Saturday, 27 April 2019

पांढराशुभ्र, फुललेला पण बेचव पाव आणि मोती वेचणारी माणसं



व्हेलारिया तिच्या सहकारी एअरहोस्टेस मैत्रिणींबरोबर पंचतारांकित हॉटेलमध्ये
बसली होती. जेवण रोजचंच, कंपनीतर्फे, या शहरात असलो की याच हॉटेलात जेवण
असायचं. व्हेलारियाला इंडियन जेवण आवडतंही.
अख्ख्या दिवस विमानातल्या आखूड जागेत वावरताना शरीर आणि मनही
आखडलेलं राहातं. विमान लँड होण्यापूर्वी कोट अडकावयचा. सीट बेल्ट बांधायच्या
सूचना द्यायच्या – दारात उभं राह्यचं. लँडिंग झालं की, खोटं हसू चेह-यावर पांघरत
प्रत्येकाला ‘बाय, बाय’ करायचं. तिरक्या नजरेने किती पायांच्या जोड्या पुढे
सरकायच्या राहिल्यात हे हळूच पाहात राह्यचं. तिला नेहमी वाटतं, आपण लहान
असतो तर या पायांच्या जोड्यांमधून रांगत पुढे गेलो असतो.
मैत्रिणी हसत होत्या. दिवसभरातल्या हकीकती शेअर करणं चाललं होतं.
व्हेलारिया पण हसत होती.
मधूनच तिला आजकाल एक वेगळीच जाणीव व्हायची. एक वेगळा भाव
उसळून वर यायचा तसा आताही आला. आपण वरवरचं जगत आहोत, खोटं जगत
आहोत… मग खूप मोठ्याने ओरडावं, मोठ्याने हसावं, मोठ्याने रडावं ज्यायोगे आपण
माणूस आहोत हे सिद्ध होईल असं वाटायचं.
हसता हसता व्हेलारियाचे पाणावलेले डोळे मारियाने पाहिले. जेवण संपवून
बरोबर चालताना तिने हळूच विचारलं, ‘‘काय झालं व्हेलारिया?’’
‘काय झालं?’ हे शब्द कधी कधी इतके स्फोटक असतात, की त्यांचा नुसता
स्पर्श झाला तरी माणसाच्या मनातले मोठमोठे खडक फुटतात. पण खडक फुटू
द्यायचे नव्हते. व्हेलारियाने मारियाकडे चेहरा वळवला. पाण्यानं डबडबलेले डोळे, दाबून
धरलेले ओठ, लाल झालेलं नाक…
‘‘प्रेमभंग?’’
व्हेलारियाची मान नकारार्थी हलली. प्रेमभंग ही नव्वद टक्के लोकांच्या बाबतीत
घडून जाणारी गोष्ट असेल. तिच्या बाबतीतही घडून गेली होती.
ट्रेनिंग पिरियडमध्ये जॉन तिच्या आयुष्यात आला होता. दिसायला साधारण.
फार सरळ, साध्या स्वभावाचा. बाकीच्या मुलींना जॉनमध्ये कधी इंटरेस्ट वाटला नाही.
इतकी साधी माणसं कुणाला आवडतात? पण व्हेलारियाला तो आवडला.
स्त्रीपुरुषांबद्दल जॉनचे विचार पारंपरिक होते. पुरुषाच्या अंगात बळ असतं, ताकद
असते, त्याने स्त्रीचे रक्षण केलं पाहिजे, स्त्रीला रिस्पेक्ट दिला पाहिजे. स्त्रीची प्रेम
करण्याची शक्ती मोठी असते, मुलांना वाढवणं हे तिचं मुख्य कर्तव्य आहे, वगैरे वगैरे.
व्हेलारियाच्या हातात ओझं पाहिलं, की लगेच धावून यायचा.‘‘लेट मी – ’’
म्हणत. बाहेरच्या जगात कुठल्या विचारांचे वारे वाहतायत याकडे त्याचं कधीही लक्ष
नसायचं, त्याच्या स्वच्छ डोळ्यात कधी वासना, लबाडी, खोटेपणा तरळताना दिसायचा
नाही. खेड्यात शेती करणा-या आईवडिलांकडून मिळालेली मूल्यसरणी तो जपत होता.
