथा-या टाकलेल्या असायच्या. रात्री कफनी, फेटा वगैरे
घातलेली, भव्यदिव्य वाटणारी कीर्तनकार मंडळी सकाळी ‘नंबर’ ला दिसली की गंमत
वाटायची. सुंदरबुवा गाण्यासाठी प्रसिद्ध. त्यांनी ‘सा’ लावला की सगळी लहान मुलं
घड्याळात पाहत राहायची, कधी ‘सा’ संपेल याची वाट पाहात.
चक्रीकीर्तनात मध्यरात्री चहा, कॉफीचे कप फिरवायला लागले, की मोठी
माणसंसुद्धा लहान मुलांसारखी तोंड उघडं टाकून लाळ गाळत अस्ताव्यस्त झोपलेली
दिसयाची...
असा तो वाडा, असे ते उत्सव आणि अशा त्या मूर्ती. वाडा पडला, मंदिर गेलं,
भाऊ वेगवेगळे झाले, एकेक करत वारलेसुद्धा. फक्त रंगा उरला. मूर्ती तात्पुरत्या
सुमित्राबाईकडे आल्या होत्या पण ‘रंगा’ आपल्या नशिबाच्या संबंध रामाच्या मूर्तीशी
जोडून त्या घेऊन गेल्यापासून मूर्तीबद्दल काहीच कळलं नव्हतं.
रंगा विक्षिप्त होताच. मागे नवा फ्रीज आणला म्हणून नंदा, सुमित्रा पाहायला
गेल्या. ‘हा काय!’’ म्हणून दाखवला. नंदाने फ्रीजचं दार उघडलं ती थक्क झाली. फ्रीज
लावलेला नव्हता. त्याच्या एका कप्प्यात कपड्याच्या घड्या ठेवलेल्या होत्या. एका
कप्प्यात मुलांची पुस्तकं, साईडच्या कप्प्यात सुई, दोरा, बटनं, पावडर, कंगवे वगैरे.
नंदाला बोलायचं सुचेना. ती फक्त आतल्या दिशेने बोट दाखवून प्रश्नार्थक खुणा करत
राहिली. तेव्हा रंगा निर्विकारपणे म्हणाला, ‘‘आम्हाला कोणाला फ्रीज मधलं काही
आवडेना म्हणून त्याचं कपाट करून टाकलं.”
अशा रंगाने मूर्तीचं काय केलं असेल? जो फ्रीजची ही अवस्था करतो, तो
मूर्तीची पण अनाकलनीय स्थिती करू शकेल. विचारावं कसं न कुणाला?
असाच आठवडा गेला. एकदा संध्याकाळी ती कोप-यावर भाजी आणायला गेली.
तिथं चिखल्यांचं राममंदिर होतं. चिखले गृहस्थ तिला ओळखत होता. तीही त्याला
ओळखत होती. तिला पाहून तो मंदिरातनं बाहेर आला. आता हा पीळ मारणार हे
ओळखून ती त्याला पाह्यलंच नाही असं दाखवायला लागली. पण चिखले आलाच.
‘‘अहो वैनी, काशीकर वैनी’’ करत.
‘‘काय हो?’’ ती नाईलाजाने वळली.
‘‘अहो वैनी, ते भटबुवा तुमच्या रामाच्या मूर्ती विकताहेत.”
‘‘काऽऽय?’’ लक्ष्मणमामांच्या बातमीचा शहानिशा झाला.
‘‘होऽ वैनी.’’
‘‘तुम्हाला कसं कळलं?’’
‘‘अहो, माझ्याच मागे लागलेत ना तुम्ही मूर्ती घ्या म्हणून, मी म्हटलं अहो
माझंच रामाचं मंदिर आहे. तिथं मूर्ती आहेत. मी आणखी तुमच्या मूर्ती घेऊन काय
करू? तर म्हणतात कसे, तुमच्या मूर्तीपेक्षा काशीकरांच्या छान आहेत. तुम्ही तुमच्या
राम - लक्ष्मणांना भरत शत्रुघ्न करा आणि त्या मूर्ती राम - लक्ष्मण म्हणून ठेवा.’’
प्रसंगाचं गांभीर्य लक्षात येऊनही नंदाला हा प्रस्ताव ऐकून हसू यायला लागलं.
