आज आमच्या एकुलत्या एका कन्येचा वाढदिवस होता. जावयांसहा तिलाच घरी बोलावलं होतं. कल्याणीने अगदी फक्कड बेत केला होता. बिर्याणी, फ्लाॕवर रस्सा, टामॕटोचं सार,गुलाबजाम, पु-या, चटणी, कोशिंबीर, पापड....आणखी काय काय सांगू? तोंडाला नुसतं पाणी सुटलं होतं. पण मी सध्या डाएटवर होतो. त्यामुळे कल्याणीने माझ्यासाठी मात्र भाकृरी आणि पालेभाजी बनवली होती. आणि मोठे उपकार केल्यासारखा १ गुलाबजाम वाढला होता..
पण त्यामुळे माझं तोंड इतकं खवळलं होतं की मध्यरात्री आता कुणाचा पहारा नाही असं पाहून मांजरीच्या पावलांनी हळूच स्वयंपाकघरात गेलो. सुदैवाने सगळे पदार्थ उरले होते. पण सगळे फ्रीजमध्ये.. नाईलाजाने बिर्याणी, रस्सा यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि पु-यांची एक चवड, चटणी आणि चांगले ५/६ गुलाबजाम पोटात गेल्यावर पोटोबा जरा तृप्त झाला. आणखी एखाददुसरा गुलाबजाम घ्यावा म्हणून जरा वळलो.. .तो दोन्ही हात कमरेवर ठेऊन रखमाईच्या थाटात उभी आसलेली कल्याणी मला दिसली. शरमिंदेपणाने हसत मी म्हणालो, " कल्लू, मी एखादा मोठा गुन्हा केलाय असं बघू नकोस ग प्लीज माझ्याकडे.. अग, भुकेने पोटात गुरगुर आवाज होत होता ग! म्हणून.."
तिची नजर टाळून मी पुन्हा म्हणालो, "अग, हो! कबूल आहे मला! मागच्या महिन्यात माझ्या छातीतून कळा येऊ लागल्या तेव्हा मीही घाबरलो होतो. डाॕ. श्रीखंड्यांनी ३०/४०पौंड वजन कमी करायला सांगितलंय मला... पण मला ही उपासमार नाही सहन होत ग! भूक लागते मला एकसारखी.. असं उपासाने मरण्यापेक्षा मी चक्क हार्टफेलनी मेलो तरी परवडेल!" आसं म्हणून मी जिभ चावली. मरणाचं नाव काढलं तर कल्याणीच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागतील म्हणून धास्तीने मी तिच्याकडे पाहू लागलो. वजनामुळे मला आधूनमधून धाप लागत होती. हाय ब्लडप्रेशरचा नविनच त्रास सुरू झाला होता. हे सगळं खरं असलं तरी त्याचा एवढा बाऊ करण्याचं काही कारण नव्हतं. मी काही इतक्यात मरत नाही असं मला वाटत होतं. पण नेमकं याच्या उलट तिला वाटत होतं. आता ती चिडेल, रागवेल, रडेल माझी चांगली खरडपट्टी काढेल असं मला वाटलं.. पण तसं काहीच घडलं नाही. " चाला, झोपा आता.. रात्र खूप झाली आहे .. असं म्हणून ती मला बेडरूममध्ये घेऊन गेली.. आणि माझ्या अंगावर हात टाकून शांत झोपी गेली.
दुस-या दिवसापासून तिने माझे सगळे डाएट बंद करून टाकले आणि मला म्हणाली, "आजपासून परत पहिल्यासारखं.. तुम्हाला जे हवं ते जितक्या वेळा हवं तितक्या वेळा खा. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा हक्क आहे. अगदी मालासुद्धा त्यात एका मर्यादेपलिकडे लुडबूड करण्याचा अधिकार नाही. तुमचं सगळं डाएट सांभाळताना मला नाही का त्रास होत? तुम्हाला सगळं सांगून समजावून झालं आहे. तुमच्यासाठी त्रास घ्यायलाही तयार आहे. यापुढे मी बापडी अधिक काय करणार?जाणत्या मनुष्यास दारूड्याची कितीही कणव आली तरी त्याचा काय उपयोग?"... "ए, हे बरोबर नाही हं! माझ्या खाण्याची तुलना दारूड्याशी करतेस तू?" मी एकदम उसळून म्हणालो. तसं ती शांतपणे म्हणाली, " दारूच्या व्यसनासारखंच हे अती खाण्याचं व्यसनच आहे. आणि तेही तितकंच घातक आहे.. जाऊ दे! मी आता हट्ट सोडलाय." असं म्हणून ती तिच्या कामाला निघून गेली.
