हा लाल्या, अन मी पिवळ्या,
दोघेही बहरतो, उलगडत अलगद, पानातून पाकळ्या!
वसंताच्या आगमनाची दवंडी, अचूकपणे देतो कोकीळस्वर,
मीही, मग त्वरेने माझा पिवळा शेला लपेटतो अंगभर!
माझ्या पिवळ्या शेल्यावर असते, माझी प्रिय हिरवी, पल्लव-नक्षी,
अवीट अशी ही रंगसंगती, अभिमानाने मिरवतो मी, निजवक्षी!
लाल्याचा मात्र, नूरच काही वेगळा,
त्याला भारी प्रिय, ग्रीष्माच्या असह्य झळा,
तावून, सुलाखून निघाल्यागत, हा डवरतो, लेवून लालबुंद बहर,
पण बहरा-बहरावरून ताडता येतं की काही लाले असतात कट्टर,
सर्वांगाने बहरताना, त्यांना पानांचाही वाटतो अडसर!
मवाळ लाल्यांना पटतच नाही, की का दाखवावा इतका माज?!
म्हणतात ते, मायबाप पानांसोबत बहरण्यात कसली आलीय लाज?
लाल्याच्या बहरण्याने, मलाही येते, नव्याने थोडी स्फूर्ती,
पहिल्या बहराचा जोम नव्हे, तरी दिसून देते बंधु-प्रीती!
तर मित्रांनो, असे आम्ही चुलतभाऊ, निसर्गचित्रांवर उठवत असतो आपापली मोहर,
टोपण नावं आमची आम्हांला, तुम्हाला परिचित आम्ही, गुलमोहर अन सोनमोहर!
आकांक्षा Phadke
No comments:
Post a Comment