वैताग सोडा. आनंदी व्हा
आज माझ्या एका
मैत्रिणीचा फोन आला जाम बोअर झाल्याचा. कारण काय तर आता ज्येष्ठ नागरिक असल्याने
गेल्या ६, ७ महिन्यांपासून कुठे बाहेर जाता येत नाही. काही खरेदी करता येत नाही.
इतरही कोणी घरी येत नाही. काय करावे समजतच नाही. श्रावण, गौरी, गणपती होते तोवर
जरा बरे होते. आता पितृपंधरवडा लागला की वैताग येईल. आणि अचानक मला म्हणाली, ‘तू काय करतेस ग
दिवसेंदिवस घरात राहूनॽ आत्ताही बोलतांना अजिबात कंटाळलेली दिसत नाहीस. मस्त हसून
बोलतेस. तुझी मुलं परदेशातून परत आली की कायॽ’
तिला जे उत्तर दिले तेच सर्वांसाठी. आनंदी
रहायला भोवतीची परिस्थिती सहाय्य जरुर करते. पण आनंद आपल्यातच असला पाहिजे. आपला
आपणच निर्माण केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की आनंद कसा निर्माण करायचाॽ तर सोप
आहे. सगळ्यात पहिले आपण एकटे आहोत ही चुकीची जाणीव सोडली पाहिजे. तो परमात्मा, देव
आपल्यातच वास करुन असतो. कायम सोबत असतो. म्हणजेच आपण एकटे नसतो कधी. आपली
नित्यकर्मे आपल्याला करायलाच हवीत. मग तीच सहजतेने केली की त्रास वाटत नाही. त्रास
वाटला की काम करायचा कंटाळा येतो. सध्या तर इतकी साधने उपलब्ध आहेत की आपल्या आपडीचे छंद आपण सहज जोपासू शकतो. ज्यांना
नामस्मरण प्रिय आहे त्यांना तर अजिबातच कंटाळा येत नाही. त्याचाच आनंद इतका असतो
की या भौतिक जगाकडे त्यांचे लक्षही जात नाही.
व्हाटसअप, युट्यूब, फेसबुकवरही खूप चांगल्या
गोष्टी असतात. आपण आपल्याला हव्या त्या शोधल्या की मार्ग सापडतो. ज्येष्ठ
नागरिकांना तर त्यांच्या अनेक आठवणी, अनुभव सोबतीला असतात. त्यांचे स्मरण करता
येते. आपल्याला आलेले काही गमतीचे अनुभव असतात. ते आठवावेत. मनसोक्त हसावे. सध्या
आम्ही, आमच्या वासुदेव वर्गाच्या बाई लॉकडाऊन असल्यामुळे संथा वर्गातील
विद्यार्थ्यांना ऑनलाईन श्लोक पाठवतात, त्याचे दृढीकरण घेतो. साधारणपणे पाठविलेले
श्लोक एकदा दोनदा ऐकावेत आणि पुस्तकात पाहून म्हणावेत. सराव करून मग रेकॉर्ड करुन
आम्हाला पाठवावेत अशी पद्धत. सर्वसाधारणपणे सगळेच ती अवलंबितात. मात्र एक दोनदा
एकीने श्लोक ऐकले आणि सराव न करताच म्हणून मला पाठवून दिले. मी ऐकले आणि तिला
कळवले की आज तू सराव न करताच श्लोक म्हटले आहेस. तर तिकडून ती विचारते, अय्या!
तुम्हाला कसे कळलेॽ मी तर काही समोर नाहीये तुमच्याॽ तुम्हाला दिव्य दृष्टी आहे का
संजयासारखीॽ आहे की नाही गंमत.
उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीतून नवे पदार्थ
करुन खावेत. आणि ते पचतील एवढा व्यायामही करावा. आपल्याच खिडकीतून, दरवाजातून
आजूबाजूचे निरीक्षण करावे. आत्तापर्यंत दुर्लक्षित झालेले खूप काही दिसेल पहा.
गीतेचा आणि दासबोधाचा अभ्यास शक्य होईल त्याने जरुरच करावा. कोणतेही ग्रंथ
आपल्याला समृद्धच बनवतात यात शंका नाही. पण या दोन ग्रंथांचा अभ्यास केला तर आपण
मानव म्हणून जन्माला आल्यानंतर काय करायला हवे ते आपल्याला समजेल अशा शब्दात पण
परखडपणे उमजेलच. माझी खात्री आहे की मग काय करावे, कसे करावे हे प्रश्नच निर्माण
होणार नाहीत. जे जे करायला हवे त्यासाठीचे प्रकल्पच प्रकल्प दिसतील आणि जाणवेल की
अरेच्चा हे तर नक्कीच करता येईल.
आता मी व माझ्या काही मैत्रिणी, माझी सून व
तिच्या मैत्रिणी, माझ्या सहाध्यायी करत असलेल्या उपक्रमांची झलक – गीतेचे २ अध्याय
क्रमशः रोज वाचणे, साप्ताहिक गीतापाठ करणे, गीताव्रती, ज्ञानेश्वरी, दासबोध यावरचे
स्वाध्याय लिहिणे, अनाथाश्रमातील बालकांसाठी दिवाळीपूर्वी स्वेटर तयार करणे,
गोष्टींचे अभिवाचन, लेखन, पत्राद्वारे
काही अभ्यासक्रमांच्या परिक्षा घरूनच देणे.
सोप्या, साध्या पण नविन रेसिपींची देवाणघेवाण करणे, एकाद्या वेगळ्या पण छान
असलेल्या विषयांच्या पोस्ट पास करणे, कोणाला सहकार्य आपल्याला देता येत नसेल व
इतरांकडून मिळेल असे वाटल्यास त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोचवणे. आता मला सांगा हे
सगळे करतांना वेळ किती आनंदात जातो ते जिची तीच सांगेल नक्की.
बोअर झालेल्या, वैतागलेल्यांनो मनावरचे मळभ
झटका आणि लागा उद्योगाला. आनंद जवळच आहे तुमच्या.
No comments:
Post a Comment