पण त्यादिवसापासून मी अगदी खूश होतो. माझ्या जिभेचे चोचले आगदी भरपूर पुरवून घेत होतो. त्या दिवसापासून कल्याणीही खूप बदलली होती. घरातील दिव्याचा फ्यूज गेला तेव्हा तो कसा लावायचा हे तिने माझ्याकडून शिकून घेतले. ड्रायव्हिंग शिकून घे शिकून घे असे मी तिच्या मागे लागायचो आणि ती दुर्लक्ष करायची.. पण आता स्वातःहूनमाझ्या मागे लागून तिने ड्रायव्हिंग शिकून घेतलं.. आधी टू व्हिलर.. मग फोर व्हिलर.. आपले फंड्स कसे किती आहेत हे जाणून घेण्यासाठी उत्सूक झाली. मी तिला सगळं समजावून सांगितलं. शेअर्स, विमा, ग्रॕच्युइटी, प्राॕव्हिडंट फंड्स, फिक्स डिपाॕझिट्स, बँकबॕलन्स याकडे तिने यापूर्वी कधीघ फारसं लक्ष दिलं नव्हतं.पण आता मात्र तिने सगळे छान समजावून घेतले. मला हा सुखद धक्काच होता. आज मला म्हणाली, " मी आता पुन्हा शिवणाचा क्लास जाॕईन करणार आहे. ब-याच दिवसात शिवणयंत्राला हात लागलेला नाही. धूळ खात पडलंय मशीन.. अजून अॕडव्हान्स काही शिकून घ्यायचं बळ माझ्यात आहे तंवर शिकून घेते." मी तिला नको नकोच म्हणत होतो.. पण क्लास जाॕईन केला. छान छान ड्रेसेस शिवू लागली, अलिकडे ती जरा माॕड झाली होती. फॕशनेबल ड्रेसेस घालू लागली होती. त्यामुळे मुळातच छान असणारी कल्याणी आता अधिक सुरेख दिसू लागली होती. मी ही सुखावतंच होतो. एके दिवशी तिने माझी परवानगी घेऊन जुनं खंडलेलं मंगळसूत्र नव्या फॕशनप्रमाणे घडवून घेतलं. पाहाणा-याला एखादी चेनच आहे असे वाटावे असे होते. अगदी खाली वाट्यांच्या पदकाजवळ उगीच थोडेसे काळे मणी होते. मला काही ते फारसे आवडले नाही. पण मी काही बोललो नाही. या दरम्यान माझे खाणे पिणे मात्र मी अगदी मनसोक्त मला हवे तसे करत होतो. चमचमीत पदार्थांवर ताव मारत होतो. दर २/३ तासांनी मला भूक लागत असे आणि खाल्ल्याशिवाय मला राहावत नसे. मला जे हवं ते कल्याणी मला करून देत होती. त्यामुळे मी जाम खूश होतो.
