दिसामाजी काहीतरी ते लिहावे|*
*प्रसंगी अखंडित वाचीत जावे||*
समर्थ रामदासांनी नेहेमीसारखेच, अत्यंत सोप्या भाषेत काय करावे ते
सांगितले आहे. आपण यातील दुसरा भाग तर नेहेमीच करतअसतो. पुस्तकं ,
वर्तमानपत्रं , अगदी गेला बाजार व्हाट्सएपचे मेसेज तर वाचतच असतो की.
'वाचणे 'ही तशी म्हटली तर सोपी क्रिया, उपमाच द्यायची तर समोर वाढून आलेले
जेवणाचे ताट संपविण्यासारखेच. आवडेल तेवढेच , हव्या त्या प्रमाणात, हवे तसे
खाणे. आवडले नाही तर करणाऱ्यांनी घेतलेले कष्ट वगैरेचा विचार सुध्दा मनात न
आणता बिनधास्त टीका करण्याची पूर्ण मुभा असणारे .
"लिहिणे " ही प्रक्रिया स्वयंपाक करण्यासारखीच नाही का ? आधी विषय
शोधायचा, त्याची नीट मांडणी करायची, योग्य ते शब्द निवडायचे आणि त्या
विचारांना मूर्त स्वरूप द्यायचे .सर्वात महत्वाचे म्हणजे मेहनतीने तयार
करून , सजवून तो दुसऱ्यासमोर मांडायचा. खरं पहायला गेलं तर अवघड अशी ही
गोष्ट. लिहिणे म्हणजे मनात उमटणारे तरंग कागदावर प्रत्यक्षात उतरवणे. जसा
एखादा चित्रकार त्याच्या मनातील चित्र कागदावर उतरवतो तसं किंवा एखादा
मूर्तिकार पाषाणातून मूर्ती घडवतो तसंच. प्रक्रिया तीच.त्यासाठी आपल्याला
नक्की काय म्हणायचं आहे , सांगायचं आहे याची आपली आपल्याच स्पष्ट कल्पना
असावी लागते. एका प्रयत्नात हे जमणे सोपे नाही. माझा एक मित्र नामवंत
लेखक आहे, तो म्हणतो की , ' मी माझ्या लेखनावर कमीत कमी पाच सहा वेळा तरी
हात फिरवतो'. अपार कष्ट घेतल्यानंतरच फायनल प्रॉडक्ट आपल्यासमोर येतं.
(एकाच प्रयत्नात लिहिणारे सिद्धहस्त लेखक असतीलच) पण छापण्यासाठीच लिहायला
हवं असा कुठे नियम आहे ? किंबहुना आपल्या भावनांचं, विचाराचं प्रकटीकरण आहे
हे . मग त्याची भाषा कशीही असो. आपल्याला जे म्हणायचं आहे तेच
समोरच्यापर्यंत पोहोचतं की नाही हा महत्वाचा मुद्दा.
खरं म्हणायचं झालं तर, 'लिहिणे ही एक कला आहे, सगळ्यांनाच ही अवगत
असतेच असं नाही', असा समज आपण करून घेतो आणि लेखन प्रपंच आपण स्वतःच कठीण
करून ठेवतो. म्हणजे असं बघा, की आपण काहीतरी खरडलं की आपण ते कोणाच्यातरी,
आपल्या दृष्टीने , 'आदर्श'अशा लिखाणाशी ताडून पाहतो, आणि मग ते आपल्यालाच
निकृष्ट वाटायला लागतं, मग काय सोडून देतो आपण प्रयत्न. पण अशी तुलना
करायचीच कशासाठी ? व्यक्ती तितक्या प्रकृती हा न्याय इथे पण लावता येईलच
की. प्रत्येकाची अभिव्यक्तीची रीत निराळी. अगदी एकाच साहित्यातून
वेगवेगळ्या चवीचे पदार्थ बनविण्यासारखेच . एकच पदार्थ दहा जणांनी बनाविला
तर दहा वेगळ्या चवी. लिखाणाचंही तसंच नाही का ? शाळेतील निबंध आठवून बघा.के
लिहिलं आहे त्यापेक्षा त्यात सुसूत्रता आहे की नाही हे महत्वाचे. दिलेल्या
मोजक्या वेळात सांगितलेल्या वेळात विचार करून लिहिणे ही काही सोपी गोष्ट
नाही. माझ्या मते सर्वांनाच दहा पैकी दहा मार्कच द्यायला हवेत.
रामदास
स्वामींनी सांगितल्याप्रमाणे , सर्वांनीच लिहिणे ही सवय आत्मसात करायला
हवी. त्यामुळे निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या कष्टांचीही जाणीव होईल. आपले
विचार आपल्यालाच स्वच्छ दिसायला लागतील. ही विचारांची स्पष्टता आपल्याला
खूप बाबतीत फायद्याची ठरु शकेल. आपले नातेसंबंध जपण्यासही याचा उपयोग
होईल असं मला वाटतं.
कोणताही कलाकार एका
दिवसात प्रसिद्ध पावत नाही, अपार मेहनत घेतलेली असते त्यांनी त्यासाठी.
स्वतः थोडेसे प्रयत्न केले तरच आपल्याला त्या कष्टांची जाणीव होऊ शकेल.
सध्या या कोविदग्रस्त परिस्थितीत नवनवीन लिहिते उदयास येऊ लागले आहेत.
फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी माध्यमे आहेतच अभिव्यक्तीसाठी. त्याचा फायदा
करून घेऊया .
विषयांची कमतरता तर अजिबातच नाहीये.
जरा प्रयत्न करून बघितलं तर अनेक विषय दिसतील. छापण्यासाठी किंवा दुसऱ्या
कोणासाठी नव्हे तर स्वतःसाठीच लिहिते होऊया. कोणी कौतुक केले तर आनंदच
आहे, टीका केली तर सुधारणेला वाव आहे. चला तर मग घेऊया लेखणी हातात.
पुन्हा एकदा रामदासस्वामींनी म्हटल्याप्रमाणेच,
*"केल्याने होत आहे रे |*
*आधी केलेची पाहिजे ||*
याला अनुसरुन वागून बघूया .
*शामा छाजेड*
No comments:
Post a Comment