व्हेलारिया जॉनची काळजी घ्यायची. त्याचा कुणी अपमान केला की, कासावीस
व्हायची. असं होतं तरी ‘आणि मग ते सुखाने नांदू लागले….’ म्हणण्यासारखं त्यांच्या
बाबतीत काही घडलंच नाही. जॉनच्या कधी लक्षातच आलं नाही व्हेलारियाचं मन.
व्हेलारियाही त्याच्या एकमार्गी, एकसुरी, रिजिड विचारसरणीला कंटाळली. हळूहळू
त्याच्यात गुंतलेलं मन तिने सोडवून घेतलं, भल्या माणसाला ते कळलंही नाही.
अशी साधीशी होती व्हेलारियाच्या प्रेमाची गोष्ट. संपूनसुद्धा गेली. तिची
आत्ताची मनःस्थिती त्या गोष्टीशी निगडित नव्हती.
मारियाच्या प्रश्नानंतर तिला वाटलं, थँक गॉड! काय झालं? हा प्रश्न अजून
जगात शिल्लक आहे. पण आता या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. पण काहीतरी
झालं होतं. कुठेतरी खोलवर बिनसलं होतं. आत कुठेतरी, कपड्याच्या आत लावलेली
सेफ्टीपिन टोचावी तसं काहीतरी टोचत होतं.
त्यानंतर, दुस-या दिवशी ती जर्मनीला गेली. महिन्यातनं १७-१८ फ्लाईट
असायच्या. उरलेले दिवस विश्रांती. तेव्हा ती जर्मनीत असायची. सुंदर, चकचकीत
रस्ते, प्रत्येक नागरिकाचा विचार करून आखलेल्या वेलप्लॅन्ड नगररचना, उत्तम
वाहतूकव्यवस्था, प्रत्येक गोष्ट नीटनेटकी, वक्तशीर. बसस्टॉवर अजून तीन मिनिटांनी
अमूक बस येणार असा बोर्ड दिसला, की तिस-या मिनिटाला बस स्टॉपवर असणारच.
महायुद्धात मोठ्या प्रमाणात तरुण कामी आलेल्या या देशात लोकसंख्या वाढीचा दर
निगेटिव्ह आहे. बसमध्ये बसलं, की आसपास सगळे वृद्ध आणि त्यांची कुत्री.
प्रत्येकाजवळ कुत्रं, काहींजवळ दोन दोन. मांजरासारखी दिसणारी, अस्वलासारखी
दिसणारी, हजार प्रकारची कुत्री…
बसमध्ये बसलेली असताना तिच्या मनात आलं, बसमध्ये बसावं तशी ही
माणसं आपापल्या आयुष्यात बसलीत. स्टॉप आला की उतरायचंय या भावनेने आपण
सगळं सामानसुमान आवरून बसलेलो असतो तसेच. या सीटस्‌ आपल्या नाहीत, ही
बस आपली नाही, गड्या रे, इथलं काहीच आपलं नाही.
अतिसुंदर, घनदाट झाडीमध्ये लपलेली टुमदार घरं, फुलांनी नटलेल्या बागा.
घराच्या आत थंडगार भिंती आणि एकाकीपण… एखादा खूप छान फुललेला पांढराशुभ्र
पण बेचव पाव असावा तशी सुंदर दिसणारी शहरं… माणसांच्या हृदयाची स्पंदनं ऐकू न
येणारी. मारियाशी हे बोलणं झाल्यानंतर काही दिवसांनी फ्लाईटला बेचाळीस जणांचा एक
मोठा ग्रुप होता. कुठल्यातरी ट्रॅव्हल कंपनीतर्फे. बरेचसे पन्नाशीच्या पुढचे होते. जोडपी
होती. चहा, ज्यूस, वाईन वगैरे सर्व्ह केल्यानंतर सगळे एकमेकांना ओरडून
विचारायला लागले, ‘‘वाईन घेतली का?’’
