Tuesday, 1 September 2020

नव्या आईची गोष्ट

 नव्या आईची गोष्ट


       परवाचीच गोष्ट - "डॉक्टर, हिला काय झालंय तेच मला कळत नाही! इतकी व्यवस्थित डिलीव्हरी होऊन सोन्यासारखा मुलगा झालाय. एकदम गुटगुटीत आहे.
फार त्रासही नाही बाळाचा, पण ही सारखी उदास असते! एवढ्या तेवढ्या कारणाने रडायलाच लागते! सारखी चिडचिड! नवरा येतो भेटायला रोज, पण ही त्याच्यावरही
नुसती चिडचिड करते, तो गेला की रडत बसते. मला काही सुचतच नाहीये! तुम्हीच सांगा, काय करावं?" असं म्हणून पेशंट च्या आईने डोळ्याला पदर लावला.

             पेशंट माझ्या समोरच होती. १५ दिवसांपूर्वी माझ्याकडेच डिलीव्हरी झाली होती. अंगावर जुना, खूप ढगळा ड्रेस, तेलकट, न धुतलेले केस, घाम येत असूनही डोक्याला घट्ट बांधलेला रुमाल, तेलकट चेहरा, अशी
तिची वेशभूषा होती. क्षणभर माझा डोळ्यावर विश्वास बसेना. एक चांगल्या कंपनीत अधिकारीपदावर असलेली ही मुलगी पूर्वी फारच चटपटीत आणि आकर्षक
व्यक्तिमत्वाची होती. मला आठवतं, हीच पेशंट गरोदरपणात यायची तेव्हा किती नीटनेटकी, व्यवस्थित असायची! छान कपडे व्यवस्थित अंगावर बसणारे, आकर्षक केशभूषा अगदी हलका मेकप असायचा कधी कधी आणि मुख्य म्हणजे चेहऱ्यावर सतत प्रसन्न भाव! हिचं अचानक असं का व्हावं?

              या पेशंटच्या निराश मनस्थितीचं कारण अगदी नैसर्गिक होतं, ते म्हणजे प्रसूतीनंतरच्या हार्मोन्स मधील बदलामुळे येणारे औदासिन्य! हे खूप कॉमन आहे. पण बऱ्याच वेळा आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येत नाही.
अति औदासिन्य मुळे कधीकधी मानसोपचाराची अथवा समुपदेशनाची गरज भासू शकते. डिलिव्हरी झाल्यानंतरच्या काळात बऱ्याच वेळा घरचे आणि बाहेरचे लोक या नव्या आईला इतक्या अखंड सूचना देत असतात आणि तिचा आत्मविश्वास इतका खचवतात की तिची मनस्थिती काय असेल याचा कोणी विचारच करत नाही.

              यातही सर्वात लाडके वाक्य विशेषतः घरातल्या वयस्कर बायकांचे म्हणजे "अगं, रडतेय ना बाळ! त्याला दूध पुरत नसणार बघ तुझं. वरचंच दूध घाल म्हणजे थांबेल रडायचं" झालं! आधीची निराशेच्या उंबरठ्यावर
असलेली आमची नवी आई या अशा वाक्यांनी नक्कीच गोंधळून जातो आणि मग तिच्या मनात न्यूनगंड घर करायला लागतो. मातृत्वाची जबाबदारी आपल्याला पेलेल की नाही अशी शंका तिला वाटायला लागते.

              यात अजून भर घालणारे लोक म्हणजे बघायला येणारे पाहुणे! "अगं, अजून एक बाळ आतमध्येच आहे की काय? केवढं पोट दिसतंय तुझं! बघ बाई, सिझेरियन झाल्यामुळे असेल, आता असाच राहणार ते!" जिची नॉर्मल डिलिव्हरी असेल तिला "पोट बांधलं नाही ना, म्हणून एवढं झालंय" असं पटवलं जातं.

