पक्षिणी
- सुजाता महाजन
गोदूला स्टॅण्डवर सोडायला घरातले सगळे आले होते. आई, बाबा, भाऊ, वैनी… त्यांच्याशी बोलायला ती खालीसुद्धा थांबली नाही. कुठूनही कुणी येईल अशी भीती वाटत होती.
गाडी एकदाची लवकर सुटावी आणि दुःखांनी, यातनांनी भरलेलं हे शहर दूर दूर जावं असं तिला वाटत होतं.
कंडक्टर जवळ आला तशी आई रडायला लागली. गलबलून म्हणाली, ‘‘नीट –हावा. घराची काही काळजी करू नकोस. कुणी न कुणी जाऊन पाहत जाईल अधनं मधनं. मामाला कळवलंय. तो पाहील सगळं. तू स्वतःला आणि पोरांना सांभाळ फक्त.’’
भाऊ तांबारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत म्हणाला, ‘‘भावजींना हिकडं बोलाव.’’
ती डोळ्यांनी ‘नको, नको’ खुणा करायला लागली. तो दरडावून म्हणाला, ‘‘बोलाव म्हणतो ना !’’
तिने आत वळून शेजारी बसलेल्या नव-याला सांगितलं, ‘‘सका बोलावू राहिला.’’
नव-याने तिच्या अंगावरूनच वाकून खिडकीतनं पाहिलं.
खालून सखाराम दरडावणा-या आवाजात म्हणाला, ‘‘आता तरी नीट –हावा. तुमच्यापायी समदं वाटुळं झालं. आता तरी नीट –हावा.’’
गोदूच्या नव-याने कसानुसा चेहरा करून आजूबाजूला पाहिलं आणि हळूच म्हणाला, ‘‘हां, हां, तू काळजी करू नगं.’’
‘‘काळजी तर जल्माचीच हाय. पर माज्या ताईच्या अंगाला हात लावला तर पगा. आता माज्याशी गाठ हाये.’’ सखारामची बायको आणि आई दोन्ही बाजूंनी त्याला ‘बोलू नको’ म्हणून ढोसत होत्या तरी तो बोललाच.
गोदूच्या नव-याचा चेहरा लालबुंद झाला, ‘‘गप बस. मला नगं श्यानपना शिकवूस.’’
‘‘हात्तिच्यायला, मादरचोद, अजून तुजा माज नाय कमी झाला व्हय’’
गोदूचा नवरा उठूनच उभा राहिला. आडमाप उंची असल्याने त्याचं डोकं वर जोरानं आपटलं. ‘‘अयाई ग’’ करत डोकं धरून खाली बसला.
ही संधी साधून गोदूने खिडकीतनं डोकं बाहेर काढलं. ‘‘ए सक्या, गप की रं. पुन्ना सगळं कश्यापायी उगाळत बसलायस निगताना? पुन्हा हेच करत बसायचं का? तुमच्या मारामा-या आणि नंतर त्यानी मला मारायचं. तुजा भाव असं बोल्ला म्हणून. गप बस. जा घरी आता. ए आये, घेऊन जा त्याला. सगळ्यांची मेल्यांची डोकी भडक.’’
आई आणि वहिनी सख्याला ओढायला लागल्या. वहिनीला जोरात ढकलून सख्याने आपला राग तिच्यावर काढला. मग हलक्या आवाजात आरडाओरड करत, ढकलाढकली करत एकदाचे ते सगळे जाताना दिसले. सख्याला बाहेर काढायच्या नादात असलेल्या आईने वळताना मागे पाहिलं आणि हात केला.
आणि गोदूच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. पोरं कावरीबावरी होऊन पुढच्या सीटवर बसली होती. आपापसात त्यांच्या एक-दोनदा मारामा-या झाल्या होत्या. पण मोठ्या माणसांचं सुरू झाल्यावर त्यांनी आवरतं घेतलं होतं. डोकं दाबून धरायचं थांबवून नवरा शांत बसला होता. डोळ्यातनं पाणी वहातंय तोवर गोदू खिडकीतून बाहेरच पहात राहिली.
नवरा पुढे मोठ्या मुलाजवळ बसायला गेला. धाकटा सीटवरून चढून मागे आला तिच्याजवळ. नवरा पुढे गेल्यावर गोदूला फार बरं वाटलं. लांबचा प्रवास. दहा बारा तासांचा. स्वतःबरोबर शांत रहायचं. विचार करायचा, पुढे काय करायचं?
