Sunday, 14 April 2019

फटका - एक काव्य प्रकार

फटका – एक काव्य प्रकार –  सुख आनंद प्रत्येकाला हवेच असते. ते कशामुळे मिळू शकते हे सांगण्यासाठी काही उपदेशपर काही आपल्या वृत्तीला चिमटे काढत केलेला काव्यमय साहित्य प्रकार म्हणजे फटका. हाही पोवाड्यासारखाच खास ढंगात म्हटला जाणारा काव्य प्रकार. अनंत फंदी चा ‘संसारामधी ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको’ हा प्रसिद्ध फटका आपण ऐकलेला असेल. आज सौ. शीतल जोशी यांचा हा फटका आपणासाठी सादर.


आनंद

आनंदनिर्भर जगण्यासाठी प्रसन्न करी तू आपुले मन
अरे आनंद असावा स्वावलंबी नको कुणावर विसंबून ॥ ध्रु.॥

सुख कोणाचे श्रीमंतीचे कोणाचे विद्वत्तेचे
कोणाचे पुपाचे तर कोणाचे परिवाराचे
कीर्तिचे सन्मानाचे ही सुखे सारी भासमान
अरे शाश्वताचे निर्विषयाचे सुख आहे मोठे मान - ॥१॥

प्रयत्न तू नियमित करी होई यशाचा मानकरी
हुरळू नको बहु यशावरी खचू नको अपयशांतरी
नको कुणाची बरोबरी ईर्षा ही बा नव्हे बरी
अरे यशप्राप्ती इतरांसी होता नको द्वेषाचा सोपान
अरे हेवेदावे नको कुणाचे कर हार्दिक अभिनंदन - ॥२॥

सत्संगतीची महती जाणून सज्जनसंगती करावी
कुसंगतीचे धोके जाणून दुर्जनसंगती टाळावी
कौटुंबिकांची विसंगती हे प्रारब्धचि आपुले जाण
तडजोडीने सामंजस्याने भोग टाक ते संपवून - ॥३॥

परनिंदा कधी करु नको निंदास्तुतीला भुलू नको
कधीही कुणाला फसवू नको फसवू नको अन फसूही नको
कधी कुणा उपमर्दू नको उगी अपमाना पचवू नको
अरे ठोशास ठोसा ठकास महाठक जशास तसे ते आचरून
अरे अन्यायाशी झुंज देऊन जावे पुन्हा ते विसरून
अरे नको व्यक्तीगत हेवेदावे नि व्यक्तीशी भांडण - ॥४॥

By 

Shital Joshi

Dombivli, India




No comments:

Post a Comment