एकदा कल्याणी घरात नसताना असंच मी भरपेट जेवल्यावर माझ्या पोटातून कळा येऊ लागल्या. पण मी फार घाबरलो नाही. जेल्यूसिलच्या गोळ्या चघळल्यावर मला बरे वाटले. इतक्यात माझा फोन वाजला. हिच्या क्लासच्या इनामदार बाईंचा फोन होता. " कल्याणी फडके आहेत का?" त्यांनी चौकशी केली. मी म्हटलं,"नाही.. त्या बाहेर गेल्या आहेत. " तेव्हा त्या म्हणाल्या," त्यांना एक निरोप सांगाल का?" " काय निरोप सांगायचाय?" "त्यांना सांगा की, परवाच्या परिक्षेत त्यांचा १ला नंबर आलाय. आणि एका मान्यवर कंपनीत त्यांना फॕशन डिझायनर म्हणून नोकरी मिळण्याची शक्यता आहे. " " त्यांना नोकरी करायची आहे हे कोणी सांगितलं तुम्हाला?" मी संतापून विचारलं .. तेव्हा त्या म्हणाल्या," अहो, आसं नाही.. नोकरीमुळे त्यांचा एकटेपणा कमी होईल. विडो असल्यामुळे सध्या त्या घरी एकट्याच असतात. त्यांना विरंगुळाही होईल आणि चार पैसेही मिळतील. नाही का?" "अहो, त्या विडो आहेत हे कोणी सांगितलं तुम्हाला? मी त्यांचा नवराच बोलतोय" असं म्हणून मी रागाने फोन खाली आपटला. तिच्या यायचीच वाट बघू लागलो. इतक्यात ती अतिशय उत्साहाने आत येऊन सांगू लागली, " अहो, ऐकलंत का?अहो, माझा की नाही परिक्षेत पहिला नंबर आलाय.. चांगल्या जाॕबची आॕफरही आल्ये." इतक्यात मी तिच्यावर भडकलो. " हो. फोन आला होता त्यांचा. तू विडो आहेस असा समज आहे त्यांचा. या या असल्या मंगळसूत्रामुळेच त्यांचा असा समज झाला असणार! विडो व्हायची इतकीच हौस असली तर होईल तसंच!" असं म्हणून मी रागारागाने घराबाहेर पडलो. चांगलीच भूक लागली होती मला. कोप-यावरच्या कॕफेत जाऊन कोल्ड काॕफी आणि २/४ डोनट हाणूयात.. असा विचार करून कॕफेकडे जाऊ लागलो. इतक्यात मला तिचे शब्द आठवले.. अती खाणे हे दारूच्या व्यसनासारखे व्यसनच आहे. आत्ता तासाभरापूर्वी खाल्लेल आसताना पुन्हा कशी भूक लागली? मनात असा विचार येताच मी चरकलोच.. खरंच हा सवयीचा करिणाम असेल का? हे व्यसनच असेल का? आपल्या चुकीच्यासवयीमुळे खरंच आपल्याला मरण आलं तर...आपल्याला मरण येईल यापेक्षा कल्याणी विधवा होईल आपल्यामुळे! मी धावतच परत निघालो. घरी येऊन बघतो तो कल्याणी तिथेच खुर्चीवर तशीच बसून होती. रडूनरडून तिचे डोळे सुजले होते. मी तिच्याजवळ जाऊन तिचा हात हातात घेऊन म्हणालो,"मी मूर्ख आहे ! बेअक्कल आहे! मला क्षमा कर. माझी चूक माला कळली आहे. मला माझे खाणे कमी करायचे आहे. कृपा करून मला मदत कर." मग काय?ती मला याबाबतीत मदत करायला तत्परच होती. माझे डाएटिंग पुन्हा सुरू झाले. आता मी मनावर घेतले होते. आणि कल्याणी माझ्या पाठिशी होती. अगदी मध्यरात्रीही मला भूक लागली तरी ती मला काहीतरी पथ्याचे करून खायला घालत होती. उत्कट प्रेमाचा हा साक्षात्कारच होता. हळूहळू माझी अती खाण्याची सवय सुटली आणि नवीन उत्साहात मी माझे जीवन व्यतित करू लागलो.
आणि मग एके दिवशी ती मला म्हणाली, " तुम्हाला एकगुपित सांगू का? त्या दिवशी इनामदारबाईंनी फोन माझ्या सांगण्यावरूनच केला होता. मी प्रौढ कुमारिका आहे असे सांगायला सांगितले होते. पण त्यांनीच ही अधिक मात्रा दिली आणि ती बरोबर लागू पडली." मी तिच्याकडे बघतच राहिलो. ती माझ्याकडे बघत मिष्कील हसत होती. तिची युक्ती सोळा आणे सफल झाली होती.
"कल्याणी! काय आहेस ग तू! तुझ्या कल्याणकारी शक्तीपुढे मी नतमस्तक आहे! भारावलो आहे !! निःशब्द आहे!!!"
Shital Joshi
No comments:
Post a Comment