बंगालमधील एका घटनेने या दैनंदिन कार्यक्रमात आणखी एका उपक्रमाची जोड दिली गेली. एका गावात कुसुमबाला हिचा पती समवेत असतांनाही काही टारगट व्यक्तींनी तिच्यावर अत्याचार केलेला ऐकल्यानंतर मावशींनी प्रकर्षाने मुलींनाही स्वसंरक्षणासाठी सर्व प्रकारच्या व्यायामांची गरज आहे याबद्दल आग्रह धरला आणि संघस्वयंसेवकांनीही सहकार्य देत मावशींचा मनोदय प्रत्यक्ष कृतीत उतरविला. आजही त्या गोष्टींची नितांत गरज आहे हे वेगळे सांगायला नकोच.
१९२९ ते १९३६ या काळात पुणे, सातारा, कऱ्हाड, बंगालमधील काही गावे आणि इतर ठिकाणच्या काही महिलांनाही देशासाठी, समाजाप्रती काही करावे असे वाटू लागले होते. संघाच्या धर्तीवर काहींनी महिलांना एकत्र करण्यास, देशाच्या परिस्थितीसंबंधी विचार करण्यास, देश स्वतंत्र करण्याच्या वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होण्यास सुरुवातही केली होती. पण हे सगळे स्थानिक पातळीवर ज्या महिलेने पुढाकार घेतला असेल तिच्या कल्पनेप्रमाणे व त्या त्या ठिकाणी जे उपक्रम होत असतील त्यामुसार चालत असे. त्यांना मावशींच्या प्रयत्नांसंबंधी डॉ. हेडगेवार यांचेतर्फे वा काही अन्य संघबंधूंद्वारा माहिती कळल्यावर त्यांनी मावशींशी पत्रद्वारे, समक्ष भेटीद्वारे संपर्क केला. काहींशी मावशींनी संपर्क साधला आणि सगळ्यांनी एकत्र येऊन एका संघटनेद्वारा आपले कार्य पुढे न्यावे या उद्देशाने २५ ऑक्टोबर १९३६ हा समितीच्या स्थापनेचा दिवस निश्चित झाला. दैनंदिन शाखेशिवाय इतर उपक्रमांची आखणी सुरु झाली. त्यासाठी अनेकांच्या गाठीभेटी घ्यायच्या तर जाण्यायेण्यात वेळ जाई, घरातल्या अडचणींमुळे थोड्या वेळात जाऊन येणे अवघड होई. अशा वेळी मावशींनी स्वतः सायकल शिकली. आपल्या बरोबर काम करणाऱ्या भगिनींनाही सायकल शिकण्यास प्रोत्साहन दिले. एवढेच नाही तर नंतरही समितीसाठी जे जे आवश्यक ते ते सगळे मावशी स्वतः शिकल्या. वेगवेगळ्या भाषा, रामायण सांगण्याचा सराव इत्यादी. त्यांचा हा आदर्श समितीच्या सेविकांना सातत्याने प्रोत्साहन देणारा ठरला.
