पाठांतर स्पर्धा झाली आणि मग सगळ्यांनाच गुरुपौर्णिमेचे वेध लागले. कोणतेही शिक्षण घेतांना योग्य गुरु मिळाले की शिकण्याचा आनंद काही वेगळाच असतो. गीता संथा वर्गाच्या सर्वच शिक्षिका अत्यंत आत्मीयतेने, सुंदर पद्धतीने प्रत्येकाला या अभ्यासाची गोडी लागेल अशाच पद्धतीने शिकवितात. अशा गुरुंचे पूजन हा एक आनंददायी सोहळा असतो. गीता संथा वर्गात याला जोडूनच एक उपक्रम असतो. आपल्याला जी व्यक्ती गुरुतुल्य वाटते त्यांचे शब्दस्मरण शक्यतो प्रत्येकानेच वर्गात दहा मिनिटे करावे अशी अपेक्षा असते. आधीच्या २, ३ वर्षात कोणाकोणावर बोलले गेले त्यांचा नामोल्लेख मिळतो. शक्यतो ते सोडून इतर व्यक्तीविशेष निवडावा असा उद्देश असतो. आपल्याला सुचत नसल्यास शिक्षकही अशा अनेक व्यक्तींची नावे, त्यांच्या बद्दलची विशेष माहिती स्वतः देतात. काही पुस्तके, काहींच्या भेटी सुचवतात.
यंदाच्या वर्षी आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विशेष व्यक्ती पुढील प्रमाणे होत्या. शारदा माता, स्वामी विवेकानंद, संत तुकडोजी महाराज, सावित्रीबाई फुले, गोंदवलेकर महाराज, वासुदेव बळवंत फडके, समर्थ रामदास, संत एकनाथ, महर्षि कर्वे यांच्या पत्नी बाया कर्वे, आद्य शंकराचार्य आणि मी निवडल्या होत्या माझ्यासाठी कायमच आदराचे, श्रद्धेचे स्थान असलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या आद्य संचालिका वं. मावशी केळकर.
या निमित्ताने इतक्या जणांच्या काही माहीत असलेल्या विशेषांची उजळणी झाली तर काही खरोखरीच नव्याने परिचित झाले. ज्यांनी ज्यांचा परिचय करुन दिला त्यांना तर त्या व्यक्तिमत्वाबद्दल अधिक सखोल माहिती करुन घेता आली. वेगळा दृष्टिकोन, वेगळ्या विचारांचे प्रवाह अनुभवता आले. आपला माहितीचा परिघ विस्तारला असे वाटले प्रत्येकीलाच.
एरवी घंटाभर बडबड करणारे आपण एका विषयाला धरुन, मुद्देसूद, न अडखळता, दिलेल्या वेळात नेमके किती आणि कसे बोलावे याचा हा एक अभ्यास होता जणू. आदर्श वाटणाऱ्या व्यक्तींचे कितीतरी पैलू असतात. त्यातले नेमके निवडून, त्याला अनुरुप त्यांच्या आयुष्यातले, विचारांचा मागोवा घेणारे प्रसंग थोडक्यात सांगणे ही एक कसोटीच असते.
पाठांतर स्पर्धेसारखी यावेळी मात्र गती झाली नाही. प्रत्येकीनेच सहभाग घेतला. एकतर याला आधी स्पर्धेचे स्वरुप नव्हते. मनमोकळा संवाद, हितगुज, प्रत्येकाला निवडलेल्या विषयाबद्दल आस्था अशा जमेच्या बाजू होत्या. वेळेची मर्यादा होती पण अगदी काटेकोर नव्हती. दोन पाच मिनिटे कमी वा अधिक सवलत मिळाली. त्यामुळे कार्यक्रम उत्तम झाला. अन्य वर्गातील शिक्षिका ऐकायला आल्या होत्या. त्यांनी मुद्दे नोंद करतो असे सांगून प्रत्येकीच्या विषयाची मांडणी, बोलण्याचा ओघ, समाविष्ट केलेल्या घटना व आजच्या काळात आपण त्यातले काय अनुसरावे याबद्दलचे मांडलेले मत या गोष्टी गृहीत धरुन गुण दिले. आणि तीन जणींची नावे जाहीर केली. वासुदेव बळवंत फडके – निर्मला वैद्य. संत तुकडोजी महाराज – सुलभा कुलकर्णी. वं. मावशी केळकर – पद्मा दाबके.
