देरसे...मगर समझे तो
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेळेचं वेगवेगळं व्यवस्थापन करावं लागतं.त्या त्या वेळच्या priorities वेगळ्या असतात ना म्हणूनच.नोकरी करत असतांना मुलगी लहान,थकलेल्या तरी नातीसाठी उत्साहानं धावपळ करणाऱ्या सासूबाई .घरी यायला होणारा उशीर म्हणून जाई जाईपर्यंत कामं उरकण्याची घाई. या सगळ्यातून मिळणारा निवांत वेळ म्हणजे जातानाचा तासभराचा ट्रेनचा प्रवास.त्यात मग जमेल तेव्हा वाचायचं,गाणी ऐकायची...हे सगळं कुणी गप्पा मारायला भेटलं नाही तरच बरं का .
एकदा का पोचलं काॅलेजला की सीन बदल..प्रकाश कटिंग दे पटकन् म्हणत चहाचा घोट घेऊन पळायचं लेक्चरला.एखाद दुसऱ्या गॅपने असलेली दिवसाची चार ते पाच लेक्चर्स...अधेमधे कलिग्ज बरोबरची अनुभवांची,नवं पाहिलेलं-वाचलेल्याची देवघेव.काॅलेजच्या -घरच्या कामांच्या गप्पा...यात दिवसच काय आठवडे कसे सरायचे ते समजायचंच नाही.... धावपळीचे पण जिवंत रसरशीत अनुभवांनी समृद्ध होते ते दिवस..नव्हे ती सगळीच वर्षे.
किती आणि काय काय केलं त्या दिवसांत..वाड्मय मंडळाचे कार्यक्रम, वादविवाद स्पर्धा,काॅलेज डे साठीच्या कमिट्या..मुलांची गाणी-नृत्याची तयारी.. मुलांच्या परिक्षा, बारावीचे पेपर तपासणं..नंतर आलेली माॅडरेटरची अन् शेवटची चीफ माॅडरेटरची जबाबदारी..हे सगळंच आनंदाचं,नवंनवं शिकवणारं होतं..याच काळात जवळचे झालेले मित्र-मैत्रिणी..त्याच्यां बरोबर केलेल्या पिकनिक, पाहिलेली नाटक-सिनेमा, केलेल्या पार्ट्यां..हे सगळं निवृत्ती नंतर जवळजवळ संपलंच की......
हे दुरावल्याची हुरहूर होतीच पण आता माझ्याकडे भरपूर वेळेचा खजिना आहे हा मोठा आनंदही होताच.मग धडाधड ट्रेक आखले अन् केलेही.देश -परदेशात उंडारुनही झालं.उदंड वेळ हाताशी असूनही हवं तसं वाचन,लेखन, सिनेमे-नाटकं बघणं होतं नाहीए हे खटकत होतं.कुठेतरी चुकतंय बरं गणित वेळेचं...हे जाणवत होतं पण ते सोडवायचं कसं हे मात्र उमगत नव्हतं.
अचानक फेसबुकवर कांचन दीक्षित यांच्या' स्त्रियांचे टाईम मॅनेजमेंट ' या कार्यशाळेची माहिती कळली.यांचे लेख मी नियमितपणे वाचत होतेच अन् आवडत,पटत ही होतेच मला.मग काय केली नोंदणी अन् शिरले विद्यार्थिनीच्या भूमिकेत.आठवड्याचे दोन दिवस. असे तीन आठवडे.सहा दिवसांचा कोर्स.प्रत्येक आठवड्यात दोन दिवस क्लास.पुढचा क्लासचा दिवस येईपर्यंत दिलेला अभ्यास करणं अपेक्षित.
पहिला आठवडा : घरासंदर्भातील प्लॅनिंग.
दुसरा आठवडा : करिअर-घर आणि नातेसंबंध.
तिसरा आठवडा :Self Care, health & goal setting.
खूप नवनवीन संकल्पनाची ओळख तर झालीच पण परिचित बाबींकडे नव्यानं बघण्याचा चष्माही सापडला.पोमोडोरो टेक्निकने स्वत:वर कामाचं दडपण न आणता वेळेत कामं उरकता.... नाही नीटसपणे पूर्ण करता येऊ लागली.' प्लॅनिंग करा पण परवाचं ' यानं तर अचानक करावा लागणारा बदल सोपा झाला.समोरचा न बोलता समजून घेईल अशी अपेक्षा करणं चुकीचंच.म्हणूनच Speak Out हे तर सुखी समंजस सहजीवनासाठी महत्वाचंच,नव्यानं उमगलं .छोट्या छोट्या गोष्टींसाठी, केलेल्या मदतीसाठी इतरांचं आणि स्वत:चंही कौतुक केलं तर उत्साह वाढतोच,हा झालेला साक्षात्कार. "छोटे छोटे बदल हळूहळू करत जाणं वा दररोज सातत्यानं थोडा थोडा बदल करणं "या कायझन विचारांचं महत्व पटलं... रुजवलं..कृतीत आणलं.
माझ्यातल्या हाडाच्या शिक्षिकेनं Wheel Of Life ,Vision Board, Priority List Chart या सगळ्या गोष्टींचा मनापासून अभ्यास केला.अन् विद्यार्थ्यांच्या भूमिकेने तो कागदावर, डायरीत उतरवून काढण्यात टंगळमंगळ केली.
कोणताही प्रवास,अगदी शिकण्याचाही प्रवास हा फक्त प्रवास नसतो.तो अनुभव असतो,वेगळ्या जगाची ती ओळख असते.आपल्याला काही शिकवणारी. It's A Journey Of Life.
कळीचा मुद्दा हा आहे की या निमित्तानं,पटलं की आपलं पहिलं नातं स्वत:शी असतं.आपलं आपल्याशी ट्युनिंग असलंच पाहिजे..झालं पाहिजे .हे जमतं ते नियोजनाच्या शिकवणीनं अन् कृतीत आणण्यानं.असं म्हणतात कोणतीही सवय लागण्यासाठी ती गोष्ट सातत्याने एकवीस दिवस करावी लागते.खरंय ते.. मलाही यातल्या अनेक गोष्टींची सहज सवय झाली.कामं करायची तर आहेतच ना मग ती प्रेमानं ,मनानं ठरवलेल्या वेळेत संपवता येऊ लागली.स्वत:साठी, छंदासाठी वेळ शिल्लक राहू लागला.कधीतरी उजाडतो एखादा उनाड दिवस..सगळं सोडून वाचन, सिरियल वा सिनेमा बघण्यात तासन् तास जातात भर्रकन...बिघडतं गणित कामांचं..हेही चलता है!! म्हणून सोडून द्यायला शिकवलंय याच नियमनाच्या कार्यशाळेनं...
No comments:
Post a Comment