आज दिसत असलेले समिती स्थानावरचे हे सुसूत्र सहजासहजी तयार झाले असेल का होॽ तर नक्कीच नाही. त्यासाठी आपला विचार चार जणांना तोही योग्य अशा व्यक्तींसमोर नीटपणे मांडणे, त्यांना तो पटणे, त्यांची अनुकूलता मिळणे, सहाय्य मिळणे, आपल्यातली त्रुटी कोणी दाखवून दिली तर ती समजून घेणे, स्वीकारणे आणि योग्य ते बदल करुन अंमलबजावणी करणे या सर्व प्रक्रिया व्हाव्या लागतात. त्यासाठी वेळ देणे, ते ते विषय लावून धरणे यासाठी जबरदस्त चिकाटी लागते. सगळ्यांना समाविष्ट करुन घेण्यासाठी मार्दवतेबरोबर प्रसंगी कटुत्व नसलेली कठोरताही लागते. मावशींच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात हे सगळे गुण दिसतात. या सगळ्या गुणांची झलक दाखवणारा एक प्रसंग जरी मावशींच्या वैयक्तिक संदर्भातला असला तरी सांगावासा वाटतो. सावली या गावी केळकरांची शेती व मालगुजारी होती. तिथल्या तहसीलदाराने आपल्याला काही सरकारी लाभ मिळावा या उद्देशाने शेतसाऱ्याबरोबर जादा युद्धनिधीची मागणी मावशींकडे केली. या अन्यायकारक मागणीकडे स्वातंत्र्यप्रेमी मावशींनी दुर्लक्ष केले. त्याची अढी मनात धरुन मावशींचा त्या गावचा सारा भरायचा राहिला आहे हे पाहून आवश्यक त्या पूर्वसूचना न देता लिलाव करण्याची योजना तहसीलदाराने आखली. पण एका हितचिंतकाने ही गोष्ट मावशींच्या कानांवर घातली. मावशींनी तहसीलदाराकडे न जाता आवश्यक ती कागदपत्रे घेऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. त्यांना नीट सर्व समजावून सांगितले आणि मुदतवाढीचा हुकूम जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवला. ज्या दिवशी तहसीलदार जप्ती घेऊन येणार होता त्याच दिवशी आपला माणूस हिंगणघाटला तहसीलदाराच्या बंगल्यावर पाठवला. त्याला पाहताच तहसीलदार ओरडला, “ आत्ताच्या आत्ता सगळे पैसे भरा, नाहीतर माझी माणसे सावलीला जप्ती घेऊन जातील. तहसीलदाराशी वैर घेणे सोपी गोष्ट नाही.” मावशींच्या माणसाने शांतपणे मुदतवाढीचे मंजुरीपत्र तहसीलदारापुढे केल्यावर तो एकदम सर्दच झाला. पुढेही कधी त्याने मावशींना त्रास दिला नाही की मावशींनीही त्याचा गवगवा केला नाही.
प्रत्येक जीवाच्या अंगी दैवी गुण असतात त्याला स्त्रीही अपवाद नाही. त्या गुणांची ओळख जिची तिला होणे यासाठी समितीचा सर्व प्रकारे प्रयत्न असावा अशीच मावशींच्या विचारांची दिशा होती असे आपणास प्रत्ययाला येते. महर्षि कर्वे यांचा महिलांसाठीचा गृहितागमा या पदवीपर्यंतच्या शिक्षणक्रमाला शासनाकडून पूर्णांशाने सहकार्य, व जनतेचा पाठिंबा न मिळाल्याने अर्ध्यातूनच बंद करावा लागला होता. पण त्यांचा उद्देश योग्य होता. त्यासाठीच्या विषयांची निवड महिलांसाठी उपयुक्त होती. म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग करुन समितीतर्फे चालविला जाणारा गृहिणी विद्यालयाचा उपक्रम अनेक महिलांना उपयुक्त ठरला आहे. सुट्टीच्या कालावधीत हे वर्ग चालवून विविध महिलांना पदवी प्राप्त करता आली आहे. आपली कला, गुण वर्धित करुन नोकरी, व्यवसाय करण्यास सहाय्यक ठरला आहे. व्यक्तिमत्व विकास हा आज प्रचलित असलेला शब्द खऱ्या अर्थाने समितीच्या विविध उपक्रमातून कार्यान्वित झालेला आपल्याला दिसेल.
