आज सकाळपासून वातावरण कुंद झालं आहे. नक्कीच कुठेतरी पाऊस पडत असावा. खरंतर ही पावसाळी ढगाळ हवा माझ्या आवडीची. गच्चीत खुर्ची टाकावी.. एका हातात मस्त फेसाळलेली कॉफी अन् दुसऱ्या हातात पुस्तक... व्वा ! व्वा ! क्वचितच येतं जमून असं. आज हवंहवसं वातावरण असलं तरी मन उदास आहे. ग्रेसच्या ,' भय इथले संपत नाही' या ओळी काही केल्या मनातून दूर सारता येत नाहीयेत. अनामिक भीती दाटून आली आहे मनात.
अपघात, आत्महत्या वा हत्या याच्या दोन-चार तरी बातम्या रोज वर्तमानपत्रातून येतच असतात आपल्या पर्यंत. या अपरिचितांबाबत जे घडलं त्याचं वाईट वाटतंच . त्याचा कालांतराने विसरही पडतोच. पण जवळच्या व्यक्ती बाबत हे घडलं की स्वीकारणं कठीण होतं. विसर पडायला काळाचं औषध चालतंच असं प्रत्येक वेळी होत नाही ना...सकाळपासूनची अस्वस्थता... पुन्हा एकदा,' ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' च्या ओळी मन आळवू लागलं अन् काॅलेजपासूनचा मित्र बुडून गेल्याची बातमी आदळली कानावर...छे .. अविश्वसनीय आहे हे....कुठे..कधी..कसं .. पाण्यात पाय बुडवायलाही तयार नसणारा तो पोहायला जाईलच कसा ... मग.. नक्की हा अपघात की....आत्महत्या... असे अनंत प्रश्न फेर धरू लागले.सुन्न झालेलं मन माझं ..कसं स्वीकारायचं हे सत्य ?
पुढची प्रश्नांची मालिका कानावर पडतच होती..काढलं का त्याला बाहेर ..पोस्टमाॅर्टम.. मग बॉडी पाठवतील घरी ..बॉडी ..बॉडी.. काही तासापूर्वी त्याला नावाने हाक मारणारे आपण क्षणार्धात त्याचं नावही विसरलो की काय ?का आता देह अचेतन म्हणून ही अलिप्तता ?त्यासाठी मृत्यूच यावा लागतो का ? आपल्यासमोर निर्जीव असलेला त्याचा हात कितीदा आपण हातात घेतलेला असतो..त्या हाताने कितीदा आधार दिलेला असतो..' मी आहे ना 'ही त्याच्या स्पर्शातून पोचणारी जाणीव मणामणाचं ओझं पिसासारखं हलकं करायची.. भर गर्दीतही आपल्या नजरेनं अचूक ओळखलेलं असायचं त्याला... अनेकदा शब्दांवाचून ही सगळं आकळत गेलेलं असायचं आपल्याला...अटीतटीनं घातलेले वाद अन् त्याच्या स्पर्शानं सहज दूर झालेले मळभ.. अशा अनेकानेक आठवणींची गर्दी दाटते.. तरी पण येते हतबुद्धते पाठोपाठ अलिप्तताही..
मृत्यू सगळी किल्मिषं , राग ,तक्रारी संपवतो.मग हेच जिवलग अवतीभोवती असतांना का नाही आपण करू शकत ? आजचं भांडण आजच संपवायचं .उद्या करू नव्याने तक्रारी . हा मोकळेपणा का हरवतो नात्यातला .समंजसपणा फक्त शाब्दिक, सोशल मीडियावर शेअर करण्यापुरताच असावा का ? ' लोका सांगे ब्रह्मज्ञान ' ऐवजी , 'आधी केलेची पाहिजे 'असायला हवं ना? विशिष्ट व्यक्ती आपल्याला हवीशी ,महत्त्वाची वाटत असेल तर तिच्या बरोबरच नातं महत्त्वाचं मानून आपले हट्ट ,अहंकार बाजूला ठेवता आले पाहिजेत.. अर्थात हे दोन्ही बाजूंनी व्हायला हवं हे मात्र नक्की.
मागण्याआधीच आपण या तरुणाईच्या हाती सगळं काही ठेवतो. म्हणून आत्महत्येची पळवाट शोधावीशी वाटत असावी का त्यांना ? काही मिळवण्यासाठी झगडावं हे लागतंच. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही प्रत्येकवेळी हवं ते गवसतंच असं होतं नाही. पण ही निराशाही स्वीकारता आलीच पाहिजे. प्रतिकूलता अनुकूलतेत बदलण्यासाठी उपाय शोधता आले पाहिजेत. नव्या वाटा धुंडाळायला हव्याच..मुख्य म्हणजे कुठे थांबावं हे समजायला हवं.. या जोडीने आत्ताचा हा क्षण आपला. तो जगता आला पाहिजे ..आनंदाने.
सहज आठवण झाली ' अनन्या 'नाटकाची .एका क्षणापूर्वी सुखी संसाराची स्वप्न बघणारी अनन्या पुढच्याच क्षणी दोन्ही हात गमावते अन् स्वप्न विखरुन जातात तिची .घरच्यांसाठी आपण ओझं झालो आहोत ही जाणीव तिला खचून टाकत असतानाच एका क्षणी, हात नाहीत पण पाय तर आहेतच ना आपल्याला हा विचार लख्खकन् चमकतो अन् जिद्दीने ती पुन्हा उभी राहते. प्रत्यक्षात अपंग नसतानाही ही अभिनेत्री ज्या सहजतेने ,पायाने लिहीणं,पुस्तकाची पानं उलटणं,टाॅवेलची घडी करणं...या छोट्या छोट्या गोष्टींसाठी पायांचा वापर करते ते अविश्वसनीय असंच... पायात कंगवा धरुन केस विंचरणं हा प्रसंग तर डोळ्यात पाणी आणणारा... तिला सलाम करावासा वाटणारा असाच.. कलेवरच्या निखळ प्रेमापोटी अनन्या नाटकातली ऋतुजा अपंग नसतानाही अपंगत्वाचा सामना कसा करता येतो हे शिकवते .
यामुळेच आपल्यापेक्षा हलाखीत जगणारी माणसं आजूबाजूला पाहिली की आपलं ' बरं..नव्हे छानच चाललंय की ' ही जाणीवच जगण्याचं बळ देते.आयुष्य सुंदर आहे हे शिकवते.म्हणूनच :
" जिंदगी सुन | तू यहीं पर रुक जा |
हम हालात | बदलके आते हैं ||
म्हणतच आत्ताच हा क्षण आपला,तोच साजरा करुया आनंदाने.
माधुरी मोरे.
माधुरी मोरे.
No comments:
Post a Comment