पोरगं मागे आलं. ते सारखं ‘‘आये, ते बघ ना!’’, ‘‘आये, म्हस बघ.’’, ‘‘आये, ते बघ विमान. वर, वर बघ’’ करत सुचू देत नव्हतं.
शेवटी कंटाळून निघताना आईने दिलेला बिस्किटपुडा तिने त्याच्या हातात दिला. पोराची बडबड थांबली.
गोदूने डोळे मिटून आत अंधार आणि एकांत निर्माण केला. आतल्या एकांतात ती सगळं विसरायला धडपडू लागली.
गोदी सातवीपर्यंत शिकली होती. लहानपणापासूनच ती आईबरोबर कामाला जायची. लहान वयात लग्न झालं. परशू उंचापुरा, धट्टाकट्टा होता. त्याच्या काळ्या चेह-यावर वण होते. गोदूही चांगली उंच, शिडशिडीत, गोरी, मोठ्ठ्या डोळ्यांची, रुंद जबड्याची होती. वयापेक्षा प्रौढ दिसायची. परशू आणि गोदीची जोडी चांगली दिसते असं सगळे म्हणायचे.
अतोनात कष्टांची गोदूला सवय होती. दुस-या एका गोष्टीची सवय तिला लहानपणापासूनच होती. घरातल्या (त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या इतरांच्याही) पुरुषांनी नीट कामंधामं न करणे आणि बायकांनी राब-राबून संसार चालवणे.
वडील मनात आलं तर पेरूच्या सीझनमध्ये पेरू विकायचे. एरव्ही घरी. दारू प्यायची, बडबड करायची. आईला मारझोड.
भाऊ कधीकधी गवंडीकाम करायचा. एरव्ही घरी. दारू प्यायची. बडबड करायची. वहिनीला मारझोड.
त्यामुळे पुरुषाची जात यापेक्षा काही वेगळं वागते हे गोदूच्या गावीही नव्हतं. परशूनेही तिचा अपेक्षाभंग केला नाही.
लग्न झालं तेव्हा तो रंगाचं काम करायचा. पेंटरच्या हाताखाली दिवसभर तोंडाला फडकं बांधून भिंती साफ करायच्या. चरे बुजवायचे. मग पहिला हात, दुसरा हात चालू रहायचं. संध्याकाळी थकला भागला घरी आला की बाटली असायचीच. मारहाणीला त्याने एकदम नाही सुरवात केली. गोदूने, ‘‘जरा कमी पीत जा’’ वगैरे सांगिल्यावर सुरू केली.
दोन मुलं झाल्यावर गोदूचा संसार चांगला स्थिरावला. गोदू हिंमतवान बाई होती. मुलांना चांगलं शिकावायचं. हे असं कंत्राटी काम त्यांनी नाही केलं पाहिजे. काम नसलं की या लोकांना वाईट सवयी लागतात, हे तिनं ओळखलं होतं. तिने जिद्द धरली. मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं. मरमर मरायची पण मुलांच्या फिया, शिकवण्या, वह्यापुस्तकं कश्शाला तिनं कधी कमी पडू दिलं नाही.
काम नसलं की परशाचं तेच दारू पिणं, शिव्या, मारझोड. पण हे सगळं अंगवळणी पडलं होतं.
मग एक मोठं संकट त्यांच्यावर कोसळलं.
गोदू जिथं काम करायची ती एकही खाडा न करता! कामचुकारपणा, भांडण, लावालाव्या, उचलेपणा, खोटारडेपणा, उठवळपणा असं काहीच तिच्यात नव्हतं. त्यामुळे तिला भराभर कामं मिळत गेली. नवीन मिळणा-या कामांबद्दल नव-याला न सांगता ती पैसे साठवत राहिली. मुलांच्या सगळ्या गरजा भागवणं, संसारातल्या वस्तू एकेक करून घेणं हे ती हळूहळू करत राहिली. अखेरीस तिने स्वतःसाठी मंगळसूत्रपण केलं. दागिने तिला नव्हतेच. तिचं मंगळसूत्र पाहिल्यावर परशूचं डोकं फिरलं. कामं संपलेली होती. महिनाभर घरीच होता. मग डोक्यात किडे वळवळायला लागले. ही एवढ्या उशीरा का घरी येते? मंगळसूत्र करायला हिच्याजवळ एवढा पैसा कुठून आला? ही करतीय तरी काय?