‘‘हां मग?” दुस-या कोप-यातनं दुसरा उत्तर द्यायचा.
एक भला गृहस्थ मला व्हिस्कीच हवी म्हणून हटून बसला. त्याने इतका वाद घातला
कर्मचा-यांशी. शेवटी कॅप्टन त्याला समजावायला आला, आम्ही फक्त बियर आणि
वाईन सर्व्ह करतो. तुम्हाला हवी तर मी माझ्याजवळची स्वतःची व्हिस्की तुम्हाला
देतो.’’ आणि त्याने दिली.
भल्या गृहस्थाने बाटली संपवली. नंतर स्वतःजवळची पिशवी उघडून
पावभाजीच्या भाजीचं रेडी पॅकेट काढलं. एअरपोर्टवरनं तो ते आत कसं आणू शकला
कुणास ठाऊक. विमानात मिळालेले पाव त्याने ठेवून घेतले होते. आत जाऊन त्याने
व्हेलारियाकडून पावभाजी गरम करून घेतली, आरामात खाणं संपवलं.
सगळे थक्क होऊन त्याच्या लीला पाहात होते.
ट्रॅव्हल ग्रुपपैकी कुणीही मनात आलं की उठायचा. दुस-या एखाद्याच्या
सीटजवळ उभं राहून गप्पा मारत बसायचा.
व्हेलारिया लंचची गाडी ढकलत नेत होती. एकेका सीटपाशी जाऊन स्मितपूर्वक
व्हेज की नॉनव्हेज विचारायचं. जे सांगेल त्याचा टे काढून द्यायचा. मधली डबी फक्त
बदलायची जिच्यात व्हेज नॉनव्हेज फरकाचं मूळ होतं. मध्येच तिची गाडी कशाला
तरी अडली. ती वाकून पाहायला लागली.
एका बाईच्या पार्श्वभागाला गाडी अडली होती. बाई खाली वाकून काहीतरी
करत होती. आसपासच्या सीटवरचे पण तिच्याबरोबरीने खाली वाकून काहीतरी पाहात
होते. मध्येच ‘हे पहा, हे पहा’ ओरडत सीटच्या पायाजवळून काहीतरी उचलायचे,
बाईकडे द्यायचे असं चाललं होतं.
व्हेलारिया ‘‘एक्स्क्यूज मी… एक्स्क्यूज मी.’’ म्हणत थकली. कुणी लक्ष द्यायला तयार
नाही. तिकडून मारिया दुस-या बाजूने आली आणि तिने करडा आवाज काढला, तेव्हा
वाकलेली मंडळी उभी राहिली.
‘‘हा काय प्रकार चाललाय?’’ मारिया व्हेलारियाला म्हणाली, तेवढ्यात लोकांनी
उत्साहात माहिती पुरवली. एका बाईचा मोत्याचा सर ओघळला होता. मोती खरे होते.
दुर्दैवाने अगदी बारीक होते. ते विमानभर धावत होते. लोक ते कुठून कुठून वेचत होते.
विमान कर्मचा-यांनी एखादा माणूस अशा प्रकारचा पाहिला असेल. पण एवढी
एकदम असली मंडळी त्यांनी पाहिली नव्हती. या माणसांना कशाचंच बॉदरेशन नव्हतं.
घरात, अंगणात वावरावं तशी ती विमानभर हिंडत होती. शौचकूपापाशी थोड्या थोड्या
वेळाने एकेक गठ्ठा जमत होता. आरामशीर गप्पा चालल्या होत्या. ‘आतली’
व्यक्तीसुद्धा आतून बोलत होती.
मारिया बरीच वर्ष मुंबईत राहिली होती. तिला त्यांची भाषा समजत होती. ती
म्हणाली, ‘‘अगं, इथे लग्नाच्या मागण्यासुद्धा घातल्या जातायत.’’