गीताधर्म मंडळात पितृपंधरवड्यात होणाऱ्या ऋषी स्मरण या कार्यक्रमांत या तीघींना त्यांनी निवडलेल्या विषयावर आता एक तास बोलण्याची संधी मिळणार आहे असे सांगितले. एकीकडे आज आपले उत्तम झाले याचा आनंद वाटला पण त्याचबरोबर एक तास बोलणे शक्य होईल का तेही अनोळखी, जाणकार श्रोत्यांसमोर याचे दडपणही आले. तयारीला साधारण महिना होता. सगळ्यांचे उत्तम सहकार्य होते त्यामुळे हे धाडस करायचे असे ठरविले. माझ्या समकालीन असणाऱ्या अनेक जणी मावशींच्या चरित्राबद्दल अनभिज्ञ आहेत याची जाण मला यावेळी झाली. पुढच्या पिढीतील महिलांना तर ते फारच कमी प्रमाणात ज्ञात असेल असे वाटते. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल गीताधर्म मंडळात जे बोलले तेच आज तुम्हा सर्वांसाठीही सादर करीत आहे.
अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानांजनशलाकया। चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवेनम:॥
उपस्थित सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ मान्यवरांना आदरपूर्वक प्रणाम आणि श्रोत्यांना सस्नेह नमस्कार. या पंधरवड्यात आपण गुरुतुल्य व्यक्तींसाठी त्यांच्या संस्मरणरुपाचा हार गुंफीत आहोत. त्यात मी एक कमलपुष्प ओवण्याचा प्रयत्न करणार आहे. आधी मी एक घटना सांगणार आहे.
१५ ऑगस्ट १९४७ हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य देण्यासाठी मुक्रर झाला खरा, पण त्याचवेळी या भूमातेचे विभाजन होणार हेही नक्की झाले. आणि त्या गोष्टीचा विपरित परिणाम म्हणजे अत्यंत दुर्वृत्तीच्या माणसांनी लांछन लागेल असे वर्तन आरंभिले. सिंध प्रांतातील महिलांना त्या झळीचे चटके जाणवू लागले. त्यामुळे सिंध प्रांतातील महिला अतिशय घाबरुन गेल्या. ज्यांनी आतापर्यंत भारतीय त्याग संस्कृतीत जीवन व्यतीत केले होते त्यांना आता भोगवृत्तीच्या शासनाखाली रहावे लागणार होते. अशावेळी जेठी देवानी यांनी अत्यंत हृदयस्पर्शी पत्र मावशींना पाठवले. आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे झालेले ज्ञान, त्याचे परिणाम आणि त्यावर काय करायला हवे याचे साध्या, सोप्या पण मोजक्या शब्दांत केलेले निवेदन मी आपणांस तसेच्या तसे वाचून दाखवणेच उचित समजते. [त्या पत्रात त्या लिहितात - “ वंदनीय मौसीजी, सादर प्रणाम। आपहीके मार्गदर्शन के कारण हिंदूभूमी के इस अति दूरवर्ती प्रदेशकी बहनोंने हिंदुत्व याने राष्ट्रीयत्व इस विशुद्ध भूमिका को समझकर हिंदू स्त्रियोंका संघटन करनेका ध्येय सामने रखा है और पहली बार वह सब हिंदू नारीयाँ आपसमें धर्म और संस्कृती के अतूट बंधन जाननेपर अतीव आनंद को अनुभव करने लगी है। पर अब दुनिया जानती है की भारतीय स्वातंत्र्यता के महान सुखद क्षण के समयहि हम सिंधवासियोंपर कितनी बडी आपत्ती आयी है। अब हमे सिंध छोडनाही पडेगा, यह बात बुल्कुल स्पष्ट होती रही है। क्योंकी हमारी मातृभूमी अब मुसलमानोंकी भोगभूमि बन रही है। हम चाहते थे कि इसी भूमि मे रहे; पर अब वह बिल्कुल असंभवसा प्रतीत होता है। मौसजी, सिंध की सब सेविकाएँ चाहती है की भारत वर्ष का विभाजन होनेसे पहले आप एकबार हमारे बीच आ जाये। ताकि पवित्र सिंधको साक्षी रखते हुए आपकी महान उपस्थिती मे हम इस महान देश के प्रति हमारी जिम्मेदारीयाँ निभाने के लिए