Tuesday, 1 December 2020

विचार करालॽ

आपल्या घरात वडिलधारी माणसे आहेत हे खरे तर भाग्याचे लक्षण समजले जाते. पण हीच वडिलधारी वृद्ध झाली, त्यांची गात्रे थकली की त्यांनी एका जागी बसावे, काही करु नये अशी मानसिकता दिसू लागते. त्यांना त्याच पद्धतीने वागवले जाते आणि मग अशी दृश्ये दिसू लागतात. दिवाळीपूर्वी दहा बारा दिवस आणि दिवाळीनंतर आठवडाभराने दोन कुटुंबात भेट देण्याचा योग आला. घरात असलेल्या वृद्धांचे बोलणे ऐकून, त्यांना मिळत असलेली वागणूक पाहून अत्यंत विषाद वाटला.

असे करणारे त्यांचेच सगेसोयरे आहेत खरे तर. मला दिसलेली दृश्य मी आपणांसमोर सादर करायचा प्रयत्न करतेय. सध्या तर प्रत्येक घरात टी. व्ही. असतोच. त्यामुळे मग अशी वृद्ध माणसे त्या टी. व्ही. समोर बसून आपली करमणूक करुन घेण्याचा प्रयत्न करतात. कधी आपल्याला हवे ते कार्यक्रम, कधी घरातल्या इतरांनी लावलेले कार्यक्रम बघत ते तिथे बसून असतात. त्यांचे जेवणखाणही तेथेच चालते. अशावेळी त्या वृद्ध व्यक्त्तीला एकटेच जेवायला ताट वाढून द्यायचे नि पुनश्च काय हवे नको ते विचारायचेच नाही असे झाले तर काय होत असेल बरे! एकतर ती व्यक्त्ती अन्न चिवडत बसते किंवा टाकून देण्याचा संस्कार नसेल तर बळेच खाऊन घेते.

मग त्याचे जे विपरित परिणाम असतात ते होतात. त्यापेक्षा चार वेळा थोडे थोडे ते खाऊ शकतील असे देणे खरेच करता येत नाहीॽ त्यांना आता वयोमानानुसार आंघोळीनंतर कपडे घालणे अतिशय अवघड होते. हात थरथरतात, बटणे लावता येत नाहीत. फार काळ उभे रहाता येत नाही. अशावेळी त्यांचे कपडे व्यवस्थित आहेत, फाटलेले, बटण तुटलेले असणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे की नाहीॽ त्यांचे स्नान होऊन कपडे घालून होईतोवर लक्ष ठेवले नाही तर ती बाथरुममध्ये, बाहेर ओल्या झालेल्या जागेवरून घसरुन पडणारच निश्चितपणे.

त्यांच्या हालचाली शिथिल झालेल्या असतांना त्यांना कुठेतरी लागते, सूज येते, त्वचेवर काही जागा दडस होतात. याची दखल घरातल्या इतर सदस्यांनी घ्यायला हवी न! अन्यथा हेच विपरित रुप धारण करु शकतात. त्यासाठी त्यांना कुठे बाहेरही न नेणे हा त्यावरचा उपाय असू शकत नाही. थोडा वेळ काढून त्यांना आपल्या सोबतीने अर्धा एक कि.मी. चालवणे अशक्य असत नाही.

आम्हीही आता पन्नाशी, साठीला आलो असे म्हणणारे महाभाग हे लक्षात घेत नाहीत की ही वृद्ध मंडळी आपल्यापेक्षा २५, ३० वर्षांनी अधिक आहेत तेव्हा त्यांची अवस्था आणखी कठीण असणार आहे त्यांना या गोष्टी जाणवत नाहीत खरेच की दुर्लक्ष करण्याचा, फक्त्त स्वतःपुरताच विचार करण्याचा स्थायीभाव झालाय आताॽ की खरेच इतके अवघड असते का त्या वृद्धांकडे लक्ष देणेॽ काय अपेक्षा असते त्या वृद्ध जीवांचीॽ त्यांची गात्रे थकलेली असतात. साध्या साध्या गोष्टी ते सहजपणे करु शकत नाहीत हे आपण समजू शकत नाहीॽ आपण लहान मुलांचे आवडीने आणि प्रेमाने करतो मग या पुनश्च लहानपणाच्या स्थितीला आलेल्या वृद्धांचे करतांना का अवघड वाटतेॽ मला खरेच कळत नाही.

Padma Dabke

No comments:

Post a Comment