              यातले सत्य म्हणजे डिलीव्हरी किंवा सिझेरियन या दोन्हीचा पोट दिसण्याशी काहीच संबंध नाही. ज्या मुलींचा आधीचाच स्नायूंचा टोन चांगला असतो त्यांचं पोट नंतर कमी दिसतं पण साधारणपणे सहा महिने ते एक वर्षाचा काळ पोट कमी व्हायला लागतोच. यात जर बाळंतिणीवर तुपाचा आणि इतर
कॅलरी असलेल्या वस्तूंचा मारा करण्यात आला आणि वजन डिलीव्हरीच्या वेळेइतकचं राहिलं तर मग  पोट दिसणारच. गर्भावस्था व प्रसूती या दोन स्थितींमधून गेलेल्या स्त्रीचं शरीर हे बदलणारंच! तो निसर्ग नियमच आहे व तो स्त्रीने आणि तिच्या नवऱ्याने स्वीकारायलाच हवा. कधीकधी नवरा सुद्धा "डॉक्टर, हिचं पोट बघा केवढं आहे! कधी कमी होईल?" असे प्रश्न पेशंट समोर
आम्हाला विचारून पेशंटचे मनोधैर्य अजूनच खचवतो. इतका त्रास सहन करून एक सुंदर बाळ आपल्या पोटात वाढवून ते जन्माला घालणाऱ्या बायकोवर तिच्या
बदललेल्या शरीरासकट प्रेमच करायला हवं, नाही का?

              प्रसूतीनंतर करायच्या काही गोष्टी म्हणजे
बाळंतीणीनेपहिल्या दिवसापासून स्तनांना योग्य तो आधार ‘फीडिंग ब्रेसिअर’ च्या सहाय्याने द्यायला हवा नाहीतर, स्तन एकदा वाढलेल्या वजनाने ओघळले तर
नंतर काही उपाय करता येत नाही.

       तसेच आहारामध्ये भरपूर भाज्या, फळे, दूध, थोडाफार सुकामेवा, आळीव व डिंकाचे लाडू हे असावं पण जास्त साजूक तुपाचा मारा करू नये. हल्लीच्या
मुली गर्भावस्था व नंतरच्या काळात आधीच सुदृढ असतात त्यांना या अतिजास्त उष्माकांची गरज नसते.

       अजून एक म्हणजे पोट बांधल्याने ते आत जात नाही तर पेशंटची चालण्याची पद्धत त्याने सुधारते. दीड महिन्यानंतर प्रत्येक स्त्रीने चालण्याचा व्यायाम सुरु करावा. ३० ते ४५ मिनिटे रोज चालण्याने शरीर
पूर्ववत होण्यास मदत होते. प्रसूतीनंतरही सुरवातीचा दहा दिवसांचा काळ संपला कि स्त्रियांनी स्वतःकडेही जरा लक्ष देण्यास हरकत नाही. व्यवस्थित कपडे, केस नीट असतील तर तिचाच स्वतःचा आत्मविश्वास वाढेल, जास्त प्रसन्ना वाटेल. बाळाच्या व स्वतःच्या बाबतीत तब्येतीच्या शंका फक्त डॉक्टरांनाच विचाराव्यात. आजूबाजूच्या लोकांनी दिलेल्या “अनाहूत आणि चुकीच्या
सल्ल्यांकडे” दुर्लक्ष करणे उत्तम!

       प्रसुतीनंतर मसाज करायला काही हरकत नसते पण धुरी देणे अयोग्य आहे. त्याने आई आणि बाळ, दोघांनाही श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

       आता महत्वाचं म्हणजे आईच्या दुधाचा मुद्दा. नैसर्गिक रित्या आईचं दुध बाळाला पुरात नाही असं फार क्वचित होतं. जितक्या जास्त वेळेला आई
बाळाला पाजेल तितकं जास्त दुध येत असतं. उलटपक्षी यात बाकीच्यांनी हस्तक्षेप करून दुध कमी आहे म्हणून वरचं दुध घालायला सुरुवात केली तर कमी
वेळा पाजल्यामुळे दुधाचे प्रमाण कमी होऊ शकते. दुसरे म्हणजे नव्याने झालेली आई जर मानसिक ताणाखाली असेल अथवा निराश असेल तर दुधाचे प्रमाण कमी
होते. काही अन्नाचे प्रकार उदा. खसखस, आळीव, लसूण या गोष्टींच्या सेवनाने दुध वाढू शकते. शतावरी सर्वज्ञातच आहे. यानेही फरक पाडला नाही तर काही गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येऊ शकतात. पण दुध कमी आहे म्हणून स्तनपान बंद करणे ही सर्वात मोठी घोडचूक ठरते. बाळाकरता व आईकरता सुध्दा!

