किराणे आणि आराधना... पर्यटन क्षेत्राचा इतिहास जणू.... ( भाग २ )
१९८३ साली पूर्वांचल - सेव्हन सिस्टर्सच्या ह्या भागांत सहली नेणारी ' आराधना ' ही एकमेव पर्यटन संस्था होती , आजही आहे !
१९८० च्या दशकांत आशियातील सर्वात मोठा ग्रुप आफ्रिकन सफारीला नेण्याचा मान ' आराधना' ला मिळाला. १९८९ मध्ये ' मॉरिशस ' ला सुरुवात केली. पहिलाच ग्रुप ८० जणांचा ! मात्र १९९१ च्या मॉरिशसमधील जागतिक मराठी परिषदेचे आयोजन शरदकाकांकडे येण्याचं थोडक्यात हुकलं, त्याची सल त्यांचा मनात अनेक वर्षं होती .
त्यानंतर व्हिएतनाम सुरू केलं.
पर्यटन व्यवसायात अनेक नवनवीन स्थळं आणि संकल्पना शरदकाकांनी आणल्या. त्यापैकी एक - वर्षारंभाची अष्टविनायक सहल... प्रतिवर्षी १ जानेवारी ते ५ जानेवारी... पुण्यात ४ रात्र मुक्काम आणि ४ जानेवारीला रात्री गाण्याची मैफिल ! मैफिलीला आणि काका काकूंना भेटायला पुण्यातील इतर मंडळीही येत.
अशीच ' आराधना ' ची वर्षासहल... दिवसभर पावसात नाहीतर धबधब्याखाली आणि मग रिसॉर्टमध्ये धमाल, खाण्यापिण्याची रेलचेल आणि उत्तमोत्तम गाण्यांची बरसात...
१९९४च्या वर्षासहलीत आपले दोन्ही सुपुत्र या व्यवसायात येत असल्याचं निवेदन किराण्यांनी केलं ! त्यानंतर यथावकाश पुण्यालाही शाखा निघाली.
शहरातील पर्यटकांना खास गुळभेंडी जातीचा हुर्डा खायला घालण्यासाठी हुर्डा पार्टी सुरु झाली. देहू – आळंदी स्थलदर्शनासह आळंदीतल्या एका शेतातच राहुट्यांमध्ये मुक्काम , खास शेतावरचं गावरान जेवण , रात्री चांदण्यांत गाण्याची मैफिल... आणि पहाटे पहाटे लसूण चटणी, दही, शेव ह्यांसह गरम गरम हुर्डा.... असा एकूण थाट असायचा.
१९९४ साली ' शरद किराण्यांबरोबर युरोप बघण्यासाठी चला' एवढ्या एका छोट्या जाहिरातीवर युरोपचा अख्खा सीझन भरण्याची किमया ह्या अवलियाने करून दाखवली.
आजच्या तुलनेत तेव्हा या सहली नेणं खूपच कष्टाचं आणि जिकिरीचं होतं.
गेल्या शतकातील तीनही खग्रास सूर्यग्रहणांच्या सहली मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने काकांनी आयोजित केल्या होत्या. १९९९ ची कच्छचे रण इथली सहल विशेषच ! तिथे अनेक कुशल कारागीर आहेत. सहलीतल्या ३५० पर्यटकांना वेळ न घालवता हे सर्व बघायला मिळावे , म्हणून त्यांनी ५०-६० स्टॉलचे कलाग्राम उभारले. मनसोक्त खरेदी , सोबत लोकगीत - लोकनृत्याचे सादरीकरण !
सहलीला शास्त्रज्ज्ञांचं मार्गदर्शनही होतं. वेगवेगळ्या गटांना काही ना काही चाचण्या करायला दिल्या होत्या. त्याची निरीक्षणं सर्वांना कथन केली. शिक्षण आणि मनोरंजन... दोन्हीचा मिलाफ झाला.
