Thursday, 1 October 2020

तिला काय xxx कळतंय !

                            

    कालिंदीच्या नव-याचं तिच्याबद्दलचं  एक आवडतं विधान होतं, दिवसातनं एकदा तरी ते उच्चारलं जायचंच. ते विधान म्हणजे, ‘‘तिला काय xxx कळतंय.’’ जाणकारांना फुल्यांच्या जागी कोणते शब्द घालायचे ते कळेलच. झेलम, कालिंदीची मुलगी, हे वाक्य अनेकदा ऐकायची, मधल्या शब्दांसहित. पुरुषाच्या शिव्याकोशाशी तिचा परिचय होता तो वडिलांमुळेच. पण तिला या शब्दाचा अर्थ कळायचा नाही. दरवेळेस हे वाक्य उच्चारलं गेलं की तिच्या मनात प्रश्न उमटायचा, खरंच? आईला काही कळत नाही. झेलम आता आईची चेष्टा करण्याच्या वयात आली होती. साहजिकच ‘पप्पा’ म्हणजे ग्रेट! हे तिचं मत होतं.

    तिचे पप्पा लेखक होते. जगाला तुच्छ लेखणं हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचाच भाग होता. त्यापैकी ‘आई’ ही त्यांची सर्वात आवडती शिकार होती.

    कालिंदी सकाळी लवकर उठून चटचट कामं आवरायची. नव-याची, नव-याकडे येणा-या वाचकांची, मुलांची उस्तवार करता करता तिचा दिवस कुठल्या कुठे निघून जायचा. ती मुंगीसारखी सतत काम करणारी बाई होती. अस्वच्छता, गबाळेपणा, पसारा या गोष्टी तिला मुळीच आवडायच्या नाहीत.

    ऊन डोक्यावर आलं तरी पांघरुणं डोक्यावर घेऊन पडणारी, भर दुपारी गाद्या टाकून, पांघरुणं घेऊन लोळत पडणारी माणसं, शेजारी खाल्लेल्या बोरांच्या बिया, चहाची रिकामी कपबशी, त्यावर घोंघावणा-या माश्या, अंथरुणाशेजारी खरकटं सांडलेलं, संध्याकाळी अंधार पडला तरी दिवे न लावता अंधुक प्रकाशात वाचत लोळत पडणारी माणसं... हे सगळं चित्र तिच्याच घरच्या बेशिस्त माणसांचं होतं. अत्यंत आळशी, वाचनात गुंगून जाणा-या, आरोग्याविषयी बेफिकीर असणा-या या माणसांमध्ये तिच्यासारखी मुंगीच्या जातीची बाई बेजार होऊन जायची. घर स्वच्छ, उजेडात भरपूर न्हायलेलं ऊबदार, आनंद आणि उजेड परावर्तित करणारं असावं अशी तिची सारखी धडपड असायची.

    झेलम आईवर वैतागायची. तिच्या सतत आवरत राहाण्याने सुद्धा कंटाळायची. तिला वाटायचं, एक दिवस असा यावा, की हजारो तास झोपायला मिळावं, अंघोळीला सुट्टी देता यावी, अंथरुणाशेजारी भरपूर कधी न संपणारा खाऊ घेऊन म्हणजे हरबरा, बोरं, आवळे, संत्री, चुरमुरे, फुटाणे, लाह्या, बत्तासे, बेदाणे, पापड असं काहीही काहीही घेऊन एखादी लठ्ठ कादंबरी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत निर्विघ्नपणे वाचता यावी. दारावर सेल्समन येऊ नयेत. आईबाबांच्या टिप-या नसाव्यात, ती वाचते तेच पुस्तक पळवणारा दुष्ट भाऊ नसावा, साखर मागायला येणारे शेजारी नसावेत, तिची कादंबरी पूर्ण होईपर्यंत बाहेरच्या जगातली झुळूकही तिच्यापर्यंत येऊ नये.

    पपा नवीन काही लिहिलं की आधी झेलमला वाचून दाखवायचे. खरं म्हणजे कालिंदी पण लिहिणारी, कळणारी होती. पण नव-याचं लेखन तिला कळत नाही, असं त्याचं ठाम मत झालं होतं.

    त्या दिवशीही असंच ते काहीतरी वाचून दाखवत होते. दोन-तीन पानंच लिहिली होती. त्या दोन - तीन पानातली अश्लील वर्णनं झेलमसमोर ऐकता ऐकता कालिंदीचा चेहरा लाल झाला. ती कसंबसं म्हणाली, ‘‘अहो, हे काय लिहिता तुम्ही?’’ झालं! पप्पांनी हातातली पानं खाली आपटली आणि बडबड करायला सुरुवात केली. ‘तिच्यायला, तुला काय कळतंय साहित्यातलं? अस्तिस्तवाद कशाशी खातात माहीत आहे का? कुठून असली बायको मी घेतली. चांगल्या चांगल्या मुली सांगून आल्या होत्या.’’ बायको ‘घेतली’ या शब्दप्रयोगाने झेलमची त्यांच्यावरची भक्ती नाही म्हटलं तरी डळमळीत व्हायचीच.

