Tuesday, 1 September 2020

पर्यटन व्यवसायातील अध्वर्यु...! (भाग १)

 शीला आणि शरद किराणे...

पर्यटन व्यवसायातील अध्वर्यु...! (भाग १)

किराणे मूळचे सोलापूर जवळच्या खेड्यातले. पांच बहिणी , दोघे भाऊ आणि आईवडील मिळून चरितार्थासाठी १९५० मध्ये पुण्यात आले. धाकटा शरद स्टॅंडर्ड ऑइल मिल्सच्या ( HP ) पेट्रोल पंपावर कामाला लागला. ४- ५ वर्षात पंप बंद झाला ; पण धंद्यातल्या खाचाखोचा शिकायला मिळाल्या. मग यात्रा कंपनीमध्ये नोकरी धरली.
भावाचाही व्यवसाय करण्याचा विचार झाला , तेव्हा दोघांनी मिळून १९५७ मध्ये ' जयलक्ष्मी यात्रा कंपनी ' ची मुहूर्तमेढ रोवली.
काशीसी जावे... नित्य वदावे... ही त्याकाळच्या पर्यटन-सीमा! सगळ्या कंपन्याच्या त्रिस्थळी, बद्रिकेदार , काशी - रामेश्वर ह्यासारख्या तीर्थक्षेत्रांना सहली जात.
मुंबईत त्या काळात एकच गुजराथी कंपनी होती. जेवण हा कळीचा मुद्दा असायचा. प्रवासात शरदकाकांना लोक भेटत. " तुमच्याशी संपर्क साधणं कठीण पडतं , " असं म्हणत. मग १९६१ च्या पानशेतच्या पुरानंतर शरदकाकांनी गिरगावला ' जयलक्ष्मी ' ची शाखा काढली.

त्या काळच्या सहली रेल्वेच्या C.T.S. च्या बोगीने व्हायच्या. रेल्वेने बनवलेल्या या डब्यांमध्ये दोन मोठी कंपार्टमेंट्स असत. यात ४०/ ४० माणसांची सोय होत असे. मध्यभागी स्वयंपाकघर आणि एक ऑफिस आसायचं. चार टॉयलेट्स. त्यातील दोनाचं बाथरूम मध्ये परिवर्तन केलं जायचं. सोबत शिधा आणि आचारीही असायचा. ताज्या भाज्या, दूध-दही ह्याची शहरांतून आवक व्हायची. घडीच्या टेबलांवर चालू गाडीतसुद्धा जेवणं व्हायची ! पर्यटन स्थळी गेल्यावर हे रेल्वेचे डबे गाडीपासून वेगळे काढून सायडिंगला ठेवत. तिथे चुली घालून स्वयंपाक होई , प्लॕटफॉर्मवर पंगती बसत. त्या ठिकाणचे स्थलदर्शन झाल्यावर तो डबा पुढच्या रेल्वेला शंटिंग करून जोडला जाई. सगळे सणवार ह्या डब्यातंच पार पडत. वीस ते चाळीस दिवसांच्या सहली असायच्या. सगळ्यांचक एक कुटुंबच होऊन जायचं !