‘‘अहो, हसताय काय वहिनी, मी खरंच सांगतोय तुम्हीच विचार करा. राम,
लक्ष्मण, भरत शत्रुघ्न अशा चौघाचौघांचं कुठं देऊळ असतं काय? आणि शीतामाईचं
काय? आमची पण आहे, त्यांची पण आहे. दोन दोन शीतामाया’’
‘‘एकीला उर्मिला करायची’’ राम - लक्ष्मण, भरत - शत्रुघ्न, सीता - उर्मिला
आणि हनुमान एवढ्या सगळ्यांची गर्दी असलेला गाभारा कसा दिसेल. या कल्पनेने
नंदाला आता मात्र हसू आवरेना. चिखलेबुवा विचित्र चेहरा करून तिच्याकडे पाहात
राहिले.
हसण्यानं डोळ्यात आलेलं पाणी पुसत ती कसंबसं म्हणाली, ‘‘मी बघते हं काय
करायचं ते’’ दुस-या दिवशी तिने फोन करून नणंदेला बोलावून घेतलं, मोठेपणानं तीच
रंगाला जाब विचारू शकेल म्हणून.
नणंद आल्यावर तिला सगळी हकीगत सांगून म्हणाली, ‘‘सुधाताई, मला
कळतच नाहीये की मूर्ती भटबुवांकडे कशा पोहोचल्या?’’
सुधाताई म्हणाल्या, ‘‘अगं, हा रंग्या काय साधाय का? मध्ये एकदा दोघे
नवराबायको मूर्ती रिक्षात घालून भांडत भांडत माझ्याकडे आले.’’
‘‘म्हणजे कसे?” नंदाच्या डोळ्यासमोर दृश्य उभं राहिलं; रिक्षात एका बाजूला
रंगा एका बाजूला सुशीलावैनी बसलेल्या, दोघांच्या मध्ये तिन्ही मूर्ती उभ्या आणि हे
भांडतायत रामाच्या आडून.
‘‘रंगाचं म्हणणं, रामानं माझं वाटोळ केलं. त्याला घरी आणल्यावर माझ्यामागे
फारच पीडा सुरू झाल्या.’’
‘‘मग वैनीचं म्हणणं वेगळं होतं का?’’
‘‘नाही सुशीचं पण म्हणणं तेच होतं.’’
‘‘मग भांडत कशासाठी होते?’’
‘‘भांडणं वेगळ्या कारणासाठी झाली होती. पण भांडणं राम आणल्यामुळे होतात
हा निष्कर्ष होता. म्हणून रामाला रिक्षात घालून माझ्याकडे आणलं. उघडे बोडके, कपडे
नाही, दागिने नाही, मुकुट नाही, काऽही नाही. बसले आपले बिचारे माझ्या घराच्या
एका कोप-यात. दुस-या दिवशी मीच त्यांना कपडे आणले.’’
‘‘अगबाई! असं झालं होय! पण मग तुमच्याकडून मूर्ती गेल्या कशा?’’
‘‘अग, हाच परत एकदा आला. चुकलं माझं. घेऊन जातो मी त्यांना परत,
म्हणाला, इंदोरला एका मंदिराचं काम चाललं होतं. त्या लोकांना चांगल्या पूजेत
असणा-या मूर्ती हव्या होत्या. म्हणून मी त्या वेळेस विचारलं त्याला. पण ‘नाही’
म्हणाला. दोन - तीन ठिकाणाच्या लोकांनी विचारलं होतं मूर्तीबद्दल. पण हा ‘नाही’
च म्हणाला. आणि घेऊन गेला माझ्याकडून.
अजूनही उलगडा होत नव्हता. मूर्ती भटांकडे गेल्या कशा? शिवाय अजून
विठ्ठल रखुमाईच्या वेगळ्या मूर्ती होत्या. हनुमान होता, त्यांचं काय झालं? सुधाताई
म्हणाल्या, ‘‘अग, त्यात काय एवढं अवघड आहे! पुन्हा काहीतरी कटकट झाली असेल
आणि आता मी रागावेन म्हणून तो गुपचुप भटांकडे मूर्ती ठेवून आला असणार.
भटांना सांगितलं असेल विकून टाका.’’