प्रतिज्ञाबद्ध हो जाए। आपका यहाँ आना इसलिए जरुरी है की बिदाई के अति कठीन समय पर आप जैसी प्रेमदायी, धैर्यदायी माता के उपस्थिती में दुख का बोझ हलका महसूस होगा और भविष्यके कर्तव्य की ओर निर्भयतासे बढने की प्रेरणा मिलेगी। क्या आप हमारी आरजू पुरी करेंगीॽ”] मावशींनी हे पत्र वाचले. जेठी देवानीं यांची भावना अशी होती की मावशींची जर एकदा भेट झाली तर येईल त्या परिस्थितीत जुळवून घेण्याचे धैर्य आम्हा सेविकांना नक्की मिळेल. मावशींनी त्यांची ही मनोवस्था जाणली. मनाशी काही निश्चय केला व वेणुताई कळंबकरांना बोलावून घेतले आणि पत्र वाचायला दिले. वेणुताईंनी पत्र वाचले आणि मावशींकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मावशी ठामपणे म्हणाल्या,“ आपल्याला कराचीला जायलाच पाहिजे.” वेणुताई म्हणाल्या, “मावशी, देशाची परिस्थिती फारच बिघडली आहे, जरा विचार करायला पाहिजे.” मावशींनी सांगितले हो विचार करु या पण जाण्याचाच. मग मावशींनी अत्यंत खंबीरपणे, योग्य त्या तजवीजीसह कराची दौरा आखला.
त्या परिस्थितीत कराचीला जाणे ही साधी सोपी, सहज गोष्ट नव्हती. संपूर्ण विमानात मोजकीच हिंदू माणसे होती. त्यातली बाकीची अहमदाबाद येथे उतरली. सगळ्या मुस्लीम प्रवाशांत या दोनच हिंदू महिला. विपरित घोषणाबाजी चालू आहे. विपरित संवाद कानांवर पडताहेत. परिस्थिती काय उद्भवेल याचा काहीच भरवसा नाही. अशावेळी मन किती स्थिर पण सावध ठेवावे लागले असेल त्याचा अंदाज आपण आज कल्पनेनेच करु शकतो. ज्यांनी ती मनःस्थिती अनुभवली असेल त्यांच्या मनोनिग्रहापुढे खरोखरच नतमस्तकच होऊ शकतो आपण. त्या दोघी कराचीला पोचल्या. मावशींच्या लेक जावयाने त्यांचे स्वागत केले. संपूर्ण हकीकत विचारली तेव्हा कळले मावशींनी नऊवारी पातळाच्या ओच्यात जंबिया लपविला होता. खरोखरच त्यांची दूरदृष्टी आणि हिंमत अनेक प्रसंगी दिसून येतेच.
१४ ऑगस्टच्या रात्री कराचीतीलच एका मोठ्या गच्चीवर १२०० सेविका एकत्रित झाल्या. आपल्या हाकेला ओ देऊन मावशी अशा कठीण परिस्थितीत उपस्थित झाल्याचा आऩंद आणि विश्वास सेविकांना वाटत होता. रात्र अंधारी होती पण त्यांचा उत्साह मात्र नवा प्रकाश दाखवत होता. प्रत्येक सेविकेने आपले रक्त पवित्र अशा भगव्या ध्वजाला वाहून मावशींच्या धीर गंभीर स्वरातील प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. मावशींचा मोजक्या शब्दातील भ्याडासारख्या वागू नका, धीर सोडू नका, आपले शील जपा हा अर्थ सांगणारा उपदेश सेविकांनी मनोभावे ग्रहण केला व त्याप्रमाणे वागू, जीवात जीव आहे तोपर्यंत कसोटीला उतरण्याची, ह्या भूमीची सेवा करण्याची तयारी दर्शविली. त्याच वेळी त्या बैठकीतील काही पालकांनी मावशींना विचारले. “जर तसाच काही बांका प्रसंग उद्भवला तर आम्ही आमच्या मुलींना कोठे धाडावेॽ” क्षणाचाही विलंब न लावता मावशी म्हणाल्या, “तुम्हाला असा प्रश्न का पडलाॽ भारतातील प्रत्येक सेविकेचे घर तुमच्यासाठी उघडे आहे.” आणि खरोखरच अशी जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली. कराचीहून “आम्ही आमचे संरक्षण कसेही करु पण आमच्या मुलींचे तुम्ही रक्षण करावे” अशी विचारणा झाली. मावशींनी “मुलींना पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करु.” असे त्वरित उत्तर दिले.