एक तरुण मुलगी होती. ती एका तरुणाशेजारी बसली होती. दोघं अखंड बोलत
होते. दोघे ट्रॅव्हल्स ग्रुपपैकी नव्हते. पण त्यांच्याच देशातले होते. मुलगी तर त्यांचीच
भाषा बोलणारी. ट्रॅव्हल्स ग्रुपपैकी ‘लीडर’ वाटणा-या एकाने तिला ओरडून तिची माहिती
विचारली, तिच्या शेजारचा मुलगा तिचा बॉयफ्रेंड आहे का हेही विचारलं. मुलगा –
मुलगी जोरात हसले. मुलगी म्हणाली, ‘‘आमची आत्ताच ओळख झाली. याचं लग्न
आहे येत्या रविवारी.’’ तो तिचा बॉयफ्रेंड नाही म्हटल्यावर, ‘‘मग एक चांगलं स्थळ
आहे आमच्याकडे, बघ, तुला इंटरेस्ट असेल तर’’ म्हणत मुलाची माहिती देणं सुरू.
अत्यंत फॉर्मल अशा त्यांच्या जगण्यात या मंडळींनी खळबळ उडवून दिली
होती. आपण विमानात नसून एखाद्या लग्नाच्या मांडवात आहोत असं वाटायला
लागलं होतं. कॅप्टन आणि मारिया वैतागून म्हणाले, ‘‘ही अशी काय आहेत माणसं?
यांचं काय करावं?’’
व्हेलारिया त्यांच्या मुक्त वावराकडे दुरून पाहात होती. एकाएकी तिला
स्पष्टपणे जाणवलं, आपण एन्जॉय करतोय या इन्फॉर्मल माणसांचं वर्तन. आपल्याला
बरं वाटतंय. ही मोती वेचणारी माणसं. साधी, सरळ जगणारी माणसं. आपण आपल्या
अतिफॉर्मल जगण्यात अशी माणसंच हरवून बसलोयत. प्रवाशांना पढवलेल्या
पोपटासारख्या फुलस्टॉप न घेता, भरभर सूचना द्यायच्या. ऑक्सिजन मास्कची
माहिती द्यायची, सीट बेल्टचं नाटक समजावून सांगायचं. दुसरा एकजण माईकवर
बोलताना कृती करून दाखवायचा, थोड्या वेळाने ब्रेकफास्टची गाडी ढकलायची, रिकामे
ट्रे उचलायचे. थोड्याशा जागेत प्रत्येक गोष्ट तशाच ठरावीक पद्धतीने झाली पाहिजे.
वस्तू ठेवण्याचा आणि उचलण्याचा क्रम तोच असला पाहिजे, वस्तूंच्या जागा त्याच.
सीटवर बसणारी माणसं फक्त वेगवेगळी. आपण तेच. त्याच अवकाशात तेच नाटक
त्याच स्टेजवर करणारे. ठरलेली वाक्यं… ठरलेली वाक्यं…. बेतलेलं हसू… बेतलेलं हसू…
बेतलेलं हसू…. आखलेल्या हालचाली… आखलेल्या हालचाली…. आखलेल्या हालचाली….
जातानाच्या पायांच्या जोड्या पाहताना कोट कधी काढू असं झालं असताना आपल्या
विमानातनं प्रवास केल्याबद्दल लोकांचे आभार मानत राहायचं, प्रत्येकाचे, प्रत्येकाचे….
प्रत्येकाचे…. पांढरा शुभ्र फुललेला पण बेचव पाव…
लँडिंगची वेळ आली होती. लोक उत्साहाने एकमेकांच्या सीटजवळ जाऊन
निरोप घेत होते. हसत होते, एक्साईट होऊन एकमेकांना हाका मारत होते.
विखुरलेले मोती वेचणा-या माणसांत तिला तिचं काय विखरून गेलं होतं ते
नीट दिसलं. ते सापडणार नव्हतंच. समाधान एवढंच होतं, आपल्याला रूतणारा काटा
कुठे आहे, हे समजलं होतं.
खरंखुरं हसू डोळ्यातून हसत व्होलारिया दारापाशी उभी राहिली आणि त्यांना
मनापासनं ‘बाय’ करू लागली.

- सुजाता महाजन

No comments:

Post a Comment