Tuesday, 1 September 2020

बाटलीतील मासे गेले कुठे?

 बाटलीतील मासे गेले कुठे?


आमचे बालपण हे स्मार्टफोन,टेलिव्हिजन, कम्प्युटर्स आणि इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणांशिवाय पार पडले. सहाजिकच भावंडांशी तसेच मित्रमंडळींशी खेळणे, हुंदडणे आमच्या लहानपणाचा अविभाज्य भाग होता.

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आमच्यासाठी एक आनंदाची पर्वणी असे. आत्ते, मावस- चुलत भावंडांना भेटणे त्यांच्याबरोबर राहणे व त्यांच्याशी खेळत सुट्टी घालवणे हा आमचा महिनाभराचा कार्यक्र म होता. रोज रात्री गच्चीवर गाद्या घालून आकाशातील तारे मोजत गाढ झोपी जाणे. सकाळी उठून चहा पीत दिवसभराचा कार्यक्रम आखणे. दुपारी पत्ते कॅरम व व्यापार खेळणे हा नित्यक्रम होता.

आम्ही सर्व भावंडे सहा महिने ते  तीन वर्षाच्या अंतरातील म्हणजेच समवयस्क होतो. त्यामुळे एकत्र खेळणे आणि भांडणे करणे दोन्ही रंगत असे.

"चला आज काहीतरी नवीन करूयात का? सगळ्यांनी ओढ्यावर मासे पकडायला जायचे का? गंमत येईल ना खूप!"  आमच्या लीडर भावाने विचारले. पाण्यात खेळायला मिळणार त्यामुळे सर्वांनी एकमताने हो सांगितले. आईच्या आणि आजीच्या अनेक सूचना नंतर सर्वांचा जवळच्या ओढ्यावर मासे पकडायला जाण्याचा प्लॅन ठरला. घराच्या जवळच मागे एक ओढा होता ओढ्याला त्यावेळी चांगले खळाळणारे पाणी असायचे. ओढा फार खोल पण नव्हता, जास्तीत जास्त गुडघ्यापर्यंत पाणी असायचं. मासे पकडण्यासाठी ची आमची तयारी सुरू झाली. घरामध्ये एक जुने पातळ उपरणे सापडले. आईकडून एक रिकामी काचेची मोठी बाटली घेतली. उपरण्याच्या उपयोग मासे पकडण्याचे जाळे म्हणून करणार होतो. आणि सापडलेले मासे बाटली भरून घरी आणणे असा प्लान ठरला. या माशांचे बाटलीत एक्वेरियम तयार करायचे आणि रोज ते मासे कसे मोठे होतात ते पाहायचे. हे आमचे प्रयोगातून विज्ञान आहे असे आईला सांगितले होते.

आमची सहा भावंडांची गॅंग मासे पकडायला निघाली. ‌ ओढ्यावर पोहोचताच गुडघाभर पाण्यात आधी खूप उड्या मारून घेतल्या. मग आम्ही मोठ्या चौघांनी  उपरण्याची चार टोके धरून उपरणे पाण्यात बुडवले. बऱ्याच वेळाने एक छोटासा मासा पोहत पोहत आमच्या उपरण्यात आला. "मासा आला, मासा आला" चौघांनी ओरडाआरडा केला ... आमच्या उपरणे गुंडाळण्याच्या झटापटीत तो सुटून गेला. पकडण्यासाठी चौघांचे को-ऑर्डिनेशन जमणे अवघड झाले. मासे उपरण्याच्या पाण्यात येत तर होते पण आम्ही उपरणे बंद करायच्या आतच ते पळून जायचे. खूप कष्टानंतर आम्हाला यश आले आणि कसेतरी एक मासा आम्ही उपरण्यात पकडला. आमच्या धीट भावाने तो मासा हातात पकडून  बाटलीतील पाण्यात टाकला. आमची दोन छोटी भावंडे खुप त्रास देत होती. "सापडला का रे मासा दादा...थांब मला पण पकडू देत ना मासा .." असे करत सारखी मध्ये मध्ये येत होते. दादाचा पेशंस आता गेला होता. " गप्प बसा रे बारक्यानो, आणि तुम्ही जरा नीट उपरणे धरा " असा आमच्यावर आरडाओरडा केला. चार तासांच्या कष्टानंतर आम्हाला टोटल चार  मासे पकडण्यात  यश मिळाले. घरी येऊन आईला आणि आजीला मासे पकडण्याचे अतिरंजित वर्णन करून  सांगितले आणि ते बाटलीतील मासे घरात आणण्यास परवानगी मिळवली. 