एक दिवस त्याच्या अंगात भूत शिरलं. तिच्या कामाच्या ठिकाणी गेला. ‘‘गोदूला पाठवा’’ म्हणाला. गोदू बाहेर आली. ‘‘माझ्याबरोबर चल’’ करड्या स्वरात म्हणाला. ‘‘पन कामं?’’
‘‘चल म्हणतोय ना?’’
गोदू बिचारी बाईंना सांगून त्याच्याबरोबर निघाली. रस्त्यात तिला विचारलं, ‘‘मंगळसूत्र कुणी केलं?’’
‘‘कुणी केलं? मला कोन करणार? माझ्या सोत्ताच्या पैशांनी मीच केलंय.’’
‘‘कसली कामं करतीस एवढी लोकांची. इतका पैसा कुठून आला?’’
एका क्षणात गोदूला त्याच्या मनात काय चाललंय त्याचा अंदाज आला. ती परशाकडे अवाक् होऊन पहात राहिली. ‘याला काय चपलेनं बडवावं की एखादा धोंडा घालावा डोक्यात’ असा विचार करत ती मोठमोठे भरून आलेले डोळे त्याच्यावर रोखून पाहात राहिली.
सटकन् परशा म्हणाला, ‘‘डोळे काढतीस माझ्यावर? लईच माज आलाय वाटतं’’ आणि त्याने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र इतक्या जोरात हिसकलं की ते तुटलं. रस्त्यात मणी विखुरले.
गोदूने रडत रडत मंगळसूत्र उचललं. मणी गोळा केले. स्वतःच्या कष्टाने केलेले मंगळसूत्र घालून जेव्हा पहिल्यांदा ती कामाला गेली होती- दहा कामं होती तिची- कामावरच्या प्रत्येक बाईने तिला मंगळसूत्राबद्दल विचारलं होतं. जवळ येऊन नीट निरखून पाहिलं होतं. तिच्यासारख्या धुणंभांडी करणा-या इतर बायकांनी रस्त्यात थांबवून विचारलं होतं. गोदूच्या दृष्टीने तो दिवस अविस्मरणीय होता. रात्री झोपली तेव्हाही तिला बायकांचे चेहरे, असूयामिश्रित कौतुकाच्या प्रतिक्रिया आठवत होत्या आणि हा तिचा आनंद परशाने आता एका क्षणात अक्षरशः धुळीला मिळवला होता.
परशा तिला फरफटत घरी घेऊन गेला. ज्या बायकांनी परवा तिच्याकडे कौतुकाने पाहिलं त्यांच्या नजरेत कीव दिसल्यावर गोदूला फार मोठी मानहानी वाटली.
‘आपण कष्ट करतो, कुणालाही त्रास देत नाही. तरी जगायचं जमू देत नाही जग. आपलं काय चुकतं? पुरुषाची जातच हरामी, तर आपण कुठवर पुरे पडणार?’
गोदू तिथे राहिली नाही. इतका चांगला जम बसलेला असूनही ती शहराच्या दुस-या टोकाला रहायला गेली तिथे मिल्ट्रीच्या क्वार्टर्स होत्या. परशाला तिथे रखवालदारीचं काम मिळालं आणि हिला धुण्याभांड्याचं. एका छोट्याशा पत्र्याच्या खोलीत ते रहायला लागले. पुन्हा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आला. मुलांना तिथल्याच शाळेत घातलं.
वर्ष होतंय ना होतंय तोच परशा रखवालदारीच्या कामाला कंटाळला. त्याला पेंटिंगच्या, जास्त पैसे देणा-या कामाच्या ऑफर्स यायला लागल्या. काय करावं? परत जावं की काय तिकडेच?
एक दिवस त्याने गोदूपाशी गोष्ट काढली.
‘‘चांगलं चाललंय की. कशापायी सोडायचं?’’ ती.
‘‘अगं, हितं काय जास्त पैसा नाही. वाडवणार बी नाहीत आन किती जबाबदारीचं काम आस्तंय. जरा झोप लागली अन् कायतरी गडबड झाली तर काय भावात पडायचं ते. अन् हितं हे मिल्ट्रीचे लोक त्यांचं सगळं येगळंच अस्तंय. सगळं भरून घेतील चोरीबिरी झाली तर.’’
