आपण तटस्थ राहून चालेलॽ
आज अभिजित सोनवणे यांची अखंड आशिर्वाद म्हणून आलेली एक सत्यकथा वाचण्यात आली. वाचता वाचता सुन्न व्हायला तर झालेच पण खरोखरीच तळपायाची आग मस्तकात गेली. वडिलांच्या पश्चात आईच्या नावावर असणारे घर स्वतःच्या नावावर करुन घेतल्यानंतर आईला तू मरत का नाहीसॽ किती दिवस अन्न खाणारेस असे प्रश्न मुलगा, सून, नातवंडे विचारत असलेल्या त्या आईने घराबाहेर पडून डॉ. मरणासाठी औषध द्या म्हणून विनवणी केली. त्यानंतर डॉ. नी तिला समजावून शांत केले. तिची परभणीच्या एका वृद्धाश्रमात सोय केली. तोवर दोन दिवस स्वतःच्या घरी काढ असे सांगितले आहे.
मला डॉ. च्या कार्याबद्दल आपुलकीही आहे आणि त्यांच्या सहनशीलतेचे कौतुकही. पण आज मला प्रचंड राग आला आधी आणि नंतर वैषम्यही वाटले. राग त्या कुटुंबाचा आला ज्यांना आपली आई नकोशी झाली. कारणे कोणतीही असोत ती आई आहे याचे भान मुलाला असत नाही; आणि आई असलेल्या सुनेलाहीॽ अशा मुलासुनेला घराबाहेर काढून त्या घरी त्या माऊलीसारख्याच अनेकांची सोय त्या घरात करावी. किंवा त्या माऊलीचा आणि आणखी एका व्यक्त्तीचा आर्थिक भार तरी त्यांचेवर टाकावा असे वाटू लागले होते प्रत्येक जण आपापल्या प्राक्तनानुसार भोग भोगतो हे गीतेद्वारे कितीहीवेळा ज्ञात झाले तरी अशावेळी क्रोध अनावर होतोच आणि प्रत्यक्षात त्या व्यक्तीला शासन करणे शक्य नसले तरी वचनातून देऊन आपण मोकळे होतो हाही अनुभव आला. कमीत कमी त्या आईचा पुढचा काळ सुखाचा जावा यासाठी डॉ. नी त्यांच्या परीने प्रयत्न केला. आपण काय केले असते हा विचारही करावा वाटला नाही याचे वैषम्य वाटले. तथापि माध्यमाचा उपयोग झाला आणि त्या कुटुंबाच्या काही हितचिंतकांपर्यंत ही वार्ता पोचली. काही प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढाकार घेऊन त्यांच्यात सध्या तरी समन्वय घडवून आणला आणि त्या माऊलीला आपल्याच घरी आपल्या कुटुंबासोबत राहण्याचे सुख मिळणार आहे. मात्र यापुढे अशी वेळ कोणत्याही माऊलीच्या वाट्याला येऊ नये यासाठी जागरुक रहायलाच हवे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा आपला स्थायीभाव बदलायला हवा हे मात्र नक्की.
खरे तर असे वाटते आहे की जे कोणी असेल त्यांना असे करतांना समाजाचा धाक उरला नाही आता. दिवसेंदिवस जग जवळ येतेय की लांब जातेय कळत नाही. करोनासारखी आपत्ती आहेच. रोजच्या रोज ज्यांना युवापिढी आदर्श मानत होती म्हणे अशा सिनेजगतातील अनेकांच्या नको त्या गोष्टी आता उजेडात येत आहेत. २०१७ सालापासून हे चालू असतांना कोणाला खरेच कळले नसेल. याचे परिणाम किती भयंकर होणार आहेत तेॽ
परकीयांचा अंमल गेल्यानंतर आपल्याच स्वकीयांनी आपल्याच देशाला आपल्याच संस्कृतीपासून दूर नेले त्याचे परिणाम आज सर्वांनाच विचार करायला लावणार असे दिसते. आपण परकीयांच्या नको त्याच गोष्टी स्वीकारल्या. त्यांची शिस्त, देशाबद्दलचा अभिमान, कामावरची निष्ठा हे सगळे सोडून त्यांची व्यसने, सार्वजनिक ठिकाणी नको त्या गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला प्रिय झाले. संत सज्जनांची असलेली भूमी, स्वधर्मासाठी प्राणपणाने लढणारी शिवराय, राणाप्रताप, राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श मानणारी आपली संस्कृती सोडून दळभद्री, कामुक, व्यसनी, अत्याचारी दृश्ये असणाऱ्या सिनेमांतील तथाकथित नायक नायिकांना आदर्श मानू लागलो आहोतॽ आपणच आपला विनाश करणारा मार्ग निवडला आहेॽ
संपूर्ण समाज तसा नाही. मूठभर लोक आहेत हे. पण त्यांच्यामुळे सबंध समाज किडणार आहे. यासाठी बहुसंख्येने असलेल्या आपल्याला दुर्लक्ष करण्याचा जो रोग जडला आहे तो मूळापासून दूर करावा लागणार आहे. अयोग्य दिसले की तिथल्या तिथे करणाराचा हात धरता येण्याइतकी सावधानता आणि हिंम्मत दाखवावी लागणार आहे. आपल्याच मुलींना वेळप्रसंगी कठोर होऊन आवर घालावा लागणार आहे. मुलांकडेही मुलगा आहे काही बिघडत नाही असे न म्हणता लक्ष ठेवावे लागणार आहे. निसर्गाचा विनाश आपल्याला कळला आहे. त्यासाठी हिरीरीने प्रयत्न सुरु झाले आहेत आता. त्यापेक्षा जास्त पुढाकार घेऊन मानवी जीवनाचा विनाश टाळायला सिद्ध होऊ.
No comments:
Post a Comment