        प्रत्येक वेळी रडणारे बाळ भुकेनेच रडत असेल असे नाही. इतरही काही कारणे असू शकतात. उदा. बाळाला पोटात दुखणे, अंगाला खाज सुटणे इत्यादी.
प्रत्येक वेळी बाळ रडले तेव्हा त्याला पाजणे ही चुकीची पद्धत आहे. बाळाला दिवसातून ५ ते ६ वेळेला शु होत असेल आणि वजन नियमित वाढत असेल तर याचा
अर्थ त्याला दुध पुरते आहे असे समजायला हरकत नाही. बाळाला शक्यतोवर दोन तासांनी पाजायची सवय लावल्यास आई ही सतत पाजण्याने दमून जाण्याची शक्यता कमी होते तसेच आईला अधून मधून थोडं फार बाहेर चक्कर मारायला हरकत नसते. पण ते प्रत्येक पेशंटच्या तब्येतीवर अवलंबून आहे. पण बाळंतीणीला सुध्दा जरा मूड आणि वातावरणातला बदल आवश्यक आहे. सतत कोंदट, बंद खोलीत बसून अथवा झोपून राहणाऱ्या बाळंतीणींमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असू शकते.

        पोटावर व मांड्यांवर पडणारे स्ट्रेच मार्क्स हा अजून एक चिंतेचा विषय असतो. हे कमी व्हावेत म्हणून गर्भारपणातच काही क्रीम्स पोटावर व मांड्यांवर लावता येतात. त्यामुळे या व्रणांचे प्रमाण कमी होते पण तरीही
प्रसूती नंतरच्या सहा महिन्यात हे व्रण फिकट होऊन खूप कमी वाटायला लागतात. काही जणींना पूर्ण शरीरावर काळसरपणा, डाग आलेले असतात. उदा. मान,
काखा, पोट. पण सहा महिन्यात हे प्रमाण आपोआप कमी होतं. त्याची काळजी करायची गरज नसते.

        सिझेरिअन असो अथवा नॉर्मल डिलिवरी, दोन महिन्यात पती – पत्नीचा शरीरसंबंध येण्यास हरकत नसते. अर्थात रात्रीची जागरणं, बाळाला पाजणे,
त्याची देखभाल व शरीरातील होर्मोंसमधील बदलांमुळे नव्या आईला लैंगिक संबंधाची इच्छा थोडी कमी असू शकते. हेही पतीने समजून घेऊन तिला मानसिक व
शारीरिक आधार द्यायला हवा. तसेच प्रसुतीनंतर दीड महिन्याने गर्भनिरोधकविषयीचा सल्ला सुध्दा घेणे आवश्यक आहे. अन्यथा पाळी आलेली नसली तरी परत दिवस जाऊ शकतात. पुढे होणारा व्याप व मनस्ताप टाळण्याकरता ह्या बाबतीत वेळीच पाउल उचललेलं चांगलं!

        आणि मग आपल्या सुरवातीला वर्णन केलेल्या पेशंटचे आणि तिच्या नवऱ्या व नातेवाईकांचे अशा तऱ्हेने बौद्धिक घेतल्यावर ती बरीच सावरली. अशा सगळ्या गोष्टींबद्दल समजावून सांगितल्यावर ‘डॉक्टर, पुढच्या वेळी पूर्वीचाच प्रसन्न चेहऱ्याने तुम्हाला भेटायला येईन, बरं का!’ असे आश्वासन देऊन ती दवाखान्याबाहेर पडली!!

डॉ शिल्पा चिटणीस जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ
कोथरूड,पुणे

No comments:

Post a Comment