कृष्ण...एक अनुपम बालरूप,
आकृती काळी, तेजोमय स्वरूप!
कृष्ण...गोकुळातील विस्मयकारी बाललीला,
मानव, पशु-पक्षी, वृक्ष-वेली-पर्वत साऱ्यांचा सहजीवी आनंदमेळा!
कृष्ण...एक अलौकिक अद्वैत,
कृष्णाआधी राधेचे नाम, एक दैवी संकेत!
कृष्ण...एक जिवलग सखा,
सखी द्रौपदीचा अविरत पाठीराखा!
कृष्ण...एक विलक्षण प्रेमरोगी,
सुदामा, विदुराच्या निरपेक्ष, निरलस प्रेमाचा अनुरागी!
कृष्ण...आजन्म रिपुदमन,
कंस, चाणूर, शिशुपालादी खलांचे निर्दालन!
कृष्ण...एक धूर्त राजकारणी,
जरासंध अन जयद्रथाची कपटाने उलथवली करणी!
कृष्ण...एक प्रेमळ,चतुर पती,
मत्सरी सत्यभामेच्या कलाने घेत रुक्मिणीवर उधळी प्रीती!
कृष्ण...असामान्य स्त्री-दाक्षिण्य,
जरासंधाच्या बंधनातून सोडवलेल्या सोळा हजार भविष्यहीन नारींना पत्नीपदाने केले धन्य!
कृष्ण...पांडवांचे सर्वस्व,
निःशस्त्र सारथ्य करूनही, पांडवांकरवी प्रस्थापित करवले, अधर्मावर धर्माचे वर्चस्व!
कृष्ण...एक असामान्य कर्मयोगी,
सारी इतिकर्तव्ये यथासांग पार पाडतानाही निर्लेप अन वैरागी!
कृष्ण...एक युगंधर,
अर्जुन निमित्तमात्र, वैश्विक पातळीवर जीवनाचे सार सांगणारी भगवदगीता, एक तत्वज्ञान, अजरामर!!!
आकांक्षा
No comments:
Post a Comment