.....आणि १९९९ साली आराधनाच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला... चीनला पर्यटक नेणारी पहिली प्रवासी संस्था म्हणून ' आराधना ' ची ओळख पर्यटनविश्वाला झाली... ' चीनमध्ये आहे काय ' ? इथपासून ते ' तिथे आपलं शाकाहारी जेवण कसं मिळणार ? ' इथपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरं लोकांना पहिल्याच सहलीने दिली. पर्यटकांना चीन कसा वाटतो हे ऐकण्याकरता चिनी वकिलातीने एक पत्रकार परिषद घ्यायला लावली... आणि ' आराधना' चं... पर्यायानं शरद शीला किराणे यांचं कौतुक केलं. तीच गोष्ट २००२ सालच्या ' व्हिएतनाम - कंबोडिया - इंडोनेशिया ' सहलीची... अशा अनेक अनोख्या सहली आराधना ' नी पर्यटनविश्वाला दिल्या...
अगदी सुरुवातीपासूनच शरदकाकांनी ह्या व्यवसायाकडे भरपूर नफा कमावण्याचे साधन ह्या दृष्टीने पहिले नाही. मुलांनाही तसेच संस्कार दिले . ,' शरदकाकांनी हे केलं ' असं म्हणताना ' शीलाकाकूंच्या सहभागाने ' हे वेगळं सांगायला नको.
सेव्हन सिस्टर्स , संपूर्ण राजस्थान, संपूर्ण मध्य प्रदेश.. या सहली तर आजही फक्त आराधनाचीच खासियत आहे. ' शरद किराणे ही एक व्यक्ती नसून संस्था आहे…!' हे पर्यटकांचे शब्द ह्याला दुजोराच देतात. जैसलमेरच्या वाळवंटात त्यांनीच प्रथम तंबू उभारले ; ते मात्र त्यावेळी लोकांच्या पसंतीस फारसे उतरले नाहीत.
समव्यावसायिकांशी स्पर्धा करणं त्यांनी टाळलं. हातचं राखून न ठेवता हवं त्याला मार्गदर्शन केलं. मोनोपोली किंवा सिग्नेचर सहलींमधून खोऱ्याने पैसा ओढणें... प्रसिद्धी मिळवणे... ह्या साऱ्यापासून शरदकाका दूर राहिले. चांगली माणसं जोडणं , व्यवसायाशी प्रामाणिक राहून वेगळ्या वाटा चोखाळणं , पर्यटकांच्या चेहऱ्यावर तृप्तीचा आनंद बघणं... ह्यावर त्यांनी नेहमीच भर दिला.
त्याकाळी सर्वांना गरजेचं वाटणारं उत्तम कौटुंबिक वातावरण, नेहमीच हवंहवंसं उत्कृष्ठ भोजन , अत्यंत कठीण - अवघड अशा सहलीचेही उत्तम नियोजन हे शरदकाकांच्या व्यवसायावरील निःसीम प्रेमामुळेच शक्य झालं.
आपल्या तब्येतीमुळे शीलाकाकूंना फिरतीचं काम तुलनेनं लवकर बंद करावं लागलं. मात्र सतत खणखणणारा फोन आणि इतरही कामं आपली मुलं व्यवसायात येईपर्यंत त्यांनी संभाळली. काकांनी शेवटची सहल २००९ मध्ये नेली , त्यानंतर मात्र निवृत्ती स्विकारली.
असे मितभाषी, हसरे, माणूसवेडे शरदकाका लॉकडाऊनच्या काळात ९ एप्रिल २०२० रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी अतिदूरच्या प्रवासाला निघून गेले , ५०-५५ वर्षांच्या अनुभवाचं गाठोडं बरोबर घेऊन... मंदार किराणे यांच्याकडे सर्व धुरा सोपवून ! पर्यटन व्यवसायाचा इतिहासच रचला त्यांनी !
समाप्त
*******
स्वाती कर्वे
No comments:
Post a Comment