    बडबड करून ते बाहेर निघून आले. कालिंदी झेलमला म्हणाली, ‘‘अश्लील लिहिलं तरच चांगलं लिखाण असतं का? प्रेमचंदांनी कधी अश्लील लिहिलं नाही. त्यांचं वाचलंयस तू? समाजाचं किती बारीक निरीक्षण, समाजातल्या प्रश्नांविषयी किती कळकळ! यांना सामान्य माणसाची भूक कधी दिसते की नाही? की नुसत्या मांड्याच दिसतात?’’ झेलमला वाटलं, कुणी काय लिहावं, कुणाला काय सुचेल, लिहावंसं वाटेल ते कसं सांगता येणार? पण त्याहून कळीचा प्रश्न हा आहे की, कुणाला कोणत्या पातळीपर्यंत कशी समज आहे हे कसं मापणार?

    एक दिवस एक दिवाळी अंक घरात येऊन पडला. झेलम एकटीच घरात होती. तिने कुतूहलाने चाळला. त्यात कालिंदीची कविता होती. तिचं नाव वाचल्यावर झेलमला पोटात कसंनुसं झालं. एवढे सगळे व्याप सांभाळत केव्हा लिहिते ही बाई. मग तिला आठवलं, सकाळची सगळी कामं आटोपली, बाबा बाहेर पडले की अर्धवट जाग्या झेलमला टेबलखुर्चीशी बसून तुफान वेगात आई लिहीत बसलेली दिसायची. कधी कधी ती थांबायची. कुठेतरी शून्यात बघत विचार करायची पुन्हा लिहायची. उठल्यावर आपण आईला वाचून दाखवायला सांगू असं ठरवून झेलम परत झोपून जायची आणि उठल्यावर विसरूनच जायची. कारण आई पुन्हा गृहिणी बनून कामाला जुंपलेली असायची. 

    झेलमने उत्सुकतेने अंक उघडला. कालिंदीच्या कवितेचं पान काढलं.

    एक छोटासा किडा मारताना

    दिसतो,

    आयुष्याबद्दलच्या विश्वासाने

    तुरुतुरु चालणा-याचा आपण

    किती सहज करतो, तो

    विश्वासघात!

    आपण मिळवलेली असते शाश्वती

    आपल्या उद्यापरवाची

    आपल्या पुढच्या पिढीचीही

    दुस-या जिवाबद्दल असतो आपण बेफिकीर

    तडफड मृत्यूची जरी असली तरी

    असते अगदी छोट्या आकारात

    आपलं मन असतं इतकं छोटं 

    की,

    गरम तव्याजवळ गोड पदार्थ ठेवताना

    इकडे आड तिकडे विहीर झालेल्या

    मुंग्या दिसत नाहीत,

    आपल्या छोट्याशा मनाला.

    आपल्या मनात मावूच शकत नाहीत

    विश्वातल्या इतर जीवांचे आकार.

    त्यांची सृष्टिनियमांप्रमाणे जगण्याची धडपड

    हलणारे जीवच जर दिसत नाहीत आपल्याला

    तर,

    आपण सहजपणे धडाधड आपटतो

    ती दारं खिडक्या,

    लाथेने उडवतो ते स्टूल

    कडकडा फांद्या मोडतो ती झाडं

    या सगळ्यांचे वेदनेचे हुंकार काय ऐकू येणार आपल्याला?

    कविता वाचल्यावर झेलम सुन्न झाली. तिला आईच्या कितीतरी गोष्टी आठवल्या, ज्या खूप खूप छोट्या होत्या पण किरकोळ नव्हत्या...

    एकदा तिला कुणीतही हिरवागार ‘ख्रिसमस ट्री’ गिफ्ट दिला. तो हातात घेऊन रिक्षाकडे जात असताना मागे कुणीतरी आहे असं वाटलं म्हणून तिने वळून पाहिलं. तर एक शेळी उभी होती. ती वळल्यावर ‘बेंऽ बेंऽ’ करून तिने तिच्याजवळच्या ख्रिसमस ट्रीबद्दल उत्सुकता दाखवली. कालिंदीला हसू आलं, ‘‘बायो गं, हे काही खरं नाही’’ असं म्हणून तिनं शेळीच्या नाकाजवळ ते झाड धरलं. शेळीनं ते हुंगलं आणि ‘तरीपण आम्हाला दुसरं काही...’ अशा अर्थाचं बेंऽ बेंऽ केलं. तेव्हा कालिंदीने एक हरब-याची पेंडी तिला घेऊन दिली. 