याच अनुषंगाने समितीची आज म्हटली जाणारी जी प्रार्थना आहे त्याचा आपण विचार करु. भगव्या झेंड्याला किंवा झाशीच्या राणीचा फोटो समोर ठेवून सेविका आधी सावरकरांची राष्ट्रप्रेम व्यक्त करणारी कविता प्रार्थना म्हणून म्हणत. परंतु समितीच्या एकूण ध्येयाला व्यक्त करणारी प्रार्थना नंतर जी म्हणत असत ती सुरुवातीला मराठीत होती. समितीच्या शाखा जशा अन्य प्रांतात सुरु झाल्या तसे सर्वांना मान्य होईल अशा भाषेत म्हणजे संस्कृत भाषेतली आज जी प्रार्थना म्हणतात ती लिहिली आहे समितीच्या बौद्धिक प्रमुख असलेल्या कुसुमताई साठे यांनी. सुरुवातीच्या कडव्यात हिंदूभूची वैशिष्ट्ये सांगून संपूर्ण विश्व त्याचेसमोर नम्र असेल असे त्याचे दिव्यत्व वाढावे म्हणून आम्ही महिला सुमार्गावर चालण्यासाठी सज्ज झाल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यासाठी आम्ही स्त्रिया धैर्यवान, सुशील, समर्थ आणि एकजुटीने राहू. एवढेच नव्हे तर आपल्या पिता, पुत्र, पती, बंधू यांनाही सुमार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या असू. दुष्प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी, दुराचाराचा नाश करण्यासाठी सज्ज असणाऱ्या, देश प्रगतीपथावर नेणाऱ्या संततीच्या जननी असू असा आशिर्वाद मागितलेला आहे. ही भावना किती मौल्यवान आहे. केवळ आम्हीच चांगल्या असून देश उन्नतीकडे जाणार नाही तर तो वारसा पुढच्या पिढीला सोपवणे हाही अविभाज्य भाग इथे दुर्लक्षिलेला नाही. या प्रार्थनेतील संस्कार प्रत्येक मुलीवर होणे आजतर नितांत गरजेचे आहे नॽ शिक्षणतज्ञांनी याचा जरुर विचार करावा आणि प्रत्येक शाळेत मुलींना नित्यनेमाने स्वसंरक्षणासाठी आवश्यक ते केवळ व्यायामच नव्हे तर त्यांची मनोवृत्तीही कणखर होईल असे उपक्रम कोणत्याही राजकीय अभिनिवेशाशिवाय समितीच्या सहाय्याने आखावेत. आपले राष्ट्रगीत, प्रतिज्ञा हे जसे आपल्या विद्यार्थ्यांना शिकविले जातात, तसेच ही प्रार्थनाही प्रत्येक मुलीला आत्मसात व्हायला हवीय. मला खात्री आहे की सेविका अशी सेवा देण्यास निश्चित तत्पर असतील.
या संदर्भात अनेक प्रसंग मला आठवतात. कोणताही कार्यक्रम झाल्यानंतर काहीजण मावशींना भेटत आणि वा वा समितीचा विचार तर उत्तम आहे, पण चार स्त्रीया एकाठायी एका विचाराने एकत्र रहाणे कठीण. तेथे संघटना काय उभी राहणार अशासारखे प्रश्न मावशींना विचारले जात. त्यावर मावशींचे उत्तर असे जर चांगले विचार आणि निस्वार्थ देशप्रेम असेल तर चारच काय हजारो महिला एकत्र येतील आणि उत्तम कार्य करतील. त्यांचा हा विश्वास कशामुळे साध्य होईल हे सांगणारीच ही अर्थपूर्ण प्रार्थना आहे.
