Sunday, 14 April 2019

आसू आणि हसू

मला एक आठवण इथे शेअर करावीशी वाटते.

1996 सालची गोष्ट आहे. तेव्हा आम्ही वरळीला प्रवासी या सरकारी बिल्डींगमधे रहात होतो. अमृत, माझा धाकटा मुलगा दुसरीत शिकत होता. भयंकर मस्तीखोर होता. शाळेला गणपतीच्या सुट्या होत्या त्यामुळे घरात उच्छाद मांडला होता त्याने. 

 प्रवासी समोरच पोदार मेडिकल काॅलेज आणि हाॅस्पीटल. तिथले बरेच डाॅक्टर्स प्रवासी मधेच रहायचे. तेव्हा मी डीटीपी ची कामे करून देत असे.  पोदार मेडिकल मधील अनेक डाॅक्टरांचे शोध प्रबंध, एखाद्या विषयावरचा पेपर मी टाईप करून प्रिंट करून त्यांना त्यांच्या वेळेत देत असे. त्यामुळे खूप डाॅक्टर विद्यार्थी, विद्यार्थीनी घरी येत असत.  त्या दिवशी असंच खूप काम आलं होतं माझ्याकडे आणि अर्जंट करून हवं होतं. मी भराभर की बोर्डवर बोट चालवत होते. चिरंजीव घरातच बाॅल घेऊन खेळत होते. बाॅल च्या टप्प्याने भिंत खराब होऊ नये म्हणून त्याला मी बेडरूमच्या दाराच्या मागच्या भिंतीला आणि दारावर बाॅल चे टप्पे मारायचे तर मार असं सांगितलं होतं त्यामुळे त्याचं ठपठप चाललं होतं. एकीकडे माझं टकटक आणि त्याचं ठपठप. निवांत चालू होतं. इतक्यात सणकन एक बाॅल माझ्या पाठीवर.  मी जाम ओरडले अमृतला. साॅरी साॅरी झाल्यावर (तेही हसत हसत) परत ये रे माझ्या मागल्या. आता टप्प्यांचा आवाज वाढला होता आणि माझा पारा. मला काम लवकर संपवायचंय तू त्रास देऊ नकोस. पण जम त्याच्या कानावर ते जात नव्हतं. मी शांत राहून काम करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. इतक्यात एक बाॅल आला आणि ठपकन कीबोर्ड वर बसला. कडेलोट झाला माझ्या संतापाचा. उठले आणि दोन चार रट्टे दिले ठेवून अमृतला, त्याच्या हातातला तो रबरी लाल बाॅल काढून घेतला. मी इतकी संतापले होते की मी चक्क विळी घेऊन तो बाॅल चिरला. खरं तर मला स्वतःला आणि अमृतला ही माझी ती कृती अनपेक्षित होती. अमृत रड रड रडून झोपला. मीही कामाला सुरूवात केली. अर्ध्या पाऊण तासात काम संपवलं. प्रिन्ट आऊटसची फाईल करून ठेवली आणि चहा करण्यासाठी उठले.  

चहा घेऊन बेडरूम मधे आले. अमृत गाढ झोपलेलाच होता. गालावर अश्रूंचे ओघळ सुकले होते. मळलेल्या हातानी डोळे पुसल्याने गोरे गुबरे गाल आणि पापण्या मळलेल्या दिसत होत्या. मला भडभडून आलं. किती दुष्टासारखी वागले मी बाळाशी. किती अतिरेक केला मी.  विळीवर बाॅल चिरला! त्याच्या केसांवरून बराच वेळ हात फिरवत राहिले. डोळ्यातले अश्रू थोपवू शकत नव्हते. अंबी उठला की त्याला साॅरी म्हणायचं आणि त्याला घेऊन दुकानात जायचं ठरवलं. 

अमृत जागा झाला.  माझ्या गळ्यात हात टाकून म्हणाला "मायू साॅरी.  तू किती important काम  करत होतीस आणि मी तुला disturb केलं.  परत नाही करणार असं"  त्याची पापी घेतली. त्याला म्हणाले, "चल, आपण मंगलताईकडे जाऊ, बाप्पाचे दर्शन घेऊ आणि येताना तुला बाॅल पण आणू."

आम्ही दोघं मंगलताईकडे, माझ्या मावस बहिणीकडे गेले. दर्शन घेऊन तिच्याशी गप्पा मारत बसले. तिला झालेला प्रकार सांगून मोकळी झाले. अमृत वाटीत दिलेला खाऊ खात बसला होता. इतक्यात ताईच्या सासूबाई तिथे आल्या आणि अमृतला पाहून म्हणाल्या, "इकडे ये रे बाळा. तुझ्यासाठी कधीची एक गंमत द्यायची ठेवलीय."  

अमृत त्यांच्या मागोमाग दुस-या खोलीत पळाला. परत आला तेव्हा त्याच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी होती आणि त्यात चक्क तसाच लाल रबरी बाॅल आणि चार पाच गोष्टींची पुस्तकं होती. अमृतचे डोळे आनंदाने चमकत होते.  चेहेऱ्यावर हसू ओसंडत होतं.  

माझ्या मात्र डोळ्यात आसू आणि ओठावर हसू होते.

By

Anagha Joshi

Talegaon, India

No comments:

Post a Comment