    कुत्री, मांजरी, शेळ्या सगळ्या तिच्याशी थेट संवाद साधत. कुणीही भुकेजलं पाहणं तिला शक्य होत नसे. भिका-यांना तर इतकं देत रहायची की त्यासाठी प्रसिद्ध झाली होती.

    एक दिवस दुपारी दार वाजलं. झेलमने दार उघडलं तर तान्ह्या बाळासारखं तोंडभर हसू घेऊन कालिंदी दारात उभी. सावळी कालिंदी, अत्यंत स्वच्छ धुतलेल्या, नीळ घातलेल्या कॉटनच्या साडीत धुतलेल्या कपड्यांचा एक खास वास आणि प्रकाश घेऊन आत आली. वर हसरे निष्पाप डोळे. त्याच्यातून ओसंडणारा एवढा आनंद कसला तर खरेदीचा.

    जादूच्या पोतडीसारखी गच्च भरलेली पिशवी तिने खाली ठेवली आणि म्हणाली, ‘‘पाहिलंस, मी काय आणलंय?’’

    झेलमने पाहिलं, तर काही नाही. रोजच्याच आवश्यक वस्तू. साबण, पावडर, पाण्याचा मग... फिकट आकाशी रंगाचा मग हातात उचलून ती म्हणाली, ‘‘याचा रंग बघ, किती छान आहे. प्रसन्न वाटेल रोज याला पाहिल्यावर. आणि हा साबण बघ. खूप दिवसांनी आज माझ्या आवडीचा साबण मिळालाय. आणि सर्वात छान म्हणजे हे बघ.’’ तिने एक पिवळी घडी उलगडली. सुंदर डिझाईनचं टेबलमॅट होतं ते.

    ‘‘आई, हे टेबलमॅट दिसतेय.’’

    ‘‘हो, सहाचा सेट असतो. पण मी एक घेतलंय सध्या. खूप आवडलं. आणि टेबल कुठेय आपल्याकडे?’’

    झेलमला वाटलं. टेबल कुठेय? तर कशाला घेतलं टेबलमॅट? पण सौंदर्यावर प्रेम करणा-या बाईला त्याचं काय?

    कपबशा स्टँडला लावताना त्या सर्वांचं डिझाईन एकाच दिशेला येईल याची ती काळजी घेते, पालकाची भाजी निवडताना एखादं छोटं, कोवळं पान आलं तर ‘‘झेलम, बघ ना किती छोटं पान’’ असं म्हणून ते बाजूला ठेवते. ती मोलकरणीशी प्रेमाने बोलते. फुलांशी, झाडांशी बोलते. शंकर, राम, विठ्ठल, गणपती कुणी तिला काही दिलं नाही तरी ती सगळे देव मुलं बाळं असल्यासारखी त्यांना स्वच्छ ठेवते. ती प्रेमचंद वाचते आणि तिला भुकेल्यांची भूक त्रस्त करते.

    तरी पप्पा म्हणतात, तिला काय xxx कळतंय. कळणं म्हणजे काय असतं! कुणाला काय कळत असेल, जगाच्या निबर कातडीखालचे प्रवाह कसे समजत असतील, कुठून जातात या प्रवाहांच्या धारा, कुठले असतात किनारे, कुठे असतात स्पंदनं? कुणाला समजते विश्वाच्या श्वासोच्छ्‌वासाची लय? कुणाचा प्रवास असेल किती खोलवर, आत आणि दूरवर, कोण कसं मापू शकेल?

    पप्पा म्हणतात, तसं नाहीय. तिला कळतंय, जे पपांना कळत नाही. तिला दिसतंय, जे पपांना दिसत नाही. जगण्याच्या कणाकणातून जाणवणा-या चैतन्याला तिने समजून घेतलंय म्हणूनच या संसाराने तिला फक्त उपेक्षाच दिली तरी तिची मुळं खोल रुजली आहेत या संसारात. वस्तूंचे आकार बिघडले की बिघडते त्यांच्या अस्तित्वातली लयसुद्धा! हे नेमकेपणाने समजलंय तिला. तिला आवडणारी स्वच्छता, उजेड या वरवरच्या गोष्टी नाहीत. संसारातल्या प्रत्येक गोष्टीची उजेडाकडे वळण्याची धडपड वाचता येते तिला. एवढं सूक्ष्मदर्शी तिचं कळणं आहे. पप्पांना यातलं काय कळणार?


सुजाता महाजन


***


No comments:

Post a Comment