१९३६ ते १९४७ या अकरा वर्षांच्या काळात समितीचे कार्य जोमाने व प्रभावीपणे सुरु होते. पण खंडित स्वातंत्र्य मिळाल्याचे जे दुष्परिणाम आपल्या देशाला भोगावे लागले त्यात विकृत मनोवस्था आणि लांछनास्पद वर्तन यांचा अतिरेक घडला. दुटप्पी धोरणांमुळे समाज मनाचा गोंधळ उडाला. नेते देखील जणू काही भांबावल्या स्थितीत असल्यासारखे झाले. ज्यांच्या हाती सत्ता आली त्यांनाही या गोष्टींवर अचूक नियंत्रण ठेवणे जमले नाही. गांधी हत्येसारखे कृत्य घडले. त्या व्यक्तीचा निषेध किंवा त्या व्यक्तीला शिक्षा याऐवजी वेगवेगळ्या संघटनांवर बंदी, त्या संघटनातील व्यक्तींची धरपकड अशाही पद्धतीचे निर्णय झाले. त्याचा फटका समितीलाही बसला. कमलाबाई सोहनी, ताई दिवेकर, सुगंधाताई जोगळेकर अशा तुरळक समिती कार्यकर्त्यांना पकडून, चौकशी करुन सोडून देण्यात आले, काही सेविकांना त्रासही झाला. मावशींनी एकूण भगिनीवर्गाचा विचार करुन काही काळासाठी माघार हे धोरण ठेवून समिती स्थगनाचा निर्णय घेऊन तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांना तारेने हा निर्णय कळवला. असे जरी असले तरी निराशा किंवा औदासीन्य असा काही प्रकार झाला नाही. देशभर पसरलेल्या कार्यकर्त्यांशी म्हणण्यापेक्षा सहकाऱ्यांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध ठेवण्याचे मावशींचे काम नित्यनेमाने चालूच होते. अगदी स्वतःच्या मुलाच्या विवाहाच्या आमंत्रण पत्रात निमंत्रणाचा मजकूर लिहून झाला की समिती कार्यासंबंधीचा मजकूर लिहिलेला असायचा. भले ही या काळात समिती स्थानावर ध्वज लावून जरी उपक्रम होत नसले तरी कोणाच्या तरी घरी एकत्र जमून भजन, गाणी, विविध विषयावर चर्चा असे सर्वदूर चालूच राहिले. अशा वेळी काही सेविकांची घालमेल झालेली दिसली किंवा सेविकांना कधी कोणत्या कारणाने आपण करीत असलेल्या कार्याविषयी निराशा आली तर मावशी त्यांना समजावतांना सांगत की आपला समितीशी व्यवहार अपत्यवत असावा. म्हणजे काही जरी चूक झाली तरी ती दुरुस्त करुन समितीचे कार्य चांगले होईल याकडे आपले लक्ष असेल. किती नेमक्या शब्दात योग्य आशय सांगत मावशी. आपल्या मुलांची किंवा मुलांसंबधी काही चूक झाली तर आपण त्या मुलाचा त्याग करीत नाही तर ती चूक दुरुस्त करुन मुलाचे भले होईल याकडे लक्ष देतो. तसेच कोणत्याही कारणाने समितीचे कार्य करतांना एकादी गोष्ट योग्य होत नसेल तर ती सुधारून घेण्याची दृष्टी ठेवली पाहिजे हा विचार किती सहजपणे मावशी सांगून गेल्या.
स्थिरस्थावरता आल्यावर पुन्हा शाखा सुरु होण्यासाठी भजनवर्ग, मुलींच्या शाखा याप्रमाणेच चैत्र पाडवा ते रामनवमी या दरम्यान आधी स्वतः मावशींनी रामायण सांगायला सुरुवात केली. त्यासाठी स्वतः अभ्यास केला. वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण इ. चे नुसते वाचनच केले नाही तर ते समजून घेतले. सुराज्याची कल्पना करतांना नेहमी रामराज्य असावे असेच का म्हटले जाते अशासारखे प्रश्न लक्षात घेऊन त्याचा शोध ग्रंथातून घेतला तसा इतरांशी बोलूनही समजून घेतला. रामायण सांगतांना आपल्या कार्याचे उद्दिष्ट लक्षात घेऊन त्यातील स्त्री व्यक्तीरेखा सांगण्यावर मावशींनी भर दिला. सीतामाईंचे वैशिष्ट्य सांगतांना त्या नेहमी म्हणत की, रावणासारख्या बलाढ्य राक्षसाने तिला बंदी केले पण तिच्या इच्छेविरुद्ध, जबरदस्तीने तिला तो वश करु शकला नाही ते तिच्या सामर्थ्यामुळे, तिच्या तेजामुळे. आपल्या अंगीही हे तेज आपल्या कर्माने, विचाराने आपण प्राप्त करु शकतो असे त्या सांगत. तसेच रावणपत्नी मंदोदरीने आपल्या पतीच्या वर्तनातील त्रुटींचे कधीही समर्थन केले नाही याचा त्या आवर्जून उल्लेख करीत असत. हळूहळू अनेक सेविकांना त्यांनी रामायण सांगण्यासाठी प्रवृत्त केले. यासाठी चक्री रामायणासारखा उपक्रमही त्यांनी केला होता. त्यामुळे अनेक जणींची रामायण सांगण्याची पद्धत एकमेकींना समजली. नविन माहितीही संग्रहित झाली. आपल्या काही त्रुटी असतील तर त्याही कळून दुरुस्त करता आल्या. आजही रामायण कथनाचा उपक्रम चैत्रपाडवा ते नवमी किंवा अश्विन प्रतिपदा ते विजयादशमी या कालावधीत अनेक ठिकाणी सुरु आहे. ढोबळ माहीत असलेली कथा सांगण्याबरोबरच अनेकदा एकादा आत्ताच्या काळाला अनुरुप असा विषय घेऊनही समाजप्रबोधनाचे, विचारांचा वेगळा दृष्टीकोन सादर करण्याचे कार्य या उपक्रमातून होत असते.