१९४७ च्या डिसेंबर महिन्यात कराचीहून १०० मुली मुंबई बंदरात उतरल्या. त्या सर्व जणींच्या राहण्याची सोय सेविकांनी घराघरातून केली. एकेका घरात २,३ मुली आपल्या स्वतःच्या नातेवाईकच आहेत इतक्या विश्वासाने, प्रेमाने राहिल्या. केवळ दोन चार दिवस, एकादा महिना नव्हे तर वर्षभरापेक्षा अधिक काळही. जेव्हा त्यांचे नातेवाईक भारतात परतले तेव्हा त्यांना त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
कल्पना करा ज्या मुलींना पूर्णतः अनोळखी आहेत, आपण त्यांना परत कधी भेटणार हे माहीत नाही, अशा स्थितीत आपल्या मुलींना परक्या घरी केवळ मावशींच्या व त्यांच्या सहकाऱी असलेल्या सेविकांच्या विश्वासावर त्या पालकांनी पाठवल्या. आणि ज्या मुलींची ओळखही नाही, त्या मुलींचे पालक कधी परत येतील याचा काहीच अंदाज नाही, अशा मुलींना आपल्याकडे ठेवून घेण्याने आपल्यालाही धोका असणार हे माहीत असतांना ज्या सेविकांनी त्यांना आपल्या घरी घरचेच सदस्य आहेत या भावनेने सामावून घेतले त्याला खरेच तोड नाही. आजही जेव्हा कोणत्याही मुलीला आपल्या घरी ठेवून घेण्याची वेळ येते तेव्हा काय काय आणि कसे कसे विचार ऐकायला मिळतात, केले जातात याची आपल्याला कल्पना आहे. त्या पार्श्वभूमीवर या गोष्टींचा विचार केला तर मावशींनी. उभ्या केलेल्या संघटनेचे कार्य, त्यांमधून मिळालेले संस्कार याबद्दल सेविकांना सार्थ अभिमानच वाटतो.
यातील वं. मावशी म्हणजेच राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका, आद्य संचालिका लक्ष्मीबाई पुरुषोत्तम केळकर. पूर्वाश्रमीच्या कमल दाते. जन्म ६ जुलै १९०५ आषाढ दशमी. नऊ भावंडात मावशींचा द्वितीय क्रमांक असला तरी वडील बंधू अल्पवयातच निधन पावल्याने भावंडात मोठेपण आपोआपच त्यांचेकडेच आले. नागपूरला त्याकाळाला अनुरुप व उपलब्ध असलेल्या शिक्षणाच्या संधीत प्राथमिक शिक्षण वॉकर रोडवरच्या सरकारी शाळेत तिसरी पर्यंत, चौथीचा काही काळ महाल विभागातील ख्रिश्चन शाळेत व नंतर दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथे झाले.