‘‘पन पोरांच्या शाळा?’’
‘‘अगं, शाळेत काय तिकडं पन घालता येतंय की’’
‘‘आता कुटलं वं. आता फेपूरवारी चालू. एप्रिलमधी परीक्षा अस्ती. ती झाल्याबिगर काय जाता येतंय!’’
‘‘काय शिकून मोठं करनारेत तुजे लेक. जाऊ दे गेली परीक्षा तर!’’
ते वाक्य गोदूच्या मनावर चरचरलं.
‘‘कायतरी बोलू नका. माजे लेक चांगले शिकून चांगली मोठ्ठी नोकरी करणारेत. हे असलं हातावरचं पोट काय कामाचं?’’
‘‘मग बस मुलांना घेऊन हितं. मी चाललो. माझी हातातली कामं सुटली, पेंटरला दुसरं कुणी मिळालं तर मला पुन्हा काम नाही मिळायचं.’’
गोदूही मग थांबली नाही. जुन्या चाळीत तिला पुन्हा खोली मिळाली. बायका तिच्या मानहानीचा प्रसंग विसरल्या. तिने आपल्या जुन्या कामांच्या ठिकाणी भराभर निरोप पाठवले. लोक जणू तिचीच वाट पहात होते. पुन्हा कामं मिळाली. परशालाही पेंटिंगची चांगली कामं दोन महिने पुरतील इतकी मिळाली.
परशा खुशीत होता. गोदूनेही काहीतरी मनाशी जुळवलं होतं. ‘‘आता आपण स्वतःच्या दोन खोल्या बांधू. जागा घ्यायला फक्त पैसे लागतील. पुढचं बाबा, सका, तुमी, मी सगळे मिळून आपलं घर बांधून घेऊ. सामानाला पैसे लागतील. माझ्या कामाच्या बायकांकडनं घेईन. पण आता घर बांधायचंच. नाही तर आलेला पैसा आसा तसा खर्च होऊन जाईल. पोरांच्या डोक्यावर छप्पर पायजेच.’’
परशाही कधी नव्हत ‘बरं बरं’ म्हणाला.
झालं ! गोदू नव्या स्वप्नाने भारावून गेली. चार ठिकाणी विचारपूस करून, कर्जाची चौकशी करून तिनं अखेर जागा घेतली. थोडे दिवस पुन्हा पैसे जमेपर्यंत थांबली. मग भाऊ, वडील, अळंटळं करणारा नवरा, मुलं सगळ्यांना कामाला लावून तिने दोन खोल्यांचं छोटंसं घर उभारलं. हा सगळा काळ कामाच्या गर्दीचा; जीव खाऊन मेहनत करताना देहभान विसरून जाण्याचा होता. रात्री कष्टानं शिणलेलं शरीर झोपेच्या हवाली करताना शिणवट्याबरोबर खोल समाधान तिच्या अंगात झिरपत जायचं. तिला दिसायचं, तिचा मोठा लेक ‘बाबू’ शिकून चांगल्या नोकरीला लागलाय. कसली व्यसनं नाहीत. काही नाही. घरात मदत करतोय. बाहेरच्या जगात लोक त्याला ‘बाबूराव, बाबूराव’ म्हणून मान देतायत. आजूबाजूचे लोक म्हणतायत, ‘गोदीचं लई चांगलं झालं. बिचारीने एवढे कष्ट केले. त्याचं सोनं झालं. लेकरं गुणी निघाली.’
तिच्या स्वप्नात परशा कुठेच धरलेला नव्हता. एक दिवस मोठ्या बाईच्या घरी, त्यांची मुलगी टीव्ही पहात बसली होती. जंगलावरचा कार्यक्रम होता. प्राण्यांचं जगणं दाखवत होते. सिंह फक्त पिल्लांना जन्माला घालण्यापुरता. बाकी कुटुंबाशी त्याला काही देणं घेणं नाही. सिंहिणीनी मिळवायचं. मग हा आयता येऊन खाणार. फरशी पुरसा पुसता गोदू ते पहात राहिली. तिच्या मनात विचार आला, हे तर आपल्यासारखंच आहे. मग माणसात माणूसपणा कुठला? की पुरुषाला नकोच असतं घर? घर हवं बाईला. एका जागी रोज तेच तेच आवडीने जगते बाई. याला पक्ष्यासारखं भटकायला हवं आकाशात. मनात येईल तेव्हा उडून जायचं.’