 माशांना काय काय खायला टाकले तर चालते हे खूप चौकशा करून ज्ञान मिळवले. दिवसभर त्या बाटलीमध्ये खाण्याचे पदार्थ टाकायचे आणि मासे कसे खातात ते बघत बसणे. दोन ते तीन दिवसानंतर ह्या माशांच्या तोंडाचा आकार हळूहळू बदलायला लागला. तसेच त्यांचे कल्ले देखील विचित्र आकार घेऊ लागले. आपण काहीतरी विशेष मासे पकडले असावेत असा विजयी भाव आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर होता.

आम्ही शाकाहारी फॅमिली असल्याने मासे फक्त सार्वजनिक उद्यानातील एक्वेरियम मध्येच पाहिले होते. माशांची पिल्ले कशी दिसतात हे कोणालाही माहिती नव्हते. माशांच्या बाटलीची रवानगी मागच्या परसात होती.  घरामध्ये माशांची बाटली  ठेवण्यास परवानगी नव्हती. मांजरीने मासे खाऊ नयेत म्हणून आम्ही एका उंच कठड्यावर ती बाटली ठेवली. एका आठवड्यानंतर आमच्या बाटलीतील एक मासा नाहिसा झाला

खूप शोधूनही तो जमिनीवर सापडला नाही म्हणून बहुतांश मांजरीने खाल्ला असावा असे आम्हाला वाटले. दोन दिवसांनी अजून एक मासा नाहीसा झाला असे करत शेवटी एकच मासा बाटलीत राहिला. आम्ही सर्वजण फरशीवर मासा शोधत होतो. मागच्या परसात भांडेवाल्या मावशी भांडी घासत होत्या.  त्यांनी विचारले "काय शोधताय पोरांनो फरशीवर? काय हरवलेय  तुमचे? आम्ही आमच्या माशांचा  दुःखद  किस्सा सांगितला. "अहो मावशी आम्ही खूप कष्टांनी चार मासे पकडले होते ओढ्यातून आणि एक्वेरियम तयार केले होते. पण मांजरीने आमचे तीन मासे खाऊन टाकले बहुतेक " मावशी हात धुऊन घाईघाईने जवळ आल्या आणि म्हणाल्या "अरे पण मांजर आली असती तर तिने बाटली खाली पाडली असती ना! आणि सगळेच मासे खाल्ले असते .. एक मासा अजून शिल्लक दिसतोय की तुमचा, बघू मला जरा!" त्या माशाला बघून मावशी खो खो हसू लागल्या आम्ही थोडेसे कावरेबावरे झालो. मावशी का  हसते असते ग! तर मावशी म्हणाली " पोरांनो हा मासा नव्ह! ही बेडकाची पिल्ले हायेत! उड्या मारुन पळाले असतील ती बाटलीबाहेर " तेवढ्यात आजी तावातावाने बाहेर आली आणि म्हणाली "तरीच मला काल धुण्याच्या कपड्यांच्या बादलीत बेडकाचे पिल्लू दिसले. काय ह्या पोरांचे उद्योग". आई आजी आणि मावशी, तिघीही जोर जोरात हसू लागल्या. "काय रे पोरांनो तेवढे उद्योग करून मासे पकडलेले, तीही बेडकाची पिल्ले निघाली!" आमच्या डोक्यात आता दिवा पेटला "बाटलीतले मासे गेले कुठे?"

Anagha Mahajan

No comments:

Post a Comment