मावशींचे वडील सरकारी नोकरीत असल्याने त्यांना त्यांच्या नावावर केसरी वर्तमानपत्र मागवता येत नसे. त्यामुळे यशोदाबाईंच्या म्हणजेच मावशींच्या आईच्या नावावर मागवत. यशोदाबाईही दुपारच्यावेळी आसपासच्या महिलांना एकत्र करुन त्याचे सामूहिक वाचन करीत. वर्तमानपत्र आपण सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारातूनच मागवता या चौकशी अधिकाऱ्याच्या प्रश्नाला यशोदाबाईंनी निर्भयपणे उत्तर दिले होते की मी त्यांच्या पगारातून ते मागवत नाही तर मला घरखर्चाला दिलेल्या पैशातील काही रक्कम वाचवते. ती माझी कमाई असते. त्यातून मी केसरीची वर्गणी भरते. अशा घरात घडलेल्या प्रसंगातून त्या काळात घडत असलेल्या घटनांचा, त्यावर घरातील व्यक्तींच्या प्रतिक्रिया, आजूबाजूच्या परिसरात घडणारे प्रसंग या सर्वांचा कळत न कळत परिणाम लहानग्या कमलवर निश्चितपणे झालेला दिसतो. आईवडिलांकडून मिळालेले कौटुंबिक संस्कार, सामाजिक जाणीव याचे बाळकडूही मावशींना समृद्ध करते झाले.
वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी म्हणजे १९१९ साली विवाह होऊन वर्ध्याला केळकरांच्या संयुक्त कुटुंबात दोन मुलींची आई या नात्यासह त्यांचा प्रवेश झाला. होय मावशींचा विवाह एन्फ्ल्युएंझाच्या साथीत प्रथम पत्नी निवर्तल्याने विधुर झालेल्या दोन मुलींचे पिता असणाऱ्या पुरुषोत्तमरावांशी झाला.
इ. स. १९२० ते १९३२ या कालावधीत सहा अपत्यांची प्राप्ती, कुटुंबातील काही सदस्यांचे अकाली निधन झाले. त्यातच त्यांचे पती पुरुषोत्तम यांचेही क्षयरोगाने निधन झाले. आज आपल्याला अनेक रोगांवर उपचार सहज उपलब्ध आहेत पण त्या काळात प्लेग, क्षय, एन्फ्लुएंझा हे आजारही जीवघेणेच ठरत होते. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी वैधव्य, स्वतःच्या सहा मुलांची व सावत्र दोन मुलींची जबाबदारी सांभाळण्याची वेळ मावशींवर आली. यात एक चांगली गोष्ट होती की त्यांच्या मोठ्या जाऊबाई ज्यांना उमाकाकू असे संबोधिले जाते त्या मावशींशी अगदी सख्या बहिणीप्रमाणे व्यवहार करीत. जशी पुरुषाच्या कर्तृत्वामागे त्याच्या पत्नीचा∕स्त्रीचा पाठिंबा असावा लागतो. त्याचप्रमाणे नव्हे तर त्यापेक्षाही अधिक पाठिंबा घरातील एकादी स्त्री जेव्हा समाजासाठी काही काम करते तेव्हा घरातील दुसऱ्या स्त्रीयांचा असणे, सहकार्य असणे आवश्यक असते.
केळकरांची तीन ठिकाणी असलेली शेती त्यांची अन्नधान्याच्या आवश्यकतेची पूर्तता करीत असली तरी बाकी गोष्टींसाठी लागणारा रोख पैसा उभा करण्यासाठी त्या काळाचा विचार केला तर मावशींनी एक धाडसाचा निर्णय घेतला आणि त्यासाठी आपले स्त्रीधन विकले. त्या पैशातून महिना ४०० रु. रक्कम मिळेल अशी बिऱ्हाडांची सोय राहत्या घरात करुन घेतली. त्यावेळच्या समजुतींनुसार अनेकांनी त्यांना त्याबद्दल नावे ठेवलेली असणार. पण एकदा जो निर्णय विचारपूर्वक घेतला त्यावर ठाम राहण्याचा व चुकीच्या प्रचलित गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा मावशींचा गुण त्यांच्या सर्व कार्यात प्रामुख्याने दिसतो.