आपला बाबूराव पण या पक्ष्यांच्या जमातीतला आहे असं मात्र तिच्या मनातही आलं नाही.
घराचं कर्ज फिटत आलं. मग तिने परशूसाठी गाडी घेतली. सेकंडहॅन्ड मोटरसायकल. खूप लांबून ती कामावर चालत यायची. परशू आपल्याला सकाळच्या घाईत गाडीवरून सोडेल तर घरात मुलांचं आणखी थोडं बघता येईल असं तिला वाटलं होतं. परशूने एक दिवस उत्साहाने सोडलं. पुन्हा कधीच नाही.
पेंटिंगच्या जोडीला परशू आता गवंडीकामालाही जात होता.
एक दिवस तो रात्री घरीच आला नाही. काळजीने गोदू बेजार झाली. शोध तरी कुठे घेणार? लांबलांबची कामं. दोन दिवसांपूर्वीच तो पिऊन घरी आला होता आणि काही चमचमीत खायला का नाही केलं म्हणून गोदूला वळ उठेपर्यंत मारलं होतं.
दुस-या दिवशीही तो आला नाही तेव्हा गोदूला फारच काळजी वाटायला लागली. आपण त्याच्याशी बांधलेले आहोत हे तिला फार जाणवलं. त्याचं मारणं, आक्रस्ताळेपणा, संशयीपणा, कामचुकारपणा, अंथरुणातली बळजबरी….. होतं ते सगळं वाईटच होतं. तरीही आपला जीव का कासावीस होतोय तिला कळत नव्हतं.
दोन दिवसांनी तो आला. त्याला पाहून तिचा जीव भांड्यात पडला. पण कुठे गेला होता त्याने काहीच सांगितलं नाही. तो अतिशय मऊपणे वागत होता. एकदाही ओरडला नाही. पोरांशीही छान वागला. तिला राहून राहून आश्चर्य वाटत राहिलं. एक दोनदा तिच्याकडे पाहून हसला पण. गोदू चक्क लाजली.
रात्री त्याने तिच्यापुढे एक कागद ठेवला. ‘सही कर’
‘काय आहे हे?’
‘तुला काय करायचंय. सही कर’
‘काय आहे पण हे? मी नाही उगाच सही करणार’ त्याने दात-ओठ खात तिच्याकडे पाहिलं.
‘काडीमोड हवाय मला. तुला सोडून देणार आहे मी. दुसरी करणार आहे.’
गोदूने कपाळाला हात लावला. एवढंच राहिलं होतं. ‘असं काय झालं पण एकाएकी. मी करुन घालील तुमाला चमचमीत. मध्यरात्रीसुद्धा घालील. पण असं नका करू. मी आणि पोरं काय करू? कुठे जाऊ?’
‘तुमाला राह्यचं तर रहा. पण मी दुसरी करुन आणणार आहे. मी वचन दिलंय तसं.’
गोदू पोटतिडकीने म्हणाली, ‘‘कोण हाये ती सटवी? भलत्या नादी लागू नका. आजवर तुमचं दारुचं खूप सहन केलंय मी. पण आता असलं काही कराल तर घरादाराला मातीत घालाल. यात काही कुनाचं भलं नाही. ती बाजिंदी बया दोन दिवस राहील आणि जाईल सोडून.’
‘चूप. बडबड करू नकोस. सही करणारेस की नाही?’
‘नाही.’
तो रागारागाने निघून गेला.
पण प्रकरण एवढ्यावर संपलं नाही. नंतर खूप चिघळलं. गवंडीकाम करताना तिथंच काम करणा-या एका पोरीवर परशा फिदा झाला. हळूहळू त्याने तिला जाळ्यात ओढलं आणि तिनेही त्याला. त्याने तिच्यासाठी गंठण केलं, अंगठी, पैंजण केले. तिला रहायला रूम घेऊन दिली. जेव्हा तिच्या घरच्यांना हे कळलं तेव्हा ते परशाला भेटायला आले. ‘आमच्या पोरीला फशी पाडलंस. लग्न कर. बायकोला काडीमोड दे. तिच्याशी लग्न कर.’ पण गोदू काडीमोडाला तयार नाही म्हटल्यावर ते सगळे चिडले आणि म्हणायला लागले, ‘तुझं घर आमच्या मुलीच्या नावावर कर. गाडी आमच्या नावावर कर.’
