एक गोंडस मुखवटा, स्वतःहून परीधान करतो चेहरा,
यथावकाश, तो मुखवटाच चेहऱ्यावर गाजवू लागतो दरारा!
घराच्या चार भिंतींपलीकडे तर, त्याचा भारीच जाचक असतो पहारा,
इतका की, चेहऱ्याला कधी कधी पडतो संभ्रम, मी खरा की हा मुखवटा खरा?!
कधीतरी उद्विग्न होऊन चेहरा करू पाहतो मुखवट्याचा त्याग,
वाकुल्या दाखवत मुखवटा, कळत-नकळतपणे घडलेल्या चुकांचा, पापांचा धमकीवजा काढू लागतो माग!
चेहरा मुखवट्याला पुन्हा नव्याने जातो शरण,
छद्मी हसत मुखवटा म्हणतो, "मी असणार आहे अविनाशी, जरी तुला आले मरण!
तुझ्या मरणापरांत, मी उजळती ठेवीन तुझी प्रतिमा,
जर लांघल्या नाहीस मी आखून दिलेल्या सीमा!"
परीणामी, मुखवटा बनून राहतो, चेहऱ्याचं अभिन्न अंग,
मुखवटा विहीन चेहरा विरळाच, जसा असतो एखादाच मलंग!!!
आकांक्षा
No comments:
Post a Comment