१९६१ ते ६७ पर्यंत सगळा भारत पालथा घालून झाला. लोकांचं काश्मिरचं वेड वाढू लागलं होतं. हा एकटा व्यवास्थापक मोठमोठ्या सहली नेऊन कुठल्याही गोंधळाशिवाय कसा परत येतो... म्हणून लोक स्टेशनवर शरदकाकांना बघायला , भेटायला येत !
१९६५-६६ च्या सुमारास अमरनाथच्या एका सहलीत त्यावेळी अभावानेच येणारा असा तरुण मंडळींचा ग्रुप आला होता. एका सुखवस्तू घरातील सावळी, स्मार्ट, उंच, तरतरीत, हसतमुख, बोलकी मुलगी आणि ह्या सहलीतील गोरागोमटा, उमदा, हसरा, माणूसवेडा, महत्वाकांक्षी तरुण मालक ह्यांच्यात प्रेमबंध जुळले ...आणि एका अमेरिकन कंपनीत मोठ्या पदावर असणाऱ्या नेरुरकरांची मुलगी शरदकाकांच्या ह्या बेभरवशाच्या उद्योगात पदर खोचून कामाला लागली. ३० एप्रिल १९६७ ला तिचं लग्नं काकांबरोबरच कष्टांशीही झालं ! मे महिन्यातच दोघेही चाळीसजणांची काश्मीरची सहल घेऊन गेले; तोच त्यांचा मधुचंद्र ! १९६७ च्या अखेरीस यांच्या कंपनीचं नामकरण ' आराधना ट्रॕव्हल सर्व्हिसेस ,' असं झालं.
सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना सवलती मिळू लागल्याने पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. मुंबईच्या पार्ल्यात ' दयाळाश्रम ' हे आराधनाचं आॉफिस आणि किराण्यांचं घरही झालं !
शीलाकाकू एकटीनेही सहली घेऊन जाऊ लागल्या. बाई व्यवस्थापक म्हटल्यावर लोक बिचकत. पण किराण्यांचा लौकिक तोवर सर्वदूर झाला होता. वागण्यात आपलेपणा , गप्पा आणि स्वादिष्ट जेवण यामुळे स्नेहबंध निर्माण होण्यास वेळ लागत नसे. जाहिरातीची गरजही पडत नसे.
५ मे १९७७ ' काश्मीर स्पेशल ट्रेन' नंतर ह्या जोडीने मागे वळून पहिलं नाही.
एकदाच सहलीबरोबर काश्मिरला जाऊन आल्यावर काश्मिरसहली आता शीलाकाकूच नेऊ लागल्या. काकांनी ग्रुप दिल्लीला नेऊन सोडायचा; सहल पूर्ण करून झालेला ग्रुप घेऊन शीलाकाकूंनीही दिल्लीला परतायचं. लोकांची आदलाबदल करून काकू पुन्हा काश्मिरला रवाना होत असत. असे तीन तीन महिनेही जात. आजच्यासारखी फोनची सोयही नव्हती तेव्हा !
सीझन तोंडावर आला की घरात गडबड उडायची. शिधा बांधून घ्यायचा म्हणजे मसाले , चटण्या , मुरांबे , लोणची ... शेव - चिवड्यांचे प्रकार , दिवाळीसाठी अनरश्यापासूनचे फराळाचे पदार्थ ... याची तयारी घरातच व्हायची.
शरदकाकांकडे ६० जणांचा एक खास मित्रांचा गट होता. वर्षांच्या प्रारंभी एखाद्या रविवारी सर्वजण किराण्यांच्या घरी जमत. जगाचा , भारताचा नकाशा आणि कॅलेंडर जवळ असे. या बैठकीतून नवनवीन सहली जन्म घेत. कोस्ट-टू-कोस्ट (मुंबई ते चेन्नई समुद्रकिनाऱ्याने २२ दिवस) हे एक उदाहरण ! १९७९ मध्ये श्रीलंका सहलींचा जन्म झाला. मुंबई - रामेश्वर रेल्वेने आणि त्यापुढे रामेश्वर - तलैमन्नार (श्रीलंका) बोटीने , असा प्रवास व्हायचा. १९८० मध्ये श्रीलंका आणि लक्षद्वीपही सुरू झालं.

१९८२ मध्ये अंदमान सहलींचा प्रारंभ झाला. आठवड्यातून एकदाच विमान जायचे , यायचे... पर्यटकांची सोय युथ हॉस्टेलमध्ये केली होती. एका हॉलमध्ये ४० पुरुष, दुसऱ्यात ४० महिला आणि एका हॉलमध्ये किचन व डायनिंग. त्यानंतर दोनच वर्षांत N. K. INTERNATIONAL हॉटेल तयार झालं आणि त्याचं उदघाटन शीलाकाकूंनी -पर्यायाने आराधनाच्या ग्रुपने केलं. ६०/६२ च्या सुमारास अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये जेलर असलेले व अंदमानातील महाराष्ट्र मंडळाचे एक संस्थापक अण्णा हर्षे स्वतः आराधनाच्या प्रत्येक ग्रुपला अंदमानची संपूर्ण माहिती सांगण्यासाठी येत. अशी अनेक माणसे ह्या जोडीने जगभर जोडली.
अंदमाननंतर लेहलडाखचाही समावेश झाला.
१९८३ साली शरदकाकांनी पूर्वांचल - सेव्हन सिस्टर्सच्या सहली धडाक्यात सुरु केल्या. ह्या भागांत सहली नेणारी ' आराधना ' ही एकमेव पर्यटन संस्था होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतल्या या सहली !

क्रमशः
स्वाती कर्वे

No comments:

Post a Comment