मावशींचा कल धार्मिकतेकडे झुकणारा दिसत असला तरी धार्मिकता म्हणजे केवळ तात्त्विक चिंतन नव्हे तर ते विचारांप्रमाणे आचारांचेही शास्त्र आहे. त्याची प्रात्यक्षिके समितीच्या उपक्रमांद्वारे समाजासमोर आलेलीही दिसतात. उदा. द्यायचे तर अधिक मासानिमित्त ३३ तुळशीच्या रोपांचे संगोपन करुन मग त्यांचे दान, ३३ बोधपर कथांचे कथन मग ते मुलांसाठी असेल किंवा महिलांसाठी असेल, ३३ वह्या, पुस्तके, पेन्सिली इ. शालोपयोगी वस्तूंचे आवश्यक त्यांनाच दान. चातुर्मासानिमित्त रोज मूठभर धान्य, रोज एक पैसा (हा जुन्या काळातील आहे हे समजून घेणे आवश्यक आहे) बाजूला काढून ठेवणे असेल. या सर्व गोष्टी समिती सेविकांनीच नव्हे तर आजूबाजूच्या इतर महिलांनाही सामावून घेऊन कराव्यात असा मावशींचा आग्रह असे. हे जमा झालेले धान्य, पैसे अवर्षणग्रस्त विभागासाठी उपयुक्त ठरत असे. भारतातल्या हवामानाचा विचार केला तर दरवर्षी कुठे तरी कमी पाऊस पडल्याने दुष्काळ तर कुठे अतिवृष्टीमुळे दुष्काळ ही स्थिती आजही उद्भवतेच. ऐनवेळी जमवाजमवीची धावाधाव अशा उपक्रमांनी कमी होते. मावशींच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणच्या सेविकांनी जे उपक्रम राबविले त्यातही या विचारांचे प्रतिबिंब आपल्याला दिसेल. त्या वर्षभरात ६१ पुस्तकांचे वाचन करुन त्यांची संक्षिप्त टिपणे काढणे, आपल्याला येत असलेल्या कलेचा वर्षभरात ६१ वेळा समाजाला उपयुक्त होईल असा उपयोग करुन समाज संघटनाचे कार्य करणे, ६१ उत्कृष्ट पुस्तकांतील उताऱ्यांचा संग्रह स्वतःजवळ तयार करणे. वर्षभरात प्रौढ सेविकांनी निदान ६१ दिवस तरी समितीच्या कोणत्याही शाखेत उपस्थित राहण्याचा नियम असेल किंवा श्रद्धानिधीला हातभार म्हणून यथाशक्ति ६१ पैशांपासून ६१ नोटांपर्यंत निधी जमवणे हा असेल. अवर्षणग्रस्त
खेडे दत्तक घेऊन त्याची जबाबदारी स्वीकारणे असेल.
क्रमशः
By:
Padma Dabke,
Pune, India
No comments:
Post a Comment