दरम्यान गळ्याशी आलं म्हटल्यावर गोदूने आई-वडील-भावाकडे धाव घेतली. ते आले. भाऊ आणि वडिलांनी परशाला चोपून काढलं. ‘हे घर गोदीचंय तूच चालता हो’ म्हणाले.
परशा सगळीकडूनच अडचणीत आला. थोड्या दिवसांची मजा इतकी अंगाशी येईल असं त्याला वाटलं नव्हतं.
लोक रोज येऊन धमक्या देतच होते. शेवटी धीर करून तिचे वडील, भाऊ पोलिसांकडे गेले. हकीकत ऐकल्यावर पोलीस म्हणाले, ‘त्यांनी येऊन कायतरी मारझोड, दगडफेक वगैरे केल्याशिवाय आम्ही तरी काय करणार?’
हे ऐकल्यावर ते सगळे गुपचूप परतले.
दुस-या दिवशी खरोखरच ‘ते’ आले. त्यांनी परशाला मारझोड केली. घरातल्या वस्तूंची फेकाफेक केली. शिवीगाळ केली. सर्वात शेवटी सर्वांना त्यांच्याच घरातून हाकलून दिलं. ‘आमच्या पोरीचा फैसला नीट होत नाही तोपर्यंत आम्ही हितं कुणाला फिरकू देणार नाही’ म्हणाले.
गोदू नव-याला, मुलांना घेऊन माहेरी आली. तिच्या घरावर त्या लोकांनी पहारा ठेवला. कुणालाच तिकडे फिरकता येईना.
चार दिवस आई-वडलांकडे येऊन राहिल्यावर मानहानीने चूरचूर झालेली गोदू खात नव्हती, पीत नव्हती, झोपत नव्हती. नुसती टक्क भिंतीकडे पाहत बसलेली असायची. परशा तर तोंड लपवूनच बसला होता. घराबाहेरही पडला नाही. घरातही कुणाच्या नजरेला नजर देत नव्हता.
आयुष्याने दिलेली ही थप्पड गोदूला पेलली नव्हती. वडील, भाऊ चुळबुळत होते, तळमळत होते. गोदू आणि परशाचं काय करावं कुणालाच समजत नव्हतं.
शेवटी गोदूच्या आईने मार्ग सुचवला, ‘तुम्ही थोडे दिवस मामाकडे नागपूरला जाऊन रहा. तिकडं सगळं शांत झालं की मगच या. मामा सांभाळेल तिथं थोडे दिवस. जमलं तर काम करा. सगळं ठीक होईल.’
पक्षिणीच्या जातीची गोदू पुन्हा जगण्याच्या भानावर आली. मोडून टाकलेलं घरटं तिला पुन्हा उभारायचं होते. पिल्लं तर तिची होतीच ना. त्यांच्यासाठी जगावं लागणारच होतं. तिचा बाबू ‘बाबूराव’ होणार होता.
तिने पुन्हा उभारी धरली. मामाला कळवलं. मामा पाठवून द्या म्हणाला आणि ते नागपूरच्या गाडीत बसले. जो तिचा नव्हता त्या पुरुषाला ती का बांधून नेत होती स्वतःबरोबर?
तिचं घर भावनांनी बांधलेलं नव्हतं. तिच्या कष्टांनी बांधलेलं होतं. माणसात गुंतून रहाणा-च्या या भावनांपेक्षाही तिला अर्थकारणाचा विचार करणं भाग होतं. स्वतः बांधलेलं घर हातचं जाऊ द्यायचं नव्हतं तिला. मुलं मोठी होताना त्यांच्या सगळ्या गरजा भागवायला आपण एकट्या पुऱ्या पडणार नाही हे तिला ठाऊक होतं म्हणूनच परशा कसाही असला तरी स्वतःबरोबरच बांधून ठेवायला हवा होता.
गाडीत मिळालेल्या पुरेशा एकांतात पडझड झालेल्या मनाला तिने पुन्हा बांधून घेतलं. घरटं मोडून टाकलं तरी पुन्हा पुन्हा न कंटाळता बांधायला घेणा-या पक्षिणीसारखी ती पुन्हा जगायला सिद्ध झाली.
***