काही दिवसांनी त्यांना बातमी कळली, की राम पुन्हा घरी गेले. त्यांचा वनवास
संपला. म्हणून एकदा हिय्या करून नंदा आणि सुधाताई रिक्षा करून रंगाकडे गेल्या.
वाडा पाडून बांधलेली फ्लॅट सिस्टिम. इतकी अजागळ बांधली होती की ती
पाहून नंदा आणि सुधाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. इथे वाड्याचा भव्य दरवाजा होता
त्याला अडसर काढला की तो मंडपात सरकावला जायचा. लहान मुलं त्यावर
खेळायची. मंडप म्हणजे वर छत आणि चारी बाजूंना गज लावून बंद केलेला एक
प्रशस्त हॉल. त्यातच देऊळ. इथेच रामासमोर कीर्तनं व्हायची. दरवाजापासून मंडपाला
समांतर असा आत जाणारा बोळ. त्यात सायकली ठेवल्या जायच्या. तिथं बसायलाही
लांबलचक कट्टा होता. मंडप भरला की मंडळी तिथं कीर्तन ऐकायला बसायची.
मंडपाच्या मागे अंधा-या खोल्या, तळघर, तळघरात उत्सावासाठी लागणारी
मोठमोठी भांडी, लहान मुलांना धाक दाखवायचं ठिकाण. बोळ संपला की अंगण.
अंगणात एक बंद आड. सर्व बाजूंनी जिने. वर चौथ्या मजल्यापर्यंत खोल्या. अंगण ही
मोठमोठ्याने हाका मारायची व खालून वर, वरून खाली अशा सार्वजनिक गप्पा
मारायची जागा.
काहीही आर्किटेक्चर नसलेला पण चैतन्याने सळसळणारा वाडा. दंतकथांनी
आणि उत्सवांनी गजबजलेला आणि आता या वाड्याची एक ओंगळ, अंधारी इमारत
झाली होती.
त्या दोघी जिने चढून वर गेल्या. रंगाचं घर पाहिलं. चहा आला. चहा
घेतल्यावर सवयीने कपबशा आत ठेवायला नंदा स्वयंपाकघरात गेली. सिंकमध्ये
तेलाचा डबा, तिखटमिठाचं पाळं, चहासारखेचे डबे ओळीने लावलेले. नंदा दचकलीच. हा
काय प्रकार? तिने प्रश्नार्थक चेहरा करून, तिच्या मागोमाग आलेल्या सुशीलाबाईंकडे
पाहिलं. ओशाळल्या चेह-याने त्यांनी खुलासा केला, “अगं, बिल्डरने इथं नुसतं सिंक
केलंय. खाली पाईपलाईनच नाही. त्यामुळे आम्ही याचा कोनाड्यासारखा वापर करतो
आणि बाथरूममध्ये कपबशा बिसळतो.’’
नंदाला फ्रीजचा कपाटासारखा वापर आठवला, तेव्हा हे योग्यच असं म्हणून ती
कपबशा ओट्यावर ठेवून बाहेर निघून आली. राम कुठे दिसत नव्हते. तिच्या मनात
एक भयंकर शंका आली. प्रत्येक गोष्टीचा वेगळ्याच कुठल्या तरी उद्देशाने वापर
करणारे हे लोक! हे राम, सीता, लक्ष्मण वगैरे मूर्तींचा कपडे वाळत टाकण्यासाठी
नसतील ना उपयोग करत! अत्यंत धास्तावल्या मनाने ती घरभर फिरली सुदैवाने
तसलं दृश्य कुठे दिसलं नाही.
राम कुठे दिसेनात. परत कुणाकडे ठेवून आले की काय? वाईट घडलं, राम
घराबाहेर. चांगलं घडलं, राम आत.
तेवढ्यात सुधावैनींनी विचारलंच,
‘‘सुशीला, अग, राम कुठायत?’’
‘‘राम ना, गच्चीवर आहेत.’’
‘‘गच्चीवर?’’
‘‘हो. घराच जागाच नाही ना कुठे?’’
त्या गच्चीवर गेल्या. एका कोप-यात एक टेबल उलटे, आकाशाकडे पाय करून
पडलं होतं. त्याच्या आत बिचारे राम, सीता, लक्ष्मण उभे होते. पांढ-याशुभ्र संगमरवरी
मूर्ती उन्हाने काळ्या पडायल्या लागल्या होत्या. तरीही तशाच हसतमुख. नंदाच्या
मनात आलं, राम खरेखुरे असते तर एक बाण रंगावर नक्कीच सोडला असता.
दुस-या उताण्या टेबलात विठ्ठलराव आणि हनुमान अशी जोडी. हनुमान आता
विठ्ठलापुढे नम्र झालेला होता. ‘‘आणि रुक्मिणी कुठाय ? रखमाई’’
सुधाताईने विचारलं तेव्हा सुशीला म्हणाली, ‘‘रखमाई भंगली. लक्ष्मणाचा भाता
लागला तिच्या पाठीला.’’
हे भलतंच विनोदी. लक्ष्मण भाता तिरका करून रखमाईला मारायला का गेला?
त्याचा भाता आता तर वरच्या दिशेने. नंदा आणि सुधाताईंनी एकमेकींकडे पाहिलं.
सुशीलेच्या अबसर्ड सांगण्यानुसार चित्र डोळ्यासमोर आणण्याचा दोघी प्रयत्न करत
होत्या. पण लक्ष्मणाचा भाता रखमाईच्या पाठीला का आणि कसा लागला असावा
याचा काहीच अंदाज करता येईना.
सुधाताईंचं बालपण आणि तारुण्य ज्या गोष्टीच्या सहवासात गेलं होतं, ज्या
गोष्टी आपल्या जागेवर असल्यामुळे सगळं जग नीट चाललंय असं त्यांना वाटत होतं.
त्या गोष्टी अशा दयनीय होऊन उताण्या टेबलाखाली पडल्या होत्या. त्यांची छत्रं
चामरं, पालखी सगळं धूळ खात तिथेच पडलं होतं. चांदीची महिरप फक्त गायब होती.
तिच्याबद्दल विचारण्याची आवश्यकता नव्हती.
सुधाताईंचा आता घरावर काही अधिकार राहिला नव्हता. नंदा, सुमित्रा
वहिनींना तरी कोण विचारणार होतं.
दोघी निमूट खाली आल्या. रामाचा वनवास अजून संपला नव्हता. काही
दिवसांनतर एका नातेवाईकाच्या लग्नात त्या सगळ्यांची पुन्हा गाठभेट झाली. तिथं
रंगा आणि सुधाताईचं जोरात भांडण झालं. तशी लग्नं ही भांडणाचे अड्डेच असतात
म्हणा! अनेक दिवसांनी भेटलेल्या नातेवाईकांच्या उखाळ्या पाखाळ्या, रुसवे, फुगवे
आणि भांडणं.
सुधाताई प्रचंड संतापल्या होत्या. संतापाने त्यांना रडू फुटलं होतं, ‘‘तू आम्हाला
त्यांचे दर्शनही होऊ दिलं नाहीस. तुला काय अधिकार होता त्यांना असं पोत्यात घालून
टाकून द्यायचा, ती काय मांजरं होती?’’
हे कशाबद्दल चाललंय तिथं पोचलेल्या नंदाला कळेना. रंगभूमीवर नंदा
उपस्थित होताच सुधाताईंनी तिला सांगायला सुरुवात केली. ‘‘अगं, हा म्हणतो,
वादळात सगळ्या मूर्तीचे तुकडे तुकडे झाले. पोत्यात घालून विसर्जन करून आला
म्हणे!’’ रंगाच्या म्हणण्यानुसार भलंमोठं वादळं झालं होतं, जे त्याच शहरात राहणा-या
असूनही सुधाताई आणि नंदाला ठाऊक नव्हतं. त्या वादळात जडशीळ मूर्ती एकमेकींवर
उडून पडल्या आणि त्यांचे तुकडे तुकडे झाले; एवढेच नाही तर त्याची छत्र चामरं वगैरे
तर उडून मागच्या बोळात पडले होते म्हणे.
मग त्या गोजिरवाण्या मूर्तीचे तुकडे आणि अनेकांचे बालपण, तारुण्य,
अनेकांच्या श्रद्धा पोत्यात भरून रंगा नदीत सोडून आला होता. रामाच्या नशिबी
इतका भयानक शेवट रामायणातही आला नव्हता. माणसाच्या अंधश्रद्धा आणि
अर्थकारणाचे बळी देव ठरले होते.
By
Sujata Mahajan,
USA