या सर्व प्रापंचिक गोष्टी घडत असतांनाही मावशींचे लक्ष देशांत, समाजात चाललेल्या विविध घटनांकडे बारकाईने होते. आणि त्यावर विचारही करीत होते. आपलीही काही जबाबदारी समाजाप्रती आहे याची जाणीवही त्यांना होत होती. विविध प्रकारचे वाचन, समाजातील घटकांशी विचार विनिमय याद्वारे जणू काही अभ्यास होत होता. स्वातंत्र्य लढ्यात अविभाज्य ठरलेले पिकेटींग, प्रभात फेऱ्या, टिळक, म. गांधी, इ. नेत्यांची भाषणे ऐकणे यात मावशी सहभागी होत असल्या तरी यापेक्षा समाजातील महिलांची स्थिती व जबाबदारी काही वेगळी असावी असे त्यांना वाटत असे. असेच विवेकानंदांचे चरित्र वाचतांना इंग्लंडमध्ये जमलेल्या तरुणांना उद्देशून विवेकानंद म्हणाले, “निष्ठेने जीवन समर्पित करणारे दहा तरुण मला मिळाले तर “कृण्वन्तो विश्वम् आर्यम्” ही उक्ती कृतीत आणणे काही अवघड नाही.” विवेकानंदांच्या या उद्गारांवर भगिनी निवेदिता म्हणाल्या की, “स्वामी त्या तरुणात मी असेन नाॽ” यावर स्वामीजींनी सांगितले की, “गरुड कितीही बलवान असला आणि त्याला भरारी घ्यायची असेल तर त्याचे दोन्ही पंख बळकट असले पाहिजे. एका पंखावर तो उडू शकत नाही.” भगिनी निवेदिता व विवेकानंदांमधील संवाद मावशींना आपल्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी सहाय्यभूत झाला. आपले राष्ट्र सक्षम व्हायला हवे असेल तर पुरुषांइतकीच स्त्री सक्षम व्हायला हवी. जी आजच्या परिस्थितीत दिसत नाही. यासाठी काय करायला हवे हा विचार मावशींच्या मनात सुरु झाला.
मावशींच्या विचारांना पूरक असे संघकार्य त्यावेळी सुरु झाले होते. डॉ. हेडगेवारांना आम्हा स्त्रियांनाही तुमच्या संघटनेत सहभागी होऊ द्यावे यासंबंधी मावशी आग्रह करीत होत्या. पण डॉ. नी आपला उद्देश फक्त पुरुषवर्गांसाठीच आहे हे स्पष्ट केले, पण त्याचबरोबर तुम्ही स्वतंत्रपणे महिलांसाठी संघटना करु शकता असेही सुचविले. दोन्ही संघटना एकमेकांना पूरक असतील पण स्वतंत्र असतील ही दिशा ठरली. मग मात्र मावशींनी त्यासाठी योजना तयार केली. हळूहळू मुलींसाठी दैनंदिन एकत्रीकरण, प्रौढ महिलांसाठी साप्ताहिक एकत्रीकरण, भजनाचे वर्ग, या पद्धतीने वर्ध्यात सुरु झालेल्या कार्याप्रमाणे इतर गावी, अन्य प्रांती व देशभर महिला एकत्र येऊ लागल्या. विशिष्ट वेळी, विशिष्ट स्थानी, विशिष्ट वेळ मुलींनी, महिलांनी एकत्र येऊन भारत माता आपली आई व आपण तिच्या मुली आहोत हा भाव दृढ होईल, जे आहे ते समाजाचे, समाजाकडून आपल्याला मिळालेले. ते सर्व समाजालाच अधिक सुंदर, सार्थ करुन अर्पण करायचे हा भाव पक्का होईल याचा विचार करुन एकत्रीकरणासाठी उपक्रम योजले. त्यासाठी संपर्कात आलेल्या प्रत्येक महिलेच्या अंगी असलेले गुण मावशींनी टिपले, त्यांना उत्तेजन दिले आणि सर्वांच्या सहकार्याने सुसूत्र अशी व्यवस्था तयार झाली.
दैनंदिन एकत्रीकरणात अगदी लहान वयाच्या बालिकांपासून ते महाविद्यालयीन तरुणींपर्यंत प्रत्येकीला सहभागी होता येईल असे खेळ, गाणी, गोष्टी यांच्या माध्यमातून पूर्ण व्यक्तीविकास होईल अशा प्रकारे रचना केलेली दिसते. स्त्रीला देवता म्हणून डोक्यावर बसवू नये तसेच पायाची दासी म्हणून कमीही लेखू नये. राष्ट्र निर्माणाच्या कामी ती बरोबरीची सहकारी असावी असाच मावशींचा दृष्टीकोन असलेला दिसतो.
By
Padma Dabke
